खर्या अर्थाने ऑल राऊंडर व्यक्तिमत्त्व
कै. दत्ता केशव… एक आठवण
आज ३० जून.. आमच्या अण्णांचा, म्हणजे सुप्रसिद्ध, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नाट्य – चित्रपट लेखक, दिग्दर्शक आणि गीतकार कै. दत्ता केशव यांचा जन्मदिन. त्यांचे बालपण खूप गरिबीत गेले होते. त्यांनी आपले विश्व शब्दश: शून्यातून.. नोकरी करत शिकून, कष्टाने उभे केले होते. चिमणी पाखरं, बाळा जो जो रे, पतिव्रता, वैशाख वणवा, महात्मा अशा अनेक दर्जेदार आणि लोकप्रिय चित्रपटांचे निर्माता दिग्दर्शक कै. दत्ता धर्माधिकारी हे दत्ता केशव यांचे गुरु होते. दत्ता केशव यांच्या घडण्यात, उभे राहण्यात कै. दत्ता धर्माधिकारी (आमचे दत्तूकाका) आणि त्यांच्या पत्नी कै. विमल धर्माधिकारी (आमची अक्का) यांचा फार मोठा वाटा आहे. लेखनात कै. मधुसूदन कालेलकर हे त्यांचे गुरु होते. आपल्या दोन्ही गुरूंचा विश्वास सार्थ ठरवत दत्ता केशव यांनी लेखन आणि दिग्दर्शन या दोन्ही क्षेत्रात मोठी कामगिरी केली. त्यांनी लेखन आणि/किंवा दिग्दर्शित केलेले चित्रपट, महितीपट, लिहिलेली नाटके आणि मालिका यांची एकत्रित संख्या ६० हून अधिक आहे.
त्यांचा अति शहाणा हा पहिलाच चित्रपट रौप्यमहोत्सवी झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. त्यांचे बायांनो नवरे सांभाळा, बदला, ओवाळिते भाऊराया, पोरींची धमाल बापाची कमाल, दे टाळी, सावली प्रेमाची, जिद्द, कशाला उद्याची बात, प्रेमासाठी वाट्टेल ते, सेनानी साने गुरुजी असे अनेक चित्रपट गाजले, यशस्वी झाले. दैवे लाभला चिंतामणि, माझा कुणा म्हणू मी, कुंकू जपून ठेव, घरोघर मातीच्या चुली, धंदेवाईक, मवाली अशी अनेक यशस्वी नाटके त्यांनी लिहिली. यातील अनेक नाटके गुजराथी आणि कन्नड रंगभूमीवरही यशस्वी झाली. चित्रपट कारकीर्दीसाठी त्यांना फिल्म रायटर्स असोसिएशनचा जीवन गौरव हा सर्वोच्च पुरस्कार, (आता स्क्रीन रायटर्स असोसिएशन हे नाव आहे) महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार, मराठी चित्रपट महामंडळातर्फे चित्रकर्मी पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले. नाट्य लेखनासाठी आचार्य अत्रे पुरस्कार, गो. ब. देवल पुरस्कार, राम गणेश गडकरी पुरस्कार या पुरस्कारांसह गुजराथी आणि कन्नड रंगभूमीचेही सन्मान त्यांना प्राप्त झाले होते.
सुप्रसिद्ध निर्मात्या सुषमा शिरोमणि यांच्यासाठी त्यांनी लिहिलेल्या / दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांत इमोशनल ड्रामा, तूफान कॉमेडी, संघर्ष आणि हिन्दी चित्रपटांच्या तोडीची, डोळे दिपवणारी अॅक्शन हे सारे असे. त्या भिंगरी, फटाकडी, मोसंबी नारिंगी या महोत्सवी चित्रपटांच्या यशस्वी हॅटट्रिकमुळे त्या काळात दत्ता केशव कौतुकाने मराठीतले मनमोहन देसाई म्हणून ओळखले जात.
दत्ता केशव आणि आमचा लाडका अंतामामा, म्हणजे कै. अनंत धर्माधिकारी यांनी अनेक चित्रपटांसाठी एकत्र काम केले होते. व्यावसायिक आयुष्यातील दिग्दर्शक – संकलकाची ही जोडी, व्यक्तीगत आयुष्यातही मित्रांची धरम वीरची जोडी होती.
दत्ता केशव हे खर्या अर्थाने ऑल राऊंडर होते. लेखन आणि दिग्दर्शनात भरीव कामगिरी करत असताना त्यांनी नवरंग साप्ताहिकाचे संपादनही केले. अनेक लोकप्रिय चित्रपट गीतेही लिहिली. अनेक हिन्दी मराठी मालिकाही लिहिल्या. वयाच्या पंचाहत्तरीनंतरही त्यांनी ‘अपूर्ण विराम’ हे आत्मचरित्र, ‘धवलकीर्त’ हे त्यांचे गुरु कै. दत्ता धर्माधिकारी यांचे चरित्र, अनेक कादंबर्या, कथासंग्रह, धनंजय व आवाज सारख्या विविध दर्जेदार आणि लोकप्रिय दिवाळी अंकांत ५० हून अधिक कथा असे विपुल लेखन केले.
एवढे काम करूनही, एवढे यश मिळवूनही ते सर्व लोकांशी मृदुपणे, नम्रतेने वागत. समाजात अजातशत्रु होते. नाट्य चित्रपट सृष्टीत दत्ता केशव म्हणून प्रसिद्ध असलेले आमचे अण्णा आईच्या माहेरच्यांसाठी, पुणेकरांसाठी दत्ताभाऊ होते, सासरच्या सातारकरांसाठी मामा होते, वडीलधार्यांसाठी दत्ता होते, काही खास लोकांसाठी डीके होते आणि भाईंदरकरांसाठी दत्ताजी होते. भाईंदरच्या नागरिकांनी प्रेमाने त्यांना पहिला भाईंदर भूषण पुरस्कारही दिला होता. शिक्षिका असलेल्या आमच्या आईने (ती. सौ. मंगल दत्ता कुलकर्णी) त्यांना जीवनातील संकटांत आणि लेखनातही तोलामोलाची साथ दिली. याचा यथोचित उल्लेख करून दत्ता केशव यांनी हा पुरस्कार पत्नीला अर्पण केला होता. त्यांना लेखनात आईने दिलेली साथ ही एक तपस्या होती. लिहिताना अण्णांचे विचार इतके जोरात धावत की त्यांचे अक्षर बाहेरच्यांनाच काय आम्हालाही वाचणे कधी कधी कठीण जाई. पण ते आईला बरोबर समजे. त्यांच्या लिखाणाची सुवाच्य प्रत काढणे हे काम तिने पन्नास वर्षे सातत्याने केले. तिला साहित्याची उत्तम जाण होती त्यामुळे लिखाणावर सकारात्मक चर्चाही ती करू शकत होती.
वडिलांचा वारसा मुलाला मिळतो. त्यांचा वारसा एवढा समृद्ध होता की तो कोणा एकाला पेलला नसता. त्यांच्या लिखाणाचं वरदान मला मिळालं. दिग्दर्शनाच्या दिशेने संगीत (सुप्रसिद्ध मालिका आणि चित्रपट दिग्दर्शक संगीत कुलकर्णी) यशस्वी वाटचाल करतोय. आमची सर्वात धाकटी बहीण अस्मिता (आता सौ. अस्मिता अमोल जोशी) हिने लेखन आणि दिग्दर्शन दोन्ही क्षेत्रांत थोडी शागिर्दी, थोडी मुशाफिरी केली.. करतेय. अण्णांच्या काव्य, गीत लेखन आणि अव्यावसायिक ऑफ बीट लेखन याचा वारसा मात्र आमचा मधला भाऊ संगम याच्याकडे गेला.
अण्णांच्या आत्मचरित्राचे नाव आहे अपूर्ण विराम.. हो अपूर्ण विराम. ते काम आता आम्हाला पूर्ण करायचय.. निदान त्या दिशेने प्रामाणिक प्रयत्न करायचेत.. आम्ही ते यथाशक्ती करतोय.. अण्णांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेतच.. तुम्हा रसिकांचेही हवेत.
सागर कुलकर्णी