दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
डिजिटल मीडिया हेच मनोरंजन क्षेत्राचं भविष्य – सारंग साठे
यूट्यूबसारख्या माध्यमामुळे अनेक हरहुन्नरी कलावंत पुढे आले आहेत. त्यातील ‘स्टॅण्डअप कॉमेडी’ क्षेत्रातील कलाकारांनाही मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळतेय. ‘भारतीय डिजिटल पार्टी’ म्हणजे ‘भाडिपा’ या मराठमोळ्या ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ चॅनलने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. भाडिपाच्या संस्थापकांपैकी एक म्हणजे लेखक, दिग्दर्शक, अभिनेता सारंग साठे. भाडिपाची सुरूवात, सारंगचा आत्तापर्यंतचा प्रवास, डिजिटल प्लॅटफॉर्मविषयची त्याची मते, त्याचे आगामी प्रॉजेक्टस या सगळ्याविषयी सारंगने मनमोकळेपणाने कलाकृती मीडियाशी गप्पा मारल्या आहेत.
१) भाडिपाने मराठी वेबदुनियेत क्रांती सुरू केली असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. या सगळ्याची सुरुवात कशी झाली?
खरं तर क्रांती घडवावी असा उद्देश आमचा कधीच नव्हता. आपल्याला हवं तसं व्यक्त होण्यासाठी माध्यमाची गरज होती. या गरजेतून भाडीपाची सुरूवात झाली. मी, पॉला, अनुषा पुण्यामध्ये एका वेगळ्या प्रॉजेक्टवर काम करत असताना आम्ही चांगले मित्र झालो. तेव्हा एकमेकांशी बोलत असताना आमच्या लक्षात आलं की आपल्याला जे सांगायचंय ते सांगण्यासाठी कुठलंच माध्यम उपलब्ध नाहीये. हिंदीमध्ये त्यावेळी अशा माध्यमांना सुरूवात होऊन चांगला प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे मराठीमध्ये असं काहीतरी सुरू करावं हा विचार डोक्यात ठेवून भाडिपाला सुरूवात झाली.
२) भाडिपा हे नाव कसं सुचलं?
आमचं तिघांची नाव ठेवायची नाहीत हे आधीच ठरलं होतं. हा लोकांचा प्लॅटफॉर्म असल्याने पटकन आपलंस वाटायला हवं. म्हणून पार्टी हा शब्द आला. या नावाचं चांगलं अॅब्रिव्हेशन व्हावं असंही वाटत होतं. जरी मराठी कंटेट आम्ही बनवत असलो तरी आमचं हे आधीच ठरल होतं की फक्त महाराष्ट्रापुरता याला मर्यादित ठेवायचं नाहीये. मराठी भाषेला एका राज्यापर्यंत सीमित न ठेवता आंतरराष्ट्रीय पातळीवर न्यायचं म्हणून भारतीय आणि मग माध्यम कुठलं तर डिजीटल म्हणून हे ‘भाडिपा’ असं नाव ठेवलं गेलं.
३) कास्टिंग काउचची संकल्पना कोणाची? आत्तापर्यंतचा तुझा आवडता एपिसोड?
अमेय आणि निपुण माझ्या कॉलेजमध्ये ज्युनिअर होते. तिथे ते दोघंही अत्यंत मस्तीखोर होतेच पण त्याचबरोबर मिश्किलही होते. त्यांच्या खोड्यांमुळे राग कमी आणि हसायला जास्त यायचं. त्यामुळे या दोघांची ही बाजू लोकांच्या समोर आणण्यासाठी यांना घेऊन काहीतरी करायचं हे आधीच ठरलेलं होतं. त्याप्रमाणे कास्टिंग काउच ही कल्पना डोक्यात आली. कास्टिंग काउचचे श्रिया पिळगावकर, रिमा ताईंबरोबरचा एपिसोड्स मला खूप आवडतात. त्याचबरोबर अजय-अतुलचा पण याच कारण म्हणजे पहिल्यांदा कुणीतरी अमेय आणि निपुणवर भारी पडत होतं.
४) नाटक /सिनेमा/वेबसिरीज जास्त कुठे रमतोस?
मी फार पूर्वीपासून सिरीज बघत आलोय. मला लेखक- दिग्दर्शक म्हणून वेबसिरीज जास्त आवडतात. कारण २ तासात गोष्ट संपलेली मला फारशी आवडत नाही. मला दीर्घकालीन मनोरंजन करायला आवडतं. पण नट म्हणून नक्कीच नाटक करायला जास्त आवडतं.
५) फॅन सोबतचा काही किस्सा? आठवण??
‘आई आणि मी’ याची लोकप्रियता अफाट आहे. म्हणजे हे घरातली ज्येष्ठ व्यक्तीही आणि लहान मुलेही बघतात. अशा विविध वयोगटातल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत येत असतात. मी एकदा माझ्या पुतणीला शाळेत घ्यायला गेलो होतो. त्या लहान मुलांचा मला भेटण्यासाठी, माझ्याशी बोलण्यासाठी माझ्याभोवती अक्षरशः गराडा पडला होता. कुणीतरी शाळेच्या बाहेरच्या बाकावर कर्कटकाने #भाडिपा असंही लिहून ठेवलं आहे. लहान मुलांच हे निरागस प्रेम ही माझी सगळ्यात आत्तापर्यंतची आवडती आठवण आहे.
६) दारू देसी/ ट्रॅव्हल vlogs या साठी अनेक ठिकाणी तुम्ही फिरत असता… आवडतं ठिकाण?
भारताबाहेर म्हणलं तर स्कॉटलंडची रोड ट्रीप ही माझ्यासाठी अविस्मरणीय ट्रीप होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये अमेय आणि निपुण बरोबर असल्याने तीही धमाल ट्रीप झाली होती. भारतातही केरळ, वारणसी, राजस्थान असं मी खूप फिरलो आहे. पण सह्याद्रीवर माझं विशेष प्रेम आहे. मला कुठेही लांब फिरायला जायला आवडतं त्यामुळे एक निश्चित सांगता येणार नाही.
७) तुझा लुक नेहमीच हटके असतो. या मागचं सिक्रेट काय आहे? स्टायलिस्ट की पॉला??
मी कॉलेजमध्ये असताना सुरूवातीला कसेही कपडे वापरायचो. पण नंतर एका मुलीने मला सांगितलं की तुला माहिती आहे का की तुझ्या कपड्यांवरून तुझी चेष्टा केली जाते. तोपर्यंत माझे कपडे कसे आहेत याकडे माझं लक्ष नव्हतं. पण तिने सांगितल्यापासून मी माझ्या कपड्यांच्या बाबतीत थोडा जागरूक झालो. आणि मग खूप मोठं कपड्यांचं कलेक्शन माझ्याकडे आहे. भारतीय डिझाइनरही खूप छान प्रयोगशील कपडे बनवत असल्याने माझ्या कपड्यांमध्ये ती विविधता आणायला मला आवडते.
हे वाचलंत का: चिकटगुंडे – लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या चार जोडप्यांचं भावविश्व पाहिलंत का?
८) या क्षेत्रात नसतास तर मग काय केलं असतस ?
मला असं सांगता येणार नाही. कारण मी सी.ए. करत होतो. फोटोग्राफी, लाइटींग, इंटिरियर डिझाइन असं बरच काय काय मी करून पाहिलय. कदाचित अजून ८-१० वर्षांनंतर हे डिजीटल युग सोडून मी शेतीही करेन. त्यामुळे असं ठरवून काही करावं असं मला वाटत नाही.
९) ट्रिपलिंग मधला मार्को पोलो, ब्राईट डे मधला शिव ते अगदी जुई चा बबु… तुझी प्रत्येक भूमिका वेगळी आहे… या सगळ्यात खरा सारंग साठे कसा आहे?
सारंग कसा आहे तर आपण असं म्हणू शकतो की शिवपासून सुरूवात झालीये आणि आता बबू एवढा दिलखुलास आहे. ब्राईट डे मधल्या शिवची शोध घेण्याची प्रक्रिया आता संपली आहे असं मला वाटतं. आता चांगलं काम करून लोकांच मनोरंजन कसं करता येईल याकडे जास्त लक्ष असत. त्यामुळे मला वाटतं जो स्टॅण्डअप करतानाचा सारंग आहे तो खरा सारंग साठे आहे.
१०) आगामी प्रोजेक्टस??
भाडीपाचे तीन मोठे आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टस येत आहेत. त्यातला एक कॉमेडी, एक डार्क कॉमेडी आणि एक डिटेक्टिव शो असणार आहे. आणि यातल्या प्रत्येक प्रॉजेक्टमध्ये माझा काही ना काही सहभाग असणारच आहे. माझी छोटी पण महत्त्वपूर्ण भूमिका असणारी एक वेब सिरीज एका मोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर लवकरच येईल.
११) ओटीटी किंवा डिजिटल प्लॅटफॉर्म हे मनोरंजन क्षेत्राचं भविष्य आहे असं वाटतं का ?
नक्कीच आहे. आत्ता करोनाच्या काळात जरी ओटीटी किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर वाढला असला तरी आम्हाला हे फार पूर्वीपासून वाटत आहे. टी.व्ही, सिनेमाच्या पलीकडे जाऊन डिजीटल युग येणार. अजून काही वर्ष हा बदल स्विकारायला जातील. पण डिजिटल हेच मनोरंजन क्षेत्राचं भविष्य असेल असं मला वाटतं.
११) या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांना काय सांगशील?
ह्या क्षेत्राकडे तुम्ही आवड म्हणून बघताय की करिअर म्हणून हे आधी विचार करून ठरवायला हवं. कारण करिअर म्हणून बघत असाल तर आर्थिकदृष्ट्या फायदा कसा होईल याचा अभ्यास असला पाहिजे. डिजिटल क्षेत्रात आल्या आल्या सहज तुम्हाला यश मिळेलच असं नाही त्यामुळे संयम आणि सातत्याने काम करत राहणं इथे महत्वाचं आहे.
मुलाखत आणि शब्दांकन : गौरी भिडे.