नाही कळले कधी.. जीव वेडावला
मालिकांची शीर्षकगीतं तर लोकप्रिय होतातच,पण मालिकांमध्ये सुद्धा एखादं गीत खूप हिट होतं आणि त्यालाही प्रचंड लोकप्रियता लाभते. असंच घडलं होतं ‘होणार सून मी ह्या घरची’ या झी मराठीवरील मालिकेतील एका प्रेमगीताच्या बाबतीत. त्या गीताची जन्मकथा सुद्धा खूप रंजक आहे. ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिका प्रचंड हिट झाली होती. श्री आणि जान्हवी ह्या व्यक्तिरेखा लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत होत्या. दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांचा संगीतकार निलेश मोहरीरला फोन आला की आपल्याला या मालिकेत एक प्रेमगीत करायचं आहे आणि उद्या सकाळी त्याचे शूटिंग करायचे आहे.
संगीतकार निलेश मोहरीरने गीतकार मंदार चोळकर याला फोन केला. आजच्या आजच रात्री गाणे लिहून, त्याला संगीतबद्ध करून ते गाणे अप्रूव्ह करून घेऊन मग रेकॉर्डिंग करायचं आहे, असं मंदारला सांगितलं. पुढे काय घडलं हे सांगताना या गीताचा गायक मंगेश बोरगावकर म्हणाला, “मी त्यावेळी गोरेगावला एका शूटिंगमध्ये होतो आणि हे निलेशला माहित होतं. त्यानं मला माझं काम झाल्यावर पार्ल्याच्या बझ – इन स्टुडिओत यायला सांगितलं. हे गीत युगुलगीत असल्याने निलेशने गायिका सावनी रवींद्र हिला फोन केला होता. ती त्यावेळी पुण्यात होती. ती म्हणाली की मी लगेच पुण्याहून निघते आणि मग रात्री साडे अकराच्या सुमारास ती स्टुडिओत आली.
यापुढचा किस्सा अजून मस्त आहे. गाणे रेकॉर्ड करून पाठवले तेव्हा रात्रीचे दोन वाजले होते. गाणे आवडले, पण पुन्हा असं सांगण्यात आलं की अजून एखादी ओळ काहीतरी यात हवी आहे. गीतकार मंदार चोळकर याला रात्री पुन्हा फोन केला. तेव्हा मंदार चोळकरला झोपेतून उठवले आणि एक ओळ सांग, असे सांगण्यात आले. तेव्हा त्याने ओळ लिहून दिली ‘तू मला मी तुला, गुणगुणू लागलो, पांघरू लागलो, सावरू लागलो’ ही ओळ त्या गीतात समावेश करून पुन्हा संपूर्ण गाणे पाठवले गेले. ते गीत जेव्हा मंदार देवस्थळी याने ऐकले, तेव्हा मालिकेचे शूटिंग रात्री चालू होते. मंदारला आणि सेटवरील सर्वांना ते गाणे खूप आवडले आणि मग दुसऱ्या दिवशी ते गाणे चित्रित होणार असे ठरले.
हे ही वाचा : ‘स्पर्धा स्वत:शीच करा, तरच लांबचा पल्ला गाठालं’, सावनी रविंद्र
दुसऱ्या दिवशी शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान अर्थात श्री आणि जान्हवी यांच्यावर हे गीत ठाणे परिसर, उपवन अशा ठिकाणी चित्रित केले गेले. संगीतकार निलेश मोहरीर, गीतकार मंदार चोळकर, गायक मंगेश बोरगावकर आणि गायिका सावनी रवींद्र असं टीम वर्क प्रचंड यशस्वी झालं. आजही मंगेशला त्याच्या कार्यक्रमात हे गीत गायची फर्माईश केली जाते. मालिकेतलं तुफान यशस्वी झालेलं प्रेमगीत असा या गीताचा उल्लेख करावा लागेल.