‘फियाट टॅक्सी’ राहिली आता फक्त चित्रपटात
सिनेमे जलन आखो मे तुफान सा क्यू है
इस शहर मे हर सक्स परेशान सा क्यू है…
मुंबईमध्ये १९६४ सालापासून म्हणजे तब्बल साठ वर्ष चालणारी फियाट टॅक्सी (Fiat Taxi Memory) बंद झाल्याची बातमी वाचताना मी हेच गाणं गुणगुणत होतो. मुजफ्फर अली दिग्दर्शित ‘गमन’चा (१९७८) टॅक्सी ड्रायव्हर गुलाम हसन (फारुक शेख) मुंबईत टॅक्सी चालवत असताना बॅकग्राऊंडला शहरयार लिखित व जयदेव यांनी संगीतबद्ध केलेल्या सुरेख वाडकरच्या आवाजातील या गाण्यातून मुंबई शहराची सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय स्थितीवरचे अंतर्मुख करण्याजोगे भाष्य आहे. अर्थात, फियाट टॅक्सी बंद झाली असली तरी अन्य माॅडेल व सहा सीटसची टॅक्सी सुरु राहीलच.
टॅक्सी जगभरातील अनेक मोठ्या शहरांची आपली एक ठळक ओळख. मुंबईमध्ये अँबेसिडर टॅक्सीपासून वेगवेगळ्या पद्धतीच्या टॅक्सीची दीर्घकालीन परंपरा आहे आणि त्यात होती एक फियाट टॅक्सी. मुंबैकर तिला ‘काळी पिवळी’ म्हणत. ती आता काळासोबत काही गोष्टी इतिहासजमा होतात, कालबाह्य होतात. हे स्वाभाविक आहे. काळ पुढे सरकतो आणि काही गोष्टी आठवणींच्या रिळात जमा होतात.
एकेकाळी मुंबईत ट्राम होती. ती जवळपास साठ वर्षांपूर्वी बंद झाली आणि त्याच सुमारामध्ये फियाट टॅक्सी सुरु झाली. त्या काळात मुंबईत सहा डब्यांची लोकल ट्रेन, ॲम्बेसेडर टॅक्सी, बेस्ट बस, घोडा गाडी, रिक्षा अशा सार्वजनिक वाहतूक सेवा होत्या आणि तेव्हाच्या लोकसंख्येनुसार त्या पुरेश्या होत्या. मुंबईत शांत व संयमी आयुष्य होते. जुन्या चित्रपटातील मुंबई आवर्जून पाहत राहावी अशीच.(Fiat Taxi Memory)
टॅक्सी आणि सिनेमा नातं दीर्घकालीन. गुरुदत्त फिल्मच्या गुरुदत्त दिग्दर्शित ‘आरपार’चा १९५४ (नायक गुरुदत्त हा टॅक्सी ड्रायव्हर आहे. टॅक्सीतच त्याला प्रेयसी (श्यामा) गाण्यातून कबूली देते, ले लो मै हारी प्रिया चेतन आनंद दिग्दर्शित “टॅक्सी ड्रायव्हर” मध्ये (१९५४) देव आनंद शीर्षक भूमिकेत आहे. जोडीला कल्पना कार्तिक आहे. तेव्हापासून आपण ‘रुपेरी पडद्यावर ‘टॅक्सी पाहत आलो आहोत. चित्रपटातील टॅक्सीमधली काही गाणी माझं असेच एक आवडते गाणं सांगायचं तर बासू चटर्जी दिग्दर्शित “रजनीगंधा’मध्ये (१९७४) दिनेश ठाकूर आणि विद्या सिन्हा टॅक्सीतून प्रवास करत असताना बॅकग्राऊंडला, मुकेशच्या आवाजातील कहीं बार यू देखा है, ये जो मन की सीमारेखा हे गाणे आहे. (गीत योगेश, संगीत सलिल चौधरी) टॅक्सी सुरु असताना दिनेश ठाकूर कल्पनाविलास करतो की, विद्या सिन्हा आपल्या जवळ आली आहे. हा प्रेम त्रिकोणाचा चित्रपट आहे (अमोल पालेकर नायक आहे) बासू चटर्जी दिग्दर्शित अनेक चित्रपटांमध्ये फियाट टॅक्सी आपल्याला दिसलेली आहे. मग ती पासिंग दृश्यात असेल किंवा नायक नायिका टॅक्सीत बसलेत अशी असेल. तो चित्रपट “छोटी सी बात” असेल अथवा “बातो बातो मे” वा” प्रियतमा” असेल.
चेतन आनंद यांनीच आपल्या “टॅक्सी ड्रायव्हर” चित्रपटाची “जानेमन” (१९७६) या नावाने रिमेक केली आणि पुन्हा एकदा मूळ चित्रपटातला “टॅक्सी ड्रायव्हर” देव आनंदच पुन्हा एकदा “टॅक्सी ड्रायव्हर”च्या भूमिकेमध्ये आपल्याला दिसला. फक्त काळाचा फरक पडला होता. पहिल्या वेळी देव आनंदने त्या व्यक्तीरेखेनुसार भूमिका साकारलीय. “जानेमन”च्या काळात तो आपण देव आनंद आहोत हे विसरायला तयार नव्हता. म्हणून तर “जानेमन” मध्ये “ट्रॅक्सी ड्रायव्हर” नव्हे आपल्याला देव आनंद दिसला. जानेमन किसीका नाम नही…गाणे हिट. चेतन आनंदच्याच ‘हंसते जख्म”मध्ये नवीन निश्चल टॅक्सी ड्रायव्हर आहे आणि प्रिया राजवंश त्याच्या टॅक्सीत प्रवासी असताना तुम जो मिल गये हो तो ऐसा लगता है मोहम्मद रफींने गायलेले कैफी आझमीने गायलेले आणि मदन मोहनने संगीतबद्ध केलेलं सर्वकालीन असं छान एक साकारतो.
इर्शाद दिग्दर्शित “टॅक्सी टॅक्सी”(१९७७) मध्ये अमोल पालेकर यांनी टॅक्सी ड्रायव्हरची भूमिका साकारलीय आणि विशेष म्हणजे या चित्रपटात अमोल पालेकर आपल्या टॅक्सीला आपली प्रेयसी नीलम (रिना रॉय) असे नाव देतात. मिथुन चक्रवर्तीने अनेक कष्टकरी व्यक्तिरेखा साकारल्यात. ‘टॅक्सी चोर ” ( १९८०) मध्ये त्याची शीर्षक भूमिका होती. ए. भीमसिंग दिग्दर्शित ” साधू और सैतान” ( १९६७) मध्ये बजरंग (मेहमूद) हा टॅक्सी ड्रायव्हर आहे. त्यात अनेक गंमती जमंती, गडबड गोंधळ आहे. रवी टंडन दिग्दर्शित “खुद्दार” मध्ये अमिताभ बच्चनने टॅक्सी ड्रायव्हरची भूमिका साकारलीय. महेश भट्ट दिग्दर्शित ‘सडक’ मध्ये संजय दत्त टॅक्सी ड्रायव्हर आहे. हा चित्रपट ‘टॅक्सी ड्रायव्हर ” ( १९७६) या विदेशी चित्रपटावर बेतला होता. “मुंबई काली पीली” नावाच्या चित्रपटात ईशान खट्टर आणि अनन्या पांडे यांची भूमिका आहे. २०१५ साली ‘मुंबई टॅक्सी’ नावाचा तमिळ भाषेतील चित्रपटही होता. मुंबईतील टॅक्सी जीवनावर आधारित अनेक प्रकारचे चित्रपट निर्माण होण्याजोगं ते विश्व. त्यात सामाजिक, सांस्कृतिक , आर्थिक, राजकीय, माध्यम असे अनेक संदर्भ आहेत. टॅक्सीवाल्यांच्या सुख दु:खाच्या आयुष्यापासून ते टॅक्सीतील अनेक प्रकारच्या प्रवासी, आणि गोष्टींपर्यंत.(Fiat Taxi Memory)
दोन तीन वेगळ्या गोष्टी सांगतो, रवींद्र महाजनी आपल्या संघर्षाच्या काळात मुंबईत टॅक्सी (Fiat Taxi Memory) चालवायचे. त्यांची त्यामागची भूमिका आणि भावना अतिशय प्रामाणिक होती. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी आपण जर टॅक्सी चालवत असू तर त्यात काहीही नाही असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्यांनी आपल्या टॅक्सीच्या व्यवसायामध्ये आपल्या टॅक्सीत बसलेल्या प्रवाशांचे घेतलेले अनुभव किंवा त्यांच्या ऐकलेल्या गप्पागोष्टी याचा आपल्या अभिनयामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने उपयोग करुन घेतला. खरा संवेदनशील कलाकार असा असतो.
चित्रपटसृष्टी आणि टॅक्सी यांच्या नात्यांतील अजून एक महत्त्वाची गोष्ट , फार पूर्वी फिल्म सेंटर किंवा बाॅम्बे लॅबोरेटरीमधून मुंबई, ठाणे, डोंबिवलीतील विविध चित्रपटगृहांसाठी नवीन चित्रपटाच्या प्रिंट्स फियाट टॅक्सीतून (Fiat Taxi Memory) जात असत. त्यामुळे शुक्रवारी सकाळी अनेक टॅक्सीवाल्यांचा हा एक हुकमी फंडा होता. ते काम जबाबदारीने केले जाई. नवीन वा जुन्या चित्रपटाची पोस्टर्स किंवा पब्लिसिटी मटेरियल फियाट टॅक्सीतून नेलं जायचं. टॅक्सी आणि सिनेमासृष्टी यांचा एक खूप वेगळे आणि बहुस्तरीय प्रवास. एक चांगलं नातं आहे.
===========
हे देखील वाचा : ग्लोबल युगात ‘हा’ चित्रपट ठरला अगदीच ‘सर्वसाधारण’
===========
तुम्हाला कदाचित कल्पना नसेल राज कपूरने शशी कपूरला “टॅक्सी हिरो” असं लेबल दिलं. का माहित्येय? राज कपूर दिग्दर्शित “सत्यम शिवम सुंदरम” ( १९७८) या चित्रपटात शशी कपूर आणि झीनत अमानच्या रोमॅन्टिक भूमिका आहेत. राज कपूरचं वैशिष्ट्य, त्यांच्या चित्रपटाचं चित्रीकरण सत्रे ही दीर्घकालीन असत. त्यासाठी कधी आर. के. स्टुडिओत मोठा सेट लागे अथवा त्यांच्या लोणी येथील राजबागेत अथवा आउटडोर शूटिंग अशा पद्धतीने राज कपूरची चित्रीकरण आयोजित केलं जाई. शशी कपूर नेमका त्या काळामध्ये एकाच वेळेला अनेक चित्रपटांमध्ये बिझी होता. एका चित्रपटाच्या सेटवर चार तास, एका चित्रपटाच्या सेटवर तीन तास असं तो काम करे. म्हणजे कोणत्याही चित्रपटाच्या सेटला पूर्ण दिवस देऊ शकत नव्हता. या स्टुडिओतून वा बंगल्यातून त्या स्टुडिओ वा बंगल्यात अशा पद्धतीने त्याच्या शूटिंगसाठीच्या पळापळीचा फटका राज कपूरला आपल्या दिग्दर्शनातील “सत्यम शिवम सुंदरम” या चित्रपटाला सुद्धा बसत होता. राज कपूरची दिग्दर्शनीय शैली कलाकारांनी आपल्या सेटवर अधिकाधिक वेळ द्यावा, प्रसंग समजून घ्यावे आणि आपल्या व्यक्तिरेखेला न्याय द्यावा अशी होती. अशा वेळी शशी कपूरचं सेटवर येणं आणि जाणं, यातील अनियमतता हे सगळं पाहून राज कपूरनी त्याला “टॅक्सी हिरो” म्हटलं. राज कपूरचे बोल म्हणजे जणू ब्रेकिंग न्यूज. एक प्रकारचे कायमचे शिक्कामोर्तब. शशी कपूर टॅक्सी हीरो या शीर्षकाने कव्हर स्टोरीज, स्कूप, गाॅसिप्स केवढी तरी .
फियाट टॅक्सी (Fiat Taxi Memory) आणि सिनेमा यांचं नातं हे असं बहुरंगी, बहुढंगी. अनेक कलाकार कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात टॅक्सी अथवा रिक्षातूनच शूटिंग स्पॉटवर ये जा करतात आणि त्यात वावगं असं काहीही नाहीये. अगदी लोकल ट्रेन, मोनो ट्रेन, मेट्रो, बेस्ट बस यातूनही प्रवास करणारे कलाकार चित्रपटसृष्टीमध्ये होते नि आहेत. जोपर्यंत स्वतःची गाडी आपण घेऊ शकत नाही तोपर्यंत सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय असतो. फियाट टॅक्सीतून प्रवास केलेल्या कलाकारांच्या आपल्या स्वतःच्या काही आठवणी नक्कीच असतील.. फियाट टॅक्सी आता रस्त्यावर आपल्याला दिसणार नाही. परंतु ती अनेक चित्रपटांमध्ये मात्र दिसेल हे मात्र नक्कीच…फियाट टॅक्सी इतिहासजमा होत जाईल, चित्रपटांच्या फ्लॅशबॅकमध्ये मात्र आठवत राहिल.