मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमधून दिला ‘सवतीचे कुंकू’ चित्रपटाच्या आठवणींना
‘हीरा’ ठरला डाकूपटाच्या वाटचालीत सुपर हिट
आपल्या पिक्चरवाल्यांचे काही अलिखित नियम आहेत. सुपरड्युपर हिट पिक्चरसारखेच धडाधड पिक्चर काढायचे आणि अशाच एकाद्या सुपर हिट पिक्चरमधील भूमिकेसारखीच भूमिका त्या हीरोला द्यायची. मेहबूब खान दिग्दर्शित “मदर इंडिया ‘ ( १९५७) सर्वकालीन बहुचर्चित सुपरहिट चित्रपट. नर्गिसजींच्या मध्यवर्ती भूमिकेतील अभिनयासाठी हा चित्रपट पुन्हा पुन्हा पहावा असाच. त्यातील राधाच्या भूमिकेतील दोन मुलांपैकी एक सरळमार्गी (राजेन्द्रकुमार) तर दुसरा ‘बिघडी हुई औलाद ‘ बिरजू ( सुनील दत्त) हा चक्क दरोडेखोर बनतो. डाकू बनतो. आणि क्लायमॅक्सला त्याची आईच त्याच्यावर बंदूक रोखून गोळी घालते. त्या काळात चित्रपटाचा हा प्रचंड धक्कादायकच. आणि म्हणूनच फार फार चर्चेचा. पिक्चर हिट झाल्यावर सुनील दत्तने पुन्हा एकदा डाकूचीच भूमिका साकारली. (Super Hit)
अजंठा आर्ट्स निर्मित व मोनी भट्टाचार्य दिग्दर्शित ‘मुझे जीने दो’ ( १९६३) चं समिक्षकांनी भारी कौतुक केले. पिक्चरमधील गाणी लोकप्रिय झाली. सुनील दत्त व वहिदा रेहमान यांनी उत्तम अभिनय केला. सुनील दत्तच या चित्रपटाचा निर्माता. डाकू ठाकूर जर्नैलसिंग ही भूमिका गाजली. डाकूमधील माणूसपण दाखवणे असा या कलाकृतीचा हेतू. याचं विशेष कौतुक झाले. आणि त्यानंतर अनेक पिक्चर्समध्ये त्याने डाकूच साकारला.
असाच एक सुनील दत्तची मध्यवर्ती भूमिका असलेला भारी डाकूपट सुल्तान अहमद निर्मित व दिग्दर्शित “हीरा” ( रिलीज १६ नोव्हेंबर १९७३. पन्नास वर्ष पूर्ण. म्हणूनच हा फोकस.) या पिक्चर्सची अनेक वैशिष्ट्य…
‘हीरा’च्या व्यावसायिक यशाने सुनील दत्तचा कमबॅक झाला आणि त्याने आपल्या सेकंड इनिंगमध्ये चांगलाच जम बसवला. त्याचं नायक म्हणून करियर व्यवस्थित चाललेले. अशातच साठच्या दशकाच्या अखेरीस राजेश खन्नाची जबरदस्त क्रेझ निर्माण झाली आणि त्याचा राजेन्द्रकुमार, शम्मी कपूर, सुनील दत्त, विश्वजीत यांना चांगलाच तडाखा बसला. नायक म्हणून त्यांची ‘चलती’ ओसरली. सुनील दत्तकडे काही काळ कामच नव्हते (असं कालांतराने संजय दत्तने एका मुलाखतीत सांगितलंय). अशातच सुनील दत्तला ‘हीरा’ व अली रझा दिग्दर्शित ‘प्राण जाए पर वचन न जाये’ हे दोन चित्रपट मिळाले. दोन्हीत डाकूच. आपली हिट व्यक्तिरेखाच पुन्हा साकारावी, त्यामुळे ‘पुन्हा चांगले दिवस येतील ‘ असं वाटणं स्वाभाविकच हो. प्राण जाए….त रेखा नायिका. पिक्चरमध्ये प्रचंड हिंसा, ओलेती दृश्य या कारणास्तव सेन्सॉरने तो कात्रीत पकडला. काही कटस मिळेपर्यंत वेळ गेलाच. (Super Hit)
‘हीरा’चं रिलीज विशेष ठरले. १९७३ तसं वैशिष्ट्यपूर्ण वर्ष. दो फूल, बनारसी बाबू, दाग, जंजीर, अभिमान, छुपा रुस्तम, अनुराग, कच्चे धागे, बाॅबी , यादों की बारात यांच्या यशाने माहौल बदलला होता. अनेक सिंगल स्क्रीन थिएटर्सवर ‘हाऊसफुल्ल ‘चा हुकमी बोर्ड असे. अशा वातावरणात ‘हीरा’ आला आणि तोही पब्लिकला आवडला. ( पिक्चरचे रिलीज टायमिंग फारच महत्वाचे असते असं म्हणतात ते उगाच नाही) मुंबईत मेन थिएटर गंगा ( ताडदेव)ला गर्दीचा वेढा पडलाय असा ‘बोलका फोटो’ स्क्रीनच्या पानभर जाहिरातीत टाकल्याचे आठवतेय. त्या काळात टप्प्याटप्प्याने चित्रपट प्रदर्शित होत, ‘हीरा’ उत्तर भारतात हमखास हिट होईल अशा फाॅर्मुल्यावरचा चित्रपट. एकिकडे यश मिळताच तो इतरत्र अधिकाधिक विश्वासाने झळकला. आणि सुनील दत्त पुन्हा फाॅर्मात आला.
पिक्चरची कथा के. बी. पाठक यांची. पटकथा सुल्तान अहमद व वजाहत मिर्झा यांची. संवाद वजाहत मिर्झा यांचे. कथासूत्र असे, एका गावातील गोष्ट आहे ही. हीरा ( सुनील दत्त) व आशा ( आशा पारेख) एकमेकांच्या प्रेमात असतात. आशा जमिनदाराची मुलगी. त्यांचं लग्न होणार तोच हीरीवर गावातील एका युवतीवर जबरदस्ती आणि खून केल्याचा आरोप केला जातो आणि त्या शिक्षा होते. आपण निरपराध आहोत हे तो सांगून देखील त्याला न्याय मिळत नाही. तो जेलमधून पळतो आणि चंबळ खोर्यातील डाकू बनतो. आणि तो आपल्यावर अन्याय करणाऱ्यांचा चुन चुन के बदला घेतो. सूडनायक. परिस्थितीतून ‘डाकू ‘ बनतो हे सूत्र प्रेक्षकांना आवडले. चित्रपटात शत्रुघ्न सिन्हा, फरिदा जलाल, अन्वर हुसेन, कन्हैयालाल, सुलोचना, तब्बसूम, सत्येन कप्पू, मॅकमोहन, रणधीर, मुकरी, टुनटुन इत्यादींच्या भूमिका. चित्रपटाची गीते अंजान व इंदिवर यांची तर संगीत कल्याणजी आनंदजी यांचे. मै तुमसे मिलने आयी मंदिर जाने के बहाने हिट.(Super Hit)
सुनील दत्तची भूमिका असलेला राजा ठाकूर दिग्दर्शित ‘जखमी’ ( १९७५) च्या यशाने सुनील दत्तच्या सेकंड इनिंगला चांगलेच टाॅनिक मिळाले. हीदेखील सूडकथाच. चित्रपटाच्या जगात ‘यश हेच चलनी नाणे’, म्हणूनच तर ‘एक हिट पिक्चर मंगता है यार ‘ हा अनेकांचा हुकमी फंडा.
सुनील दत्तची पर्सनॅलिटी, उंची, फिटनेस, लूक पाहता डाकूच्या भूमिकेत एकदम फिट्ट. आणि संतप्तपणा, उद्रेक, संताप व्यक्त करण्यातील नजरेतील, बोलण्याची जरब आणि हातात बंदूक, रुपडंही धोतर नेसलेले, कपाळी मोठा टिळा. यात सुनील दत्त कायमच भारी. ‘हीरा’नंतर सुनील दत्तने अली राझा दिग्दर्शित ‘प्राण जाए पर वचन न जाये’मध्ये राजा ठाकूर, शिबू मिश्रा दिग्दर्शित ‘आखरी गोली’मध्ये विक्रम, चांद दिग्दर्शित ‘राम कसम’मध्ये शंकर, रमेश लखनपाल दिग्दर्शित ‘काला आदमी ‘मध्ये बिरजू, खुद्द सुनील दत्त दिग्दर्शित ‘डाकू और जवान ‘मध्ये बिरजू, चांद दिग्दर्शित ‘अहिंसा’मध्ये बिरजू ( तीन चित्रपटात बिरजू नाव. ‘मदर इंडिया’मुळे ती सुनील दत्तची ओळख झाली. हिंदी चित्रपटात सर्वाधिक वेळा ‘डाकू’ साधारण्याची संधी सुनील दत्तला.
============
हे देखील वाचा : ‘कयामत’ची ही एक महत्वाची आठवण
============
दिग्दर्शक सुल्तान अहमद यांनीही ‘हीरा’नंतर ‘डाकूपटा’तच करियर केले. असतं एकेकाचे वैशिष्ट्य. ‘गंगा की सौगंध ‘( १९७८) मध्ये अमिताभ बच्चन, ‘धर्मकांटा’ ( १९८२) मध्ये राजकुमार, जितेंद्र, राजेश खन्ना, ‘दाता’मध्ये मिथुन चक्रवर्ती ( १९८९), ‘जय विक्रांत ‘मध्ये संजय दत्त असे डाकूपट सुल्तान अहमद यांनी रुपेरी पडद्यावर आणले. सुल्तान अहमद अतिशय बडे प्रस्थ. दोन चित्रपटांच्या निर्मितीत त्यांनी कायमच अंतर ठेवून आपल्या कुटुंब, हौस मौज यांनाही त्यांनी छान वेळ दिला. त्यांची पर्सनॅलिटीही रुबाबदार. त्यांचा सोन्याचा दात आणि पांढर्या शुभ्र पठाणी वस्त्रातील वावर ते कोणत्याही फिल्मी पार्टीत व इव्हेन्टसमध्ये लक्ष वेधून घेत.(Super Hit)
एक फिल्मी गोष्ट. रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ ( १९७५)चं आजही अस्तित्व जाणवतेय. पण ‘शोले’साठी सुपीक जमीन तयार होत गेली ती मेरा गाव मेरा देश ‘ ( १९७१), मेला ( १९७१), धर्मा ( १९७३), हीरा ( १९७३), समाधी ( १९७४), अशा डाकूपटांनी. ‘शोले’ रिलीज झाला आणि सुपर हिट झाला असे नव्हे. त्याच्यापर्यंत पब्लिक पोहचण्याची एक पायरी ‘हीरा’देखिल आहे…. आणि ‘शोले’च्या खणखणीत यशानंतर केवढे तरी डाकूपट आले यात आश्चर्य ते कसले? यशाने नवीन ट्रेंड सेट होत असतोच.