मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमधून दिला ‘सवतीचे कुंकू’ चित्रपटाच्या आठवणींना
शेट्टी आहे म्हणजे पिक्चरमध्ये ढिश्यूम ढिश्यूम नक्कीच
गल्ली चित्रपटाचा पडदा लागलाय, रात्रीचे दहा वाजून गेलेत, कधी बरे ‘कहानी किस्मत की’ अथवा ‘राम भरोसे’ पिक्चर सुरु होतेय असं झालयं, एकदाचे ट्रेलर दाखवायला सुरुवात होताच टाळ्या शिट्ट्या भरपूर वाजतात, वातावरण चार्ज होते, नजर पडद्यावर खिळते, तेवढ्यात मेन पिक्चरचे सेन्सॉर सर्टीफिकेट पडद्यावर येते, पुन्हा टाळ्या. आता श्रेयनामावली अर्थात टायटल्स सुरु होतात, पुढे सरकताना नाव दिसते, शेट्टी. एवढंही वाचलं तरी खात्री पटते पिक्चरमध्ये ढिश्यूम ढिश्यूम नक्कीच आणि कधी बरे ते सीन येतात याची विशेष उत्सुकता. (M. B. Shetty)
ॲन इव्हिनिंग इन पॅरिस, यकीन, चोरी मेरा काम असे पिक्चर मॅटीनी शोला एन्जाॅय करताना टायटल्समध्ये नजरेत कलाकार शेट्टी पडते, फाईट कंपोझर अथवा ॲक्शन को ऑर्डिनेटर शेट्टी आणि हे वाचतानाच चित्रपटात नक्कीच मारहाण असल्याची खात्री पटे. साठच्या दशकात अनेक चित्रपटांत अगदी शेवटी क्लायमॅक्सला मारामारी (हा त्या काळातील पब्लिकचा शब्द) असे आणि सत्तरच्या दशकात ती थोडी वाढली. रक्तपात फार होत नसे. सेन्सॉरचाही ॲक्शनवर त्या काळात वचक होता.
आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल मिडियातील रसिकांनी ‘शेट्टी’ एवढ्याच नावाचा कलाकार होता हे कदाचित माहीत नसावे. आजचा आघाडीचा दिग्दर्शक रोहित शेट्टी याचे ते वडील. आपल्या पित्याकडूनच रोहितमध्ये ॲक्शनपॅक्ड मनोरंजनाचा वारसा आला असावा. आजच्या मल्टीप्लेक्स युगात टायटल्सपासून क्लायमॅक्सपर्यंत आधुनिक शस्त्रांनी जबरा ॲक्शन असते. नवीन शस्त्र जन्माला आलेले दिसते. भरपूर रक्त सांडते. मोठ मोठ्या चकाचक गाड्या उडताहेत, हेलिकॉप्टर्स फिरताहेत, स्पीड बोटी धावताहेत, गोळीबार होतोय आणि त्यात व्हीएफएक्स तंत्रज्ञानाचा महाखर्चिक वापर आहे. चाळीस, पन्नास, साठ वर्षांपूर्वी अशा काहीही तांत्रिक सुविधा नव्हत्या. कार चेस होती, मोठ्या स्टार्सच्या डमीज (ड्युप्लीकेट) होते, नाकाजवळून बुक्का जाताना ती फायटिंग खरी वाटावी असे कौशल्य असे आणि त्यात शेट्टी, रवि खन्ना, वीरु देवगन, अझीमभाई असे फाईट मास्टर होते. शेट्टीना प्रेमाने टकलू शेट्टी असेही म्हटले जाई.(M. B. Shetty)
शेट्टीचा जन्म १ जानेवारी १९३८ चा कर्नाटकातील मंगलोर येथील. पूर्ण नाव मुद्दू बाबू शेट्टी. एम. बी. शेट्टी. तो उडुपीमध्ये लहानाचा मोठा होत असतानाच मुंबईत आला आणि मध्य मुंबईतील काॅटन ग्रीन येथे अखेरपर्यंत राहिला. २३ जानेवारी १९८२ रोजी त्याचे निधन झाले. (त्याला बेचाळीस वर्ष झाल्यानिमित्त हा लेख) किती वेगाने काळ मागे सरतो बघा. आणि आठवणींचा साठा वाढत वाढत जातो.
‘हीर’ (१९५६) या चित्रपटासाठी फाईट इन्स्ट्रक्टर म्हणून त्याने चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. अतिशय फिट्ट आणि करारी नजर यामुळे त्याला ही संधी मिळाली आणि त्याची वाटचाल सुरु झाली. काही चित्रपटांसाठी ॲक्शन को ऑर्डिनेटर तर काही चित्रपटात त्यासह छोटीशी भूमिकाही तर काही चित्रपटात अन्य फाईट मास्टरकडे काम अशी मिलीजुली वाटचाल सुरु झाली. पण त्या काळात पिक्चरभर फायटिंग नसे, त्यामुळे कधी काम तर कधी कामाचा शोध. त्यातही मारामारीच्या कामात रिक्स फॅक्टर खूपच मोठा. जखमी होण्याची मोठीच जोखीम. काही डमीज जख्मीही होत. आपल्या पित्याचे असे अनुभव कुटुंबाने घेतल्याचे रोहित शेट्टीने एका मुलाखतीत म्हटलेही.(M. B. Shetty)
तुमसा नही देखा ( १९५७) पासून शेट्टीची वाटचाल सुरु झाली. काही चित्रपट सांगायचे तर, चायना टाऊन, फिर वहीं दिल लाया हू, नाईट इन लंडन, ऑखे, प्यार का मौसम, कब क्यू और कहा, ऐलान, रखवाला, अपराध, चोर के घर चोर वगैरे. अनेक चित्रपटांत त्याला नाव नसे. कधी असले तर मार्टिन ( द ग्रेट गॅम्बलर), जग्गा ( कहानी किस्मत की), बिरजू ( अनोखी अदा) असे काही असे. तर फाईट को ऑर्डिनेटर म्हणून त्याने तिसरी मंझिल, जंगली, उजाला, प्यार ही प्यार, जेल यात्रा, बरसात की एक रात, शालिमार, डाॅन, एकसे बढकर एक, मेहबूबा, कटी पतंग असे अनेक चित्रपट केले.
=============
हे देखील वाचा : ‘हम आपके दिल मे रहते है’ ची पंचवीशी…
============
‘डाॅन ‘मधील अमिताभ बच्चनच्या डबल रोलमध्ये साहसी दृश्य, गाड्यांचा पाठलाग, बेदम मारहाण यांना भरपूर स्कोप मिळाला. यश चोप्रा दिग्दर्शित ‘दीवार ‘मधील तुम्हाला विजय वर्मा ( अमिताभ बच्चन) एकट्यानेच गोडाऊनमध्ये पीटर ( कंवलजीत) आणि त्याच्या गॅन्गला बेदम चोप देतो हे दृश्य आठवतेय? ही गॅन्ग विजयचा शोध घेत घेत येथपर्यंत येतात आणि विजय म्हणतो, इसे ( चावी त्याच्याकडे उडवून) अपनी जेब मे रख ले पीटर, अब यह ताला मै तेरी जेब से चाबी निकाल कर ही खोलुंगा…आणि मग बेदम मारहाण सुरु होते, हा सगळा पट (अथवा सीन) शेट्टीचा! असं काही करुन दाखवायची संधी मिळताच फाईट मास्टर, नृत्य दिग्दर्शक, कला दिग्दर्शक असे सगळेच खुलतात.(M. B. Shetty)
केसविरहित चेहरा ही शेट्टीची ओळख व ताकद. पण नासिर हुसेन दिग्दर्शित ‘यादों की बारात ‘ ( १९७३) मध्ये त्याच्या डोक्यावर चक्क केस असतात. थोडा वेगळा लूक ( त्याचीही चर्चा रंगलीच) पण नजरेतून धाक तोच आणि तसाच. शेट्टीची आपली एक ओळख होती. यशोगाथा होती. पिक्चरमध्ये शेट्टी आहे म्हणजे फायटिंग नक्कीच असा विश्वास होता. तोच महत्वाचा असतो.