‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
अमिताभचा चित्रपट रखडून पडद्यावर येणे नवीन नाही हो….
सिनेमाचे जग काही विचित्र अथवा आश्चर्यकारक गोष्टींनी खचाखच भरलयं. साधारण १९९०\९१ सालची गोष्ट. त्या दिवसात आम्हा सिनेपत्रकारांना मराठी व हिंदी चित्रपटाच्या सेटवर शूटिंग रिपोर्टींगसाठी आमंत्रित करण्याची रितसर पध्दतच होती. सेटवर काय काय घडलं, कसे घडले, कॅमेरा कुठे होता, कलाकार कसे वागले व वावरले याचे बारीकसारीक तपशील असणारी मिडियातील ( तेव्हा मुद्रित माध्यम) सदरे फारच वाचनीय असत म्हणून ती लोकप्रिय होती. (Amitabh)
अशातच एके दिवशी हाती आमंत्रण आले, विलेपार्ले जुहू येथील चिरंजीव बंगल्यात अशोक गुप्ता दिग्दर्शित ‘यार मेरी जिंदगी’चे आठवडाभर शूटिंग असून सेटवर यावे. खरा आश्चर्याचा जोरदार धक्का पुढे बसला, या चित्रपटात शत्रुघ्न सिन्हा व अमिताभ बच्चन यांच्या प्रमुख भूमिका आहेत हेही त्यात म्हटले होते. हे दोन स्टार सेटवर आहेत म्हणजे, लिहायला भरपूर मसाला नक्कीच मिळणार,अशी भारी अपेक्षा. एव्हाना दोघांच्या रुपेरी पडद्यावरील वाटचालीला वीस वर्ष झाली देखील होती. तोपर्यंत दोघांनी ज्योती स्वरुप दिग्दर्शित ‘परवाना’ (१९७१) पासून अनेक चित्रपटांत एकत्र काम केले होते. यश चोप्रा दिग्दर्शित ‘काला पत्थर’ (१९७९) मध्ये एकत्र काम करताना त्यांच्यात काही कारणास्तव वाद झाल्याचेही गाॅसिप्स रंगले…
सेटवर पाऊल टाकताच माझी नजर वक्तशीर अमिताभ व हमखास उशीरा येण्याबद्दल प्रसिद्ध असलेल्या शत्रुघ्न सिन्हा या दोघांना एकत्र पाहण्यास उत्सुक होती. बराच वेळ तसे काहीच दिसेना. दोघेही सेटवर नव्हते. दिग्दर्शक अशोक गुप्ता बराच काळ सुधाचंद्रनवर काही सोलो दृश्य चित्रित करीत होता. अखेर लंच ब्रेक होताच दिग्दर्शक अशोक गुप्ताला याबाबत विचारताच त्याने आश्चर्याचा जोरदार धक्काच दिला. तो सांगत होता, १९७२ साली या चित्रपटाचा राजेश खन्नाच्या हस्ते या चित्रपटाचे मुहूर्त झाला. (Amitabh)
तेव्हा मुकुल दत्त या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत होते. (त्यांच्याच ‘आन मिलो सजना’ राजेश खन्नाची भूमिका असल्यानेच त्याच्या हस्ते या चित्रपटाचा मुहूर्त झाला). त्याच वेळेस मुकुल दत्त यांच्या ‘रास्ते का पत्थर’ मध्ये अमिताभ व शत्रुघ्न सिन्हा एकत्र काम करीत होते आणि तो चित्रपट पूर्ण होत आला होता. त्यांनाच घेऊन ‘यार मेरी जिंदगी’चे शूटिंग तर सुरु झाले. पण पंचवीस तीस टक्के शूटिंग झाल्यावर प्रकाश मेहरा दिग्दर्शित ‘जंजीर’ (१९७३) रिलीज होताच अमिताभ बच्चन स्टार झाला.
त्याच वर्षी त्याचे ह्रषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘अभिमान’ व ‘नमक हराम’ आणि सुधेन्दु राॅय दिग्दर्शित ‘सौदागर ‘ही प्रदर्शित होताच अमिताभ अधिकाधिक लोकप्रिय होत गेला. ‘जंजीर ‘ व ‘नमक हराम ‘च्या यशाने त्याला ॲन्ग्री यंग मॅन इमेज चिकटली. सौदागर व अभिमानमधील भूमिका वेगळ्या होत्या. पण एकूणच अमिताभ बच्चनचे पर्व सुरु झाले. त्याची मागणी वाढली. तो अतिशय बिझी होत गेला. आणि त्यात ‘यार मेरी जिंदगी’साठी त्याच्याकडे तारखाच नव्हत्या. ( की मुद्दाम देत नव्हता?).त्यात चित्रपट खूपच मागे मागे पडत गेला. कदाचित तो कायमचा डब्यातच गेला असता. पण कितीही अडचणी आल्या, अडथळे आले, आव्हाने आली तरी हा चित्रपट पूर्ण करायचेच आम्ही ठरवलयं, दिग्दर्शक अशोक गुप्ताची जिद्द ऐकून मला विशेष कौतुकच वाटले.(Amitabh)
अमिताभ व शत्रुघ्न सिन्हा यांच्यावरील चित्रीत झालेली ‘अधली मधली दृश्ये’ तशीच ठेवून अवतीभवती पटकथा रचण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि आता शूटिंग होत होते. चित्रपटात शारदा, जलाल आगा, इफ्तेखार, चांद उस्मानी अशा जुन्या कलाकारांसह आणखीन काही कलाकार जोडले गेले. हे कौशल्य, कसब व करामत कितीही असली तरी हा चित्रपट कधी बरे पडद्यावर यावा याची आपणास काही कल्पना ? बघा विचार करुन…२००८ साली हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. निर्मात्यांनी अजिबात हार मानली नव्हती. जसं जसे शक्य होईल तसं तसे थोडे थोडे शूटिंग करत करत एकदाचा हा चित्रपट पूर्ण केला. १९७२ साली मुहूर्त झालेला चित्रपट २००८ साली म्हणजेच तब्बल छत्तीस वर्षांनी झळकला हादेखील एक विक्रमच. अमिताभच्या अनेक विक्रमांसारखाच एक. अर्थात हा चित्रपट रिलीज तर झाला. पण हिट की फ्लाॅप यांची अजिबात चर्चाच नव्हती.(Amitabh)
===========
हे देखील वाचा : फिल्मी दुनियेतील निरोगी स्पर्धेचे दुर्मिळ उदाहरण !
==========
हे आताच का आठवलं ? तर सूरजीत सरकार दिग्दर्शित ‘शोबाईट’ हा २०१२ साली पडद्यावर येणार असलेला चित्रपट आता म्हणजेच बारा वर्षांनी प्रदर्शित होईल असे दिसतेय. अमिताभ बच्चनने यात जाॅन परेरा (जाॅनी मस्ताना) ही व्यक्तीरेखा साकारलीय. हा जाॅन खांद्यावर एक भरलेली बॅग घेऊन घराबाहेर पडलाय. तो आपल्या प्रेमाचा शोध घेतोय. आपला शोध घेतोय. अतिशय शांतपणे तो वाटचाल करतोय.
अमिताभ बच्चनने (Amitabh) वयाच्या सत्तरीनंतर आपल्या चित्रपट निवडीत आणलेली विविधता अशा चित्रपटामुळे अधोरेखित होत आहे. अमिताभने नवीन पिढीतील दिग्दर्शक व त्यांचे वेगळे, नवीन विषय यांना विशेष प्राधान्य देऊन आपलं अष्टपैलूत्व अधोरेखित केले आहे. म्हणूनच तर असे चित्रपट अगदी वेळेवर प्रदर्शित व्हायला हवेत. दिग्दर्शक सुरजीत सरकारने पिंक, विकी डोनर, पिकू अशा चित्रपटातून आपली थीमची विविधता स्पष्ट केली. मल्टीप्लेक्स व ओटीटी युगातील विषय तो मांडतोय. या चित्रपटात अमिताभसह सारीका, जिमी शेरगील, नवाऊद्दीन सिद्दीकी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.अमिताभचा उशीरा प्रदर्शित होणारा चित्रपट ही देखील एक विशेष उल्लेखनीय गोष्टच. चित्रपटसृष्टी अशा अनेक लहान मोठ्या गोष्टींसह रंगतदार वाटचाल करतेय. त्यात काही रंग असे अगदी वेगळेच.