दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
अमिताभ व नाना पाटेकर एकत्र आले त्याला २५ वर्ष झाली देखिल
आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीला कदाचित आश्चर्य वाटेल, पण एकेकाळी दोन लोकप्रिय नायक ( पब्लिक भाषेत हीरो) एकाच चित्रपटात एकत्र येण्याची घोषणा झाली रे झाली की दोघांचेही चाहते “कोण कोणाला खाईल वा भारी ठरेल” यावरुन हमरीतुमरीवर येत. राजेश खन्ना व अमिताभ बच्चन ह्रषिकेश मुखर्जी दिग्दर्शित “नमक हराम” (१९७३)मध्ये एकत्र आल्यावर अनेक महिने या दोघांचे भक्त चित्रपट साप्ताहिकातील वाचकांची पत्रे, अड्ड्यावरच्या गप्पांत, इराणी हाॅटेलमधील वादात, काॅलेजच्या कॅन्टीनमध्ये यावरच बोलत. वाद घालत. त्यात मीही असे…. चित्रपट प्रेक्षक संस्कृतीतील ही देखील एक विशेष गोष्ट.
असेच दोन तगडे कलाकार अमिताभ बच्चन व नाना पाटेकर हे मेहुल कुमार (Mehul Kumar) दिग्दर्शित “कोहराम” (मुंबई रिलीज १३ ऑगस्ट १९९९. चक्क पंचवीस वर्ष पूर्ण झाली देखिल) मध्ये एकत्र आले…
नाना पाटेकरचे ज्या दिग्दर्शकांशी सूर जुळले त्यात एक मेहुलकुमार. त्यांच्या “तिरंगा” (१९९२)च्या वेळेस दोघांचे छान जमले. खरं तर “मरते दम तक” (१९८७) पासून मेहुल कुमारला राजकुमारच्या कामाच्या पध्दतीशी सवय झाली (पटकथेत फेरफार करायचे नाहीत, संवाद जोरदार हवेत, दुपारच्या लंच ब्रेकमध्ये एक तासाची हुकमी विश्रांती वगैरे.). “तिरंगा”च्या निर्मितीत राज कुमार महत्वाचा होता पण नाना पाटेकरने बाजी मारली. त्याचं आपल्याभोवतीचे स्पष्टवक्ता हे वलय एव्हाना चांगलेच एस्टॅब्लिश झालेले.
आता मेहुलकुमार व नानाचं सूत जमले आणि त्यातून “क्रांतीवीर” (१९९४) घडला नि जोरदार डायलॉगबाजीवर गाजला. बरं मेहुल कुमार (Mehul Kumar) असा दिग्दर्शक जो आम्हा सिनेपत्रकारांना आवर्जून सेटवर बोलवणार आणि आवश्यक ती माहितीही देणार. (याचं कारण मुळात मेहुलकुमार मिडियातच होता.) ते दिवसच वेगळे होते….
अशातच अमिताभने “अमिताभ बच्चन कार्पोरेट लिमिटेड” (एबीसीएल)ची स्थापना करुन चार पाच चित्रपट निर्माण करीत असतानाच आपला एक चित्रपट मेहुल कुमारला दिग्दर्शनासाठी दिला. तो होता “मृत्यूदाता” (१९९७). या चित्रपटाच्या सेटवरही मेहुल कुमार(Mehul Kumar)नी आम्हा सिनेपत्रकारांना आमंत्रित केले… अमिताभचा हा चक्क “यडता काळ”. मृत्यूदाता, सूर्यवंशम, लाल बादशाह, हिन्दुस्तान की कसम अशा चित्रपटातून तो का बरे भूमिका साकारतोय हाच भला मोठा प्रश्न होता. अशातच जुहूच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये “कोहराम“चा मुहूर्त असल्याचे आमंत्रण हाती आले.
=======
हे देखील वाचा : परवीन बाबीचं चरित्र साकारणार तृप्ती डिमरी…
=======
अमिताभ व नाना पाटेकर पहिल्यांदाच एकत्र येणार, दिसणार ही फार मोठीच बातमी हो. (ते एकत्र येण्यापर्यंतचा थोडासा प्रवास सांगणे आवश्यक वाटले), अमिताभची अवडलेली वाटचाल आणि नाना पाटेकर फाॅर्मात असे काहीसे चित्र निर्माण झाले होते. सगळेच दिवस सारखे नसतात असं म्हणतात ते उगाच नाही. मेहुल कुमारचं काम अगदी फोकस्ड. सेटवर आल्यावर फळे खाणार. कुठेही गडबड गोंधळ घाई नाही.
अमिताभ वक्तशीर आणि त्याच्याच कंपनीचा चित्रपट. सगळेच कसे जुळून आले. नाना पाटेकरलाही ही मोठीच संधी.चित्रपट कधी पूर्ण झाला हे समजलेच नाही. याचं कारण मेहुल कुमार(Mehul Kumar)चे पक्के पेपरवर्क आणि मग सुरु झाली चित्रपट प्रदर्शित करण्याची तयारी. अर्थात सर्वप्रथम मुंबईत रिलीज आणि मग टप्प्याटप्प्याने अन्य शहरात प्रदर्शित ही तेव्हाची पध्दत. मुंबईत मेन थिएटर आमच्या गिरगावातील सेन्ट्रल.
ते काही असो, अमिताभ व नाना पाटेकर एकत्र येणार म्हणजे पिक्चर कसे भारी असायला हवे ना? कायमच गाजायला हवे होते. त्या काळात दहशतवादाविरुद्धचा लढा नि त्यांचा खातमा हा हिंदी चित्रपटाचा हुकमी फाॅर्मुला. गोळीबारी तीच. त्यात नवीन काहीच राहिले नव्हतेच. ‘कोहराम’चे तेच तर झाले. अतिरेक्यांकडून मेजर राठोड (जॅकी श्राॅफ)ची निर्घृण हत्या करण्यात आल्यावर कर्नल बलबीर सिंग सोढी (अमिताभ) दहशतवादाविरुद्धची लढाई अधिक जोरदार करतात. त्यात मेजर अजित आर्य (नाना पाटेकर)ची साथ मिळते. ही लढाई अतिरेकी जो चेंजजी (मुकेश रिशी) याचा निष्पाप करण्यासाठी असते. त्यात समजते की मंत्री वीरभद्रसिंह (डॅनी डेन्झोपा) ही त्यात सामील आहे. सगळे कसे फिल्मी रचनेनुसार. पोलीस इन्स्पेक्टर किरण पाटकर (तब्बू), तसेच कर्नलची पत्नी नम्रता सोडी (जयाप्रदा), तसेच मुकुल देव, कबीर बेदी, आयेशा जुल्का, अवतार गिल इत्यादींच्या प्रमुख भूमिका. पण पिक्चर अगदीच सरधोपट. नाविन्य असे काही नाहीच. तात्पर्य, पिक्चर फ्लाॅप. अमिताभचे चाहते अवाक. तर “क्रांतीवीर”चा नाना पाटेकर न दिसल्याने त्याचे चाहते निराश.
=========
हे देखील वाचा : “क्रांतीवीर”ची तीस वर्ष !
=========
अमिताभ व नाना पाटेकर एकत्र येणार म्हटल्यावर चित्रपटाची थीम वेगळी हवी होती. मसालेदार मनोरंजक चित्रपटाची चौकट सांभाळून काही करता आले असते. निदान “निर्माता” म्हणून अमिताभ जागरुक हवा होता (ते त्याला जमलेच नाही) आणि काही वर्षातच त्याची “एबीसीएल” बंद पडली. “कोहराम”ची आठवण ही अशी. चक्क निराशाजनक. खरं तर “कोहराम”ची निर्मिती अचानक ठरली. एबीसीएलसाठी मेहुल कुमारने “ऐ वतन तेरे लिए” या चित्रपटाचा मुहूर्त केला. या चित्रपटात डिंपल खन्ना, करिश्मा कपूर व अर्शद वारसी यांच्या प्रमुख भूमिका. मुहूर्तही थाटात रंगला. अचानक काय घडले ते समजायच्या आतच तो चित्रपट बंद पडून “कोहराम”ची निर्मिती सुरु झाली….