ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
“वो मै नहीं” पन्नास वर्ष झाली तरी…
काही काही बातम्या फारच धक्कादायक असतात हे तर सर्वकालीन सत्य. (डिजिटल युगात तर फारच)
आचार्य अत्रे लिखित “तो मी नव्हेच” या अतिशय गाजलेल्या नाटकावरुन दिग्दर्शक मोहन सैगल “वो मै नहीं” (woh main nahin) हा चित्रपट निर्माण करताहेत (आणि मग पडद्यावर आणलाही) ही देखील अशीच धक्कादायक बातमी. एव्हाना मागील पिढीतील नाटकप्रेमींच्या डोळ्यासमोर प्रभाकर पणशीकर यांनी “तो मी नव्हेच”चा चतुराईने रंगमंचावर खुलवलेला नाट्यमय खेळ नक्कीच आठवला असेल.
मराठी चित्रपट व नाटकावरुन हिंदी चित्रपटाची निर्मिती हे अनेक वर्ष सुरु असलेले माध्यमांतर. कधी जमते, कधी फसते. तर कधी कशाला या फंदात पडून हसू करुन घेतले असेही वाटले. मोहन सैगल यशस्वी चित्रपट निर्माता व दिग्दर्शक. न्यू दिल्ली (१९५६) पासून कार्यरत. त्यानंतर लाजवंती, देवर, साजन, सावन भादोनंतर मग “वो मै नही” (woh main nahin). म्हणजेच बराच अनुभव होताच. “तो मी नव्हेच”चे चित्रपट माध्यमांतर ते पेलतील याचा विश्वास कधीच नव्हता. मग कोणी ते धाडस करायला हवे होते हा प्रश्न असला तरी एक गोष्ट सांगता येईल प्रभाकर पणशीकर यांनी विविध रुपे घेत घेत अनेक स्त्रियांना लग्नाच्या/ संसाराच्या जाळ्यात ओढणारी व्यक्तीरेखा चित्रपटात त्या काळात दिलीप कुमार आणि त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी अतिशय उत्तम वठवली असती. हां, दिग्दर्शक बी. आर. चोप्रा अथवा विजय आनंद हे सगळेच नाट्य चित्रपट माध्यमातून खुलवण्यात यशस्वी ठरले असते.
आजच या तो मी नव्हेच आणि त्यावरच्या वो मै नही या चित्रपटावर फोकस का? मुंबईत हा चित्रपट २५ ऑक्टोबर १९७४ रोजी प्रदर्शित झाला, याला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत…पन्नास वर्षांनंतरही तो मी नव्हेचचा ठसा कायम आहे, पण वो मै नहीं (woh main nahin) व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी ठरुनही त्याचा दबदबा नाही. मुंबईत मेन थिएटर मिनर्व्हात दहा आठवडे मुक्काम केल्यावर दक्षिण मुंबईतील काही सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये पाच सात आठवडे मुक्काम करीत करीत तो रौप्य महोत्सवी आठवड्यापर्यंत पोहचला आणि नवीन निश्चलने यशाची पार्टी केली. नवीन निश्चल मोहन सैगल यांचेच फाईंड. त्यांच्याच “सावन भादों” मधून नवीन निश्चल, रेखा, रणजीत यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले.
रेखा आजही जणू “आजचीच अभिनेत्री” आहे. रणजीतने वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षीदेखील आपला फिटनेस कायम ठेवल्याचे त्याला भेटताच पटकन लक्षात येते. नवीन निश्चल नशीबवान. आशा पारेख (नादान), अनुपमा (संसार, निर्माण), रेखा (सावन भादो, धर्मा, वो मै नही (woh main nahin), झोरो ), सायरा बानू ( व्हीक्टोरिया नंबर २०३), शर्मिला टागोर ( एक से बढकर एक), प्रिया राजवंश (हंसते जख्म), राखी ( मेरे सजना), योगिता बाली (परवाना), अर्चना (बुढ्ढा मिल गया) अशा त्या काळातील टाॅपच्या अभिनेत्रींचा नायक झाला.
फक्त हेमा मालिनीचा हीरो बनू शकला नाही याचे आश्चर्य वाटत नाही. ती जोडी शोभली तरी असती का? प्रभाकर पणशीकरांनी जे विविध रुपे घेत घेत बेरकीपणा, धूर्तपणाचे खेळ रंगवले ते नवीन निश्चलचा जमले नाहीत… “तो मी नव्हेच” हे आचार्य अत्रे लिखित एक लोकप्रिय मराठी नाटक हे सर्वश्रुतच! ही कथा सत्य घटनेवर आधारित होती व खटला हा बार्शीच्या कोर्टात चालू होता. (woh main nahin)
प्रभाकर पणशीकरांनी मुखवटे बदलत बदलत साकारलेल्या भूमिका अशा,
लखोबा लोखंडे: निपाणीचा तंबाखूचा व्यापारी.( ही भूमिका सर्वाधिक गाजली)
हैदरअली: भिवंडीच्या सय्यद मंसूर ह्या मुसलमान खाटिकाचा धाकटा भाऊ.
मधुकर विनायक देशमुख: ह्याच्यावर वसंत अग्निहोत्री ह्या गृहस्थाला १५,००० रुपयांनी फसवल्याचा आरोप होता.
माधव गजानन गोरे: नागपुरच्या महिला विद्यालयातील इंग्रजीचा शिक्षक.
दिवाकर दातार: इंग्लंडमध्ये शिकलेला आणि म्हैसूर राज्याच्या राजकीय खात्यात गुप्त स्वरूपाची नोकरी करणारा इसम. ह्याच्यावर सुनंदा दाते ह्या महिलेशी खोटे लग्न केल्याचा आरोप आहे.
दाजीशास्त्री दातार: किर्तनकार आणि दिवाकर दातारचे वडीलबंधू.
कॅप्टन अशोक परांजपे: दिवाकर दातारचा धाकटा भाऊ. ह्याच्यावर प्रमिला परांजपे ह्या महिलेशी खोटे लग्न केल्याचा आरोप होता.
राधेश्याम महाराज: स्वतःला कृष्णाचा अवतार समजणारे एक ढोंगी बाबा. ह्यांच्यावर चंद्राबाई चित्राव ह्यांची मुलगी वेणू हिला फसवल्याचा (आणि ठार मारल्याचा) आरोप.
वो मै नही (woh main nahin) चे लेखन अली रझा यांचे आणि नवीन निश्चलने साकारलेल्या व्यक्तीरेखांची नावे, विजय, सलिमुद्दीन, दिवाकर गणेश दातार, दाजी शास्री, अशोक परांजपे, बाबा राधेश्याम. या व्यक्तीरेखा जवळपास मूळ नाटकानुसार आणि त्याच्या जाळ्यात अडकतात अंजली (रेखा), पद्मिनी कपिला (सुनंदा दातार), आशा सचदेव (पामेला) , नाझनीन (वेणू).. याशिवाय चित्रपटात राकेश पांडे, नरेंद्रनाथ , इफ्तेखार,,नादिरा, कृष्ण धवन, चमन पुरी, धुमाळ इत्यादी अनेक कलाकार. छायाचित्रणकार पीटर परेरा यांची दखल हवीच. वर्मा मलिक यांच्या गाण्यांना सोनिक ओमी यांचे संगीत…
==============
हे देखील वाचा : रोटी कपडा और मकानला ५० वर्ष पूर्ण
==============
चित्रपट क्लायमॅक्सला फसला. पिक्चरचा नायक बिनभोपाटपणे स्त्रियांना फसवणुकीचे उद्योग करतो हे चित्रपट रसिकांना पटले नाही तर? नायक कपटी कसा असेल? म्हणून नवीन निश्चलचा डबल रोल दाखवला आणि सगळाच खेळ बिघडला….नवीन निश्चलसारखाच दिसणारा हे सगळेच भलतेच उद्योग करतो म्हणे…
तो मी नव्हेचवरुन वो मै नहीं अशीच इतकीच नोंद राहिलीय…एक चित्रपट असाही असतो. पन्नास वर्षांनंतर तेवढेच आठवते.