संगीतकार रोशन यांना आत्मविश्वास दिला होता अनिल विश्वास यांनी!
अतिशय प्रतिभावान, गुणवान, परंतु कमी आयुष्य लाभलेला संगीतकार म्हणजे संगीतकार रोशन (Roshan). अवघ्या पन्नास वर्षाचं आयुष्य त्यांना लाभलं. खरं तर जेव्हा बहरीचा कालखंड सुरू होणार आहे त्याच काळात विधात्याने संगीतकार रोशन यांना आपल्याकडे बोलावून घेतलं. रोशन नागरथ दिल्ली आकाशवाणीवर कार्यरत होते. त्यानंतर ते मुंबईला आले. मुंबईत आल्यानंतर त्यांचा स्ट्रगल सुरू झाला.
संगीतकार अनिल विश्वास यांच संगीत त्यांना खूप आवडत असे. म्हणून त्यांनी अनिलदा यांना आपला गुरु मानलं होतं. मुंबईत आल्यानंतर अनिल विश्वास यांच्या संगीत सीटिंग ला उपस्थित राहू लागले. अनिलदा देखील त्यांना आपल्या शिष्य मानत, आणि त्यांना संगीतातील बारकावे समजावून सांगत. याच काळात रोशन (Roshan) यांना चित्रपट मिळाला केदार शर्मा यांचा ‘नेकी और बदी’ या चित्रपटात केदार शर्मा स्वतः नायक होते आणि नायिका मधुबाला होती. चित्रपटाला संगीत संगीतकार रोशन यांचे होते. खूप मेहनतीने त्यांनी चित्रपटाचे संगीत बनवलं. पण सिनेमा फ्लॉप झाला. तेव्हा ते प्रचंड नाराज झाले होते.
या पहिल्याच अपयशाने रोशन (Roshan) खूप नाराज झाले. अक्षरशः मुंबई सोडून जाण्याचा त्यांनी विचार केला होता. पण अनिल विश्वास यांनी त्यांना थांबवले आणि सांगितले की,”अशा थोड्याशा अपयशाने कधीच घाबरायचं नसतं. चित्रपट हिट होण्यासाठी अनेक घटक कारणीभूत असतात. संगीत हा त्यापैकी एक आहे. त्यामुळे चित्रपटाचे अपयश टोटली संगीतामुळे कधीच होत नसतं. याच काळात संगीतकार अनिल विश्वास ‘आरजू’ या चित्रपटाचे संगीत देत होते. यातील लता मंगेशकर यांच्या ‘कहा तक हम उठाये गम जिये हम या के मर जाये…’ या गाण्याची सीटिंग चालू होती.
संगीतकार रोशन (Roshan) सर्व प्रकार बारकाई ने टिपत होते आणि त्यांची अतिशय गोड चाल ऐकून ते अक्षरशः हुंदके देऊ लागले! अनिल विश्वास यांनी त्यांना विचारले ,”काय झालं?” तेव्हा रोशन म्हणाले,” तुमच्या इतके सुंदर संगीत मला कधीच जमणार नाही!” त्यावर अनिलदा म्हणाले,” असं नाही. तुला देखील चांगलं संगीत देता येईल. तू देखील प्रतिभाव संगीतकार आहेत. गाण्यातील भावनांशी तादात्म्य होऊन संगीत द्यायचा प्रयत्न कर. एक दिवस नक्की जमेल.” या शब्दांनी रोशन यांना धीर आला.
किदार शर्मा यांनी रोशन (Roshan) यांना त्यांचा पुढचा चित्रपट संगीतबध्द करण्यासाठी दिला होता. संगीतकार रोशन यांनी या सिनेमासाठी प्रचंड मेहनत घेतली. आणि गुरु अनिल विश्वास यांच्या आशीर्वादाने त्यांनी संगीत द्यायला सुरुवात केली. चित्रपट होता ‘बावरे नैन’. राजकपूर आणि गीताबाली प्रमुख भूमिकेत होते. यातील मुकेश यांनी गायलेल्या ‘तेरी दुनिया में लगता नही वापस बुलाले मै सजदे में गिरा हूं मुझको ऐ मालिक उठा ले…’ या गाण्याची ट्यून त्यांनी बनवली आणि अनिल विश्वास यांना ऐकवली. ‘भूप‘ रागावरील हे गाणे अनिल विश्वास यांना खूप आवडले. कौतुकाने त्यांनी पाठ थोपटली.
‘बावरे नैन’ (१९५१) या चित्रपटातील सगळीच गाणी खूप सुंदर बनली होती. गीता रॉय आणि मुकेश यांनी गायलेलं ‘खयालो मे किसी के इस तरह आया नही करते’ आणि राजकुमारी आणि मुकेश यांनी गायलेलं ’सुन बैरी बलम सच बोल इब क्या होगा…’ या गाण्यांनी रोशन (Roshan) यांना कधीच मागे पाहायची वेळ आली नाही. अनिल विश्वास यांनी धीराचे शब्द देऊन रोशन यांना वेळीच सावरले.
==============
हे देखील वाचा : प्राण यांची खरी जन्मतारीख कुणी शोधून दिली?
==============
गुरुने शिष्याची प्रतिभा ओळखली होती फक्त त्याला व्यवस्थित दिशा द्यायची होती आणि आत्मविश्वास जागा करायचा होता. अनिल विश्वास यांनी रोशन यांना आत्मविश्वास दिला! अवघे पन्नास वर्ष आयुर्मान लाभलेले संगीतकार रोशन (Roshan) यांनी उण्यापुऱ्या १६-१७ वर्षाच्या काळात बरसात कि रात, दिल हि तो है, ताजमहल (या सिनेमाच्या संगीतासाठी त्यांना फिल्म फेअर पुरस्कार मिळाला होता.) बाबर, चित्रलेखा, आरती, ममता, बहु बेगम, अनोखी रात या चित्रपटाना संगीत दिले. ते कव्वाली चे बादशहा होते.