…आणि संगीतकार खय्याम यांच्या ‘उमराव जान’च्या संगीताने इतिहास घडवला!
आज १८ फेब्रुवारी. संगीतकार खय्याम यांचा जन्मदिवस. त्या निमित्ताने आज आपण १९८१ साली प्रदर्शित झालेल्या आणि खय्याम यांच्या संगीत असलेल्या ‘उमराव जान’ या त्यांच्या अप्रतिम संगीताच्या सुरेल कहाणीची माहिती घेऊयात.
मला संगीतकार खय्याम यांचे नेहमीच कौतुक वाटतं. १९४८ साली त्यांनी या मायानगरीत पाऊल टाकलं. त्यांचे समकालीन सर्व संगीतकार म्हणजे नौशाद, सी रामचंद्र, ओ पी नय्यर, शंकर-जयकिशन हे ज्या वेळी निवृत्तीच्या फेज मध्ये होते त्यावेळी खय्याम मात्र कायम आपल्या संगीतातून तरुणाईला साद देत होते.
यश चोप्रा यांच्या ‘कभी कभी’ या १९७६ साली आलेल्या चित्रपटापासून त्यांचा पुन्हा कमबॅक झाला आणि तिथून पुढची आठ ते दहा वर्ष खय्याम सातत्याने उत्तमोत्तम चित्रपट रसिकांना देत गेले. या त्यांच्या सेकंड इनिंग मधील महत्वपूर्ण चित्रपट होता १९८१ साली आलेला ‘उमराव जान’!
‘उमराव जान’ हा चित्रपट भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील एक माईलस्टोन आहे. अठराव्या शतकातील उमराव जान या तवायफचा जीवनपट यातून दाखवला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मुजफ्फर अली यांनी केले होते. या चित्रपटाची गाणी शहरियार यांनी लिहिली होती.
हा चित्रपट खय्याम यांच्याकडे जेव्हा आला त्यावेळी सुरुवातीला यांना थोडीसे टेंशन आले. टेंशन यासाठी की सात-आठ वर्षांपूर्वीच म्हणजे १९७२ साली मीनाकुमारीचा ‘पाकीजा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ‘पाकीजा’ तील गीत संगीताची जादू रसिकांवर कायम होती आणि पुन्हा तशाच प्रकारच्या विषयावरील चित्रपटाला संगीत देताना काहीशी भीती वाटणं स्वाभाविक होतं. पण संगीतकार खय्याम यांनी हे आव्हान स्वीकारले.
खय्याम यांनी मूळ ‘उमराव अदा’(ले. मिर्झा हादी रुसवा-) हे पुस्तक मिळवून वाचून काढलं. १८९९ साली हे पुस्तक प्रकाशित झालं. हे उर्दूतील पहिले पुस्तक आहे, असं म्हणतात. पुस्तक वाचल्यानंतर त्यांना त्या काळाची ओळख झाली. त्या काळातील संगीत कसे असेल? त्या काळातील तवायफच्या नृत्याच्या अदा कशा असतील? त्यावेळी कुठली वाद्य असतील? वादक वाद्य वाजवताना कुठल्या गोष्टीचा आधार घेत असतील? या सर्व गोष्टींचा त्यांनी अभ्यास केला.
उमराव जान एकोणीसाव्या शतकातील एक ‘तवायफ’ होती. तिचा शास्त्रीय संगीताचा गाढा अभ्यास होता. अनेक गुरूंकडून तिने शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले होते. त्याचप्रमाणे कथ्थक नृत्यशैलीमध्ये ती पारंगत होती. दिसायला अतिशय देखणी होती. त्यामुळे तिला पाहायला, तिचं गाणं ऐकायला, तिचे नृत्य पाहायला त्या काळातील मोठ मोठे आमिरजादे, राजे-महाराजे, सावकार गर्दी करायचे.
त्या काळात तवायफच्या नृत्यावर चांदीचे पैसे फेकले जायचे. परंतु उमराव जान हिचे नृत्य-गायन झाल्यानंतर तिला चांदी सोन्याच्या नाण्यांची थैली पेश केली जायची. हा तिचा ‘रुतबा’ संपूर्ण हिंदुस्थानात ‘मशहूर’ झाला होता. संपूर्ण अवधनगरी तिच्या नृत्य संगीताने भारावून गेली होती. एवढं सगळं असलं तरी यातून, या पेशातून सुटका नाही, याची तिला जाणीव होती! एक खंत होती, एक दुःख होते जे उरामध्ये कायम सलत होतं.
या सर्व पार्श्वभूमीवर खय्याम यांनी तिची गातानाची मानसिकता कशी असेल, मनात कोंडलेल्या दु:खाच्या वेदना कशा व्यक्त करीत असेल, याचा अभ्यास केला. त्यांची पत्नी जगजीत कौर हिने देखील त्यांना यात खूप मदत केली.
‘पाकीजा’ या चित्रपटाशी आपल्या सिनेमाची तुलना होणार, पाकीजाचे संगीत आणि उमराव जानचे संगीत याबद्दल देखील लोक बोलणार, याची त्यांना जाणीव होती. त्यामुळे त्यांनी सुरुवातीपासूनच एक वेगळं आणि ‘हटके’ असं संगीत या चित्रपटाला द्यायचं निश्चित केलं होतं.
सर्वात प्रथम त्यांनी या चित्रपटातील सर्व गाणी गाण्यासाठी आशा भोसले यांची निवड केली. त्यांच्या बऱ्याच मित्रांना ही निवड खटकली; कारण त्यावेळी आशा भोसले वेस्टर्न टाईपची गाणी गात होत्या. आशाकडून शंभर-दीडशे वर्षापूर्वीची गायकी गाऊन घ्यायची हे मोठं आव्हान होतं, पण आव्हान त्यांनी स्वीकारलं. त्यांचा आशाच्या गायकीवर, तिच्या कुठल्याही मूडचे गाणे त्या शैलीत समरस होवून गाण्याच्या स्टाईलवर विश्वास होता.
खय्याम यांनी आशा भोसले यांना पहिल्या भेटीतच याची जाणीव करून दिली, “पाकीजा चित्रपटाच्या तोडीचे संगीत करण्याचे एक मोठं ‘चॅलेंज’ आपल्याला पूर्ण करायचे आहे. त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल.” आशा भोसले यांनी त्याला मान्यता दिली.
सुरुवातीला खय्याम आणि जगजीत कौर यांनी आशा भोसले त्या काळात ज्या स्केलमध्ये गात होती ती स्केल त्यांनी निम्म्यावर आणली. गाण्यात आलाप, मुरकी यांचा मोठा वाटा होता. आशा भोसले उपजतच चांगली गायिका असल्यामुळे तिने लवकरच या सर्व गोष्टी आत्मसात केल्या. रेकॉर्डिंगच्या दोन दिवस आधी खय्याम साहेबांनी आशा भोसले यांना सांगितलं, “देखो अशा, अब हमारे इम्तिहान की घडी नजदीक आ गई है. अब हमे आशा भोसले नही चाहिये, बस हमे उमराव जान चाहिये. ये खयाल दिल मे हमेशा रखना. आपका जो गाणे का टोन है उसे आपको थोडा बदलना पडेगा और आपको उमराव जान के टोन मे गाना पडेगा!”
हे ऐकून आशा भोसले अचंबित झाल्या त्यांनी टोन बद्दल विचारले. त्यावेळेला खय्याम यांनी त्यांना त्यांना अभिप्रेत असलेला टोन गाऊन दाखवला. त्यावर आशा भोसले म्हणाल्या “आपण गाण्याचे रेकॉर्डिंग काही दिवस पुढे ढकलूयात. मला या टोनवर काही दिवस काम करावे लागेल!”
आशा भोसले यांनी आठ दिवस घरी रिहर्सल केली आणि रेकॉर्डिंगच्या दिवशी ती मेहबूब स्टुडिओमध्ये पोहोचली. त्या दिवशी ती प्रचंड नर्व्हस होती कारण एवढी रिहर्सल करून देखील तिला मी गाऊ शकेल की नाही अशी शंका होती. तिने गमतीने खय्याम यांची पत्नी जगजीत कौर यांना जवळ बोलावून विचारले की, “माझे आणि खय्याम यांचे कधी काळी भांडण झाले होते त्याचा बदला तर ते घेत नाहीत ना?”
सर्व म्युझिशियन्स सोबत रिहर्सल झाली. फायनल टेक घ्यायची वेळ आली. आशा भोसले रेकॉर्डिंग साठी मायक्रोफोन समोर उभ्या राहिल्या. पण त्यावेळी पुन्हा त्यांना औदासिन्य जाणवू लागले. त्यांनी खय्याम यांना रेकॉर्डिंग रूममध्ये बोलावले आणि म्हणाल्या, “आपण म्हणता त्या पद्धतीने मी तुम्ही सांगितलेल्या टोन मध्ये गाणं गाते, पण एक माझी विनंती आहे गाणं रेकॉर्ड झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा माझ्या ओरिजनल टोनमध्ये हे गाणं रेकॉर्ड करूयात!” यासाठी तिने खय्याम यांना त्यांच्या मुलाची (म्हणजे प्रदीपची) शपथ घ्यायला लावली.
खय्याम यांनी आशाजींचे म्हणणे कबूल केले आणि सांगितले की, “आपको भी शपथ लेनी पडेगी मा सरस्वती की आपको वही करना है जो मैने आपको बताया है, आपको उसी टोन में गाना है.” दोघांनी पण शपथा घेतल्या. आशा भोसले यांनी डोळे मिटून ‘उमराव जान’ चित्रपटाचे पहिले गाणे गायला सुरुवात केली. ‘दिल चीज क्या है आप मेरी जान लीजिये…..’ रेकॉर्डिंग संपले.
खय्याम यांनी त्यांच्या म्युझिशियन्सला सांगितले की “तुम्ही आता कुठेही जाऊ नका आपल्याला या गाण्याचे पुन्हा एकदा रेकॉर्डिंग करायचे आहे.”
दरम्यानच्या काळात आशाजींना त्यांनी रेकॉर्डिंग रूममध्ये बोलून ते रेकोर्डेड गाणे ऐकवले. आशा भोसले यांनी शांतपणे कानाला हेड फोन लावून गाणे ऐकायला सुरुवात केली. सुरुवातीचा सारंगीचा पीस ऐकला आलाप सुरू झाला…. एका ट्रान्स अवस्थेत जाऊन आशा भोसले यांनी ते गाणे ऐकले. पाच साडे पाच मिनिटांचं ते गाणं होतं. गाणं झाल्यानंतर एक दीड मिनिट प्रचंड स्तब्धता पसरली.
====
हे देखील वाचा: कमाल अमरोही आणि मीना कुमारी यांच्या प्रेमाची अधुरी एक कहाणी…
====
आशा भोसले जणू मोठ्या दीर्घ निद्रेतून बाहेर आली. तिच्या डोळ्यातून पाणी येत होतं. ती खय्याम साहेबांना म्हणाली “क्या ये मैने गाया है क्या? क्या ये मेरा स्वर है? मैंने पहले कभी ऐसा गाना नही गाया!” खय्याम म्हणाले, “आशा जी आपले बखुबी गाया है… उमराव जान का सारा दर्द इस आवाज छलक रहा है, बहुत कमाल की गायकी है आपकी!”
आशा भोसले म्हणाल्या “आता दुसरा टेक घ्यायला नको मी माझी शपथ मागे घेते!” आणि याच्या पुढची सर्व गाणी तुम्ही सांगाल त्या टोनमध्ये मी गायला तयार आहे. यानंतर ‘इन आंखो की मस्ती के मयखाने हजारो है’, ‘जुस्तजू जिसकी थी उसको तो न पाया हमने’, ‘ये क्या जगह है दोस्तो’ ही सर्व गाणी खय्याम यांनी सांगितल्याप्रमाणे आशाजींनी गायली.
====
हे देखील वाचा: संगीतकार बप्पी लाहिरी (Bappi Lahiri) काळाच्या पडद्याआड!
====
या सिनेमात जगजीत कौर यांच्या स्वरात ‘काहे हो ब्याही बिदेस’ हे बिदाई गीत होते ज्याचे शब्द आणि सूर अमीर खुस्रो यांचे होते. तलत अझीझ यांच्या स्वरात ‘जिंदगी जब भी तेरे’ ही अप्रतिम रचना होती. खय्याम यांनी यातील रागमालेसाठी उस्ताद गुलाम मुस्तफा खान, शाहिदा खान निझामी यांना पाचारण केले होते. उमराव जानचे संगीत ‘पाकीजा’च्या तोडीचे झाले होते. या चित्रपटाच्या संगीतासाठी खय्याम यांना, पार्श्वगायनासाठी आशा भोसले यांना, तर अभिनयासाठी रेखा यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. खय्याम आणि रेखा यांना फिल्मफेयर पुरस्कार देखील मिळाला.
– धनंजय कुलकर्णी