दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
राॅक्सी: आठवण मध्यंतरामधल्या २५ पैशांच्या वडापावची…
लहानपणी आपण कोणता चित्रपट बघायचा याचा निर्णय पालक घेतात आणि त्यातूनच चित्रपटगृह माहित होत जातात. साठच्या दशकात “तू कितनी अच्छी है, प्यारी प्यारी है ओ मा” आणि “फिरकीवाली तू कल फिर आना” ही गाणी लोकप्रिय झाली असता ही गाणी असलेला ‘राजा और रंक’ (१९६८) हा चित्रपट पालकांसोबत पाहायचा योग येणे स्वाभाविकच. पण हा चित्रपट आपण राॅक्सी थिएटरमध्ये (roxy theatre) पाहिला इतकेच तेव्हा माहित झालं. पण विशेष म्हणजे, या चित्रपटातील बालकलाकार महेश म्हणजे महेश कोठारे हे अर्थातच कालांतराने समजले आणि महेश कोठारेला दोन तीनदा तरी ‘राजा और रंक’ मी लहानपणी कसा एन्जाॅय केला हे सांगितले. एखाद्या फिल्मी योगायोगासारखं झालं हे. असो.
तर, शक्ती सामंत निर्मित आणि दिग्दर्शित ‘आराधना’ (रिलीज ७ नोव्हेंबर १९६९) चित्रपटाने अनेक गोष्टी घडवल्या, त्यातीलच एक राॅक्सी थिएटरला (roxy theatre) ग्लॅमर आणले. साठच्या दशकात जन्माला आलेली माझी पिढी रेडिओ सिलोनवरील बिनाका गीतमाला आणि विविध भारतीवरील गाणी ऐकायला शिकली ती आराधना चित्रपटातील “मेरे सपनो की रानी कब आयेगी तू” आणि “रुप तेरा मस्ताना प्यार मेरा दीवाना” या गाण्यांमुळे.
ते दिवस राजेश खन्नाच्या लहान मोठ्या अदांनी/स्टाईलने झपाटून टाकणारे होते. वय वर्षे सात ते सत्तर राजेश खन्नाची क्रेझ होती आणि सहकुटुंब त्याचे चित्रपट पाहायचे ते युग होते. त्या दिवसाच्या आठवणी सांगाव्या तेवढ्या थोड्याच.
राॅक्सी थिएटरशी माझी दुसरी भेट ‘आराधना’ची स्टाॅलची तिकीटे काढण्याने झाली. तेव्हा पहिल्या चार रांगांची स्टाॅलची तिकीटे त्या त्या दिवशी सकाळी नऊ वाजता मिळत. मला आजही आठवतेय एका सकाळी आठ वाजता माझ्या मामासोबत गेलो तेव्हा रांग होती आणि नऊ वाजता तिकीटे हाती येताच प्रचंड आनंद झाला होता. आता पुन्हा तीन वाजता ‘आराधना’ पाहिला राॅक्सीला जा….
अशातच समजले की, राजेश खन्ना आमच्या गिरगावातील ठाकूरव्दार नाक्यावरच्या सरस्वती निवासचा रहिवाशी आहे. (गिरगावकरांच्या अगणित आवडत्या गोष्टीतील ही एक कायमस्वरुपी आवडती गोष्ट) आणि ‘आराधना’ सुपरहिट गर्दीत सुरू असतानाच तो वांद्र्याच्या कार्टर रोडवरील आशीर्वाद बंगल्यात राहायला गेला.
म्युनिसिपल शाळेत मी शिकत असताना शाळेच्या वतीने राॅक्सी थिएटरमध्ये आम्हा विद्यार्थ्यांना आदर्श चित्रपट म्हणून ‘प्रार्थना’ हा चित्रपट दाखवण्यात आला असता मध्यंतरात येत्या आठवड्यात प्रदर्शित होत असलेल्या ‘कटी पतंग’ चित्रपटाचा ट्रेलर सुरू होताच आम्ही विद्यार्थ्यांनी अख्ख राॅक्सी थिएटर (roxy theatre) डोक्यावर घेतलं. पुढचे काही दिवस शाळेत आम्ही ‘कटी पतंग’चा ट्रेलर आणि त्यातील राजेश खन्नाची स्टाईल यावरच बोलत होतो. खरं तर ‘प्रार्थना’ चित्रपटाचा आमच्यावर प्रभाव पडावा अशी शाळेची इच्छा होती.
जस जसा मोठा होत गेलो, राॅक्सी थिएटर अधिकाधिक ओळखीचं होत गेलं. अशातच स्टाॅलचे तिकीट सकाळी मिळण्याची प्रथा बंद झाली. ती आता शोच्या अगोदर अर्धा तास आधी मिळू लागली. त्याची खिडकीही बदलली. अप्पर स्टाॅल आणि बाल्कनीच्या तिकीटासाठी ॲडव्हास बुकिंग आणि करंट बुकिंगसाठी अशा प्रत्येकी दोन मिळून चार खिडक्या असत. ॲडव्हास बुकिंगचा भला मोठा चार्ट असे, तो अधिकाधिक फुल्ल दिसला की समजावं, चित्रपट हिट आहे. त्यावरची शो कार्ड पाहायला मिळत हा जणू फिल्म दीवाने बोनस समजत.
राॅक्सीला (roxy theatre) मॅटीनी शोला कधी जुने तर अनेकदा नवीन चित्रपट प्रदर्शित होत. अगदी मराठी चित्रपटही प्रदर्शित होऊ लागले. डाॅ. जब्बार पटेल दिग्दर्शित बहुचर्चित बहुचर्चित ‘सिंहासन’ ( १९७९) आणि अमोल पालेकर दिग्दर्शित ‘आक्रीत’ (१९८१) हे याच राॅक्सी थिएटरमध्ये मॅटीनी शोला रिलीज झाले आणि आवर्जून पाहिले.
मी मिडियात आल्यावर अधूनमधून याच राॅक्सी थिएटर्सची (roxy theatre) फस्ट डे फर्स्ट शोचे तिकीट मिळू लागले. राॅक्सी थिएटरवरचे डेकोरेशन वैशिष्ट्यपूर्ण असे. मिडियात वावरताना ‘भूतकाळात डोकावताना समजले आमचे हक्काचे राॅक्सी थिएटर सुरु होऊन चक्क १०२ वर्षे झाली. मला याचं आश्चर्य वाटलं आणि आनंदही. म्हणजे शंभरपेक्षा जास्त वर्षे कार्यरत असलेल्या मुंबईतील काही मोजक्या थिएटरपैकी हे एक असे म्हणता येईल.
एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती अशी की, राॅक्सीचे चारदा नूतनीकरण करण्यात आले. आताचे राॅक्सी आपले मूळ व्यक्तीमत्व हरवलेले असे आहे, आज त्या इमारतीच्या एका बाजूला आहे. पूर्वी आडवी इमारत होती आणि त्यावरचे आडवे डेकोरेशन पाहण्यासारखं असे. हे राॅक्सी १९२० साली इंग्रजी चित्रपटांच्या काळात सुरु झाले. त्यामुळे ते तेव्हाच्या काळाशी सुसंगत आहे.
आपल्याकडे तेव्हा मूकपटांची निर्मिती होई. कपूरचंद मेहता यांनी ते विकत घेतले आणि तेव्हा रणजित स्टुडिओचा ‘नाॅटी गर्ल’ हा चित्रपट इथे प्रदर्शित झालेला पहिला हिंदी चित्रपट ठरला. १९३४ सालची ही गोष्ट. सुरुवातीच्या काळात इथे बाॅम्बे टाॅकीज आणि फिल्मीस्तान स्टुडिओचे चित्रपट प्रदर्शित होत. साठच्या दशकापर्यंत ‘नायक’ अशोककुमारचे ‘अछूत कन्या’ (१९३६), ‘कंगन’ (३९), बंधन (४०), झूला (४१), ‘किस्मत’ (४३), ‘महल’ (४९), ‘संग्राम’ (५०); तर दिलीप कुमारचे शहीद (४८), नदीया के पार (४८), शबनम (४९), मधुमती (५८) हे चित्रपट राॅक्सीत झळकले.
मला मात्र राॅक्सी म्हटलं की, राजेश खन्ना फेव्हरेट हे पक्के माहितेय. बहारो के सपने, आराधना, कटी पतंग, अमर प्रेम, अनुरोध, रेड रोझ, फिर वही रात, अगर तुम न होते, नसिहत असे राजेश खन्नाच्या तब्बल नऊ चित्रपटांचे ‘राॅक्सी’ मेन थिएटर होते आणि यातील पहिल्या चार चित्रपटांनी तो स्टार सुपरस्टार झाला. त्यानी खणखणीत रौप्यमहोत्सवी यश संपादले.
‘आराधना’ने तर पन्नास आठवडे मुक्काम केला. ‘रेड रोझ’ (१९८०) वर त्याची मुहूर्तापासून आशा होती. दिग्दर्शक भारती राजाने आपल्याच तमिळ चित्रपटाची रिमेक करताना मूळ चित्रपटाचा हीरो कमल हसनच्या हस्ते या चित्रपटाचा मुहूर्त केला. या चित्रपटासाठी राजेश खन्नाने आपले केस अगदी छोटे करुन आपला लूक बदलला होता. या चित्रपटाने तरी आपला कमबॅक होईल अशी त्याला आशा असल्याने त्याने पब्लिसिटीवर भरपूर लक्ष केंद्रित केले. प्रचंड हाईप तयार झाला. पिक्चरच्या ॲडव्हास बुकिंगसाठी चक्क लाठीमार करावा लागला इतकी प्रचंड गर्दी झाली. पण… मार्मिकमध्ये शुध्दनिषाद यांनी शीर्षक दिलं, अरेरे संथगतीने रेड रोझ कोमेजून गेला… चित्रपट फारसं यश मिळवू शकला नाही हो.
राॅक्सी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या अगणित चित्रपटातील एक फूल दो माली, दो फूल, बेईमान, औलाद, कुंवारा बाप, स्वर्ग नरक, कस्मे वादे, मर्द, त्रिदेव, विधाता, एक दुजे के लिए, पाताल भैरवी, हत्या इत्यादी चित्रपटांनी ज्युबिली हिट यश प्राप्त केले. एक दुजे के लिएची क्रेझ भारी होती. खरं तर ‘फस्ट डे फर्स्ट शो’ संपला आणि माऊथ पब्लिसिटीवर चित्रपट असा काही हिट झाला की विचारु नका. त्याच्या यशाबद्दलची साशंकता कुठल्या कुठे पळून गेली. म्हणून मी नेहमीच म्हणतो, जोपर्यंत पब्लिक चित्रपट पाहत नाही तोपर्यंत तो हिट अथवा फ्लाॅप नसतो.
कसौटी, हमराही (रणधीर कपूर आणि तनुजा अशी वेगळीच जोडी यात जमली), ब्लॅक मेल (पल पल दिल के पास तुम रहती हो… हे कायमच तरुण असलेले गाणे यातीलच), अर्जुन पंडित (संजीवकुमार मध्यवर्ती भूमिका), आदमी सडक का, चोरनी यांनी शंभर दिवसांचे यश संपादले. येथे फ्लाॅप ठरलेल्या चित्रपटात यादगार, यह गुलिस्ता हमारा, आरोप, पती परमेश्वर, लैला, जिनी और जानी, दीदार ए यार, सवाल, किताब, माय फ्रेन्ड असे अनेक चित्रपट आहेत.
मॅटीनी शोला अचानक (गुलजार दिग्दर्शित आणि विनोद खन्ना अभिनित चित्रपट), चलते चलते (संगीतकर बप्पी लाहिरीला स्टार करणारा हा चित्रपट), विनोद पांडे दिग्दर्शित एक बार फिर, तसेच सौदागर ( नूतन, अमिताभ बच्चन आणि पद्मा खन्ना), बासू चटर्जी दिग्दर्शित अमोल पालेकर आणि टीना मुनिम अशी वेगळी जोडी असलेला ‘बातो बातो मे’ इत्यादी चित्रपटांना बरे यश लाभले. हे मॅटीनी शोच्या पठडीतील चित्रपट त्यामुळे त्यांचे असे रिलीज अगदी योग्य.
सुभाष घई सुरुवातीच्या काळात चक्क हीरोगिरी करायचा त्यातील त्याचा मौशमी चटर्जीसोबतचा ‘नाटक’ या नावाचा चित्रपट पडद्यावर आला तोच पडला. निर्मितीवस्थेत रखडलेल्या आणि कायमसाठी डब्यात गेलेल्या काही चित्रपटातील दृश्यांचा मिळून बनवलेला ‘सिनेमा सिनेमा’ येथे मॅटीनी शोला झक्कास चालला. माझ्यासारख्या फिल्म दीवान्याला असा चित्रपट एक सुखद पर्वणीच ठरला.
या चित्रपटात दिलीप कुमार आणि नूतन यांच्या डब्यात गेलेल्या ‘शिकवा’ मधील दृश्य पाहायला मिळाले. तसेच हंसा वाडकर यांच्या आत्मचरित्रावर आधारित श्याम बेनेगल दिग्दर्शित आणि स्मिता पाटील अभिनित ‘भूमिका’ याच राॅक्सीत मॅटीनी शोला झळकला. असे वेगळ्या पठडीतील चित्रपट प्रदर्शित होणं म्हणजे वैभव असते.
राॅक्सी चित्रपटगृहात लक्ष्मण रेषा, या सुखानो या, आपली माणसं, सुंदरा सातारकर (यात राजेश खन्ना पाहुणा कलाकार होता. म्हणजे राॅक्सीत झळकलेला त्याचा आणखीन एक चित्रपट), निवडुंग, लेक चालली सासरला, महेश कोठारेचा मसालेदार मनोरंजक ‘दे दणादण’ वगैरे वगैरे अनेक मराठी चित्रपट मॅटीनी शोला रिलीज झाले.
आपली माणसं प्रदर्शित व्हायच्या दिवसात मी काॅलेजमध्ये होतो आणि चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या शुक्रवारी या चित्रपटाचा फोटो सेट पाहण्यासाठी थिएटरवर गेलो असता, मला या चित्रपटाचे दिग्दर्शक व्ही. के. नाईक दिसले. रसरंग, चित्रानंद साप्ताहीकातील त्यांचा फोटो पाहिला असल्याने त्यांना मी ओळखलं आणि ते नेमके काय करताहेत याबाबत माझे कुतूहल विलक्षण वाढलं. एखादा सिनेमावाला आपल्या कलाकृतीविषयी कसा प्रचंड भावूक होतो ते मी प्रत्यक्ष अनुभवलं.
‘आपली माणसं’ पाहायला प्रेक्षक येत होते, गर्दी वाढत होती, ते पाहात त्यांचा चेहरा विलक्षण खुलून जाई. मी अशा पध्दतीचा अनुभव पहिल्यांदा घेत होतो. कालांतराने मी मिडियात आल्यावर त्यांना माझी ही आठवण सांगताच ते हेलावून गेले. ते म्हणाले, “प्रत्येक दिग्दर्शकाला नेहमीच वाटतं असतं की, आपला चित्रपट अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहचावा आणि ते घडताना प्रत्यक्षात पाहायला तो आतूर असतो. माझे तेच झाले.”
राॅक्सीची ही माझी अगदी वेगळी आठवण. अशीच एक आठवण राजेश खन्नाच्या निधनाच्या दिवशीची. म्हणजे १८ जुलै २०१२ रोजीची. एबीपी माझा या चॅनलसाठी मी आणि त्यांचा प्रतिनिधी अश्विन बापट ‘राजेश खन्नाचे गिरगाव कनेक्शन’ या कव्हरेजसाठी जाताना मी राजेश खन्नाचे राॅक्सीचे प्रगती पुस्तक सांगत होतो तेव्हा मला त्या त्या चित्रपटांचे डेकोरेशनही आठवले. मी त्याला त्याबद्दलही सांगितले आणि नसिहत वगैरेच्या अपयशाची कल्पनाही दिली.
======
हे देखील वाचा – सेन्ट्रल प्लाझा: जेव्हा मैत्रिणींसोबत गेलेल्या जयश्री गडकर यांना थिएटरमध्ये प्रवेश मिळाला नाही
======
राॅक्सी माझ्यासाठी अनेक प्रकारच्या आठवणींने भरलेले आहे, भारलेले आहे. आजही मला आठवतेय, मध्यंतरात बाहेर यायची संधी मिळे आणि मी पंचवीस पैशाचा वडापाव मुठीत पकडून पुन्हा सीटकडे धावत असे…