ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
अरोरा थिएटरचं आपलं एक व्यक्तिमत्व
देशात कोणत्याही शहरातील, तालुक्याच्या ठिकाणचं, अगदी खेड्यापाड्यातील कोणतेही सिंगल स्क्रीन थिएटर्सचं आपलं एक स्वतंत्र व्यक्तिमत्व असल्याचं लक्षात येईल. त्यातील बरीच सिंगल स्क्रीन थिएटर्स आज ‘काळाच्या पडद्याआड’ गेली असली तरी, काहींच्या खाणाखुणाही आज शिल्लक नसल्या तरी स्थानिक पातळीवरील चित्रपट दीवाने आजही त्या सिंगल स्क्रीन थिएटर्सच्या स्वतंत्र ओळखीच्या वैशिष्ट्यावर हरखून गेल्याचे लक्षात येईल. आपल्या देशातील अस्सल चित्रपट रसिक फक्त आणि फक्त चित्रपट पाहून त्यातून मोकळा होत नाही तर तो अनेकदा तरी अमूक अमूक चित्रपट कुठे बरे पाहिला या आठवणींसह त्या चित्रपटावर भरभरुन बोलतो…असेच एक स्वतंत्र व्यक्तिमत्व असलेले चित्रपटगृह अरोरा.
एव्हाना मुंबईतील चित्रपट रसिकांच्या डोळ्यासमोर माटुंगा येथील अतिशय मोक्याच्या ठिकाणची अरोरा थिएटरची इमारत आणि ते खास करुन दक्षिण भारतीय प्रादेशिक भाषेतील चित्रपटांचे हक्काचे चित्रपटगृह याची आठवण आली असेलच. दक्षिणेकडील तेजुकाया पार्कच्या कांती महलसारखी इमारत हे अरोराचे वैशिष्ट्य. चित्रपटगृहाचं आपलं एक वेगळेपण असावे हे वैशिष्ट्य अनेक जुन्या सिंगल स्क्रीन थिएटर्सच्या बाबतीत जपलेले दिसेल.(Aurora Theatre)
आजच्या कार्पोरेट युगातील डिजिटल पिढीला स्वतःच्या गाडीतून फिरताना मुंबईतील अशा काही हुकमी स्पाॅटचे कदाचित वेगळे वैशिष्ट्य जाणवत नसेल पण पूर्वापार एस. टी. ने बाहेरगावाहून मुंबईत येणाऱ्या अनेक प्रवाशांचे एक वैशिष्ट्य होते, चेंबूरला मैत्री पार्कला गाडी आल्यावर आर. के. स्टुडिओवर नजर टाकायचीच आणि मग एस.टी. आणखीन पुढे आल्यावर माटुंगा परिसरात तशाच डाव्या हाताला असलेल्या अरोरा टाॅकिजवर हमखास नजर टाकायचीच. भले तेथे तमिळ अथवा तेलगू भाषेतील चित्रपट लागलेला असेल.
तुम्हालाही कल्पना आहेच, आपल्या देशातील शहरातील अगदी जुनी चित्रपटगृह ही इंग्रजांच्या काळात उभी राहिली. त्यातील काहींवर युरोपियन चित्रपटगृह कल्चरचा प्रभाव आहे. अरोरा १२ मार्च १९४२ साली सुरु झाले ते प्रामुख्याने इंग्लिश चित्रपटासाठी होते. त्या काळातील मुंबईची सीमा वांद्रे, सायन, चेंबूरपर्यंत होती. अरोरालगतच मुंबईतील ट्राम बसचे शेवटचे स्थानक होते. मुंबईतील ट्राम बस सेवा साठच्या दशकाच्या पूर्वार्धापर्यंत सुरु होती. अगदी सुरुवातीस चित्रपट निर्मितीचे प्रमाण अत्यल्प असताना अरोरामध्ये दक्षिण भारतीय समाजांच्या सभेचेही आयोजन करण्यात येई.
अरोरा थिएटरचा परिसर म्हणजे एका बाजूला माटुंगा येथील दक्षिण भारतीय नागरिक तर दुसर्या बाजूला पाहिलं तर वडाळा, शिवडी याकडे आपण जातो. सायन, चेंबूरही जवळच. जागा अगदी मोक्याची. (Aurora Theatre)
चित्रपटगृहाची आसन क्षमता सातशे सीटसची. बाल्कनी छोटीशी. सुरुवातीच्या काळात ए आणि बी ग्रेड इंग्लिश चित्रपट प्रदर्शित होत असतानाच मॅटीनी शोला दुपारी बारा वाजता दक्षिण भारतीय प्रादेशिक भाषेतील चित्रपट प्रदर्शित होत गेले आणि त्याना हमखास हाऊसफुल्ल गर्दी होई. त्यामुळे मग काही वर्षांतच दिवसा तीन खेळ याप्रमाणेच तमिळ, तेलगू, मल्याळम वा कन्नड भाषेतील चित्रपट प्रदर्शित होत गेले आणि अरोरा थिएटरला स्वतःची ओळख मिळाली. काही वर्षातच ती ओळख चिकटली. पूर्वी दक्षिण भारतात प्रदर्शित झालेली तेथील प्रादेशिक भाषेतील चित्रपट अरोरा थिएटरला येण्यास तीन चार महिने सहज लागत. तोपर्यंत चित्रपटविषयक साप्ताहिक, मासिकांतून त्या चित्रपटांबद्दल भरपूर रंजक माहिती, गाॅसिप्स, भरपूर फोटो पाह्यला मिळत. गाणी हेही एक माध्यम होतेच. मुंबईत इतरत्रही थोड्याफार प्रमाणात साऊथ इंडियन पिक्चर रिलीज होत पण अरोराची गोष्टच वेगळी. जेमिनी गणेशन, शिवाजी गणेशन, जयललिता, एमजीआर, एनटीआर यांच्या यशस्वी कालखंडात अरोरामध्ये त्यांचे चित्रपट प्रदर्शित होत, त्यानंतर कमल हसन, रजनीकांत, मोहनलाल, विष्णुवर्धन, श्रीदेवी, जयासुधा यांचा काळ आला. अरोराला आता अधूनमधून हिंदी चित्रपटही प्रदर्शित होत.(Aurora Theatre)
जवळच षण्मुखानंद सभागृहात मनोरंजनाचे कार्यक्रम, फिल्म फेअर पुरस्कार सोहळ्याचे आयोजन सातत्याने होत. ( कालांतराने त्याची जागा बदलली). रजनीकांत क्रेझने अरोराला कमालीचे महत्व प्राप्त झाले. रजनीकांतचा पिक्चर म्हणजे कथा पटकथा, संवाद, थीम, गीत संगीत नृत्य व पोस्टर या सगळ्यावर रजनीकांतचा विलक्षण प्रभाव. अतिरंजित आणि अतिशयोक्तीपूर्ण धमाकेदार मसालेदार मनोरंजन. त्याच्या हुकमी प्रेक्षकवर्गात स्वप्नाळू आणि कष्टाळू वर्ग मोठाच. आणि अरोरावर त्याचा भव्य कटआऊट. अरोराच्या वैशिष्ट्यपूर्ण वाटचालीत एक महत्वाचा काळ. शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित होताना सकाळीच साडेसहा, सात वाजता त्याचे निस्सीम भक्त ढोल ताशांच्या गजरात पिक्चरला येऊ लागले. रजनीकांतच्या कटआऊटची आरती, त्याला अनेक लिटर दुधाने अभिषेक हे ठरलेले. कधी पडद्यावरील त्याच्या जोरदार एन्ट्रीला पडद्यावर पैसे उडवले जात. मुळात हे दक्षिणेकडील कल्चर पण आता मुंबईत आले आणि छान स्थीरावलेही. थलैवावरचे रसिकांचे बेहद्द प्रेम यातून अधोरेखित होत राहिले. त्याची भूमिका असलेल्या टू पाईंट झिरो,कबाली वगैरे अनेक चित्रपट येथे प्रदर्शित होताना प्रत्येक वेळी असेच जोरदार शोरदार स्वागत. कधी यानिमित्त रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले.
पूर्वी येथे मोनो साऊंड सिस्टीम होती, मग डीटीएस सिस्टीम आली आणि मग डाॅल्बीदेखिल साऊंड सिस्टीम आली. फार पूर्वी टायटॅनिक या विदेशी चित्रपटाने येथेच शंभर दिवसांचा यशस्वी प्रवास केला. प्रसाद प्राॅडक्सन्स निर्मित व के. बालचंदर दिग्दर्शित कमल हसन व रति अग्निहोत्री यांच्या प्रमुख भूमिका असलेला म्युझिकल रोमॅन्टीक चित्रपट ‘एक दुजे के लिए ‘नेही येथे पंधरा आठवड्यांचे यश संपादले. मणि रत्नम दिग्दर्शित बहुचर्चित ‘नायकन ‘ या तमिळ भाषेतील चित्रपटांला बहुभाषिक चित्रपट रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. याचे कारण, या चित्रपटाची थीम आणि कमल हसनचा प्रभावी अभिनय. अरोरा थिएटरचे वेगळेपण यातून अधोरेखित होत राहिले. अधूनमधून हिंदी चित्रपटही येथे प्रदर्शित होत राहिले. मणि रत्नम दिग्दर्शित ‘रोजा ‘ हा मूळ तमिळ भाषेतील चित्रपट. अरोरामध्ये तोच अगोदर प्रदर्शित झाला. या चित्रपटाची दिवसेंदिवस चर्चा वाढत वाढत गेल्यावर तो हिंदीत डब होऊन प्रदर्शित झाला. तेव्हा दक्षिण मुंबईतील मेट्रोला मॅटीनी शो हे त्याचे मेन थिएटर होते. अंजली, बाॅम्बे, तिरुडा तिरुडा, देवरमगन असे अनेक चित्रपट येथे प्रदर्शित झाले. (Aurora Theatre)
अश्विनी भावे पूर्वी कुर्ला येथे राह्यला असतानाच तिने अरोरा थिएटरमध्ये तिरुडा तिरुडा वगैरे अनेक चित्रपट एन्जाॅय केले. दिग्दर्शक मधुर भांडारकरनेही रजनीकांतचे काही चित्रपट येथे फर्स्ट डे फर्स्ट शोला अनुभवले. आजच्या पॅन इंडिया चित्रपट युगात दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपट हिंदीत डब होऊन जगभरातील अनेक देशांत प्रदर्शित होऊ लागला तसाच तो मुंबईतही मोठ्याच प्रमाणावर प्रदर्शित होऊ लागला. एव्हाना मल्टीप्लेक्स युग बरेच पसरले. मुंबईत एकाच वेळेस तेलगू व हिंदी भाषेतील बाहुबली, बाहुबली २, वगैरे अनेक चित्रपट प्रदर्शित होऊ लागले. आता वडाळा येथील आयनॉक्स मल्टीप्लेक्समध्ये दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपटांचे भव्य दिमाखदार प्रीमियर रंगू लागले.
===========
हे देखील वाचा : गावात दादाचं पिक्चर आलं रे आलं….
===========
त्यातून अरोराचे महत्व बरेच कमी कमी होत गेले आणि मग तर अरोरा या सगळ्यात मागे पडत गेले. एके दिवशी मुद्दाम अरोरा थिएटरला भेट दिली असता ते दुर्दैवाने बंद झाल्याचे दिसून आले. पण मुंबईतील चित्रपट थिएटर संस्कृतीत आपल्या खास वैशिष्ट्यांनी ओळखल्या गेलेल्या अरोरा थिएटरचा खेळ थांबलाय याची मिडियात कुठेही कसलीही दखल नाही याचं सखेद आश्चर्य वाटले. कदाचित असेही असेल आता मुंबईच काय अगदी देशभरातील अनेक जुनी एकपडदा चित्रपटगृहे अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर्स एकेक करत बंद पडताहेत आणि त्याचा आश्चर्याचा धक्का बसणेही कमी कमी होत गेल्याने अरोरामधील खेळ थांबणे दुर्लक्षित झाले असेल.(Aurora Theatre)
आज पॅन इंडिया चित्रपट संस्कृतीत दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपट हिंदीत डब होतानाच मूळ भाषेतही अनेक मल्टीप्लेक्समध्ये प्रदर्शित होत असले तरी अरोरा थिएटरने साऊथच्या चित्रपटांना खूपच मोठा आधार दिला. अरोरा थिएटर म्हटलं की साऊथचा चित्रपट पटकन डोळ्यासमोर येतोच यात बरेच काही आले…