बंडखोर नायिका- लालन सारंग
ज्या काळात मराठी रंगभूमी वा चित्रपटात मुसुमुसु रडणारी नायिका लोकप्रिय होती; त्याकाळात अतिशय वेगळी बंडखोर नायिका साकारणा-या लालन सारंग यांचा आज स्मृतीदिन. त्यांच्या कारकीर्दीबद्दल जाणून घेताना त्यांच्या काही गाजलेल्या भूमिकांना उजाळा देऊया.
‘लालन’ या नावापासूनच वेगळेपण जपणा-या लालन सारंग यांच्या उद्याचा संसार, सखाराम बाईंडर, कला, गिधाडे, घरकुल, घरटे अमुचे छान, जंगली कबुतर, तो मी नव्हेच, रथचक्र, संभुसाच्या चाळीत या व अन्य नाटकातील भूमिका सर्वार्थाने निराळ्या होत्या. त्यांनी सामना, हा खेळ सावल्यांचा अशा काही चित्रपटांत काम केलं होतं. रथचक्र ही त्यांची हिंदी मालिकाही गाजली.
गोव्यात जन्मलेल्या लालन यांचं माहेरचं नाव लालन पैंगणकर. एक भाऊ आणि सहा बहिणी असलेल्या मध्यमवर्गीय घरात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांना वाचनाची विलक्षण आवड होती. त्यांच्या आवडीच्या कादंबरीतील एका बैरागिणीच्या पात्रावरुन त्या़ंनी मुलीचं नाव लालन असं ठेवलं. लालन यांचं बालपण गिरगाव परीसरात गेलं. राममोहन शाळेत त्यांचं शिक्षण झालं. सिद्धार्थ महाविद्यालयात शिकतानाच त्या नोकरी करत होत्या. महाविद्यालयातून आय एन टीसाठी त्यांनी नाटक केलं. आणि तिथूनच त्यांच्या नाट्यकारकीर्दीची सुरूवात झाली. पुढे कमलाकर सारंग यांच्याशी त्यांची ओळख झाली आणि दोघांनी प्रेमविवाह केला.
विजय तेंडुलकरांचे ‘सखाराम बाईंडर’ नाटक रंगभूमीवर आणायचं ठरल्यावर त्यातील चंपाचा शोध सुरू होता. लालन यांचा शहरीपणा ही भूमिका साकारु शकेल का याची सुरुवातीला सर्वांना शंका होती. त्याआधी सत्यदेव दुबे यांच्या नाटकाचा एखाद अनुभव वगळता लालन व्यावसायिक रंगभूमीवर नव्या होत्या. पण त्यांनी दिसण्यापासून आवाजापर्यंत सगळ्याच गोष्टींवर चंपाच्या भूमिकेसाठी मेहनत घेतली. चंपा बिनधास्त वाटेल पण अश्लील वाटणार नाही यासाठी त्यांनी विशेष काळजी घेतली. पहिल्याच प्रयोगात सखाराम चंपाला या या म्हणत घरात घेऊन येतो हा प्रसंग रंगमंचावर सुरू झाला आणि चंपाच्या एंट्रीलाच प्रेक्षकातून हाssss अशी दाद आली. सखाराम बाईंडर’मधली चंपा प्रेक्षकांपर्यंत योग्य त-हेने पोहचली.
सखाराम बाईंडर’, कमला, रथचक्रमधली ती या लालन यांच्या नाट्यकारकीर्दीतील महत्त्वपूर्ण भूमिका. रथचक्रमधली ती साकारताना लालन त्यात इतक्या समरसून जायच्या की आपल्या वास्तव जीवनातील व्यक्तींच्या बाबतीत हे घडतंय असा त्यांना भास होई. अर्थातच स्वीच ऑन स्वीच ऑफचं तंत्र आत्मसात करत ही भूमिका त्यांनी संयतपणे साकारली. कमला मधील सरिताची भूमिकाही प्रेक्षक पसंतीस उतरली. नव-याची मर्जी सांभाळत दहा वर्ष संसार करणा-या सरीताच्या आयुष्यात कमला नामक स्त्री येते. पत्रकार नव-याने स्त्रियांच्या बाजाराची भांडाफोड करण्यासाठी विकत आणलेल्या कमलाचा “आपको कितनेमें खरीदा?” हा प्रश्न सरीताला स्त्री म्हणून स्वत:च्या घरातील स्थानाचे वेगळे भान देतो आणि ती बदलते. हा बदल लालन इतक्या खुबीने वठवायच्या की त्याचा परिणाम नाटकानंतर भेटायला येणा-या महिला प्रेक्षकांच्या जाणीवांमध्ये दिसायचा.
अशा वैविध्यपूर्ण भूमिका साकारणा-या लालन यांनी २००६ मध्ये कणकवली येथे झालेल्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. त्यांच्या भूमिकांप्रमाणेच, “नाट्यनिर्मितीसाठी सरसकट सरकारी अनुदान नको” ही नाट्यसंमेलनाध्यक्ष म्हणून असलेली भूमिकाही तितकीच वादळी ठरली.
२०१८ साली वयाच्या ७९ व्या वर्षी लालन यांनी जगाचा निरोप घेतला मात्र अतिशय वेगळ्या वाटेवरची त्यांची बंडखोर नायिका मात्र मराठी रसिकांच्या मनात कायम घर करून राहिल हे निश्चित