भारतीय चित्रपटाला जागतिक स्तरावर नेणारा दिग्दर्शक – आशुतोष गोवारीकर
अशोक आणि किशोरी गोवारीकर या कऱ्हाडे ब्राम्हण दाम्पत्याच्या पोटी आशुतोषचा जन्म झाला. त्याचं मूळ गाव कोल्हापूरमध्ये असलं तरी त्याचं बालपण मात्र मुंबईला बांद्र्यातच गेलं. आपल्या चित्रपटांमधून इतिहासातील निरनिराळ्या कालखंडांना पडद्यावर उभं करणाऱ्या आशुतोषचा शाळेतील आवडता विषय मात्र भूगोल होता. त्याच्या पालकांनी लहानपणापासूनच त्याला नाटकं, सिनेमे पाहायची आवड तर लावलीच, त्याशिवाय त्याची विविध साहित्यप्रकारांशीही ओळख करून दिली. आशुतोषने मुंबईच्या मिठीबाई कॉलेजमधून रसायनशास्त्राची पदवी घेतली.
कॉलेज लाईफ पुरेपूर एंजॉय करत असतानाच त्याने काही नाटकांमध्येही भाग घेतला. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर उंचापुरा व देखणा आशुतोष मॉडेलिंगकडे वळला. कॉलगेट, लाईफबॉय सारख्या नामांकित ब्रँड्ससोबत त्याला काम करण्याची संधी मिळाली. अल्पावधीतच त्याला दिग्दर्शक केतन मेहताच्या ‘होली’ या चित्रपटातही सहाय्यक भूमिका मिळाली. ‘होली’मध्ये नसरुद्दीन शहा, परेश रावल, ओम पुरी, इत्यादी दिग्गज कलाकारांबरोबर स्क्रीन शेअर करता आल्याने त्याचा आत्मविश्वास दुणावला. चित्रपटानंतरही त्याची आणि आमिरची दोस्ती फक्त पडद्यापुरती मर्यादित राहिली नाही. त्यानंतर ‘नाम’, ‘कच्ची धूप’, ‘गूँज’, ‘इंद्रधनुष’, ‘कमला की मौत’, ‘सलीम लंगडे पे मत रो’, ‘गवाही’, चमत्कार’, ‘जानम’ सारख्या चित्रपटांमधूनही त्याने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. मध्यंतरी श्रीराम लागू दिग्दर्शित ‘एक रात्र मंतरलेली’ या मराठी चित्रपटासोबतच त्याने ‘वेस्ट इज वेस्ट’ या इंग्रजी चित्रपटात आणि ‘जाट’ या हरियाणवी चित्रपटातही काम केलं. १९८८मध्ये ‘भारत एक खोज’ ह्या गाजलेल्या मालिकेत त्याने तथागत गौतम बुद्धांची भूमिकाही साकारली होती. त्याच्या पुढच्याच वर्षी आलेल्या ‘सर्कस’ या मालिकेतही विकीची भूमिका साकारली होती.
याचदरम्यान त्याने इतर सहकलाकारांसोबत घनिष्ठ संबंध प्रस्थापित केले. आमिर सोबतच दीपक तिजोरी, शाहरुख खान, जुही चावला इत्यादी कलाकारांसोबत गप्पांचे फड रंगू लागले. शूटिंगमध्ये जेव्हा जेव्हा ब्रेक मिळायचा तेव्हा आशुतोष या सहकलाकारांसोबत झालेल्या किंवा येणाऱ्या सीनवर चर्चा करायचा, नवनवे सजेशन्स द्यायचा, पण हे सगळं फक्त बोलण्यापुरतंच मर्यादित राहायचं आणि प्रत्यक्षात तो सीन जसा लिहला गेलाय तसाच शूट व्हायचा. आशुतोषची (Ashutosh Gowariker) निरीक्षणशक्ती इतकी जबरदस्त होती की त्याला फ्रेममधील उणिवा चटकन भासायच्या पण दिग्दर्शकापुढे नाईलाजाने त्याला तो सीन आहे तसाच साकारावा लागायचा. त्याने तेव्हाच ठरवलं होतं की, भविष्यात जर आपण कधी दिग्दर्शक बनलोच, तर मात्र अश्या चुका करायच्या नाहीत. आशुतोषची ही अतिचिकित्सक वृत्ती इतरांना खटकत असली तरीही त्याचे सहकलाकार, विशेषतः आमिर, शाहरुख आणि दीपक, त्याच्या या वृत्तीचं कायमच कौतुक करायचे, त्याला प्रोत्साहित करायचे. त्याच्यात एक उत्तम दिग्दर्शक बनण्यालायक आवश्यक ते सर्व गुण आहेत, हे या तिघांनी कधीच ओळखलं होतं आणि वारंवार त्याच्या मनावर हे ठसवलंही होतं.
हे वाचलंत का: शाहरुख खान : एक अभिनेता, एक प्राॅडक्ट
शेवटी मनाची तयारी करून त्याने दिग्दर्शनाच्या क्षेत्रात आपलं पहिलं पाऊल टाकायचं ठरवलं. १९९३ ला आलेली ‘पहला नशा’ (Pehla Nasha) ही त्याने दिग्दर्शित केलेली पहिली फिल्म. यात दीपक तिजोरी, पूजा भट्ट आणि रविना टंडन मुख्य भूमिकेत दिसून आले तर आमिर, सैफ अली खान, जुही चावला आणि शाहरुख खान यांनी एक खास कॅमिओही दिला होता. नीरज-उत्तंक व्होरा या जोडगोळीने संगीतबद्ध केलेला हा थरारपट बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी हिट ठरला. त्यानंतर आशुतोषने आमिर, ममता कुलकर्णी आणि परेश रावलला एकत्र घेऊन ‘बाझी’ ही ऍक्शन फिल्म १९९५ मध्ये दिग्दर्शित केली. या चित्रपटासाठी अनू मलिक यांनी संगीत दिग्दर्शन केलं होतं. हा चित्रपट मात्र त्याला ‘पहला नशा’इतकं यश देऊ शकला नाही. ‘बाझी’च्या अपयशानंतर आशुतोष पुन्हा एकदा अभिनयाकडे वळला. ‘आहट’ आणि ‘सी,आय.डी.’ सारख्या मालिका, ‘कभी हां कभी ना’ आणि ‘वोह’ हे हिंदी चित्रपट, श्रावणी देवधर दिग्दर्शित ‘सरकारनामा’ हा मराठी चित्रपट इत्यादी प्रोजेक्ट्समध्ये अभिनेता म्हणून काम करत असतानाही त्याच्यातील दिग्दर्शक शांत बसला नाही. सभोवताली घडणाऱ्या घटना, फिल्मी दुनियेतील रोजचे निरनिराळे अनुभव तो त्याच्या सूक्ष्म निरीक्षणशक्तीने टिपत गेला. एव्हाना त्याने एका वेगळ्या कथानकावर काम सुरू केलं होतं ज्यातून त्याला एक मल्टीस्टारर सिनेमा बनवायचा होता.
आशुतोषला या सिनेमात समकालीन घटनांचे संदर्भ म्हणजे गुन्हेगारी, भ्रष्टाचार, दंगली, राजकारण, धार्मिक अथवा जातीय वाद, इत्यादी विषयांचा वापर करायचा नव्हता. त्याला या कोलाहलापासून दूर असणारा पण भारतीय प्रेक्षकांना आवडेल अश्या दर्जाचा सिनेमा द्यायचा होता. त्यामुळे त्याने कथेसाठी स्वातंत्र्यपूर्व भारताचा कालखंड म्हणजेच १८८५-१८९५चं दशक निवडलं. त्या काळाचा अभ्यास करताना त्याला नवानगर संस्थानच्या महाराजा रणजितसिंहांबद्दल आणि त्यांनी क्रिकेट या खेळासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल कळलं. या संदर्भांचा व्यवस्थित अभ्यास करून त्याने ‘एकीचे बळ’ या संकल्पनेवर आधारित त्याच्या आगामी चित्रपटाची कथा लिहायला सुरुवात केली नि हा हा म्हणता आठवड्याभरात त्याची पूर्ण स्क्रिप्टदेखील लिहून झाली. स्क्रिप्ट तयार झाल्यावर तो सर्वप्रथम आमिरला भेटला आणि त्याला पूर्ण स्क्रिप्ट ऐकवली.
चित्रपटाचा नायक धोतर घालून क्रिकेट खेळतो हेच आमिरला मुळात पटलं नव्हतं. परिणामी, त्याने नकार दिला. त्यानंतर आशुतोषने ६ महिन्याने पुन्हा एकदा डिटेल्ड स्क्रिप्ट ऐकवून अखेर आमिरला त्या चित्रपटात काम करण्यासाठी राजी केलं. निर्माते शोधण्यासाठी बरीच धावपळ केल्यानंतर अखेर आमिरनेच निर्माता बनण्याचं ठरवलं आणि चंपानेरच्या खेड्यातला आगळावेगळा स्वातंत्र्यसंग्राम ‘लगान’च्या रूपाने पडद्यावर उभा राहिला.
अस्सल मातीत बनलेला ‘लगान’ आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रचंड गाजला. धोतर घातलेला नायक, क्रिकेटच्या सामन्याचा थरार, शुद्ध हिंदीऐवजी अवधी बोलीभाषेचा वापर, अहिंसात्मक स्वातंत्र्यसंग्राम इत्यादी रेकॉर्डब्रेक विषय हाताळणारा ‘लगान’ प्रेक्षकांनी उचलून धरला. ‘लगान’ (Lagaan) हा २००१चा सर्वाधिक कमाई करणारा तिसरा चित्रपट ठरला. ‘लगान’मुळे आशुतोषला २००२मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी फिल्मफेअर, बॉलिवूड मुव्ही, आयफा, झी सिने अवॉर्ड तसेच सर्वोत्कृष्ट कथेसाठी आयफा, बॉलिवूड मुव्ही, झी सिने आणि फिल्मफेअर अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं. इतकंच नव्हे, ‘मदर इंडिया’ आणि ‘सलाम बॉम्बे’नंतर त्या वर्षासाठी ऑस्करवारी करण्याचा मानही ‘लगान’ने मिळवला. आशुतोषचं दिग्दर्शकीय कौशल्य त्याला जागतिक स्तरावर घेऊन गेलं आणि २००४मध्ये ऑस्करचा आजीवन वोटिंग मेंबर बनण्याचा बहुमानही त्याला मिळाला.
२००४मध्ये आशुतोषने शाहरुखला सोबत घेऊन ‘स्वदेस’ (Swades) बनवला. दिग्दर्शनासोबतच कथा-पटकथा लेखनाची जबाबदारीही आशुतोषने सांभाळली. गांधीजींच्या ‘खेड्याकडे चला’ या संकल्पनेवर आधारित हा चित्रपट होता. त्याचसोबत शिवराम कारंथ यांच्या ‘चिगुरिदा कनासू’ आणि रजनी बक्षी यांच्या ‘बापू कुटी’ या साहित्यकृतींचा प्रभावही ‘स्वदेस’च्या कथेवर होता. कैक सामाजिक जाणिवांना हात घालत प्रबोधन करणारा हा सिनेमा बहुसंख्य जाणकारांनी स्वीकारला मात्र प्रेक्षकांनी नाकारला. वीर-झारा, मैं हूँ ना, कल हो ना हो सारख्या चित्रपटात रोमँटिक हिरोची भूमिका साकारणारा शाहरुख इथं अत्यंत वेगळ्या भूमिकेत दिसून आला, जे प्रेक्षकांना पचवणं जड गेलं. ऐतिहासिक घटना, संदर्भांची जाण आणि आवड असलेल्या आशुतोषचा ‘स्वदेस’ हा मात्र तत्कालीन काळाच्या पुढचा सिनेमा होता. अभिनय, संगीत, कथा आणि दिग्दर्शन अश्या सर्वच पातळ्यांवर उत्कृष्ट कामगिरी करणारा ‘स्वदेस’ आज एक ‘कल्ट क्लासिक’ म्हणून ओळखला जातो.
चार वर्षांच्या प्रदीर्घ गॅपनंतर २००८मध्ये आशुतोष ‘जोधा अकबर’ (Jodhaa Akbar) ही मुघलकालीन प्रेमकहाणी पडद्यावर घेऊन आला. यात हृतिक रोशन आणि ऐश्वर्या राय यांच्या प्रमुख भूमिका होत्या. ‘लगान’ आणि ‘स्वदेस’सारखीच याही चित्रपटात भलीमोठी स्टारकास्ट होती त्याचजोडीला आता भव्यदिव्य सेट्स आणि ग्राफिक्सचाही समावेश होता. या चित्रपटासाठी आशुतोषने ‘नुक्कड’फेम अभिनेते आणि लेखक हैदर अली यांच्या मदतीने कथा व पटकथा लेखन केलं.
हे देखील वाचा: जोधा अकबर- भव्यदिव्य प्रेमकथा साकारताना..
एक हिंदू-मुस्लिम प्रेमकथा पडद्यावर येणे आणि त्यातही त्याला इतिहासाचा संदर्भ असणे आणि मग याच गोष्टींचा आधार घेऊन जर काही विवाद निर्माण झालेच, तर निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून आशुतोषला आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागलं असतं त्यामुळे त्याने आधीच सर्व इतिहासकार आणि विशेषतः जोधाबाईशी संबंधित राजघराण्यांकडून रीतसर परवानग्या घेऊनच चित्रपटाचं काम सुरू केलं. १५ फेब्रुवारी २००८ला रिलीज झालेल्या ‘जोधा अकबर’ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आणि फिल्मफेअर, आयफा, नॅशनल फिल्म अवॉर्ड्सवरही आपली मोहर उमटवली.
२००९मध्ये आशुतोषने ‘व्हॉटस युवर राशी’ हा रॉमकॉम दिग्दर्शित करून प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का दिला. हरमन बावेजा आणि प्रियांका चोप्राचा हा चित्रपट पायरसीचा शिकार ठरला. थिएटर्समध्ये रिलीज झाल्यावर अनावश्यक लांबीचं कारण देत प्रेक्षकांनीही या चित्रपटाकडे पाठ वळवली. या चित्रपटात प्रियांकाने तब्बल १२ वेगवेगळ्या भूमिका साकारल्या होत्या, ज्याबद्दल तिचं सर्वांकडूनच कौतुक करण्यात आलं. या रोमँटिक कॉमेडी सिनेमाच्या अनावश्यक लांबी आणि गुंतागुंत असलेला स्क्रिनप्लेमुळे आशुतोषला टीकेचा सामना करावा लागला.
पुढच्याच वर्षी आशुतोषने पुन्हा एकदा इतिहासाकडे मोर्चा वळवत ‘खेले हम जी जान से’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. अभिषेक बच्चन, दीपिका पदुकोण आणि सिकंदर खेर यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट मानिनी चॅटर्जी यांच्या ‘डू ऑर डाय’ या कादंबरीवर आधारित होता. वर्षानुवर्षे बेदखल केला गेलेला चिट्टगॉगचा उठाव आशुतोषने पडद्यावर उभा केला खरा, पण एक चित्रपट म्हणून तो त्या कलाकृतीला न्याय देऊ शकला नाही. चित्रपटाच्या नावाला साजेसा अभिनय कलाकारांना करता आला नाही तसेच संगीत, सिनेमॅटोग्राफी अश्या पातळ्यांवरही चित्रपटाने प्रेक्षकांना निराश केले. परिणामी, हाही चित्रपट फ्लॉप गेला.
२०१४ मध्ये, आशुतोष टेलिव्हिजनकडे वळला आणि त्याने ‘स्टार प्लस’वर ‘एव्हरेस्ट’ या मालिकेच्या निर्मिती आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली. उण्यापुऱ्या तीनच महिन्यांत ही मालिकाही टीआरपीचं गणित जुळवू न शकल्याने बंद झाली. भरपूर बजेट, भक्कम स्टोरीलाईन असूनही ही सिरीयल प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली नाही.
मोठ्या पडद्यापासून ६ वर्षांचा प्रदीर्घ गॅप घेतल्यानंतर आशुतोष पुन्हा एकदा ‘मोहेंजो दारो’ (Mohenjo Daro) च्या निमित्ताने २०१६ मध्ये एक पिरियड फिल्म घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस आला. त्यापूर्वी त्याने सलग तीन वर्षं या चित्रपटाच्या कथा आणि पटकथेवर मेहनत घेतली आणि कैक संशोधकांच्या भेटीगाठींमधून नवनवी माहिती मिळवत त्याने सिंधू खोऱ्यातील लोकसंस्कृती ‘मोहेंजो दारो’च्या रूपाने पडद्यावर साकारली. हृतिक रोशन आणि पूजा हेगडे यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली चमक दाखवू शकला नाही. अतिशय जुना कालखंड सुंदररित्या पडद्यावर उभा केल्याबद्दल आशुतोषचं कौतुकही केलं गेलं पण तांत्रिक उणिवा, सदोष पटकथेअभावी चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करू शकला नाही.
त्याचवर्षी आलेल्या राजेश म्हापुसकर दिग्दर्शित ‘व्हेंटिलेटर’ (Ventilator) या मराठी चित्रपटात आशुतोषने ‘राजा कामेरकर’ ही भूमिका साकारली. गेली कित्येक वर्षे कॅमेऱ्यामागून काम करणाऱ्या आशुतोषला कॅमेऱ्यासमोर अभिनय करताना सुरुवातीला अवघडल्यासारखं होऊ लागलं पण अल्पावधीतच त्याने ठीकठाक जम बसवून त्या व्यक्तिरेखेला आपल्या अभिनयातून योग्य न्याय मिळवून दिला. या चित्रपटात राजा कामेरकर एक दिग्दर्शक दाखवलेला आहे आणि त्या पात्राला मिळालेले संवाद, त्याच्या वाट्याला आलेले प्रसंग पाहिल्यास हे पात्र पूर्णतः आशुतोषलाच डोळ्यासमोर ठेवून लिहिलं गेल्याचं प्रेक्षकांना जाणवतं. प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आशुतोषबद्दल असलेला आदर दिग्दर्शकाने या चित्रपटात छोट्याछोट्या प्रसंगांमधून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
पानिपतचा (Panipat) रणसंग्राम ही शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर यावी हे प्रत्येक इतिहासप्रेमीचं स्वप्न होतं आणि इतिहासपटांमध्ये विशेष हातखंडा असलेल्या आशुतोषने हा विडा उचलला. अर्जुन कपूर, क्रिती सॅनन, संजय दत्त, रवींद्र महाजनी आणि हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलाकारांची फौज घेऊन ‘पानिपत’ ६ डिसेंबर २०१९ला थिएटर्समध्ये झळकला. पानिपतची तिसरी लढाई आणि तिची पूर्वतयारी हा खूप मोठा आणि रंजक इतिहास होता आणि त्यामुळेच जास्त लांबीच्या फिल्म्स बनवणाऱ्या आशुतोषकडून सिनेरसिकांना बऱ्याच अपेक्षा होत्या पण सदोष ग्राफिक्स, अनावश्यक उपकथानकं, पात्रांची चुकलेली निवड, इत्यादी गोष्टींमुळे प्रेक्षकांना हा चित्रपट भावला नाही. समाजमाध्यमांमध्ये ‘पानिपत’ची ‘पद्मावत’, ‘बाजीराव मस्तानी’ सोबत केली गेलेली तुलना चित्रपटाला मारक ठरली.
आशुतोषच्या चित्रपटांची लांबी हा कायमच चर्चेचा विषय राहिलेला आहे. आशुतोषला त्याबाबत विचारलं असता तो म्हणतो, “माझ्या चित्रपटाची लांबी ही त्या कथेचीच मागणी असते. तीन-साडेतीन तास प्रेक्षक खिळून राहतील असा कंटेंट देण्यावर माझा भर असतो. जर तुमच्याकडे असा कंटेंट नसेल, तर दोन तासांची फिल्मसुद्धा पाच तासांची वाटू शकते.” ‘पहला नशा’, ‘मोहेंजो दारो’ आणि ‘पानिपत’ वगळता आशुतोषचे इतर सर्वच चित्रपट तीन तासांहून अधिक लांबीचे आहेत. ‘व्हॉटस युवर राशी’चा अपवाद वगळता इतर सर्वच चित्रपटांमध्ये आशुतोषने भरभक्कम स्टारकास्ट घेऊन चित्रपट बनवले आहेत. सोहेल खानने संगीतबद्ध केलेले ‘व्हॉटस युवर राशी’ व ‘खेले हम जी जान से’ आणि अजय-अतुल या संगीतकार जोडगोळीचा परिसस्पर्श लाभलेला ‘पानिपत’ सोडल्यास, आशुतोषच्या इतर सर्वच प्रोजेक्ट्स ए. आर. रहमानच्या जादुई सुरांचा वरदहस्त लाभलेला आहे.
आशुतोषच्या चित्रपटांमधील भव्यदिव्य सेट्स, प्रयोगशीलता, इत्यादी घटकांवर भालजी पेंढारकर आणि सोहराब मोदी यांच्या चित्रपटांचा असलेला प्रभाव तो पदोपदी मान्य करत आलेला आहे. इतिहासपटांबद्दल ‘सफरिंग इज टेम्पररी अँड फिल्म इज पर्मनंट’ हे धोरण तो कायम राबवत असल्याने सेट्स, पात्रांचे पोशाख, दागिने इत्यादी गोष्टींवर तो बारकाईने लक्ष ठेवून असतो. ऐतिहासिक पात्रांनाही हलकासा कंटेम्पररी टच देण्याचं त्याचं कसब निश्चितच वाखाणण्याजोगं आहे. त्याच्या चित्रपटातील स्त्रीपात्रे ही कायमच सामर्थ्यवान स्त्रीशक्तीचे प्रतिक म्हणून प्रेक्षकांसमोर येतात. मग ती प्रियांकाने साकारलेली संजना असो किंवा दीपिकाने साकारलेली कल्पना दत्त अथवा क्रिती सॅननची पार्वतीबाई, ही भूमिका, आशुतोषने त्याच्या चित्रपटातील स्त्रीपात्रांनाही भूमिकेनुसार योग्य न्याय मिळवून दिला आहे.
‘जोधा अकबर’नंतर आशुतोषला यश मिळालं नसलं तरीही ‘व्हेंटिलेटर’ आणि ‘पानिपत’च्या निमित्ताने त्याने काही अंशी सिनेरसिकांच्या आशा पल्लवित केल्या आहेत. व्ही. शांताराम बापूंनंतर मराठी माणसाची एक वेगळी ओळख बॉलिवूडमध्ये निर्माण केलेल्या आशुतोषबद्दल प्रत्येक मराठी माणसाच्या मनात अतीव आदर आहे. आज हा आपल्या सर्वांचाच लाडका दिग्दर्शक ५७ वर्षांचा झाला आहे. भविष्यात त्याच्याकडून उत्तमोत्तम कलाकृती येत राहोत हीच सदिच्छा! कलाकृती मीडिया कडून आशुतोषला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!