‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
बाप्पा आणि आध्यात्मिक वातावरण
स्टार प्रवाह वर सध्या ‘रंग माझा वेगळा ‘ ही मालिका खूप गाजत आहे. त्यातील ‘श्वेता’ ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री म्हणजे अनघा भगरे. अनघाने शास्त्र शाखेतील पदवी घेऊन मास कम्युनिकेशनचा अभ्यासक्रम देखीलपूर्ण केला आहे. ‘अनन्या’ नाटकात देखील तिने काम केले आहे. अनघाच्या घरी दहा दिवसांचा गणपती असतो.
आपल्या गणपतीविषयी सांगताना ती म्हणते, “मी मुळात नाशिकची. आमच्या घरी दहा दिवस गणपतीबाप्पा येतो. माझे वडील म्हणजे पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी. लहानपणापासून आध्यात्मिक वातावरणाचे माझ्यावर संस्कार झाले. वर्षातला हा सण कुटुंबियांसमवेत साजरा करावा,असे मला वाटते. आमच्या घरी गणपतीच्या दोन मूर्ती गेले काही वर्षे येतात. त्याचा किस्सा असा आहे की माझे बाबा पंडित आहेत. त्यांचा एक मित्र सातत्याने गेली काही वर्षे गणपतीची एक मूर्ती त्यांना भेट देतो. आम्ही एका मूर्तीचे विसर्जन अनंत चतुर्दशीला करतो, तर दुसरी मूर्ती पुढच्या वर्षी विसर्जन करतो.
गुरुजींची मुलगी असल्याने अर्थातच मंत्र, वेद या गोष्टींचे संस्कार पूर्वीपासूनच झाले आहेत. मी गणपतीच्या प्रतिष्ठापनेची पूजा करते. मला गणपतीबाप्पा खूप आवडतो. आमच्याकडे आरती, मंत्र यांचे उच्चार एवढ्या स्पष्टपणे होत असल्याने ते वातावरण सर्वांना एक सकारात्मक ऊर्जा देत असते. गणपतीची मूर्ती शाडूची असते. गौरी या काकांकडे असतात आणि गौरीच्या दिवशी पुरणपोळ्या केल्या जातात. माझ्या आजीने केलेली पुरणपोळी मला आवडायची. आता माझी काकू पुरणपोळ्या करते, त्या सुद्धा अगदी तशाच चवीच्या. गौरी गणपतीच्या सणाला अनेक जण घरी
दर्शनाला येतात. मात्र यंदाच्या वर्षी कोरोनाच्या सावटामुळे कोणाला बोलावता आलं नाही, याची खंत वाटते. पण गणपतीचे आणि गौरीचे हे दिवस मी शुटिंगमधून रजा घेऊन नाशिकला आले होते. नाशिकला सार्वजनिक गणेशोत्सवात देखावे पाहायला पूर्वी आम्ही जात होतो. तसेच शाळेत असताना गणपती उत्सवातील स्पर्धात मी भाग घ्यायचे आणि बक्षिसेही मिळवायचे.
मी एकदा मयुरेश पेम बरोबर गिरगावातील ‘कामत चाळीत’ गेले होते. धमाल वातावरण होत. पाऊस पडत होता, बाप्पाची मिरवणूक होती, सगळे आनंदात नाचत होते. गिरगावातील तो गणेशोत्सव माझ्या लक्षात आहे. यावर्षी मी एका व्हिडिओद्वारे लोकांनां साधेपणाने उत्सव साजरा करा, असे आवाहनही केले होते. एक सुजाण नागरिक या नात्याने कोरोनाचे संकट लक्षात घेऊन आपण हा उत्सव साधेपणाने साजरा करावा, अशी विनंती मी केली होती. हे कोरोनाचे संकट दूर होवो, ही बाप्पाकडे प्रार्थना.”