महाराणी येसूबाईंच्या भूमिकेतले अमृता खानविलकरचे फोटो व्हायरल
दादा कोंडके यांचे दोन गुरु भालजी आणि बाळासाहेब!
सत्तरच्या दशकामध्ये मराठी सिनेमाला खऱ्या अर्थाने लौकिक प्राप्त करून दिला तो दादा कोंडके (Dada Kondke) यांनी! दादा कोंडके हे खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचे रिअल हिरो होते. त्यांच्या चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांना मनमुराद हसवले त्यांचे मनोरंजन केले. तब्बल नऊ सिनेमे सिल्वर जुबली करण्याचा मोठा विक्रम त्यांच्या नावावर होत आहे. त्यांचा पहिला चित्रपट होता ‘सोंगाड्या’. या चित्रपटाच्या मेकिंगच्या आणि रिलीजच्या खूप आठवणी आहेत. दादा कोंडके यांचे गुरु भालजी पेंढारकर यांनी दादांना चित्रपट क्षेत्रात येण्याचे सांगितले आणि पहिल्या चित्रपटासाठी सर्वतोपरी मदत केली. हा चित्रपट भालजींच्या मार्गदर्शनाखालीच तयार झाला. चित्रपटातील दिग्दर्शक होते गोविंद कुलकर्णी आणि संगीतकार होते राम कदम. चित्रपटात दादांची नायिका होती उषा चव्हाण. निळू फुले यांची देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका होती. चित्रपट कृष्णधवल होता. दादा कोंडके (Dada Kondke) यांचा चित्रपटातील ‘अटायर’ हा सर्वार्थाने वेगळा होता. हाफ पॅन्ट आणि कोपरी घातलेला बावळट दिसणारा नायक हा मराठी सिनेमा पहिल्यांदाच चमकत होता. आपल्या पॅन्टची नाडी दाखवत प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या दादांनी प्रेक्षकांच्या पसंतीची नाडी परफेक्ट ओळखली होती. त्यामुळे दादांचे सिनेमे हे अफाट गाजत होते.
परंतु ‘सोंगाड्या’ या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी दादांना खूप मोठा संघर्ष करावा लागला. हा चित्रपट जेव्हा तयार झाला त्यावेळी वितरकांनी हा सिनेमा घ्यायला चक्क नकार दिला. हाफ चड्डीतला बावळट नायक कोण स्वीकारणार? अशी प्रत्येकाची प्रतिक्रिया होती. दादांनी (Dada Kondke) जवळपास दोन लाख रुपये या चित्रपटासाठी घातले होते. आयुष्याची सगळी कमाईच त्यांनी या सिनेमात घातली होती. त्यामुळे दादा मोठे काळजीत पडले होते. वितरक सिनेमाला हात लावत नाहीत म्हटल्यावर भालजींनी “हा सिनेमा तुम्ही स्वत:च वितरीत करा.” असे सांगितले. पुण्यात नारायण पेठेतील भानुविलास ला हा चित्रपट त्यांनी प्रदर्शित करायचे ठरवले. हे चित्रपटगृह त्या वेळी वि वि बापट चालवत होते. बापट यांनी एक आठवड्यासाठी हा चित्रपट घेतला. परंतु प्रदर्शनाची तारीख ज्या दिवशी होती तो दिवस नेमका अमावस्येचा होता. त्यामुळे दादांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. पहिलाच सिनेमा अमावस्येच्या दिवशी कसा प्रदर्शित करायचा? हा अपशकुन होईल का? आपल्या आयुष्याची सगळे कमाई या सिनेमात लावली आहे. तो सिनेमा अमावस्याला कसा काय प्रदर्शित करायचा? ही चिंता त्यांना सतावत होती.
परंतु भालजी पेंढारकर यांनी त्यांना सांगितले,” चिरंजीव, असे मूर्खासारखे विचार करू नका. जी तारीख मिळते त्या तारखेला चित्रपट रिलीज करा!” भालजींचे शब्द ऐकून दादांनी सिनेमा अमावस्येला प्रदर्शित केला. आणि काय आश्चर्य हा सिनेमा अक्षरशः धो धो चालला. तब्बल २५ आठवडे या सिनेमाचा मुक्काम भानुविलासला होता. एकदा पुण्यात ‘विच्छा’ चा प्रयोग भारत मधून संपल्यावर दादा कोंडके आपला सिनेमा भानुविलास ला कसा चालू आहे ते पाहण्यासाठी गेले. त्यावेळी चित्रपट सोंगाड्या सुरु झाला होता. दादा सरळ गेट मधून आत गेले आणि प्रेक्षकांची प्रतिक्रिया आजमावायला आत गेले. पण मागून डोअरकीपर आत आला आणि त्याने दादांची कॉलर धरून बाहेर ओढले आणि म्हणाला “ काय फुकटात सिनेमा पाह्यचा काय? चल बाहेर चल आधी, फुकटात सिनेमा पाहतात साले…” दादांनी मुद्दामच त्याला आपली ओळख सांगितली नाही.
नाशिकमध्ये हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित केला त्यावेळी तिथल्या अशोक टॉकीज मध्ये या चित्रपटाने रौप्य महोत्सव साजरा केला. या थेटरच्या आजूबाजूचा परिसर हा सगळा गुजराती, सिंधी, मारवाडी लोकांचा होता तरीदेखील त्या लोकांनी या सिनेमाला प्रचंड गर्दी केली. एकदा दादा (Dada Kondke) तिथे आपल्या प्रेक्षकांचा कल पाहण्यासाठी गेले असताना थेटरच्या मालकांनी दादांना सांगितले,” एक म्हातारी सिंधी बाई रोज दुपारी बाराचा शो पाहायला येते.” दादा योगायोगाने त्यात शो च्या वेळी तिथे होते. इंटर्वलमध्ये ती बाई दादांना भेटली आणि दादांना पाहून ती खूप खुश झाली. दादांच्या हाताचे मुके घेत म्हणाली,” दादा मै आपका सांगाडा रोज देखती हूं!”
मुंबईमधील सोंगाड्या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा किस्सा तसा सर्वांना माहितीच आहे. परंतु नवीन पिढीला माहीत व्हावा म्हणून पुन्हा एकदा सांगतो. मुंबईला दादरच्या कोहिनूर चित्रपटात चार आठवड्यासाठी ‘सोंगाड्या’ प्रदर्शित होणार होता या थेटर चे कपूर नावाचे पंजाबी गृहस्थ होते. सिनेमा पहिल्या आठवड्यात हाउस फुल होता. परंतु हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर एक सप्ताहा नंतरच हा सिनेमा त्याने थिएटर मधून उतरवला आणि तिथे देव आनंदचा ‘तेरे मेरे सपने’ हा सिनेमा लावला. ‘सोंगाड्या’ सिनेमा खरंतर एक आठवडा पूर्ण हाऊसफुल चालला होता. पण हिंदी सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी त्याने दादांचा सिनेमा उतरवला. दादा खूप नाराज झाले ते चक्क मुख्यमंत्र्याना देखील भेटले परंतु नाईलाज झाला.
======
हे देखील वाचा : मन्नाडे यांच्या एका लोकप्रिय गाण्यातून ‘हा’ बिजनेस झाला सुरू…
======
शेवटी दादा शिवसेनाप्रमुख दादा बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे गेले. बाळासाहेबांनी मग खास त्यांच्या ठाकरे स्टाईल मध्ये हा प्रश्न सोडवला. अक्षरशः हातापाया पडत थिएटरचा मालक मातोश्रीवर आला आणि बाळासाहेबांना म्हणाला,” माफ करना बाला साब , आप जितने दिन चाहो उतने दिन ये सिनेमा हमारे थेटर मे लगा सकते हो!” तेव्हापासून दादांचा प्रत्येक सिनेमा हा कोहिनूर या चित्रपटात गृहात प्रदर्शित होत होता आणि प्रचंड हिट होत होता. आजच्या पिढीला दादा कोंडके हा करिष्मा कदाचित माहीत नसेल परंतु एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्रात दादांच्या सिनेमांनी मोठा हंगामा केला होता.
बाळासाहेबांच्या आणि दादांची मैत्री इथेच जुळली. पुढे दादा बाळासाहेबांच्या सोबत महाराष्ट्रभर फिरले. शिवसेनेच्या प्रचार सभेत ते मोठ्या जोशात बोलत असत. १९९५ साली जेव्हा युतीचे सरकार आले त्यावेळी बाळासाहेबांनी दादांना विचारले ,”दादा कोणते मंत्रिपद घेणार?” त्यावर त्यावर दादा कोंडके म्हणाले,” तुम्ही कोणते मंत्रिपद घेणार?” त्यावर बाळासाहेब म्हणाले,”मी शिवसेनाप्रमुखच रहाणार! त्यावर दादा कोंडके म्हणाले,” जर तसं असेल तर मी सुद्धा कायम शिवसैनिक म्हणून राहील!” त्यांच्यातील हे अकृत्रिम प्रेम आणि मैत्री आयुष्यभर अबाधित राहिली. दादा कोंडके १४ मार्च १९९८ ला गेले. त्या वेळी बाळासाहेबाना अति दु:ख झाले. करारी राजकारणी आपल्या जिवलग मित्राच्या वियोगाने अगदी हळवा झाला होता. हा किस्सा ख्यातनाम लेखिका अनिता पाध्ये यांनी त्यांच्या दादा कोंडके वरील पुस्तकात सांगितला आहे.