दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
संघर्षातून झळाळून निघालेले दिग्दर्शक प्रमोद चक्रवर्ती
हिंदी सिनेमाच्या दुनियेत स्ट्रगल कुणाला चुकला आहे? आज चोटी वर असणारे कलाकार देखील याच संघर्षाचा सामना करून पुढे गेलेले असतात. आज आपल्याला त्यांच्याभोवती असणारे वलय, ग्लॅमर दिसते परंतु त्यासाठी पदरात आलेले अपयश, अपमान यांना गिळून या मंडळींनी संघर्षाचा सामना करत त्यावर विजय मिळवलेला असतो. सत्तरच्या दशकातील ख्यातनाम निर्माता दिग्दर्शक प्रमोद चक्रवर्ती यांना अशाच मोठ्या संघर्षाचा सामना करावा लागला होता. त्यांची स्ट्रगल स्टोरी नवीन पिढीसाठी खरोखरच इन्स्पायरिंग अशी आहे. सुरुवातीला राज खोसला यांच्याकडे सहाय्यक म्हणून राहिलेले प्रमोद चक्रवर्ती (जन्म १५ ऑगस्ट १९२९) यांना पहिल्यांदा स्वतंत्ररीत्या चित्रपट दिग्दर्शक करायला मिळाला १९५८ सालचा जी पी सिप्पी बॅनरचा १२ ओ क्लॉक हा चित्रपट. स्टार कास्ट होती गुरुदत्त आणि वहिदा रहमान. चित्रपटाला संगीत मुकुल रॉय यांचे होते. सर्व काही व्यवस्थित असून देखील चित्रपट अपयशी ठरला. सहाजिकच पहिल्याच सिनेमाच्या अपयशाने ते बाजूला फेकले गेले. तीन वर्षानंतर त्यांच्याकडे आणखी एक चित्रपट आला ‘पासपोर्ट’.
या सिनेमात तर प्रदीप कुमार आणि मधुबाला होते. तरी सिनेमा फ्लॉप ठरला. नंतर शेख मुख्तार यांचा ‘गंगू दादा’ हा चित्रपट देखील त्यांनी दिग्दर्शित केला हा देखील सुपरफ्लॉप ठरला. त्यामुळे त्यांच्या हातात असलेले आगामी दोन्ही प्रोजेक्ट काढून घेण्यात आले. आता प्रमोद चक्रवर्ती खऱ्या अर्थाने ‘बेकार’ झाले होते. तीन-तीन अयशस्वी सिनेमाचे ते धनी होते. अशा परिस्थितीत त्यांनी हताश न होता आत्मपरीक्षण केले. आणि यापुढे आपण स्वतःच एक चित्रपट काढायचा आणि दिग्दर्शित करायचा असे ठरवले. त्यांनी पटकथाकार सचिन भौमिक यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना सांगितले,” मागच्या पाच वर्षात मी खूप काही गमावलं आहे. परंतु जे काही हातात शिल्लक आहे. ते संपूर्णपणे लावून मी एक चित्रपट निर्माण करणार आहे. याची कथा पटकथा तुम्ही लिहावी. अशी माझी विनंती आहे. हा सिनेमा माझ्यासाठी ड्रीम प्रोजेक्ट असेल. यासाठी भले मला स्वतःला विकायला लागले तरी चालेल पण मी हा सिनेमा बनवणार आहे. या महानगरीत आलो त्यावेळी हातात एक फुटी कवडी देखील नव्हती आणि तसाच परत गेलो तरी मला काही वाटणार नाही. परंतु जाताना मी काहीतरी करून दाखवणार आहे!” आत्मविश्वास तर खूप होता. सचिन भौमिक यांनी त्यांना एक कथा ऐकवली. प्रमोदजींना ही कथा आवडली. त्यांनी सिनेमाचा नायक म्हणून त्याकाळी लोकप्रिय असलेल्या ‘एक मुसाफिर एक हसीना’ ,’फिर वही दिल लाया हु’ या हिट सिनेमाचा हिरो जॉय मुखर्जीला घ्यायचे ठरवले. यासाठी त्यांनी त्यांच्या वडिलांकडे संपर्क साधला. वडिलांनी दोन अटी टाकल्या. एकतर सिनेमाची स्क्रिप्ट स्ट्रॉंग पाहिजे तसेच जॉय मुखर्जी ची नायिका आशा पारेख किंवा साधना पाहिजे. आणि या सिनेमांमध्ये जॉय मुखर्जी चा लूक हॉलीवुड अभिनेता मार्लोन ब्रँड सारखा असला पाहिजे. सचिन भौमिक आणि प्रमोद जी या दोघांनी या अटी मान्य केल्या.
यानंतर ते अभिनेत्री साधनाकडे गेले. साधनाला सिनेमाचे कथानक आवडले. परंतु ‘गंगू दादा’ सारख्या फ्लॉप चित्रपटाच्या दिग्दर्शकाकडे मी काम करून माझे करिअर बरबाद करून घेणार नाही असे म्हणून माघार घेतली. नंतर हे दोघे आशा पारेख यांच्याकडे गेले. आशा पारेख च्या ‘छाया’ या सिनेमाची पटकथा सचिन भौमिक यांनीच लिहिली होती. त्या मुळे ती सिनेमा साईन करेल असे वाटत होते. पण आशा पारेख यांनी त्यांना सांगितले,” आता कुठे माझे करिअर मार्गी लागत आहे अशा वेळी एका फ्लॉप दिग्दर्शकाकडे मी का काम करावे? आणि माझे करिअर का बरबाद करायचे? त्यावर सचिन भौमिक यांनी कथानक ऐकून घेण्याचा आग्रह केला. परंतु आशा पारेख यांनी ‘नमस्ते’ म्हणून त्यांना कटवले! दोन्ही हीरोइन हातच्या गेल्या आता जॉय मुखर्जी देखील हातातून निघून जाईल असे प्रमोद चक्रवर्तींना वाटले. परंतु सचिन भौमिक यांनी आशा पारेख च्या आईला भेटण्याचा निर्णय घेतला आणि आईला भेटून कमीत कमी आशा पारेख ने कथानक तरी ऐकून घ्यावे अशी विनंती केली. आईने तिला तसा मेसेज दिला आणि दुसऱ्या दिवशी प्रकाश स्टुडिओमध्ये कथा ऐकण्यासाठी सचिन भौमिक यांना बोलावले . सचिन भौमिक जेव्हा प्रकाश स्टुडिओमध्ये जायला निघाला त्यावेळेला प्रमोद चक्रवर्ती यांनी त्यांना विचारले,” तुला विश्वास वाटतो का आशा पारेख आपल्या सिनेमात काम करेल?” त्यावर सचिन भौमिक म्हणाले,“ लेट अस होप फॉर द बेस्ट!”
======
हे देखील वाचा : राजकारणाने ‘या’ अभिनेत्यांची मैत्री कायमची संपली!
======
सचिन भौमिक यांची कथा आशा पारेख ला आवडली. परंतु परत तिने बॉम्ब टाकला. त्याकाळी आशा पारेख एका सिनेमाचे ७५ हजार रुपये घेत असे तिने या सिनेमासाठी मात्र दीड लाख रुपये मानधन सांगितले. याचे कारण असे होते की जर हा सिनेमा फ्लॉप झाला तर तिच्या हातातून आणखी काही सिनेमे जातील तर त्यासाठी तिला जास्त पैसे हवे होते. तिचे लॉजिक तिच्या बाजूने बरोबर होते. परंतु इकडे बजेटचा प्रश्न होता. पुन्हा सचिन दा आणि प्रमोद चक्रवर्ती आशा पारेखच्या आईला भेटले आणि त्यांनी तिला बजेट बाबत सांगितले. शेवटी सुवर्ण मध्य काढला गेला. तिच्या आईने एक लाख रुपयांमध्ये सिनेमा साईन करायला सांगितला. अशा पद्धतीने आशा पारेख आणि जॉय मुखर्जी यांना साइन केले गेले आणि सिनेमाची शूटिंग सुरू झाली. प्रमोद चक्रवर्ती यांनी या पहिल्या सिनेमासाठी कुठलीही कसर सोडली नाही. प्रत्येक शॉट घेताना तो सर्वोत्कृष्ट कसा होईल याची ते काळजी घेत होते. सिनेमा पूर्ण झाला.. हिट झाला आणि सुपरहिट देखील झाला. १९६४ साली प्रदर्शित झालेल्या सर्वोत्कृष्ट सिनेमांमध्ये चौथा क्रमांक मिळवला. हा चित्रपट होता ‘जिद्दी’. यानंतर मात्र प्रमोद चक्रवर्ती यांना पुन्हा मागे वळून पाहावे लागले नाही. लव इन टोकियो, तुमसे अच्छा कौन है, नया जमाना, ड्रीम गर्ल, आजाद असे एकाहून एक अनेक सुपरहिट सिनेमे देत गेले.