किडलेल्या मानसिकतेचा – प्रभावी ‘जोजी’
शेक्सपिअरच्या ‘मॅकबेथ’ या नाटकाची चित्रपटात जी माध्यमांतरे झाली त्यात जपानी दिग्दर्शक अकिरा कुरोसावाच्या ‘थ्रोन ऑफ ब्लड’ आणि हिंदीतील विशाल भारद्वाजच्या ‘मकबूल’ चा उल्लेख करणं क्रमप्राप्त ठरतं. या यादीत आता दिलीश पोथनने दिग्दर्शित केलेल्या ‘जोजी’ या मल्याळम चित्रपटाची भर घालायला हवी. सहा शतकांपूर्वी शेक्सपिअरने लिहिलेल्या या कलाकृतीला आजच्या काळाचे मापदंड लावून आधुनिक मानवाची मानसिकता, त्याचे विकार-विकृती चित्रित करण्याचं आव्हान या दिग्दर्शकांनी समर्थपणे पेलेलं आहे.
शेक्सपिअरच्या कथानकातील मूळ आशय कायम ठेवून त्याला आपल्या प्रादेशिकतेचा रंग देण्याचा प्रयत्न या तीनही चित्रपटात यशस्वी झाल्याचा दिसतो. अकिरा कुरोसावाने नाटकातील राजघराण्याची पार्श्वभूमी ‘थ्रोन ऑफ ब्लड’मध्ये कायम ठेवली मात्र त्याला जपानी लोकपरंपरेचा साज दिला. ‘मकबूल’ मध्ये विशाल भारद्वाजने एक बुजुर्ग शाही माफिया आणि त्याच्या कुटुंबाची कहाणी सांगितली. दिलीश पोथनच्या ‘जोजी’ची पटकथा लिहिताना श्याम पुष्करन यांनी केरळमधील निसर्गरम्य खेड्यात राहणाऱ्या श्रीमंत पनाचेल कुटुंबाला केंद्रस्थानी ठेवलं आहे. बदलत्या काळानुसार माणसाचे राहणीमान, रीतीरिवाज बदलले, आयुधे बदलली, तरीही विकृत मानसिकता बदलली नाही. या विकृतीचा धक्कादायक आविष्कार ‘जोजी’ मध्ये आपल्याला पाहायला मिळतो.
कुट्टपन पनाचेल [व्ही.पी. सनी] हा रासवट विधुर म्हातारा आपल्या तीन मुलांसह आलिशान बंगल्यात रहात असतो. त्याचा थोरला घटस्फोटीत मुलगा जोमोन [बहुराज] घरची शेती सांभाळत असतो. मधला जेसन [जोजी मंडकायम] वडिलांचा व्यवसाय सांभाळत असतो. धाकटा जोजी [फहाद फाझील] इंजिनिअर होऊन सुद्धा घरात बेकार बसून असतो. आपल्याला मनासारखं करिअर करता येत नाही म्हणून मनातल्या मनात कुढत असतो. जेसनची बायको बिन्सी [उन्नीमाया प्रसाद] आणि जोमोनचा मुलगा पोपी [अलीस्टर अॅलेक्स] हे घरातील अजून दोन सदस्य. संपूर्ण घरावर कुट्टपन पनाचेलची दहशत असते. कोणीही त्याच्या शब्दाबाहेर जाण्याचा प्रयत्न करत नाहीत. अशा या कुट्टपनला विहिरीतील पंप खेचताना अर्धांग वायूचा झटका येतो. मरणाच्या टोकाला आलेल्या कुट्टपनची अवस्था पाहून जोजीच्या मनात कुटील विचार येतात. बिन्सीचा त्याला मूक पाठींबा मिळतो आणि एका थराराला सुरुवात होते.
‘जोजी’ची सुरुवात होते ती पोपीने मागवलेल्या एअर गनची कुरिअर कंपनीकडून झालेल्या डिलिव्हरीने! एअरगन हे जीवघेणे शस्त्र नाही मात्र हिंसेला पुष्टी देण्याचं बळ त्यात निश्चित आहे. जोजीच्या मनोवस्थेच हे पहिलं प्रतिक. कुट्टपनच्या जाचाला जोजी वैतागलेला आहे. त्याच्या मनातील न्यूनगंडाला, अस्थिरतेला कुट्टपनचा धाक अधिक हवा देतो. कुट्टपन हॉस्पिटलमधून थोडा बरा होऊन आल्यानंतर आपल्यला काही दिवस मिळालेलं स्वातंत्र्य पुन्हा हिरावलं जाणार याची जाणीव होऊन जोजी अधिकच बिथरतो. पण तो हे बिथरणं सर्वांसमोर व्यक्त करत नाही. त्याची घालमेल बिन्सी अचूक हेरते. तिच्या चाणाक्ष नजरेतून जोजीच्या मनात येणारे घातक विचार आणि त्याची हिंसक कृत्य सुटत नाहीत पण जोजीच्या असं करण्याने आपलाही नकळत फायदा होणार आहे याची तिला पक्की खात्री असते. जोजी हे पात्र स्वार्थाचं एक रूप दाखवतं तसचं बिन्सी आणि तिचा नवरा जेसन, त्याच्या कृत्यांना मूकपणे पाठींबा देत स्वार्थीपणाचे दुसरे टोक गाठतात. ही सर्वच पात्र आत्मकेंद्री आहेत. एका कुटुंबात राहूनसुद्धा त्यांच्यात परस्परांबद्दल असलेला मायेचा ओलावा संपुष्टात आला आहे. वरवर पाहता ही माणसं एकत्र राहतात, जेवतात, ठरवून दिलेली काम करतात मात्र त्या प्रत्येकाला हवी आहे सत्ता, अधिकार!
कुट्टपनला आपल्या प्रौढ मुलांना धाकात ठेवण्यात आनंद मिळतो. कदाचित त्याला आपल्या मुलांच्या स्वार्थी वृत्तीचा आधीच सुगावा लागलेला आहे. जोमोन अर्धवेळ दारूच्या नशेतच असतो. बापाने नेमून दिलेलं काम इमाने इतबारे करण त्याला जमतं. जेसन आणि जोजी मात्र त्याच्यापेक्षा वेगळे आहेत. बाप जिवंत असेपर्यंत आपल्याला या घरात कोणतेच अधिकार मिळणार नाहीत याची त्यांना खात्री आहे. तो मिळवण्यासाठी जोजी षडयंत्र रचतो. या षडयंत्राचा त्याने केलेला पाठपुरावा आणि स्वतःला निरपराध ठरवण्यासाठी केलेली धडपड हा भाग अत्यंत उत्कंठावर्धक झाला आहे.
जोजीची हाताळणी संथ असली तरी त्यातील लय टिकवून ठेवण्याचं काम जस्टीन वर्गीसच्या पार्श्वसंगीताने चोख केलं आहे. पहिल्या दृश्यापासून अखेरपर्यंत हे पार्श्वसंगीत आपल्याला खिळवून ठेवतं. या पार्श्वसंगीतातून निर्माण होणारी गूढता शायजू खलिदच्या प्रकाशचित्रणाने अधिक गहिरी होते. त्याने टिपलेल्या निसर्गाच्या प्रतिमा असोत की पात्रांच्या भावमुद्रा, या वर्षात आलेल्या चित्रपटांमधील हे उच्च दर्जाचे प्रकाशचित्रण आहे!
चित्रपटातील प्रत्येक कलावंताने अफलातून अभिनय केला आहे. फहाद फाझील हा उत्तम अभिनेता आहेच. जोजीच्या मनातील न्यूनगंड, बेरकीपणा, हिंसकता,अपराधीपणा या सगळ्या भावना व्यक्त करण्यासाठी त्याने आपल्या देहबोलीचा खास वापर केलाय. हा अभिनेता प्रत्येक भूमिकेच्या गरजेनुसार आपल्या शरीरावर मेहनत घेत असतो. जोजीची कृश अंगकाठी दाखवण्यासाठी त्याने आपलं वजन कमी केलंय हे लक्षात येतं.
व्हि.पी. सनीने उभा केलेला रासवट कुट्टपन आणि अलीस्टर ॲलेक्सचा पोपी सुद्धा फर्मास आहेत. घरकामात गुंतूनही आपल्या हातात कोणतेच अधिकार नसल्याची जाणीव असणारी बिन्सी उन्नीमाया प्रसादने दीर्घकाळ लक्षात राहील अशी उभी केली आहे. कुट्टपनच्या अंत्यसंस्काराच्या प्रसंगात जीजोला ‘मास्क घालून ये’ अस सांगताना तिने दिलेला लुक अर्थपूर्ण आहे.
सत्ता, अधिकार हे केवळ राजघराणी किंवा राजकारणी यांचीच मक्तेदारी नसतात. सत्तेची भूक माणूस कोणत्याही पातळीवर असला तरीही त्याच्या मनात दडून बसलेली असतेच. ती मिळवण्यासाठी तो आपल्या नातेसंबंधानासुद्धा पणाला लावायला मागे पुढे पहात नाही. वरवर शांत दिसणाऱ्या माणसाच्या मनातील हिंसक भावनेचा उद्रेक झाल्यावर तो संपूर्ण कुटुंबाला एका अटळ शोकांतिकेकडे घेऊन जातो. जोजी पाहताना शेक्सपिअरने कित्येक शतके आधी माणसाच्या मनाचा केलेला हा विचार पुन्हा तीव्रतेने प्रत्ययाला येत राहतो.