Rohini Hattangadi : ‘गांधी’ चित्रपटातील कस्तुरबा गांधी ही भूमिका कशी

पडद्यावरची मैत्री..
ऑगस्ट महिन्याची सुरवात होताच वेध लागतात वेगवेगळ्या सणासुदीचे.. पण अलीकडच्या काही वर्षात सुरु झालीये प्रथा फ्रेन्डशिप डे ची…
वर्षभर आपण मैत्री निभावत असतोच, पण आजची तरुण पिढी, असलेली मैत्री सेलिब्रेट करायला एक खास दिवस राखून ठेवते.. ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार… शाळेपासूनचा चड्डी बडी, कॉलेजचा यार, नाक्यावरून येताना दिसल्यावर जोरात ओरडणारा आणि राडा करायला धावत येणारा भावड्या असो किंवा नोट्स देणारा स्कॉलर, सेटिंग लावणारा जुगाडू, पार्ट्या झोडणारा श्रीमंत, किंवा अगदी हाय बाय फ्रेंड असो..
आपल्याकडे मैत्रीच्या व्याख्या प्रत्येक माणसा गणित बदलत जातात आणि मैत्री जपायची पद्धत सुद्धा.. खऱ्या आयुष्यातली मैत्री रोज नव्याने जगत असलो तरीसुद्धा छोट्या किंवा मोठ्या पडद्यावर जेव्हा मैत्रीचा विषय निघतो तेव्हा सगळ्यात आधी डोळ्यासमोर येते ती, जय-विरूची जोडी.. ‘ये दोस्ती हम नही तोडेंगे’…. म्हणत म्हणत जय-विरूने फक्त त्यांचीच मैत्री जपली नाही तर अनेक दुरावलेल्या मित्रांना नव्याने जोडलं.. ते सुद्धा शेवटच्या श्वासापर्यंत कधीच न तुटणाऱ्या मैत्रीच्या नात्यात अडकवून ठेवण्यासाठी..

‘फ्रेंडझोन’ या शब्दाला सध्या अनेक तरुण मंडळी घाबरून असतात, पण १९९८ मध्ये अंजली आणि राहुलने सगळ्यांना हे पटवून दिलं, प्रेमासारख्या नाजूक नात्याची सुरवात मैत्रीतूनच होते.. मैत्रीचं नात हे अनेक वेळा रक्ताच्या नात्यापेक्षासुद्धा श्रेष्ठ ठरतं, अनेक छोट्या-मोठ्या प्रसंगातून आपण हे नेहमीच अनुभवतो; पण राजेश खन्ना आणि बिग बी ची जोडी जेव्हा आपल्याला ‘आनंद’च्या माध्यमातून सांगते तेव्हा त्या नात्याबद्दलचा आदर अजूनच वाढत जातो.अनेक वेळा घरच्यांकडून, मोठ्यांकडून आपण सतत ऐकत असतो, संगतीचा परिणाम होतो. संगत माणसाला बदलून टाकते, पण तीच गोष्ट जेव्हा थ्री ईडीयट्स ( चतुर, रॅन्चो, राजू आणि फरान) समजावतात; तेव्हा ३ तासात आपल्याला समजते.
अनेक वेळा आपण म्हणतो मैत्री जितकी जुनी तितकी चांगली पण मैत्रीच्या नात्याला कसलच बंधन नसतं म्हणतात ना, मग ते वेळेच तरी कसं असेल?! वेक अप सीड मधली आयेशा आणि सिड यांची काहीच दिवसांची मैत्रीसुद्धा सिडला स्वतःच्या पायावर उभं करते किंवा फक्त एक ट्रीपसुद्धा ये जवानी हे दिवानी मधल्या नयना सारख्या स्कॉलर मुलीला, कबीर, अदिती, अवि सारखे आयुष्यभर पुरणारे मित्र मिळवून देते.. किंवा होणाऱ्या नवऱ्याने नाकारल्यावर ‘क्वीन’ जेव्हा एकटीच हनिमूनला जाते, तेव्हा ४ दिवसांपुरतेच का होईना, पण तिची मैत्रीण विजया, तिचे रूम मेट्स या सगळ्यांसोबत राहून तिचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलून जातो.

कॉलेजचा पहिला दिवस आठवतोय? खूप एक्साईटमेंट सोबत थोडीशी भीती घेऊन आपण कॉलेजमधे पाहिलं पाऊल टाकतो.. रॅगिंगच्या भीतीने.पण कॉलेजचा ‘भाई’च जेव्हा आपला दोस्तं बनतो तेव्हा, श्रेयस आणि दिग्या सारखी जोडी तयार होते अन् मग मराठमोळ्या मैत्रीची सुरवातच ‘दुनियादारी’ करत होते. मैत्रीसाठी राडे करणारा, मैत्रीत हळवा होणारा आणि प्रेमाने चार शिव्या घालणारा मित्र म्हणतो ‘’तेरी मेरी यारी……’’
असं म्हणतात, शेअरिंगने दोस्ती वाढते… एक तीळ सात जणांनी वाटून खावा असं आपण लहानपणापासून ऐकत आलोय. पण एक घर जेव्हा सहाजण शेअर करतात तेव्हा घराचं ‘माजघर’ होताना आपण पाहिलं झी माराठीच्या’ दिल दोस्ती दुनियादारी’ मधून.. त्यांची मैत्री, एकमेकांना केलेली मदत, शिकवलेले धडे, आणि काढलेल्या खोड्या बघून प्रत्येकालाच मनातल्या मनात एकदा तरी वाटल्यावाचून राहिलं नसेल की, हे ‘माजघर’ माझं घर असावं. स्ट्रगल होता, पैशांची तंगी होती, मोठ्या माणसांचा धाक नव्हता, पण या सगळ्यात त्यांच्या सोबत कायम राहिली ती त्यांची मैत्री. वेळप्रसंगी एकमेकांचे नातेवाईक झाले, प्रसंगी धीर दिला. अनोळखी शहरात आपापली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आलेले हे बॅचलर एकमेकांच कुटुंब होऊन गेले.

कृष्ण आणि सुदामा यांची मैत्री असो किंवा अगदी टॉम अँड जेरीची मैत्री असो.. वेळ बदलली, नावं बदलली पण मैत्रीची तत्व तीच राहिली.चला तर मग, मैत्रीच्या या खास दिवशी आपल्या जवळच्या, लांबच्या, भांडण झालेल्या, किंवा कामात व्यस्त झालेल्या मित्र मैत्रीणींची टॉमसारखी खोडी काढून,त्यांना जेरीस आणु.. तुमच्या ‘जेरी’ पार्टनरला कमेंटमधे नक्की मेन्शन करा..