वाह गुरू
तो एक उत्तम व्यंगचित्रकार आहे, लेखक आहे, कवी आहे, गीतकार आहे आणि अभिनेता देखील आहे. एवढे सगळे व्यक्तिमत्वाचे पैलू ज्याच्यात आहेत, तो आपल्या सर्वांचा लाडका गुरु अर्थात गुरु ठाकूर. आज त्याचा वाढदिवस.
त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल, पण आज शब्दांच्या माध्यमातून व्यक्त होणारा हा गुरु लहानपणी अबोल होता. त्याला वाचनाची खूप आवड होती. त्याचे आजोबा गाथा वाचायचे, ज्ञानेश्वरी सुद्धा मोठ्या आवाजात वाचायचे. ते संस्कार त्याच्या मनावर होत गेले. कोकणचे त्याला विलक्षण प्रेम. तिथला निसर्ग, त्या आठवणी त्याच्या मनात लहान पणापासून साठवल्या गेल्या. त्याला प्रसिद्ध गाण्याच्या चालीवर काही सुचायचे. एक किस्सा आहे. गाण्याच्या भेंड्या खेळताना कोणतेतरी अक्षर त्याला आले होते, त्याला गाणे आठवत नव्हते. तेव्हा पटकन त्याने एक गाणे उत्स्फूर्तपणे म्हटले आणि त्याची शेवटची ओळ होती “थकले रे नंदलाला.” तेव्हा अंताक्षरीत त्याला सुचलेले ते उत्स्फूर्त काव्य, ते कडवे मूळ गाण्यात कसे नाही, असा प्रश्न नातेवाईकांना पडला होता. पण तिथेच कुठे तरी त्याच्या मनातील कविता जन्म घेत होती.
गुरूने अनेक मुलाखतीत सांगितले आहे की त्याच्या घरी आलेल्या पाहुण्यांची सुद्धा तो ‘कॅरिकेचर’ रेखाटत होता. यातून त्याला निरीक्षणाची सवय लागली. गुरूच्या कॉलेजमधील एक गमतीदार आठवण आहे. त्याने एका प्राध्यापकांचे व्यंगचित्र काढले. ते सर खूप चिडले आणि ते गुरूला घेऊन प्रिन्सिपल कडे गेले. पण प्रिन्सिपल चिडल्या नाहीत, उलट प्रिंसिपल मॅडम नि त्याला सर्व प्राध्यापकांची व्यंगचित्रे काढायला सांगितली. पुढे त्याला स्पर्धेतसुद्धा व्यंगचित्रे पाठवायला त्यांनी प्रोत्साहन दिले. त्यानंतर तो ‘मार्मिक’ साठी राजकीय व्यंगचित्रे काढू लागला. पुढे एका वर्तमानपत्रासाठी तर त्याला रोज कार्टून रेखाटायचे होते. व्यंगचित्रकाराला निरीक्षण ही गोष्ट खूप महत्वाची असते. गुरु कॉलेजमधील एकांकिकेत अभिनय सुद्धा करायचा. तो उत्तम विडंबन गीते लिहायचा. एकदा त्याने ‘मानसीचा चित्रकार तो, तुझे निरंतर चित्र काढतो’ या गीताच्या चालीवर लिहिले होते, “ओळखीचा पत्रकार तो, तुझे निरंतर वृत्तछापतो”. म्हणजे बघा ना, बदलत्या पत्रकारितेचे अचूक चित्र या दोन ओळीतत्याने मांडले होते.’हसा चकटफू’ चे शीर्षकगीत त्याने लिहिले होते. पुढे तो ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ लिहू लागला. ‘टिपरे’ ही साप्ताहिक मालिका होती. त्या मालिकेनंतर त्याला डेली सोपच्या अनेक संधी लेखक म्हणून चालून आल्या, पण त्याने डेली सोप लिहिण्याला नकार दिला. डेली सोप ची गणिते वेगळी असतात, लेखकाला मालिकेची गोष्ट आधी माहीतच नसेल तर ही बाब त्याला खटकते.
चित्रपटांचे लेखन, गीतलेखन यात तो रमू लागला. गुरूने एका मुलाखतीत म्हटले होते की त्याला एका वेळी अनेक गोष्टी करण्याची आवड होती. तो अभिनय आणि मॉडेलिंग देखील करत होता. संगीतकार अशोक पत्की यांनी गुरूला सांगितले होते, ” तू एक अस्सल गीतकार आहेस आणि अस्सल गीतकाराने कायम गाणी लिहीत राहावे.” पत्की काकांची ही दाद गुरुसाठी खूप महत्वाची होती. आपण गाणी लिहिताना आपल्यावर रेडिओच्या गाण्यांनी संस्कार केले, हे देखील तो प्रामाणिकपणे मान्य करतो. लहानपणी त्याने सातत्याने आकाशवाणीवर गाणी ऐकली होती. गुरूने रेडिओवर देखील युववाणी विभागात काम केले होते. ‘कॉफी हाऊस’ सारख्या कार्यक्रमांसाठी लेखन आणि निर्मिती सहाय्यक देखील तो होता. माझी आणि गुरुची ओळख ही आकाशवाणीच्या स्टुडिओतच झाली होती, हे आज सांगताना खूप आनंद होत आहे. गुरूने मराठी सा रे ग म प साठी लेखन केले होते. अँकर लिंक कशी असावी, एपिसोडची मध्यवर्ती कल्पना कशी असावी याच्या चर्चा झी मराठीच्या टीमशी, निर्मात्यांशी होत होत्या. त्याला सातत्याने सेटवर हजर राहावे लागे. मान्यवरांची, परीक्षकांची ओळख ही सुद्धा मोजक्या शब्दात कशी लिहावी, हे सगळे गुरु अनुभवातून शिकत होता. गीतकाराला संगीताची उत्तम जाण असली पाहिजे, हे त्याने ओळखले. तो सुद्धा सेटवर असताना परीक्षकांशी आणि मान्यवरांशी संवाद साधू लागला.
‘अगंबाई अरेच्चा’ मधील ‘मन उधाण वाऱ्याचे’ या त्याच्या गीताने तर लोकप्रियतेचे शिखर गाठले. ‘नटरंग’ साठी तर त्याने लोकसंगीताच्या सर्वप्रकारांचा अभ्यास केला. शाहीर अनंत फंदी, पट्ठे बापूराव यांच्या लेखनाचा अभ्यास केला. गण, गवळण, लावणी असे सर्व प्रकार त्याने उत्तम हाताळले आणि ‘नटरंग’ साठी त्याने लिहिलेली सर्वच गीते लोकप्रिय झाली.चालींवर शब्द लिहिणे हे जास्त आव्हानात्मक असते कारण शब्द आकारांत आहे की इकारांत हे सुद्धा पाहावे लागते आणि त्या मीटरमध्ये तुम्हाला शब्द बसवावे लागतात. गीत लिहिताना जर कथेचा नायक ग्रामीण असेल तर त्याची भाषा सुद्धा लक्षात घेऊन शब्द लिहायला पाहिजेत. नायक किंवा नायिका ज्या वातावरणातत्या चित्रपटात दाखवली आहे, ते लक्षात घेऊन शब्द लिहिले पाहिजेत, हे त्याचे ठाम मत आहे. कोकण परिसर, तिथला निसर्ग हा सुद्धा त्याच्यातील कवीला प्रेरणा देणारा ठरला आहे. ‘सुंदर माझं घर’ चित्रपटातील त्याची गीते ऐकताना ते नक्कीच जाणवते.
आज बालभारती च्या पुस्तकात देखील गुरुची कविता अभ्यासाला आहे. तसेच त्याने लिहिलेली ‘तू बुद्धी दे’ ही ‘डॉक्टर प्रकाश बाबा आमटे’ चित्रपटाकरिता लिहिलेली प्रार्थना सुद्धा शाळेतल्या मराठीच्या पुस्तकात अभ्यासाला आहे. गुरूचा हा प्रवास असाच अखंड सुरु राहूदे, त्याच्यावर अनेक पुरस्कारांचा वर्षाव होऊ दे, ही वाढदिवसाच्या निमित्ताने सदिच्छा!