जुनं ते सोनं
सध्या ऐतिहासीक मालिका आणि चित्रपट यांचा जोर आहे. छोट्या पडद्यावर स्वामिनी मालिकेमधून पेशव्यांचा इतिहास बघता येतोय. तर स्वराज्य रक्षक संभाजी आणि स्वराज्य जननी जिजामाता या मालिकांमधून मराठ्यांचा इतिहास बघता येतोय…हे युग महाराष्ट्रासाठी सुवर्णयुगच होतं…या मालिकांमधून स्वराज्यासाठी दिलेल्या लढ्याची ओळख होत आहे. म-हाठी मातीची ख-या स्वरुपात माहीती मिळतेय…आपला इतिहास समृद्ध आहे. संस्कृतीही संपन्न…फक्त आपल्याला त्याची ओळख अद्यापही निटशी नाही. या मालिकांमधून या सर्वांचा परिचय होत आहे. त्यातील एक भाग म्हणजे दागिने…या सर्व मालिकांमधून आपल्या महाराष्ट्रातील पारंपारिक दागिन्यांची नव्यानं ओळख करुन देण्यात येत आहे.
हे कलाकुसरीचे दागिने काही काळ काळाच्या पडद्याआड लपले होते असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पण छोट्यापडद्यावर आलेल्या इतिहास युगामुळे या दागिन्यांनाही सुगीचे दिवस आले आहेत. तसं पाहिलं तर मराठी गडी रांगडेच…त्यामुळे हा त्यांचा रांगडेपणा दागिन्यातही दिसतोच. आता स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेत वापरण्यात आलेल्या दागिन्यांचेच बघा ना, जिजाबाई भरभक्कम अशा दागिन्यांमध्ये वावरतांना दिसतात. जिजाबाई या करारी वृत्तीच्या…त्यांच्या व्यक्तीमत्वाला हे दागिने चपखल बसतात. तोडे, ठुशी, लक्ष्मी हार, पोहे हार, बाजुबंद, कडे, कोल्हापुरी साज, तन्मणी, पोवळ्यांचा हार, झुमके, बुगडी, गळेबंद, अंगठी, हिरवा चुडा, कमरपट्टा, छल्ला, कोल्हापुरी टाक, चंद्रकोर असलेलं कोल्हापुरी डोरलं, दोन-तीन किंवा चार पदरी बोरमाळ, गळ्याभोवती बसणारा बेलपाणी टाक, जोडवी, पैजण अशा दागिन्यांना या मालिकेमुळे उजाळा मिळाला आहे. नऊवारी साडी आणि हे दागिने खुलून दिसतात. या जोडीला डोक्यावर असणारी चंद्रकोर खरी शोभा आणते. याबरोबरच पेशवाईतील दागिन्यांची ओळख स्वामिनीच्या निमित्ताने होत आहे. पेशवाईत दागिने तसे नाजूकच…पण थोडे जास्त…कलाकुसरही जास्त….पैठण्यांच्या जोडीला दागिन्यांची रेलचेल…तोडॆ, ठुशी, पोहेहार, मण्यांचा चार पदरी हार, चुडा, अंगठी, गळ्याभोवती असणारा टाक, झुमके यांच्याजोडीला पेशवाईमध्ये आणखी काही दागिने चांगलेच वापरात आहेत. त्यामध्ये मोत्याची चिंचपेटी, मोत्यांचा तन्मणी, वेणीफुले, मोत्यांची ठुशी, कर्णफुले, बुगड्यांचे विविध प्रकार, मंगळसूत्र या दागिन्यांची भर पडली आहे. पेशवाईत दागिन्यांची वैविध्यता अधिक आली आहे. त्यासोबत मोत्याचा वापरही जास्त आहे.
मालिका असो वा चित्रपट…त्यातील फॅशनचा प्रभाव प्रेक्षकांवर होतो…आणि मग ती फॅशन चलनात येते. या ऐतिहासीक मलिकांचा मात्र थोडं वेगळं आहे. आज जिजाबाई अवघ्या महाराष्ट्राची माता आहेत. त्यांनी जे वापरलं त्याचं अनुकरण करण्यामागे फॅशनच्या ऐवजी देवत्वाची भावना अधिक आहे. जिजाबाई, शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांना आपण देव मानतो. त्यामुळे त्यांच्यासारख्या वस्तू, दागिने वापरतांनाही श्रद्धेचा भाग अधिक आहे. एकूण काय या मालिकांमुळे दागिन्यांचे दिवस आले आहेत. त्यातूनही इमिटेशन ज्वेलरीला सोन्याचे दिवस आले आहेत हे नक्की. या दागिन्यांचा नवा ट्रेंड बाजारात आहे. आता नववर्षाच्या स्वागत यात्रेमध्ये हा ट्रेंड दिसणार आहे हे
नक्की….
सई बने
फोटो सौजन्य – गुगल (Google)