बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणारे हरहुन्नरी कादर खान !
जन्म अफगाणिस्तानचा, मृत्यू कॅनडामध्ये – मधला संपूर्ण काळ बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणारे हरहुन्नरी कादर खान! यांना इंडस्ट्रीचे गॉडफादर म्हंटलं तरी ती अतिशयोक्ती ठरणार नाही. अमिताभ बच्चन पासून गोविंदा अशा कित्येकांना स्टार बनवण्यात एका माणसाचा सिंहाचा वाटा आहे, ती व्यक्ती म्हणजे सुप्रसिद्ध लेखक आणि अभिनेते कादर खान! २२ ऑक्टोबर १९३२ साली अफगाणिस्तानच्या काबूल येथे कादर खान यांनी एका मुस्लिम परिवारात जन्म घेतला, पण कादर खान यांची जडणघडण मुंबईच्या कामाठीपुरा भागात झाली, कारण त्यांच्या वडिलांनी काबूल सोडून मुंबईला यायचा निर्णय घेतला, इस्माईल युसुफ कॉलेज मधून त्यांनी त्यांची इंजिनियरिंगची पदवी घेतली आणि काही वर्षे भायखळा इथल्या कॉलेजमध्ये इंजिनियरिंग प्रोफेसर म्हणून नोकरी सुद्धा केली! नाटक लिखाण याची आवड त्यांना होतीच, अशाच एका नाटकाच्या माध्यमातून कादर खान यांची दिलीप कुमार यांच्याशी ओळख झाली आणि त्यांच्यातलं टॅलेंट ओळखून त्यांना २ सिनेमांची ऑफर दिली…तिथून त्यांच्या फिल्मी सफरीला सुरुवात झाली. १९७२ साली आलेला रणधीर कपूर आणि जया भादुरी यांच्या जवानी दिवानी या सिनेमासाठी कादर खान यांनी संवादलेखन केले, आणि त्यांच्या कामाचा मोबदला सुद्धा मिळाला तो देखील १५०० रुपये!
इथून कादर खान हे नाव लोकांना परिचित झालं! कादर खान यांनी तब्बल २५० ते ३०० सिनेमात कामं केली जो आजवरचा कुणीही न तोडलेला रेकॉर्डच मानावा लागेल. एक लेखक म्हणून आणि एक अभिनेता म्हणून कादर खान यांनी जे काही मिळवलं ते कोणत्याही सुपरस्टारला मिळवणं शक्य नव्हतं. प्रतिकूल परिस्थितीतुन केवळ स्वतःच्या बळावर इतका वर आलेला लेखक दुसरा कुणीच नाही. कादर खान यांनी जितेंद्र, राजेश खन्ना, मिथुनदा, अमिताभ बच्चन, गोविंदा या मुख्य अभिनेत्यांसोबत सर्वात जास्त काम केलं. राजेश खन्ना या पहिल्या वहिल्या सुपरस्टारने तर कादर खान यांना सर्वात जास्त मानधन मिळवून दिल. मनमोहन देसाई दिग्दर्शित रोटी सिनेमाच्या लेखनासाठी कादर खान यांना तब्बल १,२१,००० रुपये मानधन देण्यात आलं होतं. या सिनेमाची निर्मिती खुद्द राजेश खन्नाने जरी केली असली तरी कोणाचंही पाठबळ न घेता एका लेखकाला एवढं मानधन मिळणं हे त्याकाळी खूप ग्रेट मानलं जायचं!
हे हि वाचा: चिरतारुण्य म्हणजे अनिल कपूर – बॉलिवूडचा एकदम “झक्कास” अभिनेता!
१९७८ ते १९८९ ही वर्ष कादर खान यांच्यासाठी बरीच महत्वाची ठरली. या काळात कादर खान यांचं लिखाण आणि अभिनयाची अफाट रेंज आपल्याला बघायला मिळेल. राजेश खन्नाच्या दाग मधून अभिनयात आपली छाप उमटवणारे कादर खान मी.नटवरलाल, मुकद्दर का सिकंदर, सुहाग, परवरीश, हिम्मतवाला अशा वेगवेगळ्या सिनेमातून स्वतःचं स्थान निर्माण केलं. तर अमर अकबर अँथनी, शराबी, कुली, लावारीस, याराना असे एक सो एक हिट सिनेमांसाठी स्क्रीनरायटर म्हणून काम करून अमिताभ बच्चन यांचं करियर एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. अमिताभ बच्चन यांची अँग्री यंग मॅन ही इमेज बनवण्यात जेवढ योगदान सलीम जावेद या जोडगोळीच आहे त्यापेक्षा काकणभर जास्त योगदान कादर खान यांचं सुद्धा आहे! कारण ज्या वेळेस सलीम जावेद यांनी लिहिणं बंद केलं त्यानंतर सुद्धा अमिताभ बच्चन यांच्यासाठी तितक्या तोडीचे संवाद देणारा एकमेव लेखक होता तो म्हणजे कादर खान. १९८९ नंतर कादर खान यांनी प्रामुख्याने विनोदी भूमिका आणि सिनेमे करणं सुरू केलं, ज्यात त्यांची डेव्हिड धवन, गोविंदा यांच्यासोबत चांगलीच भट्टी जमली! हिरो नंबर १, कुली नं १, राजा बाबू, दुल्हे राजा, हिरो नं १, जुडवा, बडे मियाँ छोटे मियाँ, आँखें पासून मुझसे शादी करोगी अशा वेगवेगळ्या विनोदी सिनेमातल्या त्यांच्या भूमिका विसरणं निव्वळ अशक्य आहे.
इंडस्ट्री मध्ये होणारा दुजाभाव, अमिताभ किंवा गोविंदा दोघांनी दिलेली वागणूक याबद्दल कादर खान यांनी स्पष्टपणे मीडियासमोर वक्तव्य दिलेलं आहे. कशाप्रकारे त्यांना बाहेर काढलं गेलं, त्यांच्याशी संबंध तोडले गेले याबद्दल त्यांनी परखडपणे आपली मतं मांडली, पण केवळ आपलं काम करण्यासाठी त्यांनी कधीच कुणाचीही लाचारी पत्करली नाही. एक अभिनेता म्हणून कादर खान ग्रेट आहेतच, ३०० सिनेमांमध्ये काम करणं हे काय खायची गोष्ट नाही, पण कादर खान हे लोकांना जास्त लक्षात राहतात ते एक लेखक म्हणून, त्यांनी लिहिलेले कित्येक संवाद आजही लोकांच्या मनावर कोरले गेलेले आपल्याला दिसतात. इतकं सगळं नाव, इज्जत, पैसे कमावून सुद्धा एका फकिराप्रमाणे जगलेला इंडस्ट्रीचा एकमेव प्रतिभावान लेखक म्हणजे कादर खान. अमिताभ बच्चन यांच्या मुकद्दर का सिकंदर मधला त्यांनीच लिहिलेला एक संवाद आहे जो जीवनाचं सूत्र आपल्याला सांगतो, त्या सिन मध्ये कादर खान एक फकीर बनून त्या रडणाऱ्या मुलाला सांगत असतात – “इस फ़क़ीर की एक बात हमेशा याद रखना, सुख में हसते हो तो दुःख में कहकहे लगाओ, क्योंकि जिंदा है वो लोग जो मौत से टकराते है, मुर्दों से बत्तर है वो लोग जो मौत से घबराते है! सुख तो बेवफा है, चंद दिनों के लिए आता है और चला जाता है, लेकिन दुख तो अपना साथी है, इसीलिए सुख को ठोकर मार, दुःख को गले लगा, तक़दीर तेरे कदमों में होगी और तू मुक़द्दर का बादशाह होगा!” जीवन आणि मृत्यू हे इतक्या सुंदरतेने आपल्याला सांगणाऱ्या दिलखुलास हरहुन्नरी आणि एक फकीर अशा कादर खान यांना मानाचा मुजरा!