‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
भोसले – प्रतिमांचा उत्कट आविष्कार
भारतातील समांतर चळवळ नव्वदच्या दशकात क्षीण झाली तरीही त्या काळात निर्माण झालेल्या चित्रपटांनी पुढील पिढीतल्या अनेक दिग्दर्शकांना आशयघन आणि तांत्रिक दृष्ट्या सशक्त चित्रपट बनवण्याची प्रेरणा दिली. मल्टीप्लेक्सच्या उभारणीमुळे हे चित्रपट अपेक्षित प्रेक्षकांपर्यंत पोहचण्यास मदत झाली. सध्या व्यावसायिक चित्रपटांची चलती असण्याच्या काळात समांतर चित्रपटांचा वारसा समर्थपणे पुढे नेणारे जे दिग्दर्शक हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत आहेत त्यात देवाशिष माखीजाचे नाव प्रामुख्याने घ्यायला हवे. ‘ब्लॅक फ्रायडे’, ‘बंटी और बबली’ या लोकप्रिय चित्रपटामध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून कामगिरी करणाऱ्या देवाशिष माखीजाने ‘तांडव’, ‘अगली बार’ या लघुपटातून आणि ‘आज्जी’ या कथात्म चित्रपटातून त्याची शैली ठळकपणे दाखवून दिली.
सोनी लिव्हवर प्रदर्शित झालेल्या ‘भोसले’ या चित्रपटाने देवाशिष माखीजाची चित्रपट या माध्यमावर त्याची असलेली पकड पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. या चित्रपटातील प्रमुख भूमिकेसाठी मनोज वाजपेयीला २०१९ सालचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. खरंतर याआधीच ‘सत्या’ किंवा ‘अलीगढ’ या चित्रपटातील भूमिकेसाठी मनोज वाजपेयीला अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळायला हवा होता पण उशिरा का होईना त्याच्या अभिनयाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली ही समाधानाची बाब आहे. ‘भोसले’ जितका मनोज वाजपेयीच्या संवेदनशील अभिनयामुळे लक्षात राहतो तेवढाच तो जीग्मेत वान्चूकचे प्रभावी प्रकाशचित्रण आणि त्याने टिपलेल्या उत्कट प्रतिमांच्या मागे असलेल्या देवाशिषच्या दिग्दर्शकिय दृष्टीसाठी देखील लक्षात राहतो.
गणेशोत्सवाच्या काळात मुंबईच्या उपनगरातील एका चाळीत भोसलेचे कथानक घडते. कारखान्यात गणेश मूर्तींना अखेरची रंगरंगोटी करण्याचे काम सुरु झालेले असते. याचं दरम्यान गणपत भोसले [मनोज वाजपेयी] हा पोलीस हवालदार सेवानिवृत्त होतो. पोलीस सेवेत आपल्याला अजून काही काळ ठेऊन घ्यावे म्हणून तो वरिष्ठाकडे विनंती अर्ज करतो. ऑफिसमधून आपल्याला बोलावणे येईल या आशेवर गणपत भोसले आपले एकाकी, कंटाळवाणे आयुष्य रेटत राहतो. त्याच्या चाळीमध्ये गणेशोत्सवाची तयारी सुरु होते. त्यासाठी वर्गणी गोळा करणारा विलास [संतोष जुवेकर] हा कट्टर मराठीवादी टॅक्सी ड्रायव्हर! अमराठी लोकांनी मुंबईत येऊन मराठी माणसांचे रोजगार हिरावून घेतले याबद्दल विलासच्या मनात राग खदखदत असतो. चाळीतील अमराठी लोकांचा तो सतत दुस्वास करतो आणि संधी मिळेल तेव्हा तो राग त्यांना मारून पिटून व्यक्त करतो.
भोसलेच्या शेजारच्या घरात राहणाऱ्या नर्सचा, सीताचा [ईप्सिता चक्रवर्ती] लहान भाऊ लालू [विराट वैभव] विलासच्या रोषाला बळी पडतो. गणपत भोसले या सर्व प्रकरणात शांत असला तरीही त्याला विलासचे हे वागणे अजिबात पसंत नसते. चाळीत सार्वजनिक गणेशाची स्थापना होते. ऑफिसमधून कामाला नकार आल्यामुळे गणपत निराश होतो. चाळीत गणपतीच्या आरतीचा जल्लोष होत असताना घरात गणपत बेशुद्ध होऊन पडतो. सीता त्याला आपल्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती करते. तो बरा होऊन घरी आल्यानंतर सुद्धा त्याची काळजी घेते. गणपत भोसलेची सीता आणि लालू बरोबर झालेली जवळीक विलासला सहन होत नाही आणि विलास एक अघोरी कृत्य करून बसतो.
‘भोसले’चे कथानक घटनाप्रधान नाही. संपूर्ण चित्रपटात फक्त दोन ते तीन महत्वाच्या घटना घडतात. दिग्दर्शक देवाशिष या घटनांपेक्षा त्याच्या परिणामाचे पडसाद मुख्य व्यक्तिरेखांवर कसे उमटतात हे दाखवण्यावर अधिक भर देतो. त्यासाठी त्याने निवडलेल्या दृश्यचौकटी ‘भोसले’चे वेगळेपण अधोरेखित करतात. गणपत भोसले ज्या चाळीत राहतो ती चाळ या चित्रपटातील एक प्रमुख व्यक्तिरेखा म्हणून उभी राहते. पोपडे उडालेल्या भिंती, तुंबलेली गटार, रात्री उच्छाद मांडणाऱ्या घुशी, पायऱ्यांवर निवांत झोपणारे भटके कुत्रे, मांजरी, गणपत भोसलेची रया गेलेली खोली, त्याचं तिथलं नीरस वास्तव्य हे सगळं टिपत दिग्दर्शक गणपत भोसलेची व्यक्तिरेखा बांधत जातो. चित्रपटाच्या सुरुवातीला गणपती सजावटीच्या पार्श्वभूमीवर गणपत भोसलेचा ऑफिसमधील शेवटचा दिवस चित्रित करण्याचं देवाशिषचे कौशल्य विशेष दाद देण्यासारखे आहे.
शेवटला असणारा गणेश विसर्जनचा सिक्वेन्स कथानकाचे वर्तुळ पूर्ण करतो. भोसले या नावाशी जोडल्या गेलेल्या ऐतिहासिक संदर्भाचा नेमका वापर दिग्दर्शकाने करून घेतला आहे. परप्रांतीयांच्या मुंबईतील वास्तव्यास आक्षेप घेणारा विलास आणि त्यांच्याकडे सहानुभूतीच्या दृष्टीने पाहणारा गणपत भोसले या दोन भिन्न प्रवृत्तीचा लढा कुठेही शब्दबंबाळ आणि आक्रस्ताळी होणार नाही याची काळजी दिग्दर्शकाने घेतली आहे. घटनांपेक्षा काळ आणि अवकाश यांचे तपशीलवार चित्रण करण्यावर दिग्दर्शकाने भर दिल्यामुळे भोसलेला अपेक्षित संथपणा प्राप्त झाला आहे. जीग्मेत वान्चूकच्या प्रकाशचित्रण करताना अगदी बारीक सारीक गोष्टी चित्रचौकटीत येतील याची काळजी घेतली आहे. शेवटाकडे त्याने टिपलेली काही दृश्ये अंगावर येणारी आहेत. या दृश्यांना मंगेश धाकडेच्या पार्श्वसंगीताने अधिक गडद केलं आहे.
विराट वैभव, ईप्सिता चक्रवर्ती, चित्तरंजन गिरी, अभिषेक बनर्जी, श्रीकांत यादव या कलाकारांनी चाळीतील रहिवाशांच्या भूमिका नेमकेपणाने केल्या आहेत. संतोष जुवेकरच्या वाट्याला आलेली विलासची भूमिका त्याच्या या आधीच्या इमेजला साजेशी असली तरीही जेव्हा त्या भूमिकेमागील दिग्दर्शकाचा विचार वेगळा असतो तेव्हा ती पडद्यावर कलाकाराला सुद्धा त्यापद्धतीने विचार करून मांडावी लागते याचा प्रत्यय देणारी आहे. मनोज वाजपेयीने अभिनित केलेला भोसले पाहणे ही एक मोठी पर्वणी आहे. या भूमिकेची खोली जाणून त्याने आपलं सर्वस्व पणाला लावलं आहे. गणपत भोसलेचे एकाकीपण त्याने अवघ्या देहबोलीतून गहिरे केलं आहे. त्याच्या मनातील खळबळ चेहऱ्यावर परावर्तीत होत राहते. संवादाचा आधार न घेता एक उत्तम अभिनेता पडद्यावर किती प्रभावीपणे व्यक्तिरेखा सादर करू शकतो याचा मनोज वाजपेयीने केलेला भोसले हा वस्तुपाठ आहे. देवाशिष माखीजा आणि मनोज वाजपेयी साठी ‘भोसले’ पाहायलाच हवा.