फोटोप्रेम: एक फोटोजेनिक प्रेमकथा
वेट्रीमारन दिग्दर्शित ‘असुरन’ या तमिळ चित्रपटामध्ये एक प्रसंग आहे. शिवासामी त्याच्या मोठ्या मुलाला, मुरुगनला स्वतःचा फोटो काढू देत नाही कारण फोटो काढल्याने आयुष्य कमी होतं, अशी अंधश्रद्धा त्याच्या मनात असते. काही दिवसांनी मुरुगनचा दुर्दैवी अंत होतो आणि संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरते. कित्येक दिवस मुलाच्या मरणाचं दुःख उरात साठवलेला शिवासामी शेवटी आक्रोश करू लागतो आणि म्हणतो, “अंधश्रद्धेपायी मुलाचा फोटोही काढू शकलो नाही. आता तर मला त्याचा चेहराही आठवेना झालाय…”
‘ॲमेझोन प्राईम व्हिडीओ’वर नुकताच रिलीज झालेला ‘फोटोप्रेम’ पाहिला आणि ‘असुरन’मधला हा हृद्य प्रसंग पुन्हा एकदा डोळ्यांसमोर तरळून गेला. आपल्या जाण्यानंतर आपल्या कुटुंबावर काय परिणाम होईल, याची चिंता प्रत्येकालाच असते. कित्येकांनी मरण डोळ्यासमोर दिसू लागताच आपल्यापश्चात कुणाचीही आबाळ होऊ नये यासाठीही काही तरतुदी करून ठेवलेल्या असतात. समर्थांच्या ‘मरावे परि किर्तीरूपी उरावे’ या उक्तीप्रमाणे आपलं जीवन असावं, यासाठी प्रत्येकजण आटापिटा करताना दिसतो. आपल्या आठवणींना विस्मृतीत जाऊ न देता त्यांना वारंवार उजाळा देण्यासाठी त्या आठवणी फोटोंमध्ये कैद केल्या जाऊ लागल्या. पूर्वीच्या काळी, फोटो क्वचितप्रसंगीच काढले जायचे त्यामुळे त्यांना विशेष महत्त्व होतं, मात्र सध्या फोटोंचा इतका अतिरेक होतोय की त्यात कैद झालेल्या आठवणींची उब जाणवत नाही.
‘फोटोप्रेम’ची कथा माईंभोवती (नीना कुलकर्णी) फिरते. माईंना फोटोफोबिया (फोटो काढण्याची भीती) असून, आजवर त्यांनी स्वतःचा एकही फोटो नीट काढू दिलेला नाही. लेकीच्या लग्नात सुद्धा त्या कसंनुसं हसून फोटोसाठी पोझ देतात आणि लगेच तिथून निसटतात. एकेदिवशी एका अंत्यविधीला गेल्यावर मृत व्यक्तीचा फोटो शोधण्यासाठी चाललेली धडपड माई हेरतात. माणूस गेल्यानंतर त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ घरात लावण्यासाठी एकही चांगला फोटो नसावा याचं माईंना वाईट वाटतं आणि त्याचवेळी स्वतः फोटोफोबिक असल्याचाही पश्चात्ताप होऊ लागतो. आपण गेल्यावर आपला कुठलाही विद्रूप फोटो घरच्यांनी लावू नये यासाठी माई चांगला फोटो शोधण्याची धडपड करू लागतात. माईंची ही शोधमोहीम कितपत यशस्वी ठरते, हे या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळते.
नीना कुलकर्णी (Neena Kulkarni) यांनी माईंच्या भूमिका अतिशय उत्तमरित्या वठवली असून, फोटोफोबिक माई ते फोटोंच्या प्रेमात पडलेली माई हा प्रवास त्यांच्या अभिनयाने अधिकच रंजक झाला आहे. पेपरमधल्या निधनवार्ता सदरातील फोटोंवर शेरा मारणारी त्यांची स्वगतं असोत, कुठल्याही शोकसभेला जाऊन मृत व्यक्तीचा फोटो पाहण्याचं त्यांचं वेड असो वा वेबकॅमवर वेगवेगळ्या पोझेसमध्ये स्वतःचे फोटो काढणं असो, माईंच्या प्रश्नांना असलेली विनोदाची हलकीशी झालर या सर्व प्रसंगांना गंभीर वळणावर नेऊन चित्रपट नीरस बनवण्यापासून वाचवते. चित्रपटाची कथा जरी बहुतांश वेळ माईंभोवतीच पिंगा घालत असली तरी इतर सहकलाकारांनीही त्यांना उत्तम अशी साथ दिलेली आहे. अमिता खोपकर, विकास हांडे, गीतांजली कांबळी, चैत्राली रोडे, प्रियदर्शिनी इंदलकर, प्रज्ञा जावळे-एडके, समीर धर्माधिकारी इत्यादी सहकलाकारांनी साकारलेली पात्रं छोटासाच रोल असला तरी लक्षात राहतात.
या चित्रपटासाठी आदित्य राठी आणि प्रसाद नामजोशी यांनी संवादलेखन केलं आहे. कौशल इनामदार यांनी संगीत दिग्दर्शन केलं असून सौरभ भालेराव यांनी पार्श्वसंगीत दिलं आहे. वैभव जोशी यांनी शब्दबद्ध केलेली गाणी हंसिका अय्यर, राजा हसन, शाल्मली खोल्गडे आणि आनंद शिंदे यांनी गायली आहेत. ‘साहिल पर तसबीर तेरी’ आणि ‘शटर खोल फ्लॅश मार’ सारखी गाणी हा चित्रानुभव अधिकच श्रवणीय करतात. गायत्री पाटील आणि आदित्य राठी या जोडगोळीने कथा, पटकथालेखनाची आणि दिग्दर्शनाची एकत्रित जबाबदारी उचलली असून, पदार्पणातच एक वेगळा विषय हलक्याफुलक्या पद्धतीने मांडण्याचा त्यांचा हा प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद झाला आहे. सध्याच्या निराशाजनक दिवसांत मनाला विश्रांती देणारा असा हा चित्रपट नक्कीच पाहायला हवा…