रसरंग…. चित्रपट सृष्टीच्या चौफेर वाटचालीचा एक साथीदार
शीर्षकातील “रसरंग“(Rasrang) असे वाचताच चित्रपट,नाटक, क्रिकेटचे किमान तीन पिढ्यांचे वाचक एव्हाना जुन्या आठवणीत गेले असतीलच. डोळ्यासमोर रसरंग नक्कीच आला असेल. आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीला “रसरंग” हे ब्रॅण्ड नेम आहे की, आणखीन काय आहे असा कदाचित प्रश्न पडला असेल. ब्रॅण्ड नेमपेक्षाही ते भारी होते. खास करुन चित्रपटसृष्टी आणि मराठी नाट्यसृष्टीच्या चौफेर इतिहासात “रसरंग” या कला आणि क्रीडा या विषयांना वाहिलेल्या साप्ताहिकाचा खूपच मोठा वाटा आहे. मराठी साप्ताहिक, पाक्षिक, मासिक यांच्या वाचन संस्कृतीच्या काळात ते सुरु झाले. नेमके सांगायचे तर १० मे १९५८ रोजी नाशिकच्या गावकरी प्रकाशनच्या वतीने हे साप्ताहिक प्रसिद्ध होऊ लागले. अ. द. पोतनीस हे मालक व संपादक होते. गावकरी दैनिकाच्या जोडीला हे साप्ताहिक सुरु झाले. गावकरी प्रकाशनचे ‘अमृत’ हे छोट्या आकाराचे मासिकही त्या काळात वाचकप्रिय होते. ते दिवसच वेगळे होते.
रसरंग (Rasrang) साप्ताहिक सुरु झाले तो काळ मुद्रण व्यवसायात हाताने खिळे लावण्याचा होता. घरात टेलिफोन असणे केवढे तरी प्रतिष्ठेचे होते. एकाद्या सोसायटीत एका दोघांकडेच टेलिफोन असे. तर घरात रेडिओ आणला तरी शेजारच्यांना मूठभर साखर वाटून आनंदीत होण्याचा होता. ‘सातच्या आत घरात’ अशी जगण्याची पध्दत होती. सरळमार्गी आयुष्य जगत आदर्शवाद महत्वाचा होता. कृष्ण धवल अर्थात ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटाचे युग होते. एकपडदा अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर्सवर लांबलचक रांग लावून पिक्चरचे तिकीट मिळवायचा आनंद होता. रेडिओवर क्रिकेट समालोचन ऐकून धावफलक समजत होता. ज्यांच्या घरी रेडिओ नव्हता ते समालोचक ऐकण्यास शेजारीपाजारी जात. एकत्र बसून क्रिकेट समालोचन, बिनाका गीतमाला ऐकली जात असे.
अशातच ‘रसरंग‘(Rasrang) साप्ताहिक म्हणजे अबब म्हणावे असाच मोठा आनंद. नाशिकला प्रसिद्ध होणारा रसरंग दुसर्या दिवशी मुंबई व पुण्यात मिळे. मग हळूहळू अन्य शहरात, ग्रामीण भागात उपलब्ध होऊ. त्याची वाट पाहिली जाई. बहुतेक पहिल्या अंकाची किंमत वीस पैसे असावी. मला सिनियर असलेली रसिक पिढी त्याबाबत काही सांगू शकेल.
साठच्या दशकात जन्माला आलेल्या माझ्या पिढीला राजेश खन्नाचा चित्रपट, सुनील गावसकरचे क्रिकेट, बाळासाहेब ठाकरे यांची व्यंगचित्र अशा अनेक गोष्टींसह साप्ताहिक रसरंग यांची विलक्षण आवड होती. मध्यमवर्गीय कुटुंबात चित्रपटविषयक इंग्लिश गाॅसिप्स मॅगझिन वाचायला जावू देत, पाह्यलाही आणली जात नसत. त्यामुळे “चित्रपटाच्या जगात काय काय चाललंय” हे जाणून घेण्याचे माध्यम रसरंग होते.
इसाक मुजावर, शिरीष कणेकर, वसंत साठे, सुधीर नांदगावकर, वसंत भालेकर, कैलास झोडगे, विजय नाफडे, विजय जानोरकर, सुधीर वैद्य (ते क्रिकेटवर माहिती देत), इसाक मुजावर हेच बाळकृष्ण दांडेकर, मदन शारंगपाणी अशा टोपण नावाने लिहीत, यांचे लेखन याच रसरंगमध्ये वाचत वाचत माझी पिढी शाळेतून महाविद्यालयात गेली. मला आठवतय, १९७७/७८ च्या सुमारास रसरंगची किंमत पंचाहत्तर पैसे होती. त्याच सुमारास मी रसरंगमध्ये (Rasrang) वाचकांच्या पत्राच्या सदरासाठी पत्र लिहून पोस्टाने पाठवत असे. रसरंगचे मुंबईतील कार्यालय ६ ऐदून बिल्डिंग, धोबीतलाव, मुंबई ४०० ००२ हा पत्ता पाठ झालाच पण आमच्या गिरगावातून जवळ आहे याचा आनंदही होई.
रसरंगने तेव्हाच “आम्हा चित्रपट रसिकांना चित्रपटावर लिहिण्याची संधी” म्हणून “प्रेक्षकांच्या चष्म्यातून” हे सदर सुरु केले. त्यामुळे काय झालं तर कधी एकदा प्रदर्शित झालेला चित्रपट पाहतोय आणि त्यावर “आपले मत” लिहून पाठवतोय असे व्हायचे, ती एक सकारात्मक सवयच झाली. त्याच वेळेस राज्याच्या विविध भागातून ‘रसरंग‘मध्ये(rasrang) पत्रलेखन करणारे आज सोशल नेटवर्किंग युगात काही व्हाॅटस अप ग्रुपवर भेटले आणि जुन्या आठवणी निघतात. आणि दुसरं म्हणजे, याच लेखनाच्या संधीतून माझ्यातील सिनेपत्रकार हळूहळू आकार घेत आला.
रसरंग (Rasrang) साप्ताहिकाचे असे अनेकांना देणे आहे. कधी एकदा रसरंग हाती पडतोय आणि वाचतोय असे होई. शहरातील वाचनालयांपासून खेड्यापाड्यातील ग्रामपंचायतीच्या वाचनालयापर्यंत रसरंगला चांगलीच मागणी असे. अगदी अंक विकत घेऊन त्याचा संग्रह करणारेही होते..जपून ठेवत. चित्रपटावरच्या या निस्सीम भक्तीला खुद्द सिनेमावाल्यांनी मनापासून दाद द्यायला हवी. या माध्यमातून आपल्याकडे चित्रपट रुजला. रसरंगच्या मुखपृष्ठावरील कलाकार कोण असेल याचीही उत्सुकता असे. त्या काळात ‘वाचकांच्या पत्रा’तील सदरात राजेश खन्ना श्रेष्ठ की अमिताभ बच्चन हा वाद जवळपास चार सहा महिने सुरुच होता. अनेक जण आपापली मते मांडत असे. याचाच अर्थ रसरंगने अनेकांना लिहिते केले.
=========
हे देखील वाचा : फिल्मी अड्ड्यावरील चर्चेतील फिल्म
=========
महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सव ही अतिशय प्रतिष्ठेची गोष्ट. पूर्वी होळीच्या आसपास याचे सगळे पुरस्कार घोषित होत आणि ३० एप्रिल या दादासाहेब फाळके जयंतीनिमित्त धोबीतलाव येथील रंगभवन या ओपन थिएटरमध्ये हा सोहळा रंगत असे. यानिमित्त रसरंगचा (Rasrang) खास विशेषांक असे. सर्व पुरस्कार विजेत्यांच्या मुलाखती त्यात असत. रसरंग जणू मराठी चित्रपटसृष्टीचे मुखपत्र म्हणून ओळखले जाई. रसरंगमध्ये आपल्या मराठी चित्रपटाची बातमी तसेच मुलाखत, परीक्षण यावे असे मराठी चित्रपटसृष्टीला मनोमन वाटत असे. अनेक मराठी कलाकारांची पहिली मुलाखत रसरंगमध्ये येत असे. एकदा रसरंगच्या वतीने मराठी चित्रपट सोहळाही आयोजित करुन अनेकांचा गौरव केल्याचे आठवतयं. हिंदी चित्रपटसृष्टीतीलही अनेकांच्या मुलाखती रसरंगमध्ये वाचायला मिळत.
रसरंगचा (Rasrang) दिवाळी अंक म्हणजे कला व क्रीडा यावर बरेच काही वाचायला मिळत असे. अनेकांच्या मुलाखती आणि विविध विषयांवर दीर्घ लेख हे त्याचे वैशिष्ट्य असे. मराठी वाचकांना तपशीलवार आणि अनेक संदर्भासह असलेला लेख नेहमीच आवडतो. त्यात बौद्धिक खाद्य आहे.
सत्तरच्या दशकातील नवप्रवाहातील अथवा समांतर चित्रपटाच्या चळवळीला भरपूर स्कोप दिला. मृणाल सेन दिग्दर्शित “भुवन शोम “( १९७०) पासून हिंदीत ही चळवळ आली हे रसरंगमुळेच मराठी वाचकांना समजले. त्या काळात जानेवारीत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असे. नवी दिल्ली आणि देशातील चित्रपट निर्मितीचे केन्द्र असणारे शहर ( मुंबई, कोलकत्ता, हैदराबाद वगैरे) येथे आलटून पालटून वर्षी त्याचे आयोजन होई.
याची रसरंग (Rasrang) भरपूर माहिती देत असे. नाटकावरही यात बरेच काही लिहिले जाई आणि क्रिकेटसह अन्य खेळांचीही दखल घेतली जात असे. पण रसरंग म्हणजे चित्रपट हे समीकरण घट्ट होते. फार पूर्वी इसाक मुजावर ‘फ्लॅशबॅक ‘ सदरातून जुन्या काळात नेत, तेव्हाचे चित्रपटाचे जग समोर आणत. कैलास झोडगे यांचेही गुजरा हुआ जमाना हे जुन्या चित्रपटाची माहिती देणारे सदर वाचनीय होते. रसरंग साप्ताहिक म्हणजे माहिती व मनोरंजनाचे उत्तम पॅकेज. मराठी मनाचा आनंद.
=========
हे देखील वाचा : “काडतूस” चित्रपटाची पंचवीशी बहुरंगी
=========
नव्वदच्या दशकात अनेक वृत्तपत्रांच्या मनोरंजन पुरवण्या सुरु झाल्या आणि त्याचा फटका चित्रपट नाटकविषयक साप्ताहिक, पाक्षिक यांना बसू लागला. वृत्तपत्रासोबतच घरी मनोरंजन पुरवणी येतेय तर पुन्हा साप्ताहिक कशाला असे वाटणे हळूहळू वाढत गेले. यात काही मनोरंजन साप्ताहिक, पाक्षिक बंद होत गेली. नाशिकच्या गांवकरी दैनिकात मनोरंजन पुरवणीला रसरंग असे नाव देऊन एक प्रकारे रसरंगचे अस्तित्व व परंपरा जपली.
आज रसरंग (Rasrang) साप्ताहिक ६६ वर्षांचे झाले असते. चित्रपट रसिक वाचकांची मागची पिढी एव्हाना जुन्या आठवणीत गेली असेल आणि त्यांना रसरंगने दिलेला आनंद आणि चित्रपटाची वाढवलेली आवड नक्कीच आठवली असेलच. एकाद्या जुन्या आवडत्या चित्रपटाप्रमाणेच ही भावना व बांधिलकी होती.