Jaran Marathi Movie Motion Picture: विवाहिता आणि बाहुली, काय आहे

तर अशी आहे श्यामची आई !
मानवी अस्तित्वाचा सर्वात भावनिक, हळवा आणि संवेदनशील भाग म्हणजे त्याचे त्याच्या आई सोबतचे नाते ! आई या व्यक्तीला सगळ्यात जास्त गृहीत धरले जाते आणि तितकाच मान दिला जातो. सर्व नात्यांमध्ये आपल्यासाठी सर्वात सोशिक, भावनिक आणि काळजी करणारी कोण व्यक्ती असेल तर आपली आई. तिला आपल्या मुलाने एक चांगला माणूस व्हावे आणि त्याला इतर लोकांनी त्याला चांगले म्हणावे असे तिला खूप मनापासून वाटत असते. यासाठी ती तीळतीळ तुटत असते.(Shyamchi Aai)

आपण मोठे होऊन जे काही बनतो त्याचे सर्वात जास्त श्रेय आईचे असते. कोणाला सॉरी म्हणणे असो किंवा देवाला नमस्कार करणे असो किंवा मोठ्या माणसांचा आदर करणे असो या सर्वच गोष्टींतून ती आपल्याला नम्रपणाची, माणुसकीची, सच्चेपणाची शिकवण देत असते. आजवर आईला केंद्रित ठेवून अनेक कलाकृती बनल्या. बऱ्याच ठिकाणी आईला देवपण देऊन तिचे माणूसपण हिरावून घेण्यात आले होते. पण या फिल्मने आईला एक माणूस म्हणून पाहत एक सुंदर कथा आपल्यासमोर आणली आहे. (Shyamchi Aai)
या फिल्मची साधारण कथा अशी आहे की, साने गुरुजींना कारावास होतो आणि त्यावेळी ते तुरुंगात असताना ‘श्यामची आई’ नावाचे पुस्तक लिहितात. गुरुजी पुस्तकातील प्रसंग जेलमधील कैद्यांना श्यामच्या बालपणातील प्रसंग सांगत आहेत जे गुरुजींच्या खऱ्या आयुष्यावर बेतले आहेत.ब्रिटिश काळात श्याम नावाचा मुलगा कोकणातील एक छोट्याशा खेड्यात आपल्या एकत्र कुटुंबासोबत राहत असतो. त्याचे वडील त्यांच्या २ छोट्या भावांसोबत खोताचे काम करत असतात. श्यामला दोन भाऊ आणि एक मोठी बहीण असते.
वडिलांचे दोन्ही छोटे भाऊ त्यांच्याविरुद्ध संगनमताने कट करून सर्व संपत्ती आणि जमीनजुमला स्वतःच्या नावावर करून घेतात. तिथून या कुटुंबाची दैन्यावस्था सुरु होते. अशा परिस्थितीत मुलांच्या शिक्षणाची आबाळ होऊ लागते आणि त्यावर मात करण्यासाठी आईवडील खूप कष्ट घेत असतात. कितीही काही झाले तरी शिक्षण सोडायचे नाही ही आईची शिकवणूक शिरोधार्य मानून श्याम वेगवेगळ्या गावी शिकत असतो. शिक्षणाचा आणि स्वतःच्या खर्चासाठी तो वेगवेगळ्या छोट्या छोट्या नोकऱ्या करत असतो. या बिकट परिस्थितीमध्ये श्यामचे आणि आईचे नाते वेगवेगळ्या भावविश्वातून जाते. (Shyamchi Aai)
आजच्या काळात थोडे जरी कठीण प्रसंग आले तर नीतिमत्ता धाब्यावर बसवून सोप्पा अनैतिक मार्ग निवडला जातो आणि त्याला प्रॅक्टिकल होणे किंवा दुनियादारी सांभाळणे अशी गोंडस नावे दिली जातात. त्या काळात श्यामची आई आपली आई बनून नैतिकता किती महत्वाची असते हे ठासून सांगते. अभिनेत्री गौरी देशपांडे यांची निवड सर्वार्थाने अतिशय योग्य वाटते. करारी, कठोर पण मायाळू, सर्वाना जीव लावणारी अशी अनेक रूपे त्यांनी खूप अप्रतिम पद्धतीने साकारली आहेत. आवाजाचा आणि डोळ्यांचा पुरेपूर आणि योग्य प्रमाणात उपयोग त्यांनी केला आहे. संदीप पाठक श्यामच्या बाबांच्या भूमिकेत अगदी योग्य बसतात.
संदीप पाठक यांची जी विनोदी नटाची इमेज आहे ती इथे अजिबात जाणवत नाही एवढे ते भूमिकेशी समरस झालेले आहेत. बालपणीचा श्याम शर्व गाडगीळने साकारला आहे आणि त्याने त्यात जीव ओतला आहे. कुमार वयातील श्याम ‘कोटा फॅक्टरी’ फेम मयूर मोरे याने साकारला आहे. या फिल्मचे दिग्दर्शक सुजय डहाके यांना गेल्या काही फिल्म्सपासून गमावलेला सूर त्यांना सापडला आहे.(Shyamchi Aai)
फिल्मचे स्क्रीनरायटर सुनील सुकथनकर यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. ‘श्यामची आई’ या पुस्तकातून त्यांनी आजच्या काळात रिलेवंट वाटतील असेच प्रसंग निवडले आहेत. आई हा विषय या जेष्ठ दिग्दर्शकाने रायटरच्या भूमिकेत येऊन ज्या मॅचुरली हाताळला आहे त्या बद्दल नक्कीच कौतुक करावे लागेल. या विषयावर फिल्म बनवताना रायटरला भावनिक किंवा आईला पेडस्टील वरती ठेवण्याचा मोह आवरत नाही पण त्यांनी श्यामच्या आईला एक २५ वर्षाची मुलगी सगळ्या कुटुंबाला सांभाळते आणि त्या सोबत आपल्या मुलांना चांगला माणूस बनवण्याचा प्रयत्न करते या विचाराने प्रेजेंट केले आहे. (Shyamchi Aai)
==========
हे देखील वाचा : विनोद खन्नाच्या कारकिर्दीतला ‘हा’ सर्वोत्तम चित्रपट
==========
फिल्म ब्लॅक अँड व्हाइट मध्ये बनवली आहे. सिनेमॅटोग्राफर विजय मिश्रा यांचे काम खूपच प्रभावशाली झाले आहे. जेव्हा फिल्म ब्लॅक अँड व्हाइट असते तेव्हा मेन फोकस पात्रांवरती असतो. अशात सिनेमॅटोग्राफरला जास्त करण्यासारखे नसते पण त्यांनी ज्या पद्धतीने त्यांनी स्पेस, लाइट, संयत कॅमेरा मुव्हमेंट यांच्या मिश्रणाने जी जादू केली आहे त्याने आपण नकळतपणे श्यामच्या घरात जाऊन सर्व पाहत असल्यासारखे वाटते. एडिटर बी महंतेश्वर यांनी लॉन्ग टेकस आणि स्लो कटसचा वापर करून कथेतील सर्व भावभावना, आशय वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवल्या आहेत.
‘श्यामची आई’ असे फिल्मचे नाव ऐकून तुम्ही डायरेक्ट जुन्या फिल्मबद्दल विचार करत असाल किंवा त्या फिल्मशी तुलना करण्याच्या मनस्थितीत असाल तर थांबा. दोन्ही फिल्म्स ज्या काळात आणि ज्या दिग्दर्शकांनी बनवल्या आहेत त्यात खूप मोठा फरक आहे. यात कोण श्रेष्ठ व कोण छोटा नाहीये तर काळानुसार प्रत्येक फिल्मच्या निर्मितीत आणि कथेत फरक पडला आहे. कलाकृती मीडिया आशय, अभिनय, सिनेमटोग्राफी, एडिटिंग यांच्या सुंदर मिलाफाला पाच पैकी चार स्टार देते.