मिलिंद गवळींनी ‘समृद्धी’ बंगल्यातून बाहेर पडताना आठवण म्हणून नेली ‘ही’
कलादिग्दर्शन जाणणारा कलाकार
स्वप्न नक्की बघावीत…पण ती प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यायला लागते…या मेहनतीचे फळ नक्की मिळते. अशक्यप्राय वाटतील अशी स्वप्न खरी होतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपले नितीन चंद्रकांत देसाई. मराठी शाळेत शिक्षण घेतलेले, सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेले नितीन देसाई यांनी एक फोटोग्राफर म्हणून सुरुवात केली. त्यांनी जेव्हा चित्रपट सृष्टीत पदार्पण केले तेव्हा आपल्या भविष्यात काय आहे याची त्यांना कल्पना नव्हती…पण आपण जे करु ते नक्कीच भव्य असणार हा त्यांचा विश्वास त्यांनी सार्थ ठरवला आहे.
मुंबईच्या बीडीडी चाळीत नितीन देसाई यांचे बालपण गेले. शालेय शिक्षणानंतर जे. जे. आर्टस कॉलेजमध्ये आणि रहेजा कॉलेजमध्ये त्यांनी फोटोग्राफीचे शिक्षण घेतले. साधारण पस्तीस वर्षापूर्वीचा हा काळ होता. मुलगा आर्टसला, म्हणजेच कलाशाखेकडे गेला की तो फारसा हुशार नाही, असा समज होता. कमर्शियल आर्टस म्हणजे काय हे तेव्हा फार कोणाला माहीत नव्हते. पण नितीन देसाई यांना या शाखेची ओढ होती. मुलाची ही आवड आई वडीलांनी जपली. एवढंच नव्हे तर बॅंकेत कामाला असलेल्या वडीलांनी अडीच लाखांचे कर्ज काढून नितीन यांना स्टुडीओ काढण्यासाठी मदत केली. अशावेळी नितीन यांनी आपल्या गॅलेरीच्या एका भागात फोटोग्राफीसाठी जागा तयार केली. फोटोग्राफीच्या एका अशाच प्रोजेक्टमधून ते फिल्मसिटीमध्ये गेले. हे जग वेगळं होतं. आतापर्यंत आपल्याला काय करायचंय हे देसाई यांना माहित नव्हते. पण फिल्मसिटीमध्ये आल्यावर त्यांना त्यांचा मार्ग सापडला.
कॅमे-याची जादू माहीत असलेल्या नितीन देसाई यांनी पहिल्यांदा ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी यांच्या मार्गदर्शनाखाली तमस या मालिकेसाठी काम करायला सुरुवात केली. त्यानंतर चाणक्य या लोकप्रिय मालिकेसाठी त्यांनी सहाय्यक कलादिग्दर्शक म्हणून काम केले. दूरदर्शनवर लोकप्रिय असलेल्या या मालिकेच्या 26 व्या भागापासून त्यांनी स्वतंत्रपणे कलादिग्दर्शक म्हणून काम केले.
विधू विनोद चोप्रा यांचा परिंदा चित्रपट त्यांनी कलादिग्दर्शक म्हणून केला. त्यांनंतर चोप्रा यांचाच 1942 लव्ह स्टोरी हा चित्रपट नितीन देसाई यांनी केला. नितीन देसाई यांना या चित्रपटातून खरी संधी मिळाली. त्यांनी उभारलेल्या सेटचं कौतुक झालं. कोणताही सेट उभारतांना, चित्रपटाची कथा. त्यात अपेक्षित काळ…आणि त्यानुसार वातवरण निर्मिती करावी लागते…कथेत अगदी स्वर्गाचं वर्णन केलं असलं तरी तो स्वर्ग प्रत्यक्षात दाखवतो तो कलादिग्दर्शकच. त्यासाठी त्याचा तेवढा अभ्यास असावा लागतो. वाचन लागतं. माहिती गोळा करावी लागते. आपलं क्षेत्र नक्की झाल्यावर नितीन देसाई यांनी आपला हा होमवर्क पक्का केला. त्यामुळेच यशस्वी आणि अभ्यासू कलादिग्दर्शक म्हणून नितीन देसाई यांना ओळख मिळाली.
आ गले लग जा, द्रोह काल, अकेले हम अकेले तुम, डॉन, खामोशी, माचिस, करीब, प्यार तो होना ही था, इश्क, सलाम बॉम्बे, हम दिल दे चुके समन, जोश, मिशन कश्मिर, लगे रहो मुन्ना भाई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, देवदास, ताज महल, गांधी, दोस्ताना, वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई, जोधा अकबर, ट्रॅफीक सिग्नल, बालगंर्धव, अजिंठा, लगान, पानीपत अशा अनेक चित्रपटांचे य़शस्वी कलादिग्दर्शक म्हणून नितीन देसाई यांचे नाव घेण्यात येतं. याशिवाय देसाई यांच्या या यशात मानाचा तुरा खोवला ते राजा शिवछत्रपती या मालिकेमुळे. राजा शिवछत्रपती या मालिकेची निर्मिती त्यांनी केली. या मालिकेचे त्यांनी उभारलेले सेट हे त्यांच्या अभ्यासू वृत्तीचे प्रतिक ठरले. शिवाजी महाराजांना देसाई आपला आदर्श मानतात. त्यामुळेच महाराजांच्या जीवनातील प्रत्येक घटनांचा त्यांचा अभ्यास पक्का आहे. अगदी तारीख आणि नावासह…यासर्वांचा या मालिकेसाठी त्यांना उपयोग झाला.
नितीन देसाई यांनी आशुतोष गोवारीकर, विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी आणि संजय लीला भन्साळी या दिग्दर्शकांसोबत काम केलं आहे. चित्रपटाच्या सेटबाहेरही त्यांनी आपल्या कलेच्या जोरावर आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे. दिल्लीच्या राजपथावर महाराष्ट्राच्या चित्ररथ जेव्हा शानदारपणे संचलनात भाग घेतो, तेव्हा त्यामागे नितीन देसाई यांची मेहनत आणि कलादृष्टी असते. तसेच लागबागच्या गणपतीचा मंडपही दरवर्षी देसाई साकारतात. शिर्डी येथील साई सृष्टी प्रकल्पही देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाला आहे.
आज कलादिग्दर्शक म्हणून नितीन देसाई सर्वोच्च स्थानी आहेत. पण त्यामागे त्यांची मेहनत महत्त्वाची आहे. सुरुवातीला त्यांना दोन हजार रुपये एवढं मानधन मिळायचे. हे सर्व पैसे आईच्या ताब्यात देऊन रोजच्या खर्चाचे माफक पैसे ते स्वतःजवळ ठेवायचे. बसमधून प्रवास आणि वडापाव किंवा मिसळ पाव…यावर भागवायला लागायचे. या कामामध्ये वेळ आणि पैसा हे दोन्हीही फॅक्टर महत्त्वाचे असतात. आपल्याला उभारायचे सेट कमीतकमी वेळेमध्ये आणि माफक बजेटमध्ये उभे करावे लागतात. हे गणित नितीन देसाई यांनी साधले. सोबत त्या सेटमध्ये परफेक्टपणा असल्यामुळे त्यांच्या नावाला दिग्दर्शकांनी पहिली पसंती दिली. देसाई या सर्वांचे श्रेय सुरुवातीला घेतलेल्या अपार मेहनतीला देतात. तमस मालिका करतांना ते आठवडाभर तिथेच रहायचे. श्याम बेनेगल यांच्या भारत एक खोज या मालिकेतूनही खूप शिकता आल्याचं देसाई सांगतात. या मालिकेतून अवघ्या भारताचा, संस्कृतीचा, भाषेचा अभ्यास केला. त्यामुळे पुढे कुठलाही सेट उभारतांना त्याचा उपयोग झाला. देसाई य़ांनी अनेक सेट उभारले आहेत. प्रत्येक सेटमागे एक गोष्ट आहे. जोधा अकबर या चित्रपटासाठी आग्र्याच्या किल्ला उभारावा लागला होता. हा किल्ला त्यांनी अवघ्या तीन महिन्यात उभारला. प्रत्यक्षात हा किल्ला उभारणीसाठी तेहतीस वर्ष लागली होती.
कलाविश्वातील त्यांच्या या अनुभवातूनच कर्जतजवळ एनडी स्टुडीओची उभारणी करण्यात आली आहे. ऑलिव्हर स्टोन हे हॉलिवूड दिग्दर्शक अॅलेक्झांडर द ग्रेट हा चित्रपट करण्यासाठी भारतात आले. 650 कोटी बजेट असलेला हा चित्रपट योग्य सुविधा न मिळाल्यानं नंतर मोरोक्कोत शूट झाला. देसाई यांनी या चित्रपटासाठी काम केले आहे. हा चित्रपट करतांनाच त्यांना जाणवलं की आपल्या देशातही चित्रपट निर्मितीसाठी काही सुविधा होणे गरजेचे आहे. तिथूनच कर्जत येथील एनडी स्टुडीओची निर्मिती झाली. अनेक बॉलिवूडच्या चित्रपटांची निर्मिती येथून झाली आहे. या चित्रपटांचे सेट सर्वसामान्यांना पहाण्याची संधीही उपलब्ध झाली आहे. या एनडी स्टुडीओमध्ये काय बघता येत नाही…शिवाजी महाराजांचे सर्व किल्ले, 1890 पासूनची मुंबई, आग्रा किल्ला, जयपूर पॅलेस, अजिंठा गुहा असं काही तिथे पहायला मिळतं. नितीन देसाई यांनी हा प्रोजेक्ट जेव्हा हाती घेतला तेव्हा त्यांच्याकडे फार पैसे नव्हते. पण तरीही आपल्या जिद्दीतून त्यांनी या स्टुडीओचे काम पूर्ण केलेच. शिवाय या क्षेत्रात येण्यासाठी उत्सुक असलेल्या होतकरु तरुणांसाठी स्वतंत्र अभ्यासक्रमाची तयारीही केली. अशाप्रकारे होणारा हा पहिलाच प्रयत्न असल्याचे बोलले जाते. आतापर्यंत या स्टुडीओतून अनेक तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
नितीन देसाई हे नाव आज आयकॉन झाले आहे. पण हा माणूस पहिल्यासारखाच साधा आणि सच्चा आहे. आपल्या या सर्व यशाचं श्रेय ते आई वडीलांना देतात. कलाजगतात सर्वोच्च स्थानावर असलेल्या नितीन देसाई यांना कलाकृती मिडीयातर्फे अनेक शुभेच्छा.
सई बने.