‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
फ्लॉप झालेल्या ‘या’ चित्रपटाची हिट्सच्या यादीत नोंद
प्रत्येक पिक्चरची ‘सक्सेस स्टोरी’ वेगळी. तसाच ‘फ्लाॅपचा फंडा’ ही वेगळा. ‘मेरा नाम जोकर ‘ पडद्यावर आला तोच पडला…पडला अशी बोंबाबोंब झाली, तोच ‘जोकर’ क्लासिक चित्रपट म्हणून ओळखला जातोय. इतकेच नव्हे तर सत्तरच्या दशकात रिपीट रन, मॅटीनी शो, ऐंशीच्या दशकात व्हिडिओ, नव्वदच्या दशकात उपग्रह वाहिन्या अशा प्रवासानंतर तो आर. के. फिल्म बॅनरचा सर्वाधिक लोकप्रिय व यशस्वी चित्रपट म्हणून ओळखला जातो.(Hit Movie)
अनेक चित्रपट पडद्यावरुन उतरले की, त्यांचा “शो” संपतो. काही चित्रपटांचा मात्र विविध प्रकारे प्रवास सुरु राहतो. सुपरड्युपर हिट गीत संगीत व नृत्य, अनेक प्रकारचे किस्से, आठवणी, गोष्टी, कथा, दंतकथा, गाॅसिप्स यातून ते चित्रपट अनेक पिढ्या ओलांडूनही सुरुच असतात. ‘जोकर’च्या प्रदर्शनास (मुंबईत रिलीज १८ डिसेंबर १९७०) आज त्रेचाळीस वर्ष होत असतानाही तो अनेक गोष्टींसाठी “फोकस”मध्ये आहे. चित्रपट एक, दृष्टिकोन अनेक, त्याचा प्रवास मोठा असंच या फिल्मबद्दल झालं. म्हटलं तर फर्स्ट रनला फ्लाॅप. लाॅन्ग इनिंगला हिट.
गुरुदत्त दिग्दर्शित ‘कागज के फूल’, मोनी भट्टाचार्य दिग्दर्शित ‘मुझे जीने दो’, राज कपूर दिग्दर्शित ‘मेरा नाम जोकर’, यश चोप्रा दिग्दर्शित ‘लम्हे’ या चित्रपटांबाबत हीच ‘स्टोरी’ घडली. लाॅन्ग इनिंगमध्ये ते क्लासिक म्हणून ओळखले जातात. सर्वश्रेष्ठ कलाकृतीच्या बाबतीत असं घडू शकते.
राज कपूरच्या यशस्वी रुपेरी वाटचालीतील महत्वाकांक्षी आणि बहुचर्चित म्युझिकल प्रेमकथा असलेल्या ‘मेरा नाम जोकर’ च्या बाबतीत अगदी तसेच झाले. या चित्रपटाचे शूटिंग थीमनुसार सहा वर्षे सुरु होते. त्या काळाची ती एक खासियत होती.
आपली कलाकृती अधिकाधिक दर्जेदार व्हावी यासाठीचा तो ध्यास होता. पटकथा व संवाद लेखन, कलाकारांची योग्य निवड, एकेका गाण्यावरच्या अमर्याद वेळेच्या सिटींग्ज, परफेक्ट कला दिग्दर्शन अशा बहुस्तरीय प्रक्रियेतून चित्रपट घडत असतो. महान कलाकृती तर प्रत्येक बाबतीत सखोल विचार करत करत आकाराला येतात. त्यासाठी भरपूर वेळ द्यायलाच हवा. राज कपूरची दिग्दर्शनीय शैली आणि जीवन शैली यांचा ताळमेळही महत्वाचा घटक. अशा खोलवर तयारीने बनलेल्या कलाकृती म्हणूनच इतिहासजमा होत नाहीत. एक वेगळाच इतिहास घडवतात. त्यात वेळेचे गणित येत नाही. अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक आणि संकलक राज कपूरच्या आर. के. फिल्म या प्रतिष्ठित बॅनरखालील हा सर्वाधिक बहुचर्चित आणि बहुखर्चिक चित्रपट. (Hit Movie)
त्या काळात बजेटची चर्चा होत नसे. पिक्चर दिलसे बनती है अशी भावना होती. सुरुवातीला या चित्रपटाची लांबी ४ तास आणि ४३ मिनिटे ( दोन मध्यंतर) अशी इतकी होती. हा चित्रपट प्रदर्शित करताना तो ४ तास ९ मिनिटे ( दोन मध्यंतर ) अशा अवधीने पडद्यावर आला. मुंबईत मेन थिएटर नाॅव्हेल्टी असतानाच ड्रीमलॅन्डलाही तो रिलीज केला. हवाच अशी जोरदार होती. की त्याचे शो कमी पडावेत. नाॅव्हेल्टीत सकाळी दहा, दुपारी तीन आणि रात्रौ आठ वाजता असे दिवसा तीन खेळ असा चित्रपट प्रदर्शित झाला.
सिंगल स्क्रीन थिएटर्सच्या काळात अशी वेळ हेच विशेष होते हे चित्रपट रसिकांच्या मागील पिढीला आठवलं असेलच. सकाळी आठ वाजताचा फस्ट डे फर्स्ट शो सुटतोय तोच पिक्चर पडला पडला, बोअर है अशी जोरदार आवई उठली आणि मग आठवडाभरातच त्याची लांबी कमी करुन ती १७८ मिनिटे ( एक मध्यंतर) अशी करण्यात आली. तरीदेखील तीन तास. अर्थात वेळाही बदलल्या. मला आठवतय, पहिल्या आठवड्यात नाॅव्हेल्टीत या चित्रपटासाठी तिकीटांचे वाढीव दर अप्पर स्टाॅल सात रुपये व बाल्कनी आठ रुपये असे फारच होते. त्या काळात मध्यमवर्गीय कुटुंबात मासिक चारशे रुपये पगारही सुखाचा होता. ( जोकरच्या काळातील तरुण आज सत्तरीपार असतील त्यांना हा पगार आठवेल. ) आठवडाभरातच हेच तिकीट दर अप्पर स्टाॅल एक रुपया आणि बाल्कनी दोन रुपये असे झाले. हे सगळेच जोकरच्या वृत्तपत्रातील जाहिरातीत वाचायला मिळाले. (Hit Movie)
हा चित्रपट रसिकांना न आवडल्याने खरोखरच पडला की राज कपूरच्या व्यावसायिक शत्रूंनी तो पाडला याची आजही म्हणजे बावन्न त्रेपन्न वर्षांनंतरही चर्चा सुरु आहे. म्हणजेच, मुद्रित माध्यम ते डिजिटल युग, सकाळी घरी येणारे विश्वसनीय वृत्तपत्र ते सोशल मिडियातील बातमी खरी की खोटी असा प्रश्न पडावा असा ‘जोकर पडला की पाडला’ अशी चर्चा सुरुच आहे. त्यावर ‘फोकस ‘ टाकला जात आहे. विशेष म्हणजे, यू ट्यूबवर मूळ दोन मध्यंतरचा म्हणजेच ४ तास ९ मिनिटे लांबीचा चित्रपट चक्क उपलब्ध आहे. आणि अस्सल फिल्म दीवाने तो आवर्जून पहातात. चर्चेतील चित्रपट कोणत्याही काळात पाहिला जातोच. त्याची एक वेगळीच उत्सुकता असते. विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, आर. के. फिल्मच्या वतीने त्या काळातील नियमानुसार दहा वर्षांनी पुन्हा सेन्सॉर करण्यात आला असतानाच तो मूळ रुपातच सेन्सॉर करुन घेतला आहे. आपल्या चित्रपटावरचे निस्सीम प्रेम, अभिमान आणि विश्वास असावा तर तो असा. हेदेखील या चित्रपटाचे एक प्रकारचे यशच. नायकाच्या वयाच्या विविध टप्प्यांवर त्याच्या आयुष्यात आलेल्या तीन स्रिया हे याचे मध्यवर्ती सूत्र. सर्कस ही त्याची पाश्र्वभूमी. आणि त्यात प्रेक्षकांना मनापासून हसवणारा ‘जोकर ‘ व्यक्तिगत आयुष्यात मात्र प्रेमात अपयशी आहे.
या चित्रपटाचे लेखन के. ए. अब्बास यांचे आहे तर शैलेन्द्र, हसरत जयपुरी, नीरज, प्रेम धवन, शैली शैलेन्द्र आणि इंदिवर यांच्या गीताना शंकर जयकिशन यांचे संगीत आहे. जीना यहां मरना यहां इसके सीवा जाना कहां, कहता है जोकर सारा जमाना, जाने कहा गये वो दिन, ऐ भाई जरा देख के चलो, दाग न लग जाए ही गाणी आजही लोकप्रिय आहेत. या चित्रपटात राज कपूर, मनोजकुमार, सिम्मी, अचला सचदेव, ऋषि कपूर, धर्मेंद्र, दारा सिंग, पद्मिनी, केईना रबिआनकिना, राजेंद्रकुमार, ओम प्रकाश, आगा, राजेन्द्रनाथ, सुंदर, मुक्री, मारुती, पोल्सन, फजल खान इत्यादींच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे मुंबईतील मेन थिएटर नाॅव्हेल्टी होते. अतिशय दणदणीत पब्लिसिटीने हा चित्रपट प्रदर्शित झाला. इतक्या दणदणीत पब्लिसिटीने हा चित्रपट प्रदर्शित झाला की, या चित्रपटापासून मुंबईतील ‘बेस्ट ‘ बसला या चित्रपटाच्या पोस्टरने रंगवले होते. ती बसदेखिल बघण्यासारखी असे. आमच्या गिरगावातून दिवसातून चार पाच वेळा ती जायची आठवतयं.
============
हे देखील वाचा : राज कपूरचा हा चित्रपट फ्लॉप चित्रपट म्हणून ओळखला गेला…
============
कालांतराने रणधीर कपूरने काही मुलाखतीत याच चित्रपटावरुन त्याला प्रश्न करताच उत्तर दिले, आमच्या चित्रपट निर्मिती संस्थेचा सर्वाधिक यशस्वी ‘मेरा नाम जोकर ‘ आहे. म्हणजेच त्या चित्रपटाने रिपिट रन इत्यादीत रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळवला. तात्पर्य, फर्स्ट रनला चित्रपट अपयशी ठरला म्हणजे त्याचा शो संपला, खेळ अर्धवट राहिला असे होत नाही. तर चित्रपट दर्जेदार असेल तर तो त्यानंतरही यश प्राप्त करीत असतो.चित्रपटाच्या जगाची ही गोष्ट अगदीच वेगळी म्हणायची. (Hit Movie)
१९७० साली संपूर्ण वर्षभरात देव आनंदची भूमिका असलेला विजय आनंद दिग्दर्शित ‘जाॅनी मेरा नाम’ ( मुंबईत रिलीज २० नोव्हेंबर), दिलीपकुमारची भूमिका असलेला ए. भीमसिंग दिग्दर्शित ‘गोपी’ ( मुंबईत रिलीज २७ नोव्हेंबर) आणि राज कपूर अभिनित व दिग्दर्शित ‘मेरा नाम जोकर’ या तीन चित्रपटांची चित्रपटसृष्टी, मिडियात व चित्रपट रसिकांत कमालीची चर्चा व उत्सुकता. जुन्या पिढीतील अनेक जण एव्हाना याच फ्लॅशबॅकमध्ये नक्कीच असतील…