गाडीच्या टपावर पडणाऱ्या पावसाच्या थेंबाच्या आवाजातून सुचले हे गाणे!
द व्हाईट टायगर: एका गुलामाच्या अस्तित्वाची लढाई
“.. पर आजकाल सिर्फ़ दो तरह की जात हैं। पहली, जिनका पेट बड़ा है और दूसरी जिनकी भूख। जिनकी किस्मतमें दो चीजें हैं। या तो निगलो, या निवाला बनो। ..”
एका पुराणकथेनुसार मनुष्याच्या फक्त अडीच जाती आहेत- स्त्री, पुरुष आणि किन्नर. पण कालांतराने जसजसा मनुष्य समाजात स्थिरावू लागला तसतशी वर्णव्यवस्था त्याला वेगवेगळ्या जातींमध्ये विभागू लागली. त्याच्या दैनंदिन व्यवहारानुसार त्याला वर्ण ठरवून दिला गेला, तो कायमचाच. त्याच्या पुढील पिढ्यांनीही तो वर्ण जोखडासारखा आपल्या खांद्यावर वागवला. आपल्या कामानुसार वर्ण प्राप्त करणाऱ्यांच्या पुढच्या पिढ्या त्याच वर्णानुसार काम मिळवू लागल्या. स्वातंत्र्य आणि गुलामी ही या वर्णव्यवस्थेचीच देण. पुढे मालक आणि नोकर ह्या दोन जातींमध्ये समाज विभागला गेला. ज्यांची पोटं आधीच भरली होती त्यांना मिळाली मालकाची जात तर ज्यांची भूक शमत नव्हती त्यांना मिळाली नोकराची जात. बहुतांश भारतीय हे आपण करत असलेल्या कामाला नोकरी कमी आणि गुलामीच जास्त समजतात. किंबहुना, प्रत्येक नोकराच्या मनावर आधीपासूनच ‘तू गुलाम आहेस’ हे कायमस्वरूपी ठसवलं जाते.
यावर्षी नेटफ्लिक्सवर आलेला रमीन बहरानी दिग्दर्शित ‘द व्हाईट टायगर’ (The White Tiger) हा चित्रपट मालक आणि नोकर यांच्यातील संबंधांवर भाष्य करतो. सुप्रसिद्ध लेखक अरविंद अदीगा यांच्या ‘द व्हाईट टायगर’ या कादंबरीवर हा चित्रपट आधारित आहे. नोकरीच्या नावाखाली करावी लागणारी गुलामी, गावखेड्यात फोफावणारा जातीयवाद, भ्रष्ट राजकारण आणि गरीब-श्रीमंतांमधली वाढती दरी इत्यादी मुद्दे या चित्रपटातून अधोरेखित करण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केलेला आहे.
हे देखील वाचा: दीपिका पादुकोन: गुलाबाचा काट्यांसह प्रवास…
लक्ष्मणगढमध्ये राहणाऱ्या बलराम हलवाई (आदर्श गौरव- Adarsh Gourav) या तरुणाची ही कथा. मिठाई बनवणे हा बलरामचा जातीनिहाय धंदा असला तरीही खालच्या पोटजातीचा असल्याने त्याला व त्याच्या परिवाराला मोलमजुरी करून उदरनिर्वाह करावा लागतो. गावचा जमीनदार ‘सारस’ (महेश मांजरेकर-Mahesh Manjrekar) आणि त्याचा मोठा मुलगा मुकेश उर्फ ‘मुंगूस’ (विजय मौर्य) यांनी गावातल्या मजुरांच्या एक तृतीयांश कमाईवर आपला हक्क जमवलेला असतो. अभ्यासात हुशार असलेल्या बलरामला तो अत्यंत दुर्मिळ असा ‘व्हाईट टायगर’ असल्याची प्रचिती लवकरच येते पण हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडून त्यालाही बालवयातच मजुरी करावी लागते. पुढे वयात आल्यावर तो रीतसर ड्रायव्हिंग शिकतो आणि अशोक उर्फ ‘मेमना’ (राजकुमार राव) ह्या सारसच्या धाकट्या मुलाकडे ड्रायव्हर म्हणून काम करू लागतो. अशोक आणि त्याची बायको पिंकी (प्रियांका चोप्रा– Priyanka Chopra) सोबत बलराम जेव्हा दिल्ली ट्रीपवर जातो, तेव्हा तिथं घडणाऱ्या घटनांनी त्याच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळते. एक दुय्यम दर्जाचा ड्रायव्हर ते एक प्रथितयश व्यावसायिक हा बलरामचा थक्क आणि अंतर्मुख करणारा प्रवास ‘द व्हाईट टायगर’ या चित्रपटात दिसून येतो.
ह्या चित्रपटातील व्यक्तिरेखांना प्रतिकात्मक रुपात प्राण्यांच्या नावाने संबोधित केलेलं आहे. लक्ष्मणगढचे गावकरी श्रीमंत जमीनदाराला ‘सारस’ या पक्ष्याचं आणि पैशांसाठी हपापलेल्या त्याच्या मुकेशला मुंगसाचं रूप समजतात तर स्वतःवरील नियंत्रण हरवून बसलेल्या, काहीश्या गोंधळलेल्या अवस्थेत जगणाऱ्या अशोकला कोकरू समजतात. बलरामच्या नजरेतून, सर्वच नोकर हे खुराड्यातील बंदिस्त कोंबड्यांप्रमाणे असतात. आपल्या डोळ्यासमोर आपल्याच जातबंधूंची होणारी कत्तल हे कोंबडे मूकपणे बघत बसतात आणि आपल्या मानेवरूनही हा सुरा फिरवला जाणार हे माहीत असूनही सुटण्यासाठी धडपड करणं टाळतात. स्वतंत्रपणे जगण्याऐवजी गुलामीतील मरणात समाधान मानणाऱ्या नोकरवर्गाबद्दल बलरामच्या मनात तिरस्कार उत्तरोत्तर वाढतच जातो. व्यक्तित्व आणि स्वातंत्र्याचं प्रतिक समजला जाणारा दुर्मिळ पांढरा वाघ ह्या चित्रपटाचा खरा नायक आहे. बलरामला आपण व्हाईट टायगर व्हावं असं वाटतं आणि तो त्यानुसार पाऊल उचलून ह्या जंगलातून सुटकाही करून घेतो.
हे नक्की बघा: प्रियांका चोप्रा हिच्या प्रवासातील काही दुर्मिळ फोटोज या फोटो स्टोरीमधून
आदर्श गौरवने साकारलेला बलराम महेश मांजरेकर, राजकुमार राव, प्रियांका चोप्रा सारखी तगडी स्टारकास्ट असूनही स्वतंत्रपणे उठून दिसतो. फिल्मच्या फ्रेममध्ये नोकर म्हणून कोपऱ्यात उभा असणारा बलराम अभिनयाच्या बाबतीत मात्र संपूर्ण फ्रेम नकळत आपल्या नावावर करून घेतो. प्रियांका चोप्राचा अॅक्सेन्ट थोडा लाऊड वाटत असला तरीही तिच्या वाट्याला आलेल्या प्रसंगात ती भाव खाऊन जाते. कठपुतलीसारखा नियंत्रित अशोक साकारताना राजकुमार रावला विशेष कष्ट घ्यावे लागलेले दिसत नाहीत. त्याला त्याच्या भूमिकेत विशेष काही करायला वाव नसला तरीही त्याच्या सहज अभिनयाची एक छाप मनावर उरतेच. तसेच महेश मांजरेकर, विजय मौर्य, कमलेश गिल, सतीश कुमार, स्वरूप संपत, वेदांत सिन्हा, नैनिश नील इत्यादी कलाकारांनी त्यांच्या भूमिकांना योग्य न्याय दिलेला आहे.
हा चित्रपट का बघू नये यासाठी शोधूनही कारणं मिळत नाहीत. कथा, पटकथा, दिग्दर्शन, अभिनय, संगीत इत्यादी सर्वच पातळ्यांवर हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करतो. चित्रपटातील गाणी, तथागत गौतम बुद्धांशी संबंधित कथा खोलवर परिणाम करतात. कादंबरीत जे प्रसंग चार ते पाच पानांमध्ये रंगवले जातात, ते सर्व प्रसंग दोन तासांमध्ये पडद्यावर उतरवताना दिग्दर्शकाने कमालीची मेहनत घेतलेली दिसून येते. लक्ष्मणगढ आणि दिल्लीतील वस्त्यांच्या वास्तवदर्शी चित्रीकरणामुळे ह्या चित्रपटात अधिकच जिवंतपणा आलेला असून, कादंबरी व चित्रपटातील अंतर कमी करण्याचा हा प्रयत्न स्तुत्य म्हणावा लागेल. सेन्सॉर बोर्डची बंधने नसल्याने उत्तमोत्तम रॉ आणि उत्कृष्ट कंटेंट प्रेक्षकांपर्यंत आणण्यात नेटफ्लिक्स कायमच यशस्वी ठरलेलं आहे आणि ‘द व्हाईट टायगर’ हे याचंच सर्वोत्तम उदाहरण आहे.