ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
‘कयामत’ची ही एक महत्वाची आठवण
‘कांटो के खिंच के यह आंचल..’ असं म्हणेपर्यंत चित्रपट गीत संगीत व नृत्याच्या जबरा चाहत्यांच्या डोळ्यासमोर विजय आनंद दिग्दर्शित ‘गाईड’ मधील आपल्या उत्फूर्त नृत्याचा प्रत्यय देणारी रोझी अर्थात वहिदा रेहमान नक्कीच आली असेल. कलाकार व गाणे यांच्या अतिशय घट्ट नात्यातील हे एक सर्वोत्तम उदाहरण. वहिदाजींनी या गीत नृत्यात आपण घेतलेल्या शास्त्रीय संगीत व नृत्याच्या प्रशिक्षणाचा कसा झकास प्रत्यय दिलाय यालाही तुम्ही मनापासून दाद देत असालच. पण तुम्हाला मी सांगितले, स्मिता पाटीलनेही हेच गाणे रुपेरी पडद्यावर साकारलय, तर तुम्हाला त्याचा आश्चर्याचा धक्का बसला असेल अथवा आजच्या डिजिटल युगात काही गाण्यांबाबत जो ‘ओव्हरलॅप’चा खेळ करण्यात आलाय. (अनेकदा तरी तो चीड आणणारा असतो) तसं काही असेल. म्हणजे, चित्रीत झालेले मूळ गाणे बाजूला ठेवून त्यावर दुसरचं कोणते तरी गाणं फिट्ट करण्याची हास्यास्पद क्रियेटीव्हीटी वाढलीय. त्यातलाच हा प्रकार असेल असं समजत असाल.(Qayamat Memory)
पण तसं काहीही नाही. खरोखरच स्मिता पाटीलने शैलेंद्र यांनी लिहिलेले लता मंगेशकर यांनी गायलेले आणि सचिन देव बर्मन यांनी स्वरबद्ध केलेले कांटो के खीच के ऑचल गाणे रुपेरी पडद्यावर साकारलय. गुगलवर सर्च केल्यावर ते तुम्हाला पाह्यलाही मिळेल. जरा कुठे काही खट झालं की पटकन गुगलवर जाण्याच्या आजच्या ग्लोबल युगातील संस्कृतीनुसार मी हे सांगितलं. त्यात तुम्हाला हे गाणे पाह्यला मिळेलही ( अर्थात तेही मी येथे सांगितल्यावर तसा शोध घ्याल) पण ते गाणे कसे जन्माला आले ते सांगायला हवे ना? सलिम निर्मित व राज एन. सिप्पी दिग्दर्शित ‘कयामत ‘ (मुंबईत रिलीज ४ नोव्हेंबर १९८३. तब्बल चाळीस वर्ष झाली देखील.) या चित्रपटात हा योग आला आहे.
आमच्या प्रेस शोला ‘कयामत’चा थरार अनुभवत असतानाच एका पार्टीत शशी (स्मिता पाटील) ला गाणे गायचा आग्रह होतो. त्यावेळी एखादे नवीन गाणे सहज फिट्ट बसले असते. या चित्रपटाचे गीतकार मजरुह आणि संगीतकार राहुल देव बर्मन यांना ते सहज शक्य होते. दिग्दर्शक राज एन. सिप्पीने विचार केला, त्यापेक्षा आपण एखादे जुनेच गाणे वापरले अथवा दाखवले तर ? त्याच्या डोळ्यासमोर पटकन ‘यादों की बारात ‘ (१९७३) मधील चुरा लिया है तुमने जो दिल को हे आशा भोसले यांचे कायमच तारुण्यात असलेले गाणे आले. त्यासाठी त्याने ‘यादों की बारात’ चे निर्माता व दिग्दर्शक नासिर हुसेन यांच्याशी संपर्क साधला. नासिर हुसेन यांच्या चित्रपटात गीत, संगीत व नृत्य कायमच ‘हुकमाचे पत्ते’ त्यांचे जुने चित्रपट रिपीट रन अथवा मॅटीनी शोला प्रदर्शित होताना गाणी त्यांच्या चित्रपटांची मोठीच ओळख. ती ते कसे सोडतील? त्यांच्या नकारानंतर राज एन. सिप्पीने विजय आनंदशी संवाद साधला. आपल्या ‘गाईड’ चित्रपटातील गाण्याचा ‘योग्य वापर’ होणार असल्याने गोल्डी आनंदने होकार दिला आणि मग स्मिता पाटीललाही तेच गाणे पडद्यावर साकारण्याची संधी मिळाली. फरक इतकाच की, ‘गाईड ‘चे गाणे राजस्थानातील उदयपूर येथे चित्रीत झाले. विजय आनंदचा दिग्दर्शनीय टच त्यात दिसतो. ‘कयामत ‘मध्ये ते पार्टीत असल्याने ते एकाच स्पाॅटवर आहे.(Qayamat Memory)
‘कयामत ‘ची ही एक महत्वाची आठवण. ती खुद्द राज एन. सिप्पीकडून ‘सौगंध’ (१९९१) च्या सेटवर समजली. दिग्दर्शक राज एन.सिप्पी अनेक वर्ष गुलजार यांच्याकडे सहाय्यक दिग्दर्शक होता. स्वतंत्रपणे दिग्दर्शक म्हणून काम सुरु करताना त्याने गुलजार यांची संवेदनशीलता, आपल्या मातीतील विषय, फ्लॅशबॅक तंत्र यापैकी कशालाच प्राधान्य न देता इंग्लिश चित्रपटातील ‘थीम’ हिंदीत आणण्यावर जणू ‘फोकस ‘ ठेवला. आपला दिग्दर्शनीय पहिला चित्रपट ‘इन्कार’ ( १९७७) मध्ये आपला असा ‘फोकस ‘ स्पष्ट केला आणि मग ‘जोश’ (१९८१), ‘सत्ते पे सत्ता’ ( १९८२) मध्ये कायम ठेवला. जणू तशी सवयच लागली. हाॅलीवूडच्या ‘केप फिवर ‘ ( १९८२) या चित्रपटाच्या मध्यवर्ती कल्पनेवर त्याने ‘कयामत ‘ घडवला.
आपला पोलीस इन्स्पेक्टर मित्र एस. पी. कमल ( शत्रुघ्न सिन्हा) याने योग्य तपास न केल्यानेच एका खुनाच्या प्रकरणात आपल्याला तुरुंगवास भोगावा लागला असा मनात राग ठेवलेला राजेश्वर ( धर्मेंद्र) शिक्षा भोगून तुरुंगाबाहेर पडल्यावर कमलची बहिण सुधा ( पूनम धिल्लाॅन) हिला पध्दतशीरपणे सतत त्रास देतो..यातील नाट्य म्हणजे हा चित्रपट. एक रहस्यरंजकता. एकूण सादरीकरणावर इंग्लिश पिक्चरचा प्रभाव.
पिक्चरची सर्वात मोठी जमेची बाजू, अन्वर सिराज यांचे छायाचित्रण आणि वामन गुरु यांचे संकलन. तांत्रिक बाबतीत पिक्चर सरस. आपण सुरुवातीपासूनच त्यामुळेच गुंतत जातो. यू ट्यूबवर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता.(Qayamat Memory)
===========
हे देखील वाचा : गणेश टॉकीजची रचना जुन्या सिंगल स्क्रीन थिएटर्सप्रमाणे…
===========
धर्मेंद्रची निगेटीव्ह शेडची भूमिका उल्लेखनीय. शत्रुघ्न सिन्हा, जयाप्रदा, स्मिता पाटील, पूनम धिल्लाॅन, शक्ती कपूर, इफ्तेखार, अरुण बक्षी, प्रेमा नारायण, सुधीर दळवी, भरत कपूर, पिंचू कपूर, जयश्री टी., मधु मल्होत्रा, नरेंद्रनाथ, राम मोहन इत्यादींच्याही भूमिका. या चित्रपटाचे लेखन कादर खानचे तर पटकथा मोहन कौल आणि रवि कपूर यांचे. या चित्रपटाची तेलगू भाषेत ‘निप्पुल्लती ‘ या नावाने रिमेक करण्यात आली. राज एन. सिप्पीची दिग्दर्शक म्हणून कारकिर्द पुढे सुरु असतानाच १९८४ या एकाच वर्षात त्याचे ‘बाॅक्सर ‘, ‘अंदर बाहर ‘ व ” बाझी” असे तीन चित्रपट आले नि पाहिलेही. पुढच्याच वर्षी म्हणजे १९८५ साली ‘शिवा का इन्साफ ‘ ( हा तर थ्री डी) असे एकामागोमाग चित्रपट आले. त्या काळात शूटिंग रिपोर्टींगसाठी स्टुडिओ भटकंतीत राज एन. सिप्पीच्या चित्रपटाचे शूटिंग हमखास दिसत असे…याच दिग्दर्शनीय सातत्यात त्याने विनोद खन्नाने पुनरागमन केल्यावर त्याला ‘सत्यमेव जयते’ ( १९८७) चा नायक केले. मला त्याचा आवडलेला चित्रपट ‘थानेदार ‘ (१९९०) आहे. तोतया पोलीस गावकऱ्यांचा प्रिय बनतो या काॅन्स्पेक्टवर त्याने भरपूर रंगत आणली. चित्रपटात जितेंद्र, जयाप्रदा, संजय दत्त, माधुरी दीक्षित यांच्या प्रमुख भूमिका आहेत. एव्हाना राज एन. सिप्पीला आपल्या दिग्दर्शनावरील इंग्लिश चित्रपटाचा प्रभाव कमी करण्यात यश मिळाले होते तर…