ब्रिजेर्टन: नव्वदीच्या दशकातील हॉलीवूड प्रेमपटांची गोळाबेरीज
१८ व्या शतकातील लंडन शहर या उल्लेखानिशी दिमाखदार राजवाडे, सरदारमंडळी, भव्य कपडे आणि दागिने, श्रीमंतीच्या व्याख्या सांगणाऱ्या पार्ट्या आणि गरिबीमध्ये खंगून गेलेला शेतकरीवर्ग हे चित्र डोळ्यासमोर उभं राहत. इतिहासकार, राजकीय लेखकांची या काळाबद्दल कितीही वादांकित मतं असली, तरी जेन अस्तेनसारख्या अनेक लेखिकांना या काळाने मनमोहक प्रेमकथा लिहायला भाग पाडलं. या काळातील सामाजिक प्रश्नांना हाताशी धरून या लेखकांनी या प्रेमकथांमधून एक आशावाद शोधायचा प्रयत्न केला. असाच एक प्रयत्न लेखिका जुलिया क़्विनने तिच्या ‘ब्रिजेर्टन’ या कथासमुहातून केला आहे. त्यावर आधारित ‘ब्रिजेर्टन’ ही सिरीज नेटफ्लिक्सवर नुकतीच प्रकाशित झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून या सिरीजबद्दल समाजमाध्यमांवर भरभरून बोललं जात आहे. अगदी तासाभराचा एक भाग असे एकूण आठ भाग असलेली ही सिरीज दोन दिवसांमध्ये सहज पाहून पूर्ण होते. त्यामुळे प्रेक्षक म्हणून तुम्हाला जास्त अधिक वेळ गुंतविण्याची काहीही गरज पडत नाही.
ही कथा आहे लंडनमधील ब्रिजेर्टन कुटुंबाची. एक विधवा आई आणि तिची आठ मुले असं हे कुटुंब एकमेकांमध्ये गुंतलेलं असतं. ‘व्यक्ती तितक्या प्रवृत्ती’ या म्हणीला अनुसरून या प्रत्येकामध्ये वाद आहेत पण त्यांच्यामध्ये नात्यातील ओलावा पुरेपूर भरलेला आहे. गोष्टीची सुरवात होते ती या घरातील थोरली मुलगी डेफनीच्या आयुष्यातील एका नव्या टप्प्यापासून. ती आता लग्नाच्या वयाची झाली आहे, सहाजिकपणे तिच्यासाठी योग्य नवरा शोधण्याची घाई तिच्या आईला झालेली आहे. डेफनीलासुद्धा लग्न, नवरा, मुलं असं स्वतःचं कुटुंब हवं असतं. त्यामुळे तीही या सगळ्या प्रक्रीयेमध्ये उत्सुकतेने भाग घेते. उपवर मुलामुलींना भेटता यावं यासाठी लंडनमध्ये वर्षातून एकदा भव्य पार्टीजचं आयोजन केलं जात असे. या पार्टीजमध्ये मुलेमुली एकमेकांना भेटत असतं, त्यांच्या आईवडिलांच्या ओळखी होतं. काही जोड्या जुळल्या जात तर काहींना पुढच्या वर्षीच्या सीजनची वाट पहावी लागत असे. डेफनीला मात्र तिच्या पहिल्या सीझनमध्येचं योग्य नवरा मिळावा अशी तिच्या आईची इच्छा असते.
डेफनी दिसायला सुंदर, सुडौल आणि आकर्षक असते. त्यात इंग्लंडची राणी शार्लेटने यंदाच्या सिझनची सर्वोत्तम उपवर मुलगी म्हणून पसंत केलेलं असत. सहाजिकच पहिल्या पार्टीपासूनच तिच्यासाठी अनेक स्थळ येतात. डेफनी आणि तिची आईचा आनंद अर्थातच गगनात मावत नाही. पण दुधामध्ये मिठाचा खडा म्हणून डेफनीचा थोरला भाऊ अँथनी येतो. आपल्या बहिणीसाठी उत्तम नवरा शोधण्याच्या हट्टापोटी तो आलेली प्रत्येक स्थळ नाकारत असतो. दरम्यान डेफनीची ओळख ड्युक सिमॉन बासेटशी होते. सिमॉनला लग्न करायचं नसतं, पण कुटुंबाच्या हट्टापोटी त्याला या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायला लागतं. डेफनी आणि त्याच्या पहिल्या भेटीमध्येचं ते एकमेकांना नापसंत करतात. पण हा कडूपणा बाजूला ठेवून आपल्याबद्दल खोडकर अफवा पसरविल्या तर इतर उपवर मुले कुतुहलापोटी डेफनीकडे आकर्षित होतील आणि मुलींच्या आयांपासून सिमॉनला पिच्छा सोडवता येईल, अशी कल्पना त्यांना सुचते. ही कल्पना, त्यांचे नकटे रुसवेफुगवे याचा पुढे काय शेवट होणार हे चाणाक्ष प्रेक्षकाला वेगळं सांगायची गरज नाही. पण तरीही ही सिरीज वेगवेगळ्या कारणांसाठी थोड्या वेळासाठी का होई ना प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यात यशस्वी होते.
हे हि वाचा : क्वीन्स गँबिट: बुद्धिबळाचा नेटफ्लिक्सवर रंगलेला डाव
यातील प्रमुख कारण म्हणजे सिरीजच देखणेपण. मोठाल्ले राजवाडे, दिमाखदार पार्ट्या, देखणी स्टारकास्ट, आकर्षक कपडे, दागिने यामुळे सिरीज पहिल्या क्षणापासूनच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेते. सोबतीला घरगुती भांडणे, गॉसिप, प्रेमकथा अशी मस्त फोडणी कथानकाला आहे. इथे प्रजा आहे, नोकरमंडळी आहे, राजा आहे पण कोणीही दुःखी नाही ना कोणीही तक्रार करत नाही. सगळच आलबेल सुरु आहे. त्यामुळे १८ व्या शतकातील युरोप रेखाटना त्यातील समाजिक, राजकीय वाद, भेदभाव हे मात्र सादरकर्त्यांनी बाजूला ठेवले आहेत. याचा उपयोग सिरीजमध्ये रोमँटीसिझम भरण्यामध्ये झाला आहे.
या सिरीजची उल्लेखनीय बाब म्हणजे यामध्ये विविध वंशातील कलाकारांना समाविष्ट केलेलं आहे. १८व्या शतकातील युरोपमध्ये कृष्णवर्णीयांना शुद्र लेखलं जायचं. यांना मजूर, नोकर म्हणून कामाला जुंपल जायचं. वेठबिगारी तर या काळातील मोठं प्रश्न होता. पण या सिरीजमध्ये इंग्लंडची राणी शार्लेट कृष्णवर्णीय दाखवली आहे. तसचं नायकाच्या भूमिकेतील सिमॉनसुद्धा कृष्णवर्णीय कलाकाराने साकारलेला आहे. याशिवाय कथानकामध्ये अनेक कृष्णवर्णीय पात्रं येतात. पण इथे कुठेही वंशभेदावर भाष्य करण्याचा प्रयत्न केलेला नाही. उलट या वंशभेदाला बाजूला ठेवल्यास इतिहासच चित्र कसं असत याचं सुरेख चित्रण केलेलं आहे. प्रेक्षक म्हणून आपल्याला ही बाब पदोपदी जाणवते आणि सुखावते सुद्धा.
अर्थात तुम्ही जुलिया क़्विनच्या या कादंबऱ्या वाचल्या असतील किंवा नव्वदीच्या हॉलीवूड प्रेमपटांचे निस्सीम चाहते असाल, तर कथानक कोणत्या दिशेला जात आहे, याची चाहूल तुम्हाला पहिल्या भागापासून लागू शकते. पण तरीही नव्या वर्षाची सुरवात प्रेमकथेने करायची असेल, तर या सिरीजला एक संधी देऊन बघा.