ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
वेल डन उमेश…
एखादी कलाकृती निर्माण होते. त्याची वाहवा होते. मात्र, ती तुमच्या मनावर परिणाम साधणारी नसेल तर तो क्षणभंगूर मामला ठरतो. ‘चांगली’ आणि चांगल्यासोबतच ‘प्रभावी’ असे कलाकृतीचे दोन प्रकार असतात. उमेश कुलकर्णीची (Umesh Kulkarni) ‘मर्डर इन अ कोर्टरूम’ ही डॉक्युसीरिज दुसऱ्या प्रकारात मोडणारी आहे. मनात घर करून राहते, तीच खरी कलाकृती. इथं ते साध्य होतं. ही डॉक्युसीरिज पाहिल्यावर त्याचा प्रभाव आपल्यावर राहतो.
सतत नावीन्य स्वीकारणाऱ्या उमेशनं नेटफ्लिक्सच्या ‘इंडियन प्रेडेटर’ सेगमेंटसाठी नागपुरातील बहुचर्चित अक्कू यादव हत्याकांडाचा विषय निवडला. नागपुरातल्या कस्तुरबानगरातील महिलांवर अत्याचार करणारा कुख्यात गुंड अक्कूचा भर कोर्टात खात्मा केला जातो, देशच नव्हे तर विदेशातही हा मुद्दा गाजतो, दहा वर्षांनंतर या घटनेचा निकाल लागतो.खरंतर हा विषय कमालीचा संवेदनशील. मात्र, उमेशनं हा विषय निवडला, त्याला डॉक्युसीरिजमधून मूर्तरूपही दिलं. याला मोठी हिंमत लागते.
अशी झाली तयारी…
नेटफ्लिक्सच्या ‘इंडियन प्रेडेटर’ सेगमेंटसाठी अक्कूचा विषय घेण्याचं निश्चित झाल्यानंतर संशोधन गरजेचं होतं. त्यासाठी उमेश(Umesh Kulkarni) अन् त्याची टीम नागपुरात आली. पूर्ण प्रकरण समजून घेणं, संबंधित लोकांशी भेटणं, त्यांना बोलतं करणं, घटनेशी संबंधित सगळी कागदपत्रं तपासणं, या सर्वांचं डॉक्युमेंटेशन या सर्व प्रक्रियेत दीड-दोन वर्षं गेली. संपूर्ण तयारी झाल्यानंतरच नागपुरात शूट करायचं ठरलं. या घटनेशी संबंधित तसेच अत्याचारपीडित महिलांना कॅमेऱ्यासमोर बोलतं करायचं होतं. हे एक मोठं आव्हान होतं. उमेश सांगतो, ‘वस्तीत फिरून आधी त्या लोकांशी ओळख केली. नंतर त्यांना विश्वासात घेतलं. त्यांचा सहजासहजी विश्वास बसणं शक्यच नव्हतं. कारण, आज अखेर त्यांनी बरंच काही भोगलेलं आहे. त्यामुळे आमच्याकडेही संशयाच्या नजरेतून त्यांचं पाहणं साहजिक होतं. आमच्याकडून हे काही भलतंसलतं वदवून तर घेणार नाहीत ना, अशीही शंका त्यांच्या मनात होती. मात्र, त्यांचा विश्वास जिंकण्यात आम्ही यशस्वी ठरलो. तक्षशीला वाघधरे यांनी ते लोक आणि आमच्यातील दुवा सांधण्यात बरीच मदत केली. तरीही पीडित महिला सहजासहजी कॅमेऱ्यासमोर यायला तयार नव्हत्या. त्यांनी चार-पाच महिन्यांचा कालावधी मागितला, आम्ही तो दिला. त्यांच्यात हिंमत आणि विश्वास निर्माण झाल्यानंतर प्रत्यक्ष शूटला सुरुवात झाली.’
मुलाखती-रिक्रिएशनचा उत्तम संयोग
कस्तुरबानगरातील काही महिला, काही नागरिक कॅमेऱ्यासमोर बोलण्यासाठी तयार झाले. त्यांच्यासाठी वेगळा सेट तयार करण्यात आला होता. कारण, प्रत्यक्ष कस्तुरबानगरता अडचण जाणार होती. सोबत त्या घटनांचं नाट्यरूपांतर (रिक्रिएशन) करायचं होतं. त्यासाठी नागपूरला लागून असलेल्या शिवणगावची निवड करण्यात आली. १६ दिवस मुलाखती आणि १६ दिवस रिक्रिएशन असं ३२ दिवस शूट चाललं. सुप्रसिद्ध नाटककार महेश एलकुंचवार, नेते प्रफुल्ल गुडधे पाटील यांच्यासह अनेकांची बरीच मदत झाली. त्यामुळेच नागपूरच्या मध्यवर्ती कारागृह परिसरातही शूट करता आलं, असं उमेशनं (Umesh Kulkarni)सांगितलं. यादरम्यान बऱ्याच अडचणीही आल्यात. आधी जे कॅमेऱ्यासमोर बोलण्यास तयार होते, त्यांनी ऐनवेळी नकार दिला. कुणी आधी भलतंच बोललं, नंतर कॅमेऱ्यासमोर वेगळंच काही बोललं गेलं. मोठ्या कष्टातून अखेर ही डॉक्युसीरिज तयार झाली. मुलाखती आणि रिक्रिएशनचा उत्तम संयोग यात आहे. ट्रीटमेंट उत्तम आहे. म्हणूनच प्रत्येक फ्रेम आपल्या मनाचा ताबा घेते. प्रत्येक सीन मनात खोलपर्यंत पोहोचतो, आपल्याला अंतर्मुख करतो.
=======
हे देखील वाचा : आवर्जून बघाव्यात अशा मराठीमधील टॉप ५ वेबसिरीज
=======
‘क्या घटी, क्या देखी’
अक्कू यादव हत्याकांडात मते-मतांतरे आहेत. त्यामुळे समतोल साधणं आवश्यक होतं. अशावेळी दोन्ही बाजूंची मते असणाऱ्या मुलाखती घेण्यात आल्या. डॉक्युसीरिजच्या सुरुवातीलाच ‘क्या घटी, क्या देखी, क्या घटी, क्या सुनी, क्या कही, सब गलत, सब सही’ हे रॅप साँग आहे. शीतल साठे, सचिन माळी, विपिन तातड, एमसी मवाली यांनी एकत्र येऊन ते लिहिलं आहे. मंगेश धाकडे यांचं संगीत आहे. या रॅप साँगमधूनच बरंच काही सांगण्याचा प्रयत्न झालाय. यादव कुटुंबीयांचं मत जाणून घेण्याचाही टीमनं प्रयत्न केला. मात्र, त्यांनी साफ नकार दिला. अक्कूच्या आईला भेटण्याचा प्रयत्नही झाला. मात्र, तेथपर्यंत उमेश व टीम पोहोचू शकली नाही. फक्त अक्कूच्या भावालाच भेटता आलं. शेवटी, अक्कूची बाजू म्हणून त्याच्या मित्रांच्या मुलाखती यात घेण्यात आल्या.
सर्वकाही सरस
अतिशय संतुलित या डॉक्युसीरिजमध्ये सर्वकाही सरस आहे. उत्तम सिनेमॅटोग्राफी, उत्तम एडिटिंग आहे. मुलाखती वेगवेगळ्या घेण्यात आल्यात. मात्र, एखाद्याचं वाक्य पकडून लगेच त्याचं ‘क्लबिंग’ दुसऱ्या फ्रेममध्ये आणणं, यातच उमेशचं (Umesh Kulkarni)कौशल्य आणखी अधोरेखित होतं. दिग्दर्शनातील प्रत्येक बाबी अतिशह बारकाईनं हाताळण्यात आल्याचं दिसतं. एरवी चित्रपट, मालिका वा सीरिजमध्ये दिग्दर्शक ज्यांच्याकडून काम करवून घेतो, ते अभिनेते असतात. इथं मात्र सामान्य नागरिक, पीडितांना त्याच भावनांतून बोलतं करणं, यात मोठं कसब लागतं. ते इथं दिसतं. म्हणूनच ही कलाकृती फक्त उत्तम नाही तर परिणाम साधणारी ठरते.
अभिषेक खुळे