Vicky Kaushal-Katrina Kaif यांनी अखेर आपल्या लेकाचं नाव केलं रिव्हील,

रुक जाना नही तू कभी हार के : Vinod Khanna वर चित्रित किशोर कुमारची गाणी!
सत्तरच्या दशकातील हिंदी सिनेमातील डॅशिंग, हँडसम अभिनेता विनोद खन्ना खरंतर ॲक्शन मुव्हीसाठी जास्त लोकप्रिय होता. त्यांच्या वाट्याला रोमँटिक सिनेमे तसे कमीच आले पण तरीही विनोद खन्ना आपल्या सगळ्याच भूमिकांमधून रसिकांवर छाप पाडून गेला. एकेकाळी अमिताभ बच्चन यांच्या सुपरस्टार पदाला आव्हान देणार हा कलाकार अचानकपणे रजनीश यांच्या आश्रमात निघून गेल्यामुळे त्याच्या कारकीर्दीला थोडासा ब्रेक लागला पण विनोद खन्ना आजही रसिकांचा आवडता अभिनेता आहे. २०१६ साली त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
ॲक्शन मुव्हीज मध्ये जास्त रमल्याने विनोद खन्ना वर चित्रित गाणी पटकन आठवत नाहीत.पण काही खास गाणी आठवावीच लागतात. आज विनोद खन्ना आणि किशोर कुमार या कॉम्बिनेशन ची काही गाणी बघूयात. खरं तर किशोर कुमार यांचं नाव विनोद खन्ना सोबत कधीच जोडले गेले नाही. राजेश खन्ना-किशोर कुमार, अमिताभ बच्चन- किशोर कुमार किंवा देव आनंद – किशोर कुमार हे जसे कॉम्बिनेशन आहेत तसे विनोद खन्ना आणि किशोर कुमार नाही. पण तरीही विनोद खन्ना करीता 23 चित्रपटातून किशोर कुमार यांनी 44 गाणी गायली होती. यातील काही लोकप्रिय गाण्याचा आढावा आज आपण घेणार आहोत.
१९६७ साली ‘मन का मीत’ या चित्रपटातून हिंदी सिनेमात पदार्पण केलेले विनोद खन्नाने सुरुवातीची काही वर्ष खलनायकाच्या भूमिका केल्या. गुलजार यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पाउल ठेवलेल्या पहिल्याच चित्रपटात किशोर कुमारने विनोद खन्नाला प्लेबॅक दिला होता. विनोद खन्ना साठी हे पहिले किशोर कुमार चे गाणे सलील चौधरी यांनी संगीतबद्ध केलं होतं. गाणं होतं ‘कोई होता जिसको अपना कहले ते यारा…’ अतिशय सॉफ्ट आवाजात किशोर कुमार यांनी हे गाणं गायलं होतं. याच चित्रपटात ‘हालचाल ठीक ठाक है सब कुछ ठीकठाक है..’ या गाण्यात देखील विनोद करता किशोर चा स्वर होता.

याच वर्षी ‘हम तुम और वो’ हा एक चित्रपट आला होता. कल्याणजी आनंदजी यांचे संगीत असलेल्या चित्रपटात विनोद खन्ना साठी किशोर कुमारने दोन गाणी गायली होती. यातील एक गाणं आज देखील लोकप्रिय आहे. अति शुद्ध हिंदीत लिहिलेलं हे गाणं होतं ‘प्रिये प्राणेश्वरी हृदयेश्वरी यदि आप हमे आदेश करे तो प्रेम का हम श्री गणेश करे….’ या गाण्यातील विनोद खन्नाचा अटायर आणि अदाकारी भारी होती. हेमा मालिनी सारख्या दिसणाऱ्या यातील अभिनेत्रीचे नाव भारती होते. यातील दुसरं गाणं होतं ‘दो बातो की मुझको है तमन्ना….’ दोन्ही गाणी त्या काळात चांगली लोकप्रिय झाली.
================================
हे देखील वाचा : Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे
================================
१९७३ साली आलेल्या ‘धमकी’ या चित्रपटाला गणेश यांचे संगीत होतं..(हा गुणी संगीतकार एल पी जोडीतील प्यारेलाल यांचा धाकटा भाऊ होता.). यातील एक गाणं ‘ चांद क्या है रूप का दर्पण…’ हे आशा भोसले सोबत त्या काळात खूप गाजलं होतं. १९७४ साली असमचे संगीतकार भूपेन हजारिका यांनी पहिल्यांदा हिंदी सिनेमाला संगीत दिले होते. चित्रपट होता गुरुदत्त फिल्मचा ‘आरोप’. यातील लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या स्वरातील ‘नैनो मे दर्पण हे दर्पण मे कोई देखु जिसे सुबहो शाम..’ हे गाणं आज देखील म्हणून लोकप्रिय आहे. विनोद खन्ना आणि सायराबानू यांच्यावर हे गाणं चित्रित होतं.
याच वर्षी विनोद खन्नाला खऱ्या अर्थाने ओळख करून देणारा ‘इम्तिहान’ हा चित्रपट रिलीज झाला. यातील एक गाणे जे आज देखील इन्स्पिरेशनल सॉंग म्हणून खूप लोकप्रिय आहे किशोरने गायलं होतं. गाण्याचे बोल होते ‘रुक जाना नही तू कही हार के कांटो पे चलके राही मिलेंगे साये बहार के ओ राही ओ राही…’ राज सिप्पी दिग्दर्शित ‘इन्कार’ या १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ॲक्शन मुव्ही मध्ये ‘छोडो ये निगाहो का इशारा..’ गाणं होतं. यात विनोद खन्ना सोबत विद्या सिन्हा होती. या गाण्यात विनोद खन्ना प्रचंड हँडसम दिसला होता. महेश भट दिग्दर्शित १९७९ च्या ‘लहू के दो रंग’ या चित्रपटात विनोद खन्नावर किशोर कुमारची तीन गाणी चित्रित होती. त्यापैकी दोन गाणी प्रचंड गाजली.

‘मुस्कुराता हुआ गुल खिलाता हुआ मेरा प्यार’ आणि दुसरं गाणं होतं ‘चाहिये थोडा प्यार थोडा प्यार चाहिये…’ १९८० सालच्या ब्लॉकबस्टर मुव्ही ‘कुर्बानी’ मधील टायटल सॉंग मध्ये किशोर चा स्वर विनोद खन्ना साठी होता. चेतन आनंद दिग्दर्शित ‘कुदरत’ या १९८१ साली प्रदर्शित झालेले चित्रपटात ‘छोडो सनम काहे का गम…’ हे जबरदस्त रोमँटिक गाणे किशोर कुमारने विनोद खन्ना साठी गायले होते. १९८२ सालच्या ‘दौलत’ या चित्रपटात ‘मोती हो तो बांध के रख लू…’ हे अतिशय सॉफ्ट आवाजात गायलेलं किशोरचं गाणं होतं. यातच तेरी हर अदा है हंसी..’ हे देखील खूप गाजले होते.
================================
================================
यानंतर अभिनेता विनोद खन्ना रजनीश यांच्या आश्रमात निघून गेला आणि त्याच्या रुपेरी कारकीर्दीला मोठा ब्रेक लागला. १९८७ पुन्हा जेव्हा तो भारतात परत आला आणि चित्रपटात काम करून लागला तेव्हा किशोर कुमार यांचे निधन झाले होते. १९९० सालच्या ‘सीआयडी’ या चित्रपटात किशोर कुमार यांनी गायलेले एक गाणे विनोद खन्नावर चित्रित होते!