‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
चित्रपट, सफर विश्वाची!
मी इयत्ता चौथीत होतो, तेव्हाची गोष्ट. भूगोलाचा व्यवसाय पूर्ण करायचा होता. टीव्हीवर ‘एक दूजे के लिए’ लागला होता. आईचा अतिशय आवडता चित्रपट. आई म्हणाली, “मी करते दे व्यवसाय पूर्ण. तू हा पिक्चर बघ. खूप मस्त आहे.” मी पडत्या फळाची आज्ञा मानून तो पाहिला. नंतर पुन्हा कधी पाहण्याचा योग आला नाही. त्यावेळी चित्रपटांतलं काही कळत नव्हतं. त्यामुळे ‘मेरे जीवनसाथी’ या गाण्यात कमल हसन आणि रती अग्निहोत्री नाचतात, पुढे लग्न करतात आणि शेवटी मरतात, गिधाडं त्यांना येऊन खातात, एवढंच लक्षात राहिलं होतं. मधला सगळा चित्रपट झोपेने खाऊन टाकला होता. जो पाहिला, त्याचा अर्थबोध झाला नव्हता. नंतर एकदा मामाने थिएटरला नेऊन ‘ज्युरासिक पार्क’ दाखवल्याचं आठवतं. मग एकदा आई, मावशी आणि बहिणीसोबत ‘हम आपके हैं कौन’. नंतर एकदा कॉलेजच्या मित्रांसोबत ‘ब्लफमास्टर’. एकदा बहिणीसोबत आणि मावशीसोबत थिएटरमध्ये ‘जाने तू… या जाने ना…’ पाहिला होता. हे सगळे चित्रपट म्हणजे चित्रपटांबद्दल काहीतरी खरडायला लागण्याआधी पाहिलेले चित्रपट.
हे नक्की वाचा: बॉलिवूडची मुळं मुंबईतच का खोलवर पसरली आहेत? बॉलिवूड म्हटलं की मुंबईच का आठवते ?
चित्रपट रसास्वादाच्या दृष्टीने पाहायला फार उशिरा सुरुवात झाली. चित्रपट पाहावेत, समजून घ्यावेत, असं वाटू लागलं, ते काही ठराविक कारणांमुळे. वर्तमानपत्रांत येणारी चित्रपटांची, नाटकांची परीक्षणं वाचायचो. किंबहुना तेवढंच वाचायचो वर्तमानपत्रांतलं. किती कळत होतं, माहीत नाही. पण कुठेतरी आत ते रुजत होतं, एवढं नक्की. दूरदर्शनवर ‘यादें’ नावाचा एक कार्यक्रम असायचा पूर्वी. त्यात प्रत्येक एपिसोड एका अभिनेत्याच्या, अभिनेत्रीच्या, दिग्दर्शकाच्या कारकिर्दीवर आधारित असे. या अतिशय माहितीपूर्ण कार्यक्रमाने चित्रपटांबद्दलच्या जिज्ञासेला खतपाणी घालण्याचं काम केलं. इतकं की, परीक्षेच्या काळातही हा कार्यक्रम चुकवावासा वाटत नसे. त्यामुळे एकदोनदा आईकडून बोलणीही खावी लागली आहेत. पण खर्या अर्थाने चित्रपट पाहायला सुरुवात झाली ती नोकरीच्या निमित्ताने पुण्यात असताना.
कदाचित त्याच वेळी कुटुंबियांपेक्षा, मित्रांपेक्षा वेगळा रस्ता मनाने धरला आणि चित्रपट म्हणजे फक्त दोन घटका करमणूक, ही समजूत मागे पडली. २००९-१० साली प्रभात, राहुल ७० एमएम, आयनॉक्स वगैरे ठिकाणी अतिशय परवडणार्या तिकीट दरांत शनिवार किंवा रविवारी, कधी दोन्ही दिवशी, कधी एकाच दिवशी दोन सलग चित्रपट पाहणं ही पर्वणीच होती. ‘जोगवा’ प्रभातला २० रुपयांत पाहिल्याचं अजूनही आठवतं. चिंचवडला ‘थ्री इडियट्स’ पाहून झाल्यावर लगेच ‘नटरंग’ पाहिला होता. प्रभातला ‘बालगंधर्व’ पाहून झाल्यावर लगोलग ‘पांढर’ पाहिला होता. नाईट शिफ्ट आटोपून धावतपळत प्रभातला सचिन कुंडलकरचा ‘गंध’ पाहण्यासाठी गेलो होतो. पुण्यात नेमकी त्यावेळी स्वाईन फ्लूची साथ आली होती आणि मी गेलो, त्याच दिवशी खेळ बंद पडले. त्यावेळी झालेलं दु:ख नंतर ‘गंध’ची असंख्य पारायणं करूनही भरून निघालं नाही. सुरुवातीला एकट्याने चित्रपट पाहायला जात असे. नंतर विशिष्ट तारखा त्या दिवशी एका विशिष्ट व्यक्तीसोबत पाहिलेल्या चित्रपटांशी जोडू लागलो. एका मैत्रिणीसोबत नवा ‘अग्नीपथ’ पाहायला विजय टॉकीजला गेलो होतो, तो अनुभव तर अविस्मरणीयच. ‘चिकनी चमेली’च्या वेळी पब्लिकने शिट्ट्यांनी थिएटर दणाणून सोडलं होतं. इतर दृश्यांच्या वेळीही टवाळ कॉमेंट्री चालू होतीच. चित्रपटापेक्षा टॉकीजचा माहोल जास्त धमाकेदार होता.
एकीकडे पुण्यातली चित्रपटगृहं सुखावत होती, दुसरीकडे रूममेट इंग्रजी आणि इतर भाषांतल्या चित्रपटांची ओळख करून देत होता. त्याला भयपटांची आवड होती. ते तो बळजबरीने मलाही पाहायला लावायचा. त्याचा फायदाच झाला खरं सांगायचं तर. ‘लेट द राईट वन इन’सारख्या चित्रपटांतून भीतीही पडद्यावर सुंदररीत्या साकारता येते, हे दिसलं. मुंबईत आल्यावरही वीकेण्डचा शिरस्ता तोच राहिला. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरही चित्रपट पाहणं सुरु झालं. हे काही बाबतींत सुखावणारंही होतं. चित्रपट थिएटरमध्ये पाहायला गेल्यावर इतर प्रेक्षकांचा गोंधळ मला असह्य होतो. ती समस्या या माध्यमांनी सोडवली. मात्र, थिएटरच्या भव्य पडद्याचा आनंद फोनच्या किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनवर कसा मिळवणार? तो भलामोठा पडदा आपलं विश्व त्या काही तासांपुरतं व्यापून टाकत असतो. ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर त्या अनुभवाला मुकावं लागतं. मात्र काही कारणामुळे पाहायचा राहून गेलेला चित्रपट आपल्याला हवा तेव्हा पाहता येतो, ही या माध्यमांची सकारात्मक बाजू. त्यामुळे चित्रपटगृहं आणि ओटीटी ही दोन्ही माध्यमं उपलब्ध झाल्यामुळे खरं पाहता माझ्यासारख्या अनेकांची चांगली सोय झाली आहे. ‘घेता किती घेशील दो करांनी’ असं म्हणण्यासारखी परिस्थिती.
माणसं जोडायला मला चित्रपटांची मदत घ्यावी लागते. भारतीय परिप्रेक्ष्यात ते कठीणही नाही. चित्रपट पाहत नाहीत, अशी माणसं फार कमी. गप्पांमधून एखाद्या आवडत्या चित्रपटाचा विषय निघाला की मला संवाद साधता येतो. माणसांच्या हृदयात शिरण्याचा मार्ग त्यांना आवडणार्या चित्रपटांवरच्या चर्चेतून जातो, असं माझं स्पष्ट मत आहे. फेसबुकवर लिहिणार्या अनेकांशी मी त्यांच्या चित्रपटांबद्दलच्या प्रेमामुळेच जोडला गेलोय. गणेश मतकरींच्या लिखाणाने अनेक गैरसमज दूर झाले. चांगला चित्रपट कशाला म्हणावं, याचे निकष समजले. संतोष पाठारेंच्या परीक्षणांनी चांगली परीक्षणं कशी लिहावीत, याचा वस्तुपाठ घालून दिला. अमोल उदगीरकर यांनी चित्रपटसृष्टीतल्या न ऐकलेल्या गोष्टी रंजकतेने सांगितल्या. न-नायकांची ओळख करून दिली.
हे वाचलंत का: शांतारामबापूंची प्रभात मधील कलात्मक ’चित्रतयी’
जितेंद्र घाटगेच्या चित्रपटविषयक लिखाणाने वर्तमानातल्या जगण्याशी सांगड घालत चित्रपट पाहण्याची एक नवी दृष्टी दिली. इमॅन्युएल व्हिन्सेन्ट सँडरने स्वत:च्या लिखाणातून कधीही न ऐकलेल्या चित्रपटांची ओळख करून दिली. सुदर्शन चव्हाण, अक्षय शेलार, पवन गंगावणे या मित्रांनी पाहून झालेल्या चित्रपटांतल्या न दिसलेल्या, न जाणवलेल्या गोष्टी दाखवल्या. माझ्या अनेक मित्रांनी वेगवेगळे चित्रपट पाहायला लावून माझं अनुभवविश्व वेळोवेळी समृध्द केलं आहे. रुपाली जाधव या कलीगने अॅनिमेशनपटांचं जग दाखवलं. विकास काळे यांनी जुन्या कलात्मक चित्रपटांची ओळख करून दिली. फेसबुकवर ओळख झालेल्या प्रसाद अर्दाळकर या मित्राने दाक्षिणात्य चित्रपटांच्या नव्या प्रवाहातलं पाणी चाखायला लावलं. त्याशिवाय काही फेसबुक ग्रुप्समुळे दर्जेदार प्रादेशिक चित्रपटांबद्दल माहिती समजली. ते चित्रपटगृहांत पाहता आले.
मामि, कशिशसारख्या चित्रपट महोत्सवांतून पंचतारांकित हॉटेलमध्ये माफक पैशांत काही दिवस मेजवानी झोडायला मिळाल्यासारखे उत्तमोत्तम चित्रपटही पाहिले. त्यावेळी एक गोष्ट लक्षात आली. आम्ही पाहा कसे फॉरेनच्या दिग्दर्शकांचे चित्रपट पाहतो, म्हणून इतरांना कमी लेखणारा एक वर्ग भारतात उदयास येत आहे. या वर्गातील व्यक्ती ज्या पध्दतीचे चित्रपट पाहतात, तिथपर्यंत भारतीय चित्रपट अजून पोहोचलेला नाही, हे वास्तव नाकारता येणार नाही. काही वर्षांपूर्वी या अशा वेगळेपणावरून भेदाभेद करणार्या गटात मीही होतो. मात्र त्यामुळे माझंच नुकसान होतंय, हे हळूहळू उमजू लागलं. चित्रपटांच्या टेस्टवरून माणसांना जज करणं चुकीचं आहे, हे समजू लागलं.
माझ्या डॉक्टर बहिणीला ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ फार आवडतो. त्याच चित्रपटातील डॉक्टर अस्थाना हे गंभीर प्रसंगी हसणारं पात्र माझ्या बाबांचं अतिशय आवडतं. ‘मातीच्या चुली’, ‘फॅमिली कट्टा’ हे आईचे आवडते चित्रपट. ‘गुंडा’ बर्याच मित्रांचा आवडता चित्रपट आहे. ‘खिचडी’, ‘गोलमाल’, ‘सिंघम’ हे एरव्ही चित्रपटांची टेस्ट जुळत नसूनही माझे आणि माझ्या बहिणीचे आवडते चित्रपट आहेत. एरव्ही दूरदर्शन संचासमोर माझे पालक मालिकांचं दळण दळत बसलेले असतात. मात्र जुन्या हिंदी चित्रपटांची गाणी लागली की, आम्ही सर्वजण एकाच विश्वात समरस होऊन जातो.
म्हणूनच बॉलिवूडला कितीही नावं ठेवली, तरी हिंदी चित्रपटांनी आयुष्य बदलून टाकलं, त्यात रंग भरले, हे नाकारता येणार नाही. “अगर किसी चीज़ को पूरी शिद्दत से चाहो, तो सारी कायनात…” वगैरे डायलॉग मारणारा ओम सगळं संपल्याची भावना मनात असताना आशेचा किरण दाखवतो. चघळून रवंथ करून झालेल्या प्रेमकहाण्या अनेकदा त्रास होऊनही पुन्हा प्रेमात पडायला भाग पाडतात. बर्फी आणि झिलमिलसारखं. गीत आणि आदित्यसारखं. कैस आणि लैलासारखं. ओम आणि शांतिप्रियासारखं. कितीही मेलोड्रामॅटिक वाटलं, तरी ‘मुन्नाभाई एमबीबीएस’मधलं डॉक्टर सुमनचं शेवटचं भाषण डोळ्यांत टचकन् पाणी आणतं. ‘सात खून माफ’मधला डॉक्टर मधुसूदन तरफदार सुझानाला म्हणतो, “ज्यादा कभी ज्यादा नहीं होता, ज्यादा हमेशा कम ही लगता है”, तेव्हा फार कमी शब्दांत मोहापासून दूर राहायला चित्रपट शिकवत असतो. तीच सुझाना जेव्हा म्हणते की, “हर शादीशुदा औरत ने अपनी जिंदगी में कभी ने कभी ये जरुर सोचा होगा की वो अपने पति से हमेशा हमेशा के लिए छुटकारा कैसे पाएँ’, तेव्हा मोडकळीला आलेल्या लग्नव्यवस्थेबद्दलचं ते कटु सत्य असतं. ‘हॅपी जर्नी’मधली जानकी जेव्हा म्हणते, “माणसं असतात, असतात आणि एकदम व्हॅनिश होतात, निरंजन” तेव्हा नकळतच आपण आपल्या माणसांना किती गृहीत धरत असतो, हे कळून चुकतं. म्हणूनच मेलोड्रामा हे भारतीय व्यावसायिक चित्रपटांचं व्यवच्छेदक लक्षण असलं, तरी माझ्यासाठी कधीकधी हेच चित्रपट टॉनिकचं काम करतात.
चैतन्य ताम्हाणे, आदिश केळुस्कर, सचिन कुंडलकर, नागराज मंजुळे यांसारखे मराठी दिग्दर्शक, इतर प्रादेशिक भाषांत ‘हेल्लारो’, ‘बुलबुल कॅन सिंग’, ‘आमीस’, ‘द ग्रेट इंडियन किचन’ असे उत्तमोत्तम चित्रपट देणारे दिग्दर्शक भारतीय चित्रपटांना जागतिक ओळख देण्याचे प्रयत्न करत आहेत, हे नक्कीच कौतुकास्पद आहे. पण निदान माझ्यापुरतं तरी व्यावसायिक, कलात्मक वगैरे भेद बाजूला सारत चांगले चित्रपट पाहायला मिळणं आणि अशा चित्रपटांनी एका जागी बसून एका वेगळ्या विश्वाची सफर करून आणणं, हेच बालसुलभ कुतूहल आहे. ते आयुष्यभर असंच जिवंत राहावं, एवढंच आजच्या दिवशी वाटतं.
– संदेश कुडतरकर.