’द ग्रेटेस्ट स्टोरी एवर टोल्ड आजही..
’द ग्रेटेस्ट स्टोरी एवर टोल्ड’ हि टॅग लाईन घेवून २ ऑक्टोबर १९७३ ला सिप्पी पिता पुत्रांनी ’शोले’चा पहिला ’शॉट’चित्रीत केला (अमिताभ जयाच्या हातात चावी देतो) तेंव्हा त्यांना कल्पनाही नव्हती आपण या शतकातील एका महान सिनेमाची निर्मिती करतो आहोत!
सिप्पीच्या ’अंदाज’(१९७१), ’सीता और गीता’(१९७३) या सिनेमांची कथा पटकथा आणि संवाद लिहिणारे सलीम जावेद यांनी जेंव्हा ’शोले’ची चार ओळींची कथा ऐकवली तेंव्हा जी पी सिप्पी यांना ती अजिबात पसंत पडली नाही पण रमेश सिप्पी यांना त्यात दम वाटला व त्यांनी त्यावर पुढे काम करायला सांगितले.
महिनाभरात कथानक तयार झालं.सिप्पींनी मग त्याचं कास्टींग सुरू केलं.ठाकूरचा रोल आधी प्राण करणार होता.याच भूमिकेसाठी धर्मेंद्र देखील तयार होता.वीरूच्या भूमिकेसाठी संजीवकुमार आणि जय च्या भूमिकेसाठी शत्रुघ्न सिन्हा यांचा विचार चालू होता.पण मग असं झालं तर संजीव-हेमा अशी पेयर होणार या भीतीने धरमने पटकन ठाकूरचा नाद सोडून वीरू ची भूमिका स्विकारली! आणि ठाकूरच्या भूमिकेत संजीवकुमार आला.गब्बरच्या भूमिकेचा प्रवास असाच दिलीप,डॅनी होत होत शेवटी अमजद खान वर येवून थांबला.
हा सिनेमा बनविताना सिप्पींच्या पुढे अनेक पाश्चिमात्य सिनेमांचा प्रभाव होता.त्यात प्रामुख्याने अकीरा कुरासावा यांचा १९५४ सालचा ’सेवन समुराई’तसेच ’नार्थ वेस्ट फ्रंटीयर,वन्स अपॉन टाईम इन अ वेस्ट,द मॅग्निफिसंट सेवन हे विदेशी तर भारतातील ’मेरा गांव मेरा देश’,खोटे सिक्के’ यांचा समावेश होता.बंगलोर पासून पन्नास मैलावर असलेल्या एका लोकेशनवर रामगढ वसवलं गेलं.सुरूवातीचा रेल्वेवरील दरोड्याचा सीन पनवेल जवळ चित्रीत केला गेला.रमेश सिप्पी मनासारखा शॉट मिळाल्याशिवाय स्वस्थ बसत नसत त्या मुळेच त्यांनी ’ये दोस्ती हम नही छोडेंगे’ या गाण्यासाठी २१ दिवस तर पहाटेच्या अंधुक उजेडात जया भादुरी दिवे मंद करते व अमिताभ माऊथ ऑर्गन वाजवित असतो हा भाग चित्रीत करायला तब्बल २० दिवस घेतले! गब्बरची व्यक्ती रेखा लार्जर दॅ लाईफ बनली.त्याची तंबाखू चघळत बोलण्याची,तुच्छतेने पाहण्याची,हसण्याची स्टाईल प्रचंड लोकप्रिय ठरली
बिगेस्ट मल्टीस्टारर कास्ट असलेलं सव्वा तीन तासाचं हे सूड नाट्य १५ ऑगस्ट १९७५ रोजी मुंबईच्या मिनर्व्हात झळकलं. शोले प्रदर्शित झाला त्याच्या दिड महिना आधीच देशात आणीबाणीचं सत्र सुरू झालं होतं.प्रचंड हिंसाचार असलेला हा सिनेमा सेन्सार बोर्डाचे अनेक कटस स्विकारून रीलीज झाला.सुरूवातीचे काही दिवस थंडे स्वागत झाल्यावर आठवड्यातच सिनेमाने ग्रीप पकडली.माऊथ पब्लिसिटीचा फार मोठा परिणाम झाला.आणि बघता बघता शोले ने सर्वांचे विक्रम मोडीत काढत कुणी कल्पना देखील करणार नाही असे हिमालया एवढे उत्तुंग यश मिळवले.
तब्बल पाच वर्षे या सिनेमाचा मुक्काम मिनर्व्हात होता.देशात एकाच वेळी देशातील १०० थिएटर मध्ये रौप्यमहोत्सव साजरा करणारा तो एकमेव चित्रपट होता.’शोले’ने भारतीय सिनेमाची परीभाषाच बदलली.हा पहिला ७० एम एम स्टिरीओ साऊंडच्या असलेला सिनेमा होता. या सिनेमाने चक्क ’शोले;च्या आधी व शोलेच्या नंतर अशी सिनेमाच्या दुनियेची विभागणी करून टाकली.या सिनेमाने प्रेक्षकांची सांस्कृतिक टेस्ट बदलून टाकली.