राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात वाजला मराठीचा डंका!
भारतीय चित्रकर्मींचा हुरूप वाढवणारा ६७वा राष्ट्रीय पुरस्कार सोहळा (67TH NATIONAL FILM AWARDS) नुकताच पार पडला. चित्रपट महोत्सवाचे अतिरिक्त संचालक चैतन्य प्रसाद, दिग्दर्शक – सिनेमॅटोग्राफर शाजी करूण, दिग्दर्शक-निर्माते एन. चन्द्रा, डॉक्युमेंटरी फिल्ममेकर अरुण चढ्ढा, नामांकित समीक्षक आणि लेखक सैबल चटर्जी यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या, विविध भाषांमधल्या तब्बल ४६१ चित्रपट आणि २२० लघुपटांमधून सर्वोत्तम कलाकृतींची आणि कलाकारांची निवड या पुरस्कारांसाठी केली गेली. यात काही निवडक आणि दर्जेदार मराठी चित्रपट, लघुपट आणि कलाकारांनाही हा पुरस्कार मिळणार असून, यामुळे मराठी चित्रपटसृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जाणार आहे. चला तर, एक नजर टाकूयात या मराठी चित्रवैभवावर..
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट: बार्डो
भीमराव मुडे दिग्दर्शित ‘बार्डो’ (Bardo) हा प्रख्यात वैज्ञानिक आईनस्टाईन यांच्या सापेक्षतावादाच्या संकल्पनेवर आधारित आहे. स्वप्नं पाहण्याची आणि ती स्वप्नं पूर्ण करण्याची गोष्ट सांगणारा हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून शाळा, शिक्षक, शिक्षणपद्धती हा ‘बार्डो’च्या कथेचा गाभा आहे. यात अंजली पाटील, मकरंद देशपांडे, संदेश जाधव, अशोक समर्थ इत्यादी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.
सर्वोत्कृष्ट चित्रपट (सामाजिक समस्या विभाग): आनंदी गोपाळ (Anandi Gopal)
समीर विद्वांस दिग्दर्शित हा चित्रपट बाल विवाह, स्त्री शिक्षण, कर्मठ पुरुषी मानसिकता, अनारोग्य, धर्मद्वेष, अस्पृश्यता तसेच अनावश्यक आणि जाचक रूढी परंपरांवर भाष्य करतो. हा चित्रपट भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांच्यावर आधारित असून यात भाग्यश्री मिलींद आणि ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) यांनी प्रमुख भूमिका साकारली होती.
सर्वोत्कृष्ट चित्रपट (राष्ट्रीय एकात्मता विभाग) : ताजमहाल
नियाझ मुनावर दिग्दर्शित ताजमहाल हा श्रद्धा-अंधश्रद्धा आणि धार्मिक भावनांच्या बाजारीकरणाच्या खेळाला एका वेगळ्या कथेतून प्रेक्षकांसमोर आणतो. धार्मिक प्रतीकांच्या माध्यमातून लोकभावनेला कश्या प्रकारे स्वतःच्या फायद्यासाठी वापरलं जातं, हे ताजमहाल नावाच्या बकऱ्याची आणि त्याच्यावर जीव लावलेल्या बाळाची कहाणी प्रेक्षकांना सांगते.
हे वाचलंत का: मराठी चित्रपटांचा ‘नादखुळा’ फिल्मफेअर ॲवॉर्ड शो!
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकीय पदार्पण (लघुपट माहितीपट विभाग): खिसा
या लघुपटाचे दिग्दर्शन राज प्रितम मोरे यांनी केलं असून, कैलास वाघमारे यांच्या लेखणीतून या लघुपटाची कथा व पटकथा अवतरली आहे. लहान मुलांच्या निरागस भावविश्वाला धार्मिक अथवा जातीय चौकटींमध्ये बंदिस्त करण्याची संकुचित मनोवृत्ती या लघुपटातून अधोरेखित केली गेली आहे. वेदांत श्रीसागर या चिमुरड्याने प्रमुख भूमिका साकारली असून मीनाक्षी राठोड, कैलास वाघमारे, श्रुती मधीदीप, डॉ. शेषपाल गणवीर हे कलाकार सहाय्यक भूमिकेत दिसून येतात.
सर्वोत्कृष्ट अन्वेषक चित्रपट (लघुपट माहितीपट विभाग): जक्कल
हा माहितीपट सिद्धांत फेम विवेक वाघ यांनी दिग्दर्शित केला असून, पुण्यातील कुख्यात जोशी-अभ्यंकर हत्याकांडातील प्रमुख आरोपी राजेंद्र जक्कल (Jakkal) याच्यावर हा माहितीपट बेतलेला आहे. जक्कलने हे हत्याकांड का व कसे घडवून आणले, या हत्याकांडाचा तपास कसा केला गेला, इत्यादी प्रश्नांची उकल या माहितीपटात केली गेली आहे.
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका: सावनी रविंद्र (रान पेटलं-बार्डो)
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेल्या ‘बार्डो’ या चित्रपटातील हे गाणं असून, ते संगीतकार रोहन-रोहीत यांनी संगीतबद्ध केलेलं आहे. ग्रामीण जीवनातील वेदना दर्शवणाऱ्या या गाण्यात सावनीने (Savani Ravindra) अभूतपूर्व सुरांची पाखरण केलेली आहे.
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री: पल्लवी जोशी (द ताश्कंद फाईल्स)
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द ताश्कंद फाईल्स’मध्ये (The Tashkent Files) इतिहासकार आणि संशोधिका आयेशा अली शाह ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या मराठमोळ्या पल्लवी जोशीने (Pallavi Joshi) सहाय्यक अभिनेत्रीच्या राष्ट्रीय पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली असून, विवेक अग्निहोत्रीने याच चित्रपटाच्या पटकथा आणि संवादलेखनासाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेला आहे.
विशेष उल्लेखनीय पुरस्कार (अभिनेत्री): लता करे (लता भगवान करे: एक संघर्षकथा)
नवीन देशबोनाई दिग्दर्शित ‘लता भगवान करे: एक संघर्षकथा’ (Lata Bhagwan Kare) हा चित्रपट नवऱ्याच्या उपचारासाठी मॅरेथॉन स्पर्धा जिंकणाऱ्या लता भगवान करे यांच्यावर आधारित आहे. २०१३मध्ये वयाच्या ६६व्या वर्षी लता करे त्यांच्या पतीच्या वैद्यकीय उपचारांचा खर्च भागवण्यासाठी मॅरेथॉनमध्ये नऊवारी साडीत डोक्यावर पदर घेऊन अनवाणी धावल्या आणि जिंकल्या. या चित्रपटात त्यांनीच प्रमुख व्यक्तिरेखा साकारली आहे.
विशेष उल्लेखनीय पुरस्कार (दिग्दर्शक): अभिजित मोहन वारंग (पिकासो)
‘पिकासो’ (Picasso) या चित्रपटात बाप-लेकाच्या नात्याची कहाणी सांगितलेली आहे. चित्रकार बनू पाहणारा मुलगा आणि त्याला चित्रकार बनवण्यासाठी धडपडणाऱ्या बापाची गोष्ट ‘दशावतार’ या कोकणातील प्राचीन आणि प्रसिद्ध लोककलेचा आधार घेऊन दिग्दर्शकाने पडद्यावर उभी केली आहे. या चित्रपटात प्रसाद ओक, समय तांबे, आश्विनी मुकादम हे कलाकार प्रमुख भूमिकेत झळकले आहेत.
सिनेमाविषयक सर्वोत्कृष्ट लिखाण (विशेष उल्लेखनीय पुरस्कार): सिनेमा पाहणारा माणूस
‘सिनेमा पाहणारा माणूस’ (Cinema Pahanara Manus) या आत्मकथनात्मक पुस्तकाचे लेखन अशोक राणे यांनी केले असून, ते एक प्रसिद्ध समीक्षक आहेत. राणेंना यापूर्वी २००३मध्ये सर्वोत्कृष्ट समीक्षक म्हणून राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून, त्यांच्या ‘सिनेमाची चित्तरकथा’ या पहिल्या पुस्तकालाही १९९६मध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. ‘सिनेमा पाहणारा माणूस’ या पुस्तकात राणेंनी ऐकलेल्या, पाहिलेल्या आणि अनुभवलेल्या अनेक फिल्म्सचा आणि त्यांच्याशी संबंधित फिल्मी किश्श्यांचा समावेश आहे.
सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाईन: सुनील निगवेकर आणि निलेश वाघ (आनंदी गोपाळ)
१९व्या शतकातील सामाजिक क्रांतीमध्ये बहुमुल्य योगदान देणाऱ्या प्रथम भारतीय महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांच्या जीवनावर आधारित ‘आनंदी गोपाळ’ या समीर विद्वांस दिग्दर्शित चित्रपटाची निर्मिती झी स्टुडीओज, फ्रेश लाईम फिल्म्स आणि नमः पिक्चर्स या निर्मितीसंस्थांनी केली होती. १९व्या शतकातील वास्तू आणि इतर संरचनात्मक बाबींची पूर्तता करून तो काळ पडद्यावर उभा करण्यात सुनील निगवेकर आणि निलेश वाघ यांनी केलेल्या प्रोडक्शन डिझाईनचा सिंहाचा वाटा आहे.
यासोबतच, अक्षय इंडीकर दिग्दर्शित ‘त्रिज्या’साठी मंदार कमलापूरकर यांनी सर्वोत्कृष्ट ऑडिओग्राफी (साऊंड डिझायनर) या राष्ट्रीय पुरस्कारावर आपले नाव उमटवले असून बार्शी येथील विनोद उत्तरेश्वर कांबळे दिग्दर्शित ‘कस्तुरी’ या हिंदी चित्रपटाने सर्वोत्कृष्ट बाल चित्रपटाचा पुरस्कार मिळवलेला आहे.