दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
एकांकिकांचं महत्व
हल्लीच्या कॉलेज लाईफचं एक अविभाज्य समीकरण म्हणजे एकांकिका विश्व..! मानाचे करंडक असोत किंवा एखादी नवोदित स्पर्धा, एकांकिका प्रेमींचा उत्साह पार गगनाला भिडलेला असतो. आजवर या एकांकिकांनी मनोरंजन सृष्टीला अनेक हिरे दिलेत. सुबोध भावे, सिद्धार्थ जाधव, स्पृहा जोशी, मुक्ता बर्वे, संजय नार्वेकर, भरत जाधव, आद्वैत दादरकर, भक्ती देसाई असे अनेक कलाकार एकांकिका विश्वासतूनच पुढे आलेत.
तसं बघायला गेलं तर एकांकिका स्पर्धा ही इतर स्पर्धांसारखी एक स्पर्धाच.. पण त्याला एक विशिष्ट महत्त्व आहे. एकांकिका स्पर्धांमुळे लागलेली शिस्त माणसाला पुढे कोणत्याही क्षेत्रात कामाला येते. अवघ्या तासाभरात एखादी कथा सादर करत असताना नेपथ्य, संगीत, प्रकाशयोजना, सादरीकरण यात होणारी स्पर्धकांची कसरत ही नकळत टाईम मेनेजमेंट चे धडे देऊन जाते. कमी वेळात उत्तम गोष्टी बांधण्याचं कसब ह्याहून जास्त चांगलं कुठेच शिकता येणार नाही. बरं एकांकिकांच्या विषयाचं म्हणाल तर गेल्या काही वर्षात इतके वेगवेगळे विषय हाताळले गेले आहेत की त्याची कल्पना करता आली नसती. दशावतारापासून ते दशावतार जगवण्याच्या खटपटीपर्यंत, माणसांपासून ते माणुसकीपर्यंत, गावापासून ते शहरापर्यंत, पुराणापासून ते भविष्यापर्यंत सगळ्या विषयावर एकांकिका झाल्या. मुख्य म्हणजे असे वेगळे विषय निवडताना स्पर्धेसाठी का होईना पण मुलांकडून वाचन होतं. उत्तमोत्तम साहित्य ह्या निमित्ताने होतकरू पिढीच्या नजरेखालून जातं. पुरुषोत्तम, रंगवैखरी सारख्या स्पर्धांमुळे अभिनयाव्यतिरिक्त इतर कलांचाही समावेश एकांकिकांमध्ये होतोय.
एकांकिका स्पर्धांमुळे एक खूप महत्त्वाचा गुण अंगी येतो, तो म्हणजे “कमी तिथे आम्ही..!” ऐनवेळी आलेल्या अडचणींमुळे घाबरून न जाता शांत डोक्याने त्यावर पर्याय शोधून ठरवलेलं काम पूर्ण कसं करायचं, याचं कसब एकांकिकांमुळे चांगलंच आत्मसात करता येत. एखादा कलाकार ऐनवेळी आजारी पडला तर अजिबात वेळ न दवडता त्याची वाक्य पाठ करून प्रयोगाला उभं राहणं, अभिनयाबरोबरच म्युझिक आणि लाइट्स यांचादेखील तितकाच अभ्यासपूर्ण सराव करणं, ग्रुपमध्ये कमीजण असल्यामुळे ऑन स्टेज सह बॅकस्टेजचीही काम सांभाळणं हे एकांकिकाकर्मींसाठी काही नवीन नाही. एरवी अशा ऐन वेळेच्या गोंधळात काय करावं हे भल्याभल्यांना सुचत नाही. पण आमचे एकांकिकाकर्मी मात्र अशा अनेक प्रसंगांना सराईतपणे तोंड देतात.
ह्या एकांकिका स्पर्धांचा अजून एक महत्त्वाचा पैलू म्हणजे टीम वर्क. जसं एका बोटा पेक्षा मुठीत जास्त ताकद असते, तसंच कोणतेही काम हे टीम एफर्टने जास्त सफल होतं. पण बऱ्याचदा अनेक लोकांना इतरांसोबत काम करण्याची सवय नसते. जशी हाताची पाची बोटं सारखी नसतात तसंच प्रत्येक माणूस हा वेगळा असतो. वेगवेगळ्या प्रकृतीच्या माणसांसोबत जुळवून घेताना अनेक जणांची तारांबळ उडते. पण एकांकिका स्पर्धांच्या या धावपळीत याच विविध प्रकृतीच्या लोकांचं महत्व खूप प्रकर्षाने जाणवत. एकमेकांची तब्येत सांभाळत एकमेकांना सावरून घेत एखाद्या प्रोजेक्टला लावलेली पॉझिटिव्हिटी आयुष्यात खुप काही देउन जाते.
एकूणच एकांकिका स्पर्धा हा फक्त नाट्य क्षेत्राचाच नाही तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकासाचा खूप महत्त्वाचा भाग आहे. अशाच नवनवीन एकांकिका स्पर्धा दरवर्षी आयोजित होत राहोत, आणि त्यातून उत्तमोत्तम कलाकार मनोरंजन सृष्टीला मिळत राहोत, हीच नटराजा चरणी प्रार्थना!
फोटो सौजन्य- कलाकारांच्या सोशल मिडिया प्रोफाईल
– कल्पिता पावसकर