‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
विंगेतला आवाज अन तोंडातला बोळा!
कलाकार सुद्धा लै तऱ्हेवाईक असतात.
तुम्ही कोणत्या कलाकाराच्या हाताखाली काम करताय त्यावर ठरतं की तुम्ही कसं काम करायला हवं ते… डेमो दू क्या?
म्हणजे, असं बघा.. आता विक्रम गोखले साहेबांच्या हाताखाली काम करायचं असेल तर तुम्ही अभ्यासू नट असणं आवश्यक असतं. किंबहुना तुम्हाला किमान अभिनय यायला लागतो. तसं, सुबोध भावेसोबत काम करायचं असेल तर ते गणित वेगळं आहे. सुबोधभाऊ अत्यंत प्रोफेशनल आहेत. समोर दगड जरी उभा केला तरी भाऊ आपलं काम चोख करणार अन तिथून निघून जाणार.
आता तुम्ही मनात म्हणाल, अभिनेत्रींचं कसं असतं.. सांगतो सांगतो.. पण नंतर.
आता विषय अभिनेत्याचा चालू हाय.
असाच शिस्तबद्ध नट आहे मकरंदभाऊ अनासपुरे औरंगाबादवाले. मकरंदसर कामाला एक नंबर. त्यांचं वाचन तर लई खरतनाक. आणि तेवढीच त्यांची शिस्तही असते बरं. त्यांचा नियम मोडला तर सर आख्खा प्रोजेक्ट बंद करायला मागे पुढे बघत नसतात ते.
खोटं वाटतं? वाचा मग हा किस्सा..
सरांनी फक्त विंगेत कुजबुज सुरु व्हती म्हणून आख्ख नाटक बंद करायला घेतलं होतं.
हा किस्सा हाय २०१२ च्या सुमारचा. त्यावेळी नाटक आलं होतं केशवा माधवा. हं.. आता हे कुठलं नाटक असं विचारायचं काम नाय. तुम्ही मराठी लोक तुम्हाला हिंदी सिनेमे बरोबर कळतात, पण नाटकं कळत नाहीत.. अशानेच मराठी मागे राहते आपली. केशवा माधवा नाटक माहित नसेल तुम्हाला. पण तो अक्षयकुमारचा ओह माय गॉड पिक्चर माहीत असेल ना? हां.. त्याच शिनिमाचा मराठी अवतार. शिनेमात परेश रावल साहेबांनी जो रोल केला होता तो नाटकात मकरंदभाऊ करत होते. चांगलं नाटक होतं. प्रयोग रंगत होते. मकरंद भाऊंची एक अट होती. काही झालं तरी नाटक सुरू असताना, विंगेत शांतता पायजे. पायजे म्हणजे पायजे. जरा खुस्स झालं की इकडे स्टेजवरच्या मकरंद भाऊंच चित्त हालायचं.
आता विंगेत कोण असतं? एंट्री घ्यायचा तयारीत असलेले कलाकार.. एग्झिट घेतलेले कलाकार.. रंगभूषाकार, प्रॉपर्टी हालवणारे.. असे लोक. आता प्रॉपर्टी हालवणाऱ्यांना काही घंटा फरक पडत नाही नाटकात काय चालूय याचा. अहं.. म्हणजे, त्याचं लक्ष असतं नाटकाकडे पण तरीही त्यांचं काम झालं की निवांत असत्यात ते. त्यांनी विंगेत दबक्या आवाजात कुजबुज जरी केली तरी मकरंद भाऊंना ती ऐकू जायची. मग त्यांचं चित्त हालायचं. वारंवार त्यांनी सांगितलंही.
पण आपल्यालकडे मराठी नटाला लाईटली घ्यायची सवयच आहे नं. तसं इथेही झालं.
मग एक दिवस…
प्रयोग होता दापोलीचा. हाऊसफुल्ल प्रयोग. नाटक सुरू झालं. मकरंद भाऊंच्या एंट्रीला टाळ्या पडल्या प्रयोग सुरू झाला. आणि प्रयोग ऐन रंगात आला असताना अचानक विंगेतून खसखस ऐकू येऊ लागली. मकरंद भाऊ विचलीत झाले.. पण त्यांनी ते दाखवून दिलं नाही. काही न बोलता त्यांनी चोख प्रयोग केला. प्रयोग झाल्यावर सगळे त्यांचे चाहते प्रेक्षक त्यांना भेटायला आले.. फोटो झाले. गप्पा झाल्या. सगळे गेले.
आणि रात्री साडेबारा वाजता मकरंद भाऊंनी मोबाईल हातात घेऊन डायरेक्ट नाटकाच्या मुंबईत झोपलेल्या निर्मात्याला उठवला.
निर्मात्याला काय समजेना. फोन घेतल्यावर मकरंद भाऊंनी अत्यंत शांतपणे आपल्या स्टाईलमध्ये त्यांना आपली स्थिती सांगितली.
ते म्हणाले, “हेलो.. गोपाळभाऊ.. आपल्याला या नाटकाचे काय हजार बिजार प्रयोग करायचे नाहीत. आपण हे नाटक आत्ताच बंद करून टाकू. कसंय.. इथे कुणालाच शिस्त नकोय. सतत मी सांगत असतो विंगेत आवाज नको.. शांत बसा.. पण दोन तास पण जर आपल्याला शिस्त पाळता येणार नसेल तर मग बंदच करून टाकू की नाटक.”
आईच्या गावात…
आता नाटकाच्या मुख्य नायकानेच नाटक बंद करू म्हटल्यावर कोण काय बोलणार..
निर्मात्यांनी मकरंदची समजून काढली.. मकरंद बोलत असताना या नाटकाच्या सर्व लोकांची तंतरली. नंतर निर्मात्यांनी सगळ्यांना सज्जड दम भरला. मकरंदभाऊ स्टेजवर गेल्यावर विंगेतून खसखस ऐकु आली तर त्याची खैर नाही अशी ताकीद दिली गेली. मग पुढचे प्रयोग झाले.
नाही म्हणता अडीचशे प्रयोगांचा टप्पा गाठलाच की या टीमनं. पण केशवा माधवाच नव्हे, कोणत्याही नाटकात मकरंदभाऊ स्टेजवर असले की विंगेतली सगळं पब्लिक तोंडात बोळा कोंबून घेतं म्हणे.
काय समजलात!!
— धनंजय माने