मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमधून दिला ‘सवतीचे कुंकू’ चित्रपटाच्या आठवणींना
शॅम्पेन ते…फिल्मी पार्ट्यांची ‘चढती झिंग’
पार्टी हे मनोरंजन विश्वाचा एक कलर…. असंख्य गुणअवगुणासहचा एक ग्लॅमरस आणि गाॅसिप्स फंडा! सिनेमाच्या जन्मासह पार्टीही जन्माला आली असेल, ती ‘टी पार्टी’ असेल. ‘चहा बिस्किटे’ खाऊन त्या काळात सेलिब्रेशन होत असेल. हां, पेयपानही काही प्रमाणात झाले असेल, मद्याचा जन्म झाला तेव्हापासून ते घेण्याची अथवा ‘एकच प्याला ‘ संस्कृती जन्माला आली असणार. त्यासाठी खूपच मागे जाऊन शोध घ्यावा लागेल. तेव्हा त्याला रिलॅक्ससाठीचे पेय मानले असेलही कदाचित. सिनेमाची वाटचाल आणि फिल्मी पार्टी यांची रंगतसंगत खूपच जुनी आणि सुरुवातीच्या काळात तशी बरीचशी खाजगी वर्तुळातील. त्यातील किस्से/गोष्टी/चर्चा/ कथा/दंतकथा हळूहळू बाहेर येत, पण त्याकडे कुतूहल याच भावनेने पाहिले गेले. फिल्मी पार्टी कल्चरची जास्त चव अथवा स्वाद मिडियात आला त्याचे श्रेय मेहबूब खान, के. असिफ, राज कपूर अशा ‘ड्रीम मर्चंसना ‘ द्यायला हवे. त्यांच्या खाजगी आणि सिनेमाच्या अशा दोन्ही पार्ट्यांची चविष्ट वर्णन त्या काळात मिडियात येत.
सत्तरच्या दशकात गाॅसिप्स मॅगझिनचे पेव फुटले आणि पार्टी कव्हरेज अधिकाधिक वाचनीय होऊ लागले. अर्थात, अत्यंत खाजगी पार्ट्यांना फक्त आणि फक्त एकाद्या खूपच जवळच्या पत्रकाराला आमंत्रण असे. तर नवीन चित्रपटाची घोषणा, मुहूर्त, पूर्ण झाला, प्रीमियर, ज्युबिली हिट पार्टी अशी फिल्मी पार्ट्यांना निमित्त असत आणि त्यात मिडियाला आवर्जून बोलावले जाई. याचे ठळक कारण, त्या फिल्मला अधिकाधिक कव्हरेज हवे हेच असे. अशी मिडिया फ्रेन्डली पार्टी म्हणजे नवीन फॅशनच्या ड्रेसचे ग्लॅमर आणि अफेअरचे, गाॅसिप्सचे भरपूर खमंग खाद्य. गाॅसिप्स मॅगझिनध्ये ‘फिल्मी पार्टी फोकस’ ची सदरे वाचनीय होऊ लागली. एकादा स्टार पार्टीत किती बरे उशिरा आला, तो कोणाला कसा बिलगला, पार्टीतील स्टार्सचे ड्रेस, कानातले गळ्यातील अलंकार, हातातील पेग , किती ग्लास रिचवले, कोणता स्टार उशिरापर्यंत थांबला असा ‘आखो देखा हाल’ त्यात असे. आपण त्या पार्टीत आहोत असा वाचकांना फिल द्यावा/यावा असे काॅलम असत. राजेश खन्नाचे पार्टीतील नखरे, राजकुमारचे तुसडेपणाचे किस्से, राज कपूरची शोमनशीप अशा त्यात हुकमी गोष्टी असत. मूळ घटनेला भरपूर मीठ+ मसाला+ हिंग+ तिखट+ तेल लावलेले असे. वाचनमूल्य त्यालाच असे. तेच किस्से भाषिक मिडियात येत, पसरत, फॅन्सच्या गप्पात रंगवून खुलवून सांगितले जात आणि ते रसिकांच्या किमान तीन पिढ्या ओलांडूनही आजही चर्चेत आहेत. फिल्मी पार्टी कल्चर सत्तरच्या दशकात आणखीन रुजले. रंगतदार झाले. काॅमन झाले. चित्रपट निर्मिती वाढल्याने निमित्तेही वाढली. त्या काळात कुलाबा, नरिमन पाॅईंट, वांद्रे, जुहू येथील फाईव्ह स्टार हाॅटेलमध्ये या फिल्मी पार्ट्या रंगत आणि रात्री एक दीडला उतरत.
ऐंशीच्या दशकात मी मिडियात आल्यावर अशा फिल्मी पार्ट्यांची आमंत्रणे साहजिकच येऊ लागली. अशा वेळी आपण कोणत्या पार्ट्यांना जायचे, कसे वावरायचे, काय प्यायचे/खायचे हे सगळे आपल्यावर असते याचे भान मला होते. मी गिरगावातील मध्यमवर्गीय चाळीत वाढल्याचा तो परिणाम आहे हे लक्षात आले. केवढा तरी संकोचतच मी मराठी आणि हिंदी चित्रपटांच्या पार्ट्यांना जायचो. मिडियासाठीची पार्टी म्हणजे शो पार्टी, काही भेटीगाठी, त्यातून एकादी बातमी वगैरे. फोटोग्राफर्सना अशा पार्ट्यां म्हणजे फ्लॅश फ्लॅश फ्लॅश फ्लॅशची खचाखच संधी. वातावरण फ्रेन्डली, स्पोर्टली असे. महत्वाचे म्हणजे, पार्टीत सर्वपरिचित उंची मद्ये असत. तीही एक परंपरा. त्याचे पुन्हा वेगळे ब्रॅन्ड सांगायला नकोत. नव्वदच्या दशकात आणि मग पुढे मनोरंजन विश्वाचा पसारा वाढला. पार्ट्यांची निमित्ते वाढली. म्युझिक अल्बम, सिल्व्हर डिस्क, गोल्डन डिस्क, नवीन मालिका, त्याचे शे पाचशे एपिसोड झाले, नवीन चॅनलची सुरुवात, अवाॅर्ड नामांकने जाहीर अशी निमित्ते वाढली आणि ओशिवरा, गोरेगाव, सहार विमानतळ परिसरातील नवीन फाईव्ह स्टार हाॅटेलमध्येही आता या पार्ट्या थोड्या उशीरापर्यंत रंगू लागल्या. या सिस्टीमचाच तो एक भाग स्वभाव झाला. चिअर्स करत त्याचा आनंद घेणे ही या फिल्मी पार्टीची खासियत आणि शॅम्पेन हा हायपाॅईंट…. अर्थात, मिडियासाठी असलेली ओली पार्टी म्हणजे पब्लिसिटी फंडा हे सरळ गणित.
प्रिन्ट मिडियाच्या जोडीला चॅनल, डिजिटल मिडिया असे आले तरी फिल्मी पार्टीचे मुख्य सूत्र अथवा गाभा कायमच राहिला. एकूणच या पार्ट्या म्हणजे ‘दिखाऊगिरी’. आणि याच क्षेत्रातील खाजगी, अति खाजगी पार्ट्यांना ‘नो मिडिया’ हे अगदी स्वाभाविक आहे. हे व्यावसायिक जग आहे, उगाच कोणी कोणाला पार्टीला बोलवत नाही. स्टारला आणि पिक्चरला पब्लिसिटी हवी हाच एकमेव लक्ष्यपूर्वक हेतू. एकच झाले, या दशकात रेव्ह पार्टी , थीम पार्टी, बोट पार्टी असे कल्चर आले, ते फिल्मी मिडियापासून केवढे तरी दूर. ते नवकल्चर नवश्रीमंत उच्चभ्रू वर्गाचे! एक वेगळी लाईफ स्टाईल. त्यात काही स्टार… आजच्या भाषेत सेलिब्रेटिज असतात अशा आम्ही फक्त बातम्या वाचतो, पाहतो. आपली मर्यादा फिल्मी पार्टी आहे तर त्यातच ‘व्यवसायाचा एक भाग’ म्हणून वावरावे. फिल्मी पार्ट्यांतील मी अनुभवलेली काही वैशिष्ट्ये अशी, देव आनंद आपल्याला भेटलेल्या पत्रकाराला कायमच लक्षात ठेवे आणि पार्टीतही ओळख देई. आपल्या ‘सौ करोड’ फिल्मच्या निमित्ताने पाली हिलवरील आनंद रेकाॅर्डिंग स्टुडिओच्या हिरवळीवर आम्हा सिनेपत्रकाराना आवर्जून पार्टी दिली तेव्हा माझ्या लक्षात आले, संपूर्ण वेळ देवसाहेब हाती फक्त एकच पहिला ग्लास घेऊन आहेत आणि आपण पितोय अशी ॲक्टींग करताहेत.
‘कलिंगा’ या पडद्यावर न आलेल्या चित्रपटाच्या मुहूर्ताच्या पार्टीत दिलीपकुमारने आपले पहिले दिग्दर्शन म्हणून आम्हा प्रत्येक सिनेपत्रकाराची आवर्जून भेट घेतली. राजेश खन्ना वर्षातून एकदा मिडियाला पार्टी देताना आवर्जून असली स्काॅच पाजे आणि उंची फूड, जोडीला भरपूर गप्पा. माधुरी दीक्षित अगदी क्वचितच त्या काळात पार्टीला येई. ‘साजन’च्या सिल्व्हर ज्युबिली हिट पार्टी आली आणि ट्राॅफी घेऊन निघाल्याचे आठवतेय. तर ‘फूल’ सिनेमा पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राजेन्द्रकुमारने पाली हिलवरील आपल्या डिंपल बंगल्यावर पार्टी ठेवली असता माधुरी आपल्या आई बाबांसोबत आली, थोडा वेळ थांबली आणि आम्हा काही सिनेपत्रकाराना पाहत निघालीही. तेव्हा मिडिया अगदी कमी होता आणि घुसखोर फार नसत. ‘हीना ‘चा आम्हा सिनेपत्रकाराना आर. के. स्टुडिओतील मिनी थिएटरमध्ये प्रेस शो आयोजित केला आणि संपल्यावर तेथेच पार्टी असताना ती आर. के.च्या परंपरेला साजेशी अशी उंची होती. राजश्री प्राॅडक्सन्सच्या वतीने कधीही ओल्या पार्टीचे अर्थात मद्यपान सेवनाची पार्टी आयोजित केली नाही, त्यानी आपल्या कौटुंबिक सामाजिक चित्रपटांप्रमाणे टी पार्टीचे आयोजन केले.
फिल्मी पार्टीच्या अशा आणखी छान आठवणी आहेत. पुढे त्याचे कल्चर बदललं, गर्दी वाढली. रेड कार्पेट असा एक प्रकार आला. म्हणजे मेन पार्टीत मिडिया नाही, त्यानी एन्ट्रीजवर स्टारचे धडाधड फोटो काढायचे, त्यामुळे प्रत्यक्ष पार्टीत काय चाललयं हे समजणे, पाहणे दुरावत गेले, दुर्मिळ होत गेले. मनोरंजन क्षेत्रातील बदलत्या पार्टी कल्चरवर हा थोडक्यात फोकस. आता काही स्टार्सनी कोकेन, ड्रग्ज अशी नशिली व्यसने लावून घेतली, त्यात त्याना एन्जाॅयमेंट मिळतेय ही पूर्णपणे वेगळी संस्कृती आहे. ती सिनेमापासून दूर आहे. फिल्मी पार्ट्यांना कळत नकळतपणे बाजूला सारणारी आहे. बहुतेक ‘चांगल्या फिल्मी पार्ट्या’ या आता फ्लॅशबॅकमध्ये राहणार. काळच इतका आणि असा वेगाने बदलतोय की खुद्द काही फिल्मवाल्यानाच फिल्मी पार्ट्यांची परंपरा जुनी, अळणी, कोमट वाटण्याची शक्यता आहे. तेवढे आणि तसे ते पुढे गेलेत वाटते.