‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
चिकटगुंडे
पर्व : पहिले
प्लॅटफॉर्म : युट्यूब
कलाकार : सारंग साठे, श्रुती मराठे, हृषीकेश जोशी, स्नेह माजगावकर, सुहास शिरसाट, सुशांत घाडगे, गार्गी फुले-थत्ते, चैतन्य शर्मा, पुष्कराज चिरपुटकार आणि स्वानंदी टिकेकर
सारांश : टाळेबंदीच्यानिमित्ताने कित्येक नात्यांची परिमाणे बदलली. यातील काही बदलांचा मागोवा ही सिरीज घेते.
एक घर, त्यातील माणसे आणि एक निर्णय. मार्च महिन्यात एका घोषणेमुळे देशभरातील कुटुंबांच चित्र पार पालटून गेलं. खरतरं हल्लीच्या धावपळीच्या आयुष्यात कुटुंबाला वेळ देता येत नाही ही तक्रार प्रत्येकाची होतीच. त्यामुळे टाळेबंदीचा सुरवातीचा काळ हा प्रत्येकासाठी वेगळं अनुभव देणारा होता. एरवी दिवसातील अर्धातास पण एकमेकांसोबत घालवू न शकणारी कुटुंबातील मंडळी एकमेकांसाठी २४ तास हजर होती. मग कुठे फावल्या वेळात किचनमध्ये मेजवान्या रंगल्या, कुठे पत्त्यांचे डाव मांडले गेले, कुठे दिवाळीची साफसफाई आगाऊचं उरकली गेली तर कुठे नातेवाईकांच्या गप्पांचे फड व्हिडियो कॉलवर रंगले. पण हळूहळू लक्षात यायला लागलं, ही टाळेबंदी हनुमानाच्या शेपटीसारखी वाढतेच आहे. संपायचं नावच नाही. मग बोलायचे विषय आटले, किचनमधले जिन्नस संपायला लागले, पत्ते नकोसे वाटू लागले आणि मनामध्ये खोल दडलेल्या विषयांना हात लागले. काही अवघड, गुंतागुंतीचे, कुजबुजले किंवा दाबून टाकलेले संवाद आता थेट होऊ लागले. चिकटगुंडे नेमकं तेच करतात. अशाच काही अडखळलेल्या संवादांना वाट मोकळी करून देतात.
‘भारतीय डिजिटल पार्टी’ थोडक्यात ‘भाडीपा’ने गेल्या काही वर्षांमध्ये युट्युबवर मराठी चॅनेलसुद्धा यशस्वी होऊ शकत हे सप्रमाण सिद्ध केलं आहे. त्यामुळे त्यांनी स्वतःच्या युट्युब चॅनेलवर नव्या आणि पहिल्या वेबसिरीजची घोषणा केली तेव्हा उत्सुकता निर्माण होणं सहाजिकच होतं. मग सप्टेंबर महिन्याच्या दर रविवारी हे चिकटगुंडे हाजीर होऊ लागले. चार भागांची ही सिरीज वेगवेगळ्या जोडप्यांची कथा सांगते. प्रत्येकजण टाळेबंदीमध्ये अडकलेला. त्यांच्याकडील विषय वेगवेगळे आणि काही प्रमाणात आपल्याला विचार करायला लावणारे. पण हे सगळं गंभीरतेचा आव आणून सांगण्यापेक्षा नर्मविनोदाने हलक्याफुलक्या पद्धतीने मांडल्यामुळे त्यातील प्रत्येकजण आपल्यापैकी एक वाटू लागतो. पात्रांमधला जिवंतपणा जाणवू लागतो.
या सिरीजचं पहिलं जोडपं आहे साहिल आणि हीनाचं. लॉकडाऊनच्या सुरवातीच्या काळात मन रमविण्यासाठी पानचट विनोद, साहिलचे आईसक्रिमचे प्रयोग ते ओरेगामीचे धडे असे दोघांचे वेगवेगळे प्रयोग सुरु असतात. त्यात एकेदिवशी हिनाच्या आईने अर्धवट सांगितलेली भुताची गोष्ट अचानकपणे फ्लॅटची लाईट गेल्यामुळे साहिलपुढे जिवंत होते. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या विचित्र घटनांना तो भूताशी जोडू पाहतो आहे त्याची उडालेली भांबेरी पाहून हीना झाल्या प्रकारचा मनमुराद आनंद घेत असते. दर दुसरीकडे दरम्यानच्या काळात अभा आणि कार्तिक त्यांच्या लग्नाचा चौथा वाढदिवस साजरा करत असतात. बाहेर जातं येत नसलं तरी घरी साग्रसंगीतपणे हा दिवस साजरा करायचा म्हणून दोघांची तयारी सुरु असते. बोलण्याच्या ओघात आभा आपली मैत्रिणी आणि तिचा नवरा यांच्यातील ‘ओपन मॅरेज’चा करारबद्दल कार्तिकला सांगते. ‘नवराबायकोने परस्पर संमतीने केवळ शारीरिक सुखासाठी विवाहबाह्य संबंध ठेवले तर कदाचित त्यांचं पुन्हापुन्हा एकमेकांकडे येणं याचं निमित्त केवळ नात्यातील औपचारिक राहत नाही,’ हे त्या जोडप्याच मत जरी काही क्षणापुरत ग्राह्य धरलं, तरी दोघांमधील या तिसऱ्याच्या येण्याने येणारे परिणाम याची कार्तिक आणि अभामध्ये सुरु असते.
लग्नाचं एक वय येतं म्हणतात, जेव्हा त्याच्या आणि तिच्या नात्यातील नाविन्य उलटून जातं. शक्यतो हा टप्पा मुलांच्या जन्मानंतर येतो. गायत्री आणि सुहास त्यांच्या लग्नाच्या याचं टप्प्यावर असतात. पण त्यांच्यानात्यातील तारुण्य अजूनही संपलेलं नसतं. उलट टाळेबंदीमध्ये काही कारणाने एकमेकांपासून दूर राहावं लागत असल्यामुळे त्यांना एकमेकांबद्दल वाटणारी ओढ अजूनच तीव्र होते. त्यामुळे ‘फोन सेक्स’सारखा काहीसा धाडसी आणि नवखा प्रकार करायचा प्रयोग दोघे करू पाहत असतात. चौथ्या कथेतील ईशान आणि मानवच्या नात्यामध्ये अजूनही हे सगळे टप्पे यायचे असतात. शहरात समलिंगी जोडपं म्हणून राहताना त्यांना काहीच अडचण नसते फक्त ईशानच्या आईवडिलांच्या येण्यापर्यंत. पण एकदोन दिवसांच्या फेरीसाठी आलेले दोघे टाळेबंदीमुळे तिथेच अडकतात. अशावेळी त्यांना आपल्या नात्याबद्दल कळल तर त्यांची प्रतिक्रिया नक्की कशी असेल, याचा काहीही अंदाज नसल्याने ईशानची आपलं नात दोघांपासून लपविण्याची आणि त्यांना इथून लवकरात लवकर गावी पाठवण्याची धडपड सुरु असते.
कित्येकदा आपण सवयीचा भाग म्हणून एका नात्यामध्ये पाहत असतो. एखादी विषयावर समोरच्याची काय प्रतिक्रिया असेल, याबद्दल त्याला थेट विचारण्याऐवजी आपणच काही गृहीतक मांडून मोकळे होतो. मग तो संवाद हळूहळू आखडत जातो. या टाळेबंदीच्या काळामध्ये निमित्त म्हणून का होई ना लोकांना एकमेकांशी बोलायची संधी मिळाली. मनाच्या कप्प्यांमध्ये दडलेल्या संवादांना वाट मोकळी झाली. एखाद्या विषयाचा नवा पैलू पहाता आला. सशक्त नात्यासाठी अधनंमधनं हे करण गरजेच असतं. चिकटगुंडे नेमकं हेच सांगतात. नाट्याला पंधरा वर्ष होऊन गेल्यावर आपल्या जोडीदाराच्या मनात कधीतरी एका ओझरत्या क्षणी तिसऱ्या व्यक्तीबद्दल आकर्षण निर्माण होऊचं शकत किंवा गावात राहणारे आईवडील म्हणजे समलिंगी संबंध त्यांच्या समजण्यापलीकडेच असणार अशा समजुतींना धक्का देण्याच काम सिरीजमध्ये केलं आहे. पण हे करताना संवादातून कोणताही आदर्शवाद किंवा ड्रामा व्यक्त होत नाही. तुमच्याआमच्यामध्ये घडणारे रोजचे संवाद पात्रांच्या तोंडीही येतात. त्यामुळे या कथा जास्तच जवळच्या वाटू लागतात.