‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
सिनेमाच्या सुवर्णयुगाची सुरूवात करणाऱ्या ‘राजा हरिश्चंद्राचा’ प्रवास……
व्यक्तीची इच्छाशक्ती उचित मार्गाला असते त्यावेळी त्याच्या हातून काहीतरी दिव्य नक्कीच घडतं. याचंच उदाहरण म्हणजे दादासाहेब फाळके आणि पहिला मूकपट ‘राजा हरिश्चंद्र’ (Raja Harishchandra) दादासाहेब फाळके यांनी पूर्णपणे भारतीयांच्या सहभागाने मुंबईतील कॉरोनेशन थिएटरमध्ये 3 मे 1913 रोजी सादर केलेला ‘राजा हरिश्चंद्र’ हा देशातील पहिला मूकपट ठरला.
चित्रपटसृष्टीची चंदेरी दुनियाची त्याचबरोबर चित्रनगरी फिल्मसिटीची ओळख भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासोहब फाळके (Dadasaheb Phalke) त्यांचा जन्म ३० एप्रिल १८७० साली झाला. दादासाहेबांना लहानपणापासूनच वेगवेगळ्या कला शिकण्याची आवड होती. त्यामुळे मराठा हायस्कूल, मुंबई येथे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १८८५ मध्ये त्यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स येथून एक वर्षाचा चित्रकलेचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला.
दादासाहेबांनी मुंबईमध्ये लाईफ ऑफ जिझस ख्राईस्ट (म. शी. ‘ख्रिस्ताचे जीवन’) हा मूक चित्रपट पाहिला आणि त्यांच्या आयुष्यातले ध्यासपर्व सुरू झाले. स्वदेशी चित्रपट बनवायचा या विचाराने त्यांना झपाटून टाकले. भारतीय इतिहासातील महान व्यक्तिमत्त्व असलेल्या श्रीकृष्णाच्या जीवनावरही असाच चित्रपट बनवायचा ध्यास घेऊन अथक प्रयत्नांनी त्यांनी लंडनला जाऊन चित्रपटविषयक तांत्रिक ज्ञान मिळवले. तेथे आवश्यक यंत्रसामग्री आणि कच्चा माल मागविण्यासाठी नोंदणीही केली व ते भारतात परतले. जून-जुलैमध्ये रोपट्याची वाढ हा एका मिनिटाचा लघुपट तयार केला आणि काही निवडक व्यक्तींना दाखवला.
सरस्वतीबाई या दादासाहेब फाळके यांच्या पत्नी. दादासाहेबांचा पहिला चित्रपट बनवण्यात त्यांचा मोलाचा सहभाग होता. चित्रपटाच्या निर्मितीखर्चासाठी सरस्वतीबाईंनी आपले सोन्याचे दागिने विकले. त्या फिल्म डेव्हलपिंग, मिक्सिंग आणि फिल्मवर रसायनांचा उपयोग शिकल्या. शूटिंगच्या वेळी कॅमेरा असिस्टंट, स्पॅाट बॅाय, सूर्याच्या उन्हासाठी रिफ्लेक्टर धरून उभे राहणे आदी कामे करीत. त्या फिल्म निर्मितीसाठी कामावर ठेवलेल्या लोकांच्या राहण्याची, आरामाची सोय करणे, आणि त्यावरही ६०-७० लोकांचा स्वयंपाक करीत व त्यांचे कपडेही धुवीत. सरस्वतीबाईं फाळके यांना राजा हरिश्चंद्र या पहिल्या चित्रपटासाठी तारामतीची भूमिका करण्यासाठी विचारले होते. पण मग कामांचे काय या विचाराने त्यांनी नकार सांगितला. सरस्वतीबाईंनी जर मदत केली नसती तर भारतातला पहिला चित्रपट बनणे अशक्यप्राय होते.
भांडवलासाठी पत्नीचे दागिनेही त्यांनी गहाण टाकले. लेखक, छायालेखक, रंगवेशभूषाकार, कलादिग्दर्शक, दिग्दर्शक, रसायनकार, संकलनकार इ. सगळ्या भूमिका दादासाहेबांनीच पार पाडल्या. आपल्या चित्रपटासाठी त्यांना स्त्रीकलावंतही मिळू शकली नाही. अशा अडचणी असूनही फाळक्यांनी मुंबई येथील दादरच्या प्रमुख मार्गावर आपले चित्रपटनिर्मितिगृह सुरू केले आणि भारताचा पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्रसहा महिन्यांत पूर्ण करून तो मुंबईच्या त्यावेळच्या सँड्हर्स्ट रोडवरील नानासाहेब चित्रे यांच्या कोरोनेशन थिएटरमध्ये ३ मे १९१३ रोजी प्रदर्शित केला. हा चित्रपट एकूण २३ दिवस चालला. दादासाहेब पडदा आणि प्रक्षेपक घेऊन गावोगाव जात व चित्रपट दाखवीत.
=====
हे देखील वाचा: दादासाहेब फाळके भारतीय चित्रपटाचे जनक
=====
1913 साली आजच्याच दिवशी हा मूकपट रिलीज झाला होता. मर्यादित संसाधनात बनवलेला हा सिनेमा आजही भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. या पहिल्या सिनेमाचं बजेट होतं 20 हजार रुपये. उसने घेतलेल्या पैशातून दादासाहेबांनी लंडनहून चित्रिकरणाचं सामान आणलं. त्यानंतर कास्टिंग हे देखील आव्हान होते. त्याकाळी स्त्रिया सिनेमात काम करत नसल्याने तारामतीच्या भूमिकेसाठी चहावाल्याची निवड करण्यात आली. इतक्या सगळ्या प्रयत्नानंतर अखेर हा मूकपट बनला आणि भारतीय सिनेमाच्या सुवर्णयुगाचा उदय झाला.
शब्दांकन – शामल भंडारे.