‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
चश्म-ए-बद्दूर: सई परांजपेंचा मास्टरपीस
साल १९८१. सरत्या दशकात राजेश खन्नाच्या ‘सुपरस्टार’पदाचा अस्त आणि अमिताभ बच्चन नामक ‘अँग्री यंग मॅन’चा उदय प्रेक्षकांनी ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवला होता. ‘हाथी मेरे साथी’, ‘आनंद’ पासून ‘शोले’, ‘अमर अकबर अँथनी’ ते ‘द बर्निंग ट्रेन’, ‘कुर्बानी’पर्यंतचं स्थित्यंतर प्रेक्षकांना ऐंशीच्या दशकात पाहायला मिळालं. गोडगुलाबी प्रेमकहाणीला दमदार ऍक्शनचा तडका, त्यात चिमूटभर विनोदी प्रसंग आणि पसाभर अनावश्यक गाणी ही प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची नवी व्याख्याच बनून गेली. ‘लार्जर दॅन लाईफ’ नायक आणि नायिकांचा सुळासुळाट सुरु झाला. बॉक्स ऑफिसवरील घवघवीत यशाचा हा ठरलेला ठोकताळा मोडायला दिग्दर्शिका सई परांजपे (Sai Paranjpye) पुढे सरसावल्या आणि ‘चश्म-ए-बद्दूर’ (Chashme Buddoor) सारखा कल्ट सिनेमा त्यांनी प्रेक्षकांसमोर आणला. दीप्ती नवल, फारूक शेख, राकेश बेदी आणि रवी बसवानी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात सईद जाफरी, लीला मिश्रा व विनोद नागपाल यांनी सहायक भूमिकेत रंग भरला होता. सई परांजपेंच्या विनंतीला मान देऊन अमिताभ आणि रेखानेही यात पाहुण्या कलाकारांच्या भूमिका साकारल्या.
कथेबद्दल सांगायचं झालं तर, तीन अविवाहित तरुण मित्रांच्या (ओमी, जोमो आणि सिद्धार्थ) आयुष्यात एक तरुणी (नेहा) येते आणि तिघांचंही आयुष्य बदलून जातं, हेच काय ते चित्रपटाचं कथानक. पण दिग्दर्शिकेच्या कथाकथनाची शैली प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते. तत्कालीन चित्रपटांच्या जनमानसावर असलेल्या प्रभावावर हा सिनेमा खुमासदार पद्धतीने हलकंफुलकं भाष्य करतो. या चित्रपटातले कित्येक प्रसंग आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. मग ते नेहाच्या चमको ब्रँडची जाहिरात असो, उधारीच्या बदल्यात ऐकवलेल्या शायऱ्या असोत, ओमी आणि जोमोने मुली पटवण्यासाठी केलेली धडपड असो वा ओमी, जोमो आणि सिद्धार्थच्या रूममध्ये घडणारे किस्से, सईजींनी प्रत्येक प्रसंग अतिशय उत्तमरित्या खुलवला आहे.
या चित्रपटात एक पॅरडी साँग आणि इतर सहा गाणी असून, ती सर्व आजही तितकीच प्रेक्षणीय आणि श्रवणीय आहेत. प्रसंगानुरूप येणारी ही गाणी अधिकच मनोरंजक वाटतात कारण या सर्वच गाण्यांना हलकीशी विनोदाची झालर आहे (अपवाद: कहा से आए बदरा आणि आँसूँ की आरती). सईजींनी तत्कालीन टिपिकल फिल्मी गीतांना चिमटे काढत ही गाणी पडद्यावर साकारली आहेत. पॅरडी साँग वगळता इंदू जैन यांनी लिहलेल्या या इतर सहाही गाण्यांना राज कमल यांनी संगीतबद्ध केलं आहे व हेमंती शुक्ला, शैलेंद्र सिंग, आनंद कुमार, हरीहरन आणि येसूदास इत्यादी गायकांनी ती गायली आहेत. चला तर जाणून घेऊयात यातील काही सुप्रसिद्ध गाण्यांविषयी…
इस नदी को मेरा आईना मान लो
हे गाणं नेहा (दिप्ती नवल) आणि ओमीवर (राकेश बेदी) चित्रित झालेलं आहे. शैलेंद्र सिंग आणि हेमंती शुक्ला यांनी स्वरबद्ध केलेल्या या गाण्यावर उर्दू साहित्याचा प्रभाव जाणवतो. चोवीस तास शायरीत आकंठ बुडालेल्या ओमीचा स्वभाव या गाण्यातून अधोरेखित केला जातो.
करना था इन्कार (पॅरडी साँग)
‘जब जब फूल खिले’, ‘मुग़ल ए आज़म’, ‘जी चाहता हैं’, ‘साहिब, बीबी और गुलाम’, ‘आशा’, ‘तीसरी मंझिल’, ‘राजकुमार’, ‘कुर्बानी’, ‘पेईंग गेस्ट’, ‘अनामिका’, ‘दाग’ आणि ‘मिलन’ या चित्रपटांमधील लोकप्रिय गाण्यांच्या काही ओळी एकत्र करून तयार झालेलं हे गाणं नेहा आणि जोमोवर (रवी बसवानी) चित्रित झालेलं आहे. जोमोची या गाण्यात उडणारी भंबेरी पाहून प्रेक्षकांना हसू आवरत नाही.
काली घोडी द्वार खडी
राजकमल हे त्यांच्या शास्त्रीय संगीताच्या आकर्षणाबद्दल ओळखले जातात. आपण कम्पोझ केलेल्या प्रत्येक अल्बममध्ये एकतरी शास्त्रीय संगीतावर आधारित गाणं असावं याकडे त्यांचा विशेष कल होता. या गाण्यामध्ये काफी, मालकंस, जौनपुरी आणि भैरवी या रागांचा समावेश आहे. शास्त्रीय संगीताचा हा एक उत्तम नमुना असला तरी या गाण्याला विशेष असा काही अर्थ नसून फक्त आणि फक्त सिद्धार्थ (फारूक शेख) चालवत असलेल्या काळ्या रंगाच्या येझदी बाईकसाठी हे गाणं बनवलं गेलं आहे!
कहाँ से आए बदरा
या चित्रपटातील सर्वाधिक गाजलेलं गाणं. साधारणतः प्रत्येक हिंदी चित्रपटात नायक आणि नायिकेमध्ये दुरावा निर्माण झाल्यावर जे विरहगीत दाखवलं जातं, त्याचाच हा एक प्रकार. पण याची शब्दरचना, चाल, संगीत आणि चित्रण फारच प्रभावी ठरलं असून, चित्रपट संपल्यानंतरही हे गाणं सतत रुंजी घालत राहतं. मेघ रागावर आधारित असलेलं हे गाणं क्षणार्धात प्रेक्षकांना एका वेगळ्याच भावविश्वात नेऊन पोहोचवतं. साक्षात ‘देवाचा आवाज’ असलेल्या येसूदासांच्या स्वरातील सर्वोत्तम हिंदी गीतांमध्ये या गाण्याचं नाव आवर्जून घेतलं जातं.
या गाण्यांशिवाय ‘आँसूँ की आरती’, ‘कैसे हो पागल’, आणि ‘प्यार लगावत प्रणय मुहब्बत’ या गाण्यांनाही प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. या गाण्यांमधील जुन्या आणि स्वच्छ दिल्लीचं रूप पाहून अस्सल दिल्लीकर आजही हळहळतात. कसलीही अश्लीलता नसलेला, विकृती आणि अतिरंजितपणा नसलेला हा चित्रपट प्रेक्षकांना विशेष भावला. नारळाच्या करवंटीचा अॅश ट्रे, रूमच्या भिंतींवर ज्याच्या त्याच्या स्वभावानुसार लावलेले पोस्टर्स, मित्रांमधल्या उसनवाऱ्या पाहून अनेकांना आपापल्या कॉलेजच्या आठवणींत रमायला हा चित्रपट भाग पाडतो. प्रत्येकालाच आपल्या सोनेरी भूतकाळात रममाण करणाऱ्या या दर्जेदार कलाकृतीला आज ४० वर्षे पूर्ण झाली. हा चिरंतन मनोरंजनाचा ठेवा प्रेक्षकांना बहाल केल्याबद्दल सई परांजपेंना कलाकृती मिडीयाचा मानाचा मुजरा!!