मिलिंद गवळींनी ‘समृद्धी’ बंगल्यातून बाहेर पडताना आठवण म्हणून नेली ‘ही’
जंजीर: फ्लॉप अमिताभचा दणदणीत विजय
प्रकाश मेहरा प्रोडक्शनची पहिलीच निर्मिती आणि प्रकाश मेहरा (Prakash Mehra) दिग्दर्शित पाचवा चित्रपट ठरलेला ‘जंजीर’ (Zanjeer) बॉलीवूडमध्ये ॲक्शनपटांची लाट घेऊनच आला आणि याला कारण होतं त्यातून निर्माण झालेलं ‘अँग्री यंग मॅन’ नावाचं वादळ! अमिताभ बच्चन, जया, प्राण, ओम प्रकाश आणि अजित इत्यादी कलाकारांचा भरणा असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफीसवरही यशस्वी ठरला होता. कल्याणजी-आनंदजी या जोडगोळीने ‘जंजीर’साठी संगीत दिलं होतं तर गुलशन बावरा यांनी लिहलेल्या गाण्यांना मन्ना डे, आशा भोसले, लता मंगेशकर आणि मोहंमद रफी यांनी आपला आवाज दिला होता.
हा चित्रपट जितका मनोरंजक आहे, तितकीच त्याच्या बनण्याची कहाणीही रंगतदार आहे. चला तर जाणून घेऊयात ‘जंजीर’चे काही खास किस्से..
मोठमोठ्या स्टार्सनी नाकारलेला जंजीर!
जंजीरची स्क्रिप्ट धर्मेंद्रने लेखक सलीम-जावेद (Saleem Javed) यांच्याकडून आधीच विकत घेऊन ठेवली होती, पण नंतर ‘समाधी’च्या स्क्रिप्टच्या बदल्यात ती त्याने राकेश मेहरांना देऊ केली. त्याचवेळी मेहरांनी त्याच्याकडून विजयच्या रोलसाठी तारखाही मागितल्या होत्या वर स्वतः धर्मेंद्रनेच सहनिर्माता बनावे, अशी इच्छाही व्यक्त केली होती, जी धर्मेंद्रने मान्य केली. यानंतर नायिकेच्या भूमिकेसाठी मुमताजच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. पण कालांतराने धर्मेंद्र ही फिल्म करायचं टाळू लागल्यावर मेहरांनी त्याच्याशी बोलून हा करार मागे घेतला आणि देव आनंदला विजयची भूमिका देऊ केली. मात्र चित्रपटात आपल्यासाठीही गाणी हवीत हा देव आनंदचा हट्ट त्यांना पटला नाही, त्यामुळे ते त्यांची ऑफर घेऊन राजकुमारकडे गेले. राजकुमार तेव्हा मुमताजसोबतच मद्रासमध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होते. त्यांना स्क्रिप्ट आवडली आणि त्यांनी मेहरांना मद्रासमध्येच हा चित्रपट शूट करायला सांगितलं पण मेहरांचा मुंबईमध्येच जंजीर बनवण्याचा निर्णय असल्याने, त्यांनी या फिल्ममधून माघार घेतली. त्यानंतर राजेश खन्ना यांनीही गाणी नसल्याने आणि दिलीपकुमार यांनीही भूमिकेत दम नसल्याचे सांगत काम करण्यास नकार दिला.
विनोदी चित्रपटातून मिळाला तडफदार ॲक्शन हिरो!
मोठमोठ्या स्टार्सने या फिल्मकडे पाठ फिरवल्यावर मेहरा अडचणीत सापडले होते पण यावेळी लेखक सलीम-जावेद व अभिनेते प्राण (Pran) त्यांच्या मदतीला धावून आले. तिघांच्या सांगण्यावरून त्यांनी मेहमूदने दिग्दर्शित केलेला ‘बॉम्बे टू गोवा’ पाहिला आणि त्यांना अमिताभची भूमिका प्रचंड आवडली. क्लबमध्ये शत्रुघ्न आणि त्याच्या साथीदारांची बेदरकारपणे धुलाई करणाऱ्या अमिताभच्या नजरेत त्यांना विजयच्या भूमिकेसाठी आवश्यक असलेले भाव दिसले आणि अमिताभच्या नावावर शिक्कामोर्तब केलं गेलं.
कोण होणार फ्लॉप हिरोची हिरोईन?
‘जंजीर’ येईपर्यंत ‘आनंद’ आणि ‘बॉम्बे टू गोवा’ वगळता अमिताभचा (Amitabh Bachchan) एकही चित्रपट हिट झाला नव्हता. नावाजलेल्या स्टार्सला नकार देऊन तब्बल बारा फ्लॉप चित्रपटांचा हिरो प्रकाश मेहरांनी आपल्या फिल्ममध्ये घेतल्याने त्यांचं दिवाळं निघणार, अशी उलटसुलट चर्चा इंडस्ट्रीत होऊ लागली. त्यात मुमताजनेही ऐनवेळी आपल्या लग्नाचं कारण पुढे करत चित्रपटातून माघार घेतल्याने मेहरा खचून गेले. आपलं फ्लॉप करिअर हेच मुमताजच्या माघार घेण्याचं कारण असल्याचं अमिताभलाही माहित होतं आणि दुसरी कोणतीही अभिनेत्री त्याच्यासोबत काम करण्याची रिस्क घेऊ इच्छित नव्हती, त्यामुळे तोही निराश झाला होता. त्यावेळी अभिनेत्री जया भादुरी हिला मेहरा आणि अमिताभकडून नायिकेच्या भूमिकेसाठी विचारण्यात आलं आणि तिने लगेच आपला होकार कळवला.
अभिनेते ‘प्राण’ ठरले चित्रपटाचा प्राण!
सुरुवातीला आपल्या खलनायकी भूमिकांसाठी नावाजले गेलेले आणि ‘जंजीर’ येण्यापूर्वी चरित्र अभिनेत्याच्या भूमिकेत स्थिरावू पाहणारे प्राण यांनी ‘आन बान’ (१९७२) नंतर पुन्हा एकदा ‘जंजीर’च्या निमित्ताने प्रकाश मेहरांशी हात मिळवणी केली. अमिताभचं नाव विजयच्या भूमिकेसाठी सुचवण्यातही त्यांचाच हात होता. खरंतर, प्राण यांनी भूमिका स्वीकारली असली तरी आपल्यावरील गाण्याच्या चित्रणासाठी ते तयार नव्हते. त्यासाठी त्यांनी पहिल्याच दिवशी सेट सोडून जायची धमकीही दिली तेव्हा मेहरांनी कसोशीने प्रयत्न करून त्यांची मनधरणी केली आणि चित्रणासाठी राजी केलं. या चित्रपटाच्या निर्मितीचा खर्च भागावा यासाठी मेहरांनी भरपूर कर्ज घेतल्याची जाणीव असल्याने प्राण यांनीही चित्रणाला हिरवा कंदील दाखवला आणि गायक मन्ना डेंनी गायलेली ‘यारी है इमान मेरा’ ही चित्रपटाची रंगत वाढवणारी अजरामर कव्वाली प्राण यांच्यावर चित्रित करण्यात आली.
‘कल्याणजी-आनंदजी’ जोडीचा ‘लक्ष्मीकांत प्यारेलाल’ने घेतला धसका!
‘जंजीर’ रिलीज झाला आणि त्याने बॉक्स ऑफिसवर झपाट्याने गल्ला जमवायला सुरुवात केली. अमिताभचा तेरावा फ्लॉप, मेहराचं दिवाळं वगैरे बाजारगप्पांना ‘जंजीर’च्या कमाईने कुलूप घातलं ते कायमचंच! मेहराच्या आधीच्या फिल्म्स चालल्या असल्याने वितरक आणि थिएटर मालकांनीही या नव्या चित्रपटाबद्दल सकारात्मक चित्र मनात बाळगलं होतं. रिलीजच्या दुसऱ्याच आठवड्यात पाच रुपयांचं तिकीट ब्लॅकमध्ये १०० रुपयांना विकलं जाऊ लागलं. त्याच सुमारास, ऋषी कपूर आणि डिंपल कपाडीयाचा ‘बॉबी’ही प्रदर्शनाच्या वाटेवर होता. कल्याणजी-आनंदजींनी संगीत दिलेल्या ‘जंजीर’च्या गाण्यांचा ‘बॉबी’च्या गाण्यांवर परिणाम होऊ नये, म्हणून संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी ‘जंजीर’च्या सर्वच कॅसेट्स आधीच विकत घेतल्या होत्या, असं प्रकाश मेहरा सांगतात.
आणि सुरु झाली ‘अँग्री यंग मॅन’ची राजवट!
“जबतक बैठनेको ना कहा जाये, शराफतसे खडे रहो।” म्हणत शेरखानची कानउघाडणी करणारा विजय प्रेक्षकांना विशेष भावला. प्रेक्षकांनी आणि मिडीयाने अमिताभला ‘अँग्री यंग मॅन’चा किताब बहाल केला. त्यानंतर अमिताभ नायक असलेल्या ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘दिवार’, ‘त्रिशुल’, ‘डॉन’, ‘काला पत्थर’, ‘अग्नीपथ’, ‘शोले’, ‘कालिया’, ‘कुली’, ‘मर्द’ अश्या कैक ॲक्शनपटांचा ‘सिलसिला’च सुरु झाला. आपल्यावर एकही गाणं चित्रित होऊ द्यायचं नाही, असं नृत्यात तरबेज नसलेल्या अमिताभने आधीच ठरवलं होतं आणि हाच पॅटर्न पुढे ‘दिवार’, ‘त्रिशुल’, ‘काला पत्थर’, आणि ‘अग्नीपथ’मध्येही राबवण्यात आला.
आज या चित्रपटाला ४८ वर्षे पूर्ण झाली आहेत. याच चित्रपटाने अमिताभची फ्लॉप कारकीर्द पुसून त्याला रातोरात प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवलं. मिळालेल्या संधीचा उत्तम फायदा घेत या फ्लॉप नायकाने स्वतःला घडवलं आणि या चित्रपटसृष्टीचा ‘महानायक’ ठरला!!