Diljit Dosanjh पंजाब इंडस्ट्री गाजवणारा दिलजीत दोसांझ ‘असा’ बनला बॉलिवूडमधील
Nana Patekar हिंदी, मराठी सिनेविश्वातील प्रतिभासंपन्न अभिनेते ‘नाना पाटेकर’
आज २०२५ वर्षातला पहिला दिवस. आजच्या दिवशी अर्थात १ जानेवारीला जायचे वाढदिवस असतील ते किती नशीबवान असतील ना. संपूर्ण जग त्यांच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करत असते. मात्र आता सगळ्यांचेच वाढदिवस या दिवशी येऊ शकत नाही. मात्र आजच्या दिवशी काही खास लोकांचे वाढदिवस नक्कीच साजरे केले जातात. (Bollywood Tadka)
हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या दमदार ठसा उमटवणारे प्रतिभावान अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांचा आज वाढदिवस. आज १ जानेवारीला नाना त्यांचा ७४ वा वाढदिवस साजरा करत आहे. नाना यांनी आपल्या प्रतिभेच्या जोरावर हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये आपली वेगळी ओळख तयार केली. ऍक्शन, कॉमेडी, थ्रिलर, निगेटिव्ह अशा सर्वच प्रकारच्या भूमिका त्यांनी अगदी लीलया साकारल्या आहेत. (Ankahi Baatein)
नानांची स्टाईल, नानाचे संवाद, नानाची ऍक्शन सर्वच प्रेक्षकांमध्ये खूपच लोकप्रिय आहेत. १ जानेवारी १९५१ रोजी विश्वनाथ पाटेकर अर्थात नाना पाटेकर यांचा मुरुड-जंजीरा येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म झाला. नाना यांनी चित्रपटांमध्ये साकारलेल्या सर्वच भूमिका लोकांमध्ये खूप प्रसिद्ध झाल्या. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या आयुष्याशी संबंधित काही न ऐकलेल्या गोष्टी. (Nana Patekar Birthday)
नाना पाटेकरांच्या वडिलांचे नाव दिनकर पाटेकर (Dinkar Patekar) चित्रकार होते. त्यांची आई संजनाबाई पाटेकर (Sanjanabai Patekar) गृहिणी होत्या. नाना पाटेकर यांना अशोक आणि दिलीप पाटेकर असे दोन भाऊ आहेत. मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स येथून नानांनी आपले शिक्षण पूर्ण केले. घराच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे नाना यांना वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षापासूनच काम करावे लागले होते. (Entertainment mix masala)
नाना हे नवव्या वर्गात शिकत असताना त्यांनी केवळ ३५ रुपये महिन्यावर नोकरी केली. या नोकरीत त्यांना ३५ रुपये आणि एक वेळचे जेवण मिळायचे. यासाठी नाना मुंबईत माटुंगा ते चुनाभट्टी हा नऊ किलोमीटरचा प्रवास पायी करायचे. नंतर कॉलेज जीवनात त्यांनी रंगभूमीवर काम केले. नानांना स्केचिंगची आवड आहे. गुन्हेगारांची ओळख पटवून देण्यासाठी नाना मुंबई पोलिसांना स्केच बनवून देत असे. नाना २८ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे हृदय विकारामुळे निधन झाले.
पुढे नाना मराठी रंगभूमीशी जोडले गेले. त्यानंतर त्यांनी हळूहळू नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. नाना यांनी अनेक दर्जेदार नाटकांमध्ये काम केले. त्यांनी अशोक सराफ यांच्यासोबत देखील नाटके केली. पुढे नाना पाटेकर यांनी १९७८ मध्ये ‘गमन‘ (Gaman) या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. नाना यांना या सिनेमानंतरही काहीच ओळख मिळाली नाही.
या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी नाना यांनी तब्बल आठ वर्षे संघर्ष करावा लागला. याकाळात ते मिळतील ती भूमिका करत असते. त्यात त्यांनी गिद्ध, भालू, शीला या सिनेमांमध्ये अभिनय केला. यापैकी एकही सिनेमा बॉक्स ऑफिसवर चालला नाही. पुढे नानांना पहिली मोठी संधी मिळाली ती १९८६ मध्ये आलेल्या ‘अंकुश‘ (Ankush) या सिनेमात.
‘अंकुश’ या सिनेमात नानांनी बेरोजगार तरुणाची भूमिका साकारली होती. त्यानंतर १९८७ मध्ये एन. चंद्रा यांच्या ‘प्रतिघात’मध्ये एकदा काम करण्याची संधी मिळाली. १९८९ मध्ये रिलीज झालेला ‘परिंदा’ (Parinda) हा सिनेमा नाना पाटेकर यांच्या सिने करिअरमधील हिट सिनेमांमध्ये गणला जातो. या सिनेमातील त्यांची नकारात्मक भूमिका कमालीची गाजली. यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही (National Award) मिळाला होता.
त्यानंतर नाना पाटेकर यांनी मागे वळून पाहिले नाही. १९९२ मध्ये रिलीज झालेला ‘तिरंगा’ या सिनेमात त्यांनी मुख्य अभिनेता साकारला. मुख्य अभिनेता म्हणून त्यांच्या सिने करिअरमधील पहिला सुपरहिट सिनेमा आहे. १९९६मध्ये रिलीज झालेल्या ‘खामोशी’ या सिनेमात त्यांनी मनीषा कोइरालाच्या मूकबधिर वडिलांची आव्हानात्मक भूमिका उत्कृष्टरीत्या साकारली. नानांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर चार फिल्मफेअर आणि तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकले आहेत.
नाना यांचे लग्न अभिनेत्री नीलकांती (Nilkanti Patekar) यांच्यासोबत झाले. लग्नाच्या वेळी नाना महिन्याला साडे सातशे रुपये कमवायचे. तर नीलकांती या एका बँकेत नोकरीला होत्या, त्यांना त्याकाळात दरमहा अडीच हजार रुपये पगार होता. ”तुला जे काम करायचे ते कर मी घर सांभाळेल, असे नीलकांती मला म्हणाली होती. म्हणून मी आज जो काही आहे, तो नीलकांतीमुळे आहे”, असे नाना सांगतात.
नाना यांना एक मुलगा असून त्याचे नाव मल्हार पाटेकर (Malhar Patekar) आहे. पण मल्हारच्या जन्मापूर्वी नाना आणि नीलकांती यांना एक मुलगा झाला होता. पण जन्मानंतर काही दिवसांतच त्याचा मृत्यू झाला. नाना यांच्या पहिल्या मुलाच्या शरीरामध्ये काही दोष होते. जन्मताच त्याचा ओठ कापलेला होता, त्यामुळे नाना खूप निराश झाले होते. ते त्या मुलापासून लांब राहायचे आणि विचार करायचे असा मुलगा पाहून लोकं काय म्हणतील.
मात्र नंतर अश्या काही घटना घडल्या ज्यामुळे नाना यांना त्या मुलाबद्दल प्रेम वाटू लागले. नाना यांनी त्या मुलाला स्वीकारले. पण दुर्दैवाने खूप उशीर झाला होता. कारण तो मुलगा अडीच वर्षाचा असताना वारला. त्यानंतर नाना यांना अतीव दुःख झाले. पुढे काही काळाने त्यांना मल्हार नावाचा दुसरा मुलगा झाला. नाना यांचे वैवाहिक आयुष्य फारसे आनंदी राहिले नाही. काही काळ ते त्यांच्या पत्नीपासून विभक्त राहात असल्याचे मीडियामध्ये सांगितले जाते.
पहिल्या मुलाच्या मृत्यूनंतर नाना खूपच उदास झाले आणि त्यांना सिगरेट पिण्याची सवय लागली. त्यांनी कधी दारू नाही प्यायली मात्र ते खूप सिगरेट पिऊ लागले. दिवसाला ६० / ६० सिगरेट ते प्यायचे. त्यांच्या गाडीमध्ये या वासामुळे कोणीच बसत देखील नव्हते. मात्र त्यांच्या बहिणीच्या सांगण्यावरून त्यांनी सिगरेट सोडली.
त्याचबरोबर बिनधास्त आपले मत रोखठोक मांडणारा एक रांगडा गडी अशीही त्यांची प्रसिद्धी आहे. नानांनी दुष्काळग्रस्त शेतक-यांना ‘नाम‘ (Naam) या संस्थेमार्फत मदत केली. नाना सामाजिक तसेत राजकिय सर्वत्र बाबतील रोखठोक मत मांडतात. नानांच्या फिल्मी करिअर आणि सामाजिक कार्याविषयी त्यांच्या चाहत्यांना बरंच काही ठाऊक आहे.
=============
हे देखील वाचा : Yearend movies : यामुळे वर्षअखेरीस चित्रपट केले जातात प्रदर्शित !
=============
पाटेकर यांच्यावर अभिनेत्री तनुश्री दत्ताने सेक्शुअल हरॅसमेंटचे आणि मारहाणीचे आरोप लावल्याने खळबळ माजली होती. 2008 साली ‘ हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटादरम्यान नानांनी माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असभ्य वर्तन केले असा आरोप तिने केला होता. मात्र, नाना पाटेकर यांनी तनुश्रीचे आरोप खोटे असल्याचे सांगितले.