
Mohammed Rafi यांच्या दिलदारपणाचे आणि लोकप्रियतेचे किस्से
सिनेमासंगीताच्या इतिहासात मोहम्मद रफ़ी (Mohammed Rafi) यांच्या नावाशिवाय आपण तसूभरही पुढे सरकू शकत नाही. रफी यांच्या स्वराचे चाहते जसे आपल्या देशात होते तसेच ते जगभरात होते. रफींच्या स्वराला जात, धर्म, वंश, लिंग, राव, रंक कसलेली काहीही बंधन नव्हते. त्याचेच हे दोन किस्से.
४ फेब्रुवारी हा श्रीलंकेचा स्वातंत्रदिन. या सोहळ्याच्या निमित्ताने १९८० साली त्यांनी म. रफींना निमंत्रित केले होते. कोलंबोत एका मोठ्या संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला १२ लाख रसिकांची उपस्थिती होती. हा एक मोठा विक्रम होता. श्रीलंकेचे राष्ट्रपती जे आर जयवर्धने आणि पंतप्रधान प्रेमदासा हे दोघेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. खरं तर ते उद्घाटन करून लगेच निघणार होते पण रफींच्या धुंद स्वरांनी त्यांना खिळवून ठेवले. त्यांनी त्यांचे पुढील सर्व कार्यक्रम रद्द करून रफीच्या गीतांचा स्वरानंद घेतला. ज्या देशात, प्रांतात रफी गाण्याच्या कार्यक्रमात जात असे तिथल्या स्थानिक भाषेत एक गाणे नक्की गात असे. त्या दिवशी देखील रफी (Mohammed Rafi) यांनी सिंहली भाषेत एक गाणे गायले. त्यावेळी सारे प्रेक्षक इतके खुश झाले की त्यांच्या नाच गाण्याला आवर घालण्यासाठी पोलीसांना पाचारण करावे लागले! तिथले चाहते रफींचे प्रचंड चाहते होते. या कार्यक्रमानंतर पाच-सहा महिन्यातच ३१ जुलै १९८० रोजी रफी यांचे अकाली निधन झाले. श्रीलंकातील प्रत्येक नागरिक तेव्हा दु:खाच्या सागरात बुडाला होता.

रफी (Mohammed Rafi) यांचा दुसरा किस्सा काहीसा निराळा आणि गमतीचा आहे. म. रफी यांना बॉक्सिंगचे खेळ पाहण्याचा मोठा शौक होता. एकदा शिकागो येथे एका शोसाठी रफी गेले होते योगायोगाने तिथे त्या काळचा बॉक्सिंग चॅंपियन मोहम्मद अली तिथेच होता. रफींनी त्याला भेटण्याची इच्छा प्रकट केली. अलीची भेट मिळणं सोपं नव्हतं. पण वकीलातील अधिकार्यांनी जेव्हा ’तू जसा बॉक्सिंगमध्ये चॅंपियन आहेस तसेच रफीसाब गाण्यातील चॅंपियन आहेत’ असे सांगितल्यावर तो लगेच भेटायला तयार झाला व या दोन महान ’मोहम्मदांची’ भेट झाली. या दोघांची भेट अविस्मरणीय ठरली. या दोघांचा बॉक्सिंग पोझमधील एकमेकांना ठोसा लगावतानाचा फोटो त्या काळी खूप गाजला होता. म.रफी यांनी भारतातील सर्व भाषांमधून गायन केले.

त्यांनी दोन इंग्रजी गाणी देखील गायली आहेत. वस्तुत: ही गाणी म्हणजे त्यांनीच हिंदीत गायलेल्या दोन लोकप्रिय गीतांचा इंग्रजी अवतार आहे. हम काले है तो क्या हुआ दिलवाले हैं (गुमनाम) याचे ‘द शी आय लव्ह इज ब्यूटीफूल ब्यूटीफूल’ आणि बहारों फूल बरसाओ मेरा महबूब आया है (सूरज) याचे ‘ऑल दो वुई हेल फॉम डिफरंट लॅन्डस’ ही ती गाणी होती. दोन्ही गाणी हरींद्रनाथ चट्टोपाध्याय आणि लिहिली होती व संगीत शंकर जयकीशन यांचे होते!
३१ जुलै १९८० ला रफीचं (Mohammed Rafi) निधन झालं. १ ऑगस्टची सकाळ उजाडली ती हि वाईट बातमी घेवून. त्या दिवशी बी बी सी वर रफीला श्रद्धांजली वाहताना ही दोन इंग्रजी गाणी वाजवली गेली! रफींचा हा तिसरा किस्सा संगीतकार प्यारेलाल यांनी रेडिओवर सांगितला होता. आपल्या सिनेसंगीतात संगीतकरांच्या जोड्यांनी दिलेलं योगदान फार महत्वाचं आहे. साठच्या दशकात संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल (Laxmikant–Pyarelal) या द्वयीने बाबूभाई मिस्त्री यांच्या ‘पारसमणी’ या सिनेमातून पदार्पण केले. त्यापूर्वी जवळपास दहा वर्षे ते विविध संगीतकारांकडे सहायक म्हणून कार्यरत होते. ‘क्रिएटिव्ह’ काम करणारी, प्रत्येक वाद्यावर हुकमत असणारी आणि ‘ऑर्केस्ट्रेशन’ प्रकारात आपलं वेगळेपण सिद्ध करणारी, सर्वात जास्त चित्रपटांना संगीत देणारी जोडी अशी यांची ख्याती होती. त्यांचं यश हे त्यांच्या दोघांच्या एकत्रित कामाला होतं. त्यांची जोडी जमविण्याचा आशिर्वाद दिला होता Mohammed Rafi यांनी!

हा किस्सा आजच्या पीढीला सांगणं फार गरजेचं आहे यातून रफींसारख्या गायकाचे असामान्यत्व देखील अधोरेखीत होतं. त्याचं झालं असं की अनेक संगीतकारांकडे काम करीत असताना त्यांना पहिला चित्रपट मिळाला होता १९६१ साली कल्पतरू दिग्दर्शित करीत असलेला ’छैला बाबू’.आपल्या पहिल्याच सिनेमाकरीता रफीने गावं अशी त्यांची मनापासून इच्छा होती. ते दोघे रफी (Mohammed Rafi) यांच्याकडे गेले. ’हमारी इस पहली फिल्म मे हम आपसे गवाना चाहते है लेकीन आपको देनेके लिए हमारे पास पर्याप्त धन नही है’ असं पहिल्या भेटीतच त्यांनी सांगून टाकलं. रफीला त्यांनी त्या गजलेची ट्यून ऐकवली. रफीला ती चाल खूप आवडली पण त्यापेक्षा ही त्यांना या दोघांची जिद्द, संगीताविषयीची जाण आणि स्वभावातील प्रामाणिक निरागसता जास्त स्पर्श करून गेली. रफी यांनी सांगितले ’जो आप मुनासिब समझे. कब रेकॉर्डींग करनी है?’ लक्ष्मी-प्यारे दोघे खुश झाले.
=============
हे देखील वाचा : Saraswati Devi : कोणत्या संगीतकार महिलेला आपले नाव बदलून संगीत द्यावे लागले?
=============
असद भोपाली यांच्या गीताचे बोल होते. “तेरे प्यार ने मुझे गम दिया, तेरे गम की उम्र दराज हो” ही गजल रफी अगदी तन्मयतेनं गायला. (दुर्दैवाने हा सिनेमा पुरा व्हायला सात आठ वर्ष लागली व कसातरी रडत खडत १९६७ साली प्रदर्शित झाला) निर्मात्याकडून मिळालेल्या पैशातून त्यांनी रफीला एक हजार रूपये दिले. रफीने पैशाचा स्विकार केला व परत त्यांच्या हातात पैसे दिले.’ ये आप ही रखलो और आइंदा जिंदगी में इसी तरह मिल बाटकर खाओ’ रफीच्या मुखातून साक्षात परमेश्वरच बोलत होता. रफींचा आशिर्वाद त्यांनी आयुष्यभर पाळला. रफी (Mohammed Rafi) यांनी या जोडीकडे थोडी थोडकी नाही तर १७३ सिनेमातून ३६९ गाणी गायली. या दोघांची जोडी फोडण्याचा हितशत्रूंनी बराच प्रयत्न केला पण रफीचा आशिर्वाद त्यांच्या पाठीशी खंबीर होता त्या मुळेच लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर आणि प्यारेलाल रामप्रसाद शर्मा. ६३५ चित्रपटांना संगीत देणारे हे ‘जिगरी दोस्त’ १९६३ ते १९९८ म्हणजे तब्बल ३५ वर्षे एकत्र काम करीत होते.