सिनेमाचा इंटरव्हल पाॅईंट कसा असावा?
पटकथेतील टर्न ॲण्ड ट्वीस्टवर तो यावा आणि इंटरव्हलनंतर या चित्रपटात काय बरे पाह्यला मिळेल हा मेंदूला प्रश्न पडायला हवा. ‘सिनेमाच्या या मधल्या सुट्टीत’ लघुशंका करायची असो अथवा पाॅपकाॅर्न साॅफ्ट ड्रिंक घेणे असो, सिगारेट ओढणे असो या सगळ्यात कधी बरे सीटवर जाऊन बसतोय आणि सिनेमा पाहतोय असं व्हायला हवे… पण हाच इंटरव्हल ‘एक वर्षाचा लंबा असेल तर?’
कोरोनाने मनोरंजन उद्योगाला जणू एक वर्षाचा मोठा इंटरव्हल अनुभवावयास लागला आहे. एक प्रकारचा हा स्पीडब्रेकरच आहे. मार्च २०२० ते मार्च २०२१ आणि आता पुढचा आणखीन कालावधी सगळे विश्वच जणू विस्कळीत करणारे आहे. त्याला मनोरंजन विश्व अपवाद कसे ठरेल?
या वर्षभरचा कोरोना काळ गती मंदावणारा आहे. या काळातील मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीवर “फोकस” टाकताना काय दिसतेय? भविष्याची चिंता दिसतेय. ‘पुन्हा पहिल्यासारखे सुगीचे दिवस येतील’ हा आशावाद कितीही सकारात्मक असला तरी नेमके काय होईल याचे उत्तर तेव्हाच मिळेल. ते सकारात्मक असावे इतकेच. मराठी असो अथवा हिंदी चित्रपट त्यांच्या निर्मितीच्या संख्येत घट झालेली दिसत नाही. ऑक्टोबरपासून लाॅकडाऊन शिथिल झाला आणि नवीन मराठी चित्रपटाच्या घोषणा, मुहूर्त, शूटिंग यांच्या बातम्या सातत्याने येऊ लागल्या. ‘झिम्मा’, ‘बळी’ या मराठी चित्रपटाच्या रिलीजची तारीख निश्चित झाली. हिंदीत ते ‘सूर्यवंशी’, ‘८३’ या बहुचर्चित चित्रपटांबाबत झाले.
पण आता प्रश्न आहे की, चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची झुंबड कधी उडणार? मालेगावमध्ये ‘मुंबई सागा’ हा चित्रपट पहायला कोरोनाचे कोणतेही नियम न पाळता जबरदस्त गर्दी झाली हे एका अर्थी चिंताजनक आहे. पण त्याच वेळी त्यातून सूचित होते की, प्रेक्षक पुन्हा एकदा थिएटरमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत. दक्षिणेकडील प्रादेशिक चित्रपटांना मिळत असलेल्या रिस्पॉन्सवरुन आशादायक चित्र निर्माण होत आहे, पण तरीही प्रश्न आहे की, महाराष्ट्रात हिंदी आणि मराठी चित्रपटांना पहिल्यासारखा धुंवाधार रिस्पॉन्स कधी मिळणार? सध्याची परिस्थिती पाहता सगळी सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थिती सुरळीत व्हायला आणखीन किमान तीन महिने तरी लागतील असे वाटते. त्यानंतर एकाच शुक्रवारी अनेक चित्रपट रिलीज होत राहतील आणि त्यातला नेमका कोणता चित्रपट पाह्यचा असा रसिकांसमोर प्रश्न असेल. आणि तेव्हा ‘एकाच शुक्रवारी इतके चित्रपट रिलीज करु नका हो’ असेही म्हणता येणार नाही.
मराठी रंगभूमीने मात्र पन्नास टक्के प्रेक्षक संख्या या नियमाचे पालन करत आपली वाटचाल सुरु ठेवली. आर्थिकदृष्ट्या ते शक्य असले तरी चित्रपटगृहाचे अर्थकारण हा कायमच अनाकलनिय विषय राहिला आहे. (थिएटरमध्ये एकेका शोला जेमतेम आठ दहा प्रेक्षक असूनही पहिल्या तीन दिवसांत काही कोटींची कमाई कशी होते हे कोडे सोडविण्यापेक्षा चित्रपट पहावा. माझा कधीच या आकड्यांवर विश्वास नव्हता. गिरगावात लहानाचा मोठा होताना दक्षिण मुंबईतील सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये हाऊसफुल्ल गर्दीत पिक्चर एन्जाॅय करायचे एवढेच मला माहित. मी त्या कल्चरमध्ये वाढलोय आणि विश्वास ठेवतोय. एखाद्या चित्रपटाने शे पाचशे कोटी कमावल्याने माझ्या आनंदात भर ती काय पडणार?) वर्षभरच्या इंटरव्हलमध्ये काही गोष्टी गाजल्या.
ओटीटी प्लॅटफॉर्मवर अर्थात तिसरा पडदा पध्दतीने चित्रपट पाह्यची सवय वाढत गेली. काही चित्रपट (गुलाबो सिताबो) थेट ओटीटीवर आले. अगदी सोनाली कुलकर्णीची भूमिका असलेला ‘पेन्शन’ हा मराठी चित्रपटही ओटीटीवर पाह्यला मिळतोय. ओटीटीवर चित्रपट हिट झाला की फ्लाॅप यावरही फोकस टाकला जातो. ओटीटीवर एकदा का चित्रपट आला की तो प्रेक्षक आपल्या सवडीनुसार पाहत असतो. त्याला तो चित्रपट आवडला की नाही हे जास्त महत्वाचे आहे. प्रत्येक गोष्टीत हिट की फ्लाॅप याची फोड करायची गरज काय? माध्यम बदलले त्यानुसार चित्रपटाच्या यशापयशाचेही मोजमाप बदलायला हवे. पूर्वी ते गुणवत्तेनुसार होते. आणि तेच तर महत्वाचे आहे ना? गुरुदत्तचा ‘कागज के फूल’, राज कपूरचा ‘मेरा नाम जोकर’ हे चित्रपट फस्ट रनला यश मिळवू शकले नाहीत, तरी गुणवत्तेच्या जोरावर ते रिपिट रनला अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळवण्यात यशस्वी ठरले.
आज ओटीटीवर काही जुने तर काही गेल्या काही वर्षांतील चित्रपट जस जसे पाह्यला मिळताहेत तसं तसे चित्रपट रसिक खुश होताहेत. हीच बदलती सवय थिएटरमध्ये येण्यापासून कदाचित दूर नेऊ शकते. ओटीटी प्लॅटफॉर्म खरं तर काही वर्षांपूर्वीच उपलब्ध झाला आहे, त्याचे अस्तित्व आणि महत्व या वर्षभरचा अधोरेखित झाले. त्यात पुन्हा एकदा चित्रपट आपल्याला गुंतवून ठेवण्यात अपयशी ठरतोय असे जाणवायला लागले की त्याला लॅपटॉपवरच ठेवून आपण आपल्या इतर कामासाठी वेळ देऊ शकतोय. वर्क फ्राॅम होमने जगण्याची बदललेली सवय आता घरातच सिनेमा पाहूयात याच्याशीही अधिकाधिक जोडली जाऊ शकते आणि वीकेंडला छोटीशी फॅमिली पिकनिक आणि हाॅटेलींग यांना महत्व येऊ शकते. वर्षभरच्या इंटरव्हलने हे स्थित्यंतर घडवले. वेबसिरिजचा वाढता प्रेक्षकवर्ग आणि त्याबरोबरच वाढती निर्मिती यालाही याच इंटरव्हलमध्ये महत्व आले आहे.
बदल हा होतंच असतो आणि होणारच असतो. त्याला कोरोना हे एक अतिशय मोठे कारण ठरले आहे. मनोरंजन क्षेत्राला या कोरोनाचा मोठाच सेटबॅक बसला आहे. छोट्या चित्रपटाच्या निर्मात्यांच्या समस्या खूपच आहेत. टूरिंग टाॅकीज, तंबू थिएटर हा त्यांचा मोठा आधार सध्या बंद आहे. ऑक्टोबर ते मार्च हा जत्रांचा मोठा सिझन असतो तोच नेमका गमावला गेला आहे.
एकूणच मनोरंजन क्षेत्राला असा मोठा फटका प्रथमच बसला असून अजूनही ही अडथळ्याची वाटचाल कधी बरे थांबणार याचे उत्तर नाही. मराठी चित्रपटाला पुन्हा चांगले दिवस आणण्यासाठी मुंबई पुणे मुंबई, नटसम्राट, कट्यार काळजात घुसली, सैराट, फत्तेशिकस्त अशा चित्रपटांची गरज आहे, तर हिंदी चित्रपटासाठी गर्दी व्हावी म्हणून उरी, अंधाधुन, राझी, हायवे अशा चित्रपटांची गरज आहे. चित्रपटाची गुणवत्ता महत्वाची आहे, स्टार कास्ट नाही हे ‘बाॅम्बे वेल्वेट’, ‘कलंक’, ‘ठग्ज ऑफ हिन्दुस्तान’ अशा चित्रपटांच्या अपयशाने अधोरेखित केले आहे.
साधारण सप्टेंबर ऑक्टोबरपासून सर्व प्रकारची काळजी घेत शूटिंग सुरु झाले. तरी त्यात अनेक अडथळे आहेतच. विदेशी शूटिंगला जावे तर त्यावर मर्यादा आल्या आहेत. अगदी सुरुवातीला कलाकारांच्या वयाची अट होती आणि त्यामुळे वरिष्ठ कलाकारांच्या सहभागाचे काय असा प्रश्न निर्माण झाला. तो सोडवला तर चला हवा येऊ द्या, कपिल शर्मा शो यामध्ये प्रेक्षकांचा सहभाग बंद झाला आहे. खरं तर ती ‘ऑन द स्पाॅट’ प्रतिक्रिया खूप उत्साहजनक असते. मराठीचे काही इव्हेन्टस झाले. मराठी फिल्म फेअर पुरस्कार सोहळा रंगला. काही मराठी मनोरंजन उपग्रह वाहिन्यांचे इव्हेन्टस झाले.
नवीन फॅशनेबल ड्रेसमध्ये मराठी सेलिब्रेटिज आले. त्यांनी छान छान मुलाखती दिल्या. काहींच्या ड्रेसेसची चर्चा रंगली. पण तरी पन्नास टक्के प्रेक्षकसंख्या असल्याने डान्स आणि स्कीटला रिस्पॉन्सही तसाच मिळाला. खरं तर असे छानछोकी इव्हेन्टस आणि फिल्मी गुलाबी बदामी पार्ट्या म्हणजे एकाच वेळेस अनेकांना भेटण्याची, बातमी काढण्याची तर एखादी बातमी सोडण्याची छान संधीच. पण त्यालाच जर ब्रेक लागला असेल तर नवीन गाॅसिप्स मिळणार कसे? कोरोनाने मनोरंजन क्षेत्राच्या अनेक गोष्टींवर बंधने आणली हो. त्यातल्या त्यात समाधान म्हणजे, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात मराठीचा ठसा उमटला. हे एक प्रकारचे टाॅनिकच ठरले.
सध्याचा इंटरव्हल थोडासा शिथिल झाला आहे, गरज आहे ती वर्ष दीड वर्षापूर्वीच्या सामाजिक, सांस्कृतिक वातावरणाची…..