महाराणी येसूबाईंच्या भूमिकेतले अमृता खानविलकरचे फोटो व्हायरल
यामुळे अभिनेता धर्मेंद्रला घरापर्यत पायपीट करावी लागली…
अभिनेता धर्मेंद्र (Dharamendra) याला सुरुवातीपासूनच सिनेमाची प्रचंड आवड होती. आपण देखील सिनेमात जाऊन हिरोचे काम करावे असं त्याला कायम वाटत असे. या आवडीतूनच तो पंजाबमधून मुंबईला आला. तो काल होता पन्नासच्या दशकाच्या मध्याचा. इथे एका टॅलेंट हंट स्पर्धेत त्याने भाग घेतला आणि त्यात तो जिंकला देखील! ही स्पर्धा आयोजित करणाऱ्या निर्मात्यांपैकी एक होते अर्जुन कुमार हिंगोराणी. त्यांनी धर्मेंद्रला त्यांच्या आगामी ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटात नायकाची भूमिका दिली. यासाठी त्याला दीड हजार रुपये मानधन द्यायचे ठरले. धर्मेंद्र (Dharamendra) पंजाबतून जेव्हा मुंबईला आला होता त्यावेळी तो विवाहित होता पत्नी आणि छोट्या मुलासहित (सनी देओल) मुंबईत तो राहत होता. त्यावेळी त्याचा स्ट्रगल प्रचंड होता. कारण या तुटपुंज्या पैशांमध्ये मुंबईत राहणं खूप अवघड होतं. दीड हजार रुपये मानधन जरी ठरला असलं तरी एक रकमी कधीच मिळत नव्हतं. कधी वीस रुपये कधी पन्नास रुपये तर कधी शंभर रुपये अशा स्वरूपात ते पैसे मिळत होते. धर्मेंद्र (Dharamendra) मोठ्या काटकसरीने संसार करत होता. लहान मूल, त्याचा दुधाचा खर्च, औषधाचा खर्च, येणे जाण्याचा खर्च यातून त्याचा अक्षरशः पिट्टा होता. त्यावेळी तो माटुंग्याला राहत असे. या सिनेमाचं शूटिंग बांद्रा येथे मेहबूब स्टुडिओमध्ये होत होते. त्याकाळात बारा पैसे बेस्टचे तिकीट होते. रोज त्याचे दोन आणे आणि बसच्या तिकिटाला खर्च होत असत.
एके दिवशी त्याच्याकडे फक्त चार आणे होते. आता घरी जायचे आणि उद्या सकाळी परत यायचे यात सर्व पैसे खर्च होणार होते. त्यामुळे त्याने निर्मात्याकडे काही पैसे उचल देण्याची मागणी केली. निर्माते म्हणाले,” ठीक आहे. उद्या आपल्या इथे एका गाण्याचे रेकॉर्डिंग होणार आहे. या रेकॉर्डिंग नंतर आपण वादकांना लगेच पैसे देत असतो. त्यावेळी त्यांच्यासोबतच तुला देखील काही पैसे द्यायला मी सांगतो!” अशा पद्धतीने त्यांनी त्यांच्या अकाउंटंटला तिथे बोलावून उद्याच्या रेकॉर्डिंग नंतर धर्मेंद्र (Dharamendra) देखील काही पैसे देण्याचे सांगितले. धर्मेंद्र घरी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळीच अकरा वाजता तो पुन्हा स्टुडिओमध्ये आला. त्या दिवशी शूटिंग नव्हते; परंतु त्याला पैसे मिळणार होते म्हणून तो आनंदात होता. परंतु बघतो तर काय रेकॉर्डिंग स्टुडिओला कुलूप होते! धर्मेंद्रला खूप आश्चर्य वाटले. एवढ्या लवकर रेकॉर्डिंग संपले की काय? असे त्याला वाटले. म्हणून त्याने तिथल्या गुरख्याला त्याबाबत विचारले. त्याने सांगितले की,” आजचे रेकॉर्डिंग कॅन्सल झाले आहे. कारण आज ज्या गायकाचे रेकॉर्डिंग होते, त्याचा आवाज बसल्यामुळे आजचे रेकॉर्डिंग कॅन्सल झाले आहे!” धर्मेंद्र अक्षरशः गर्भगळीत झाला. कारण खिशात आता फक्त एक पैसा होता आणि आज त्याला कुठलेही पैसे मिळणार नव्हते . तो तिथेच पटकन खाली बसला. त्याला भोवळ आली. गुरख्याने त्याला त्याच्या जवळची भाजी भाकरी खायला दिली. धर्मेंद्र (Dharamendra) सावरला. त्याने तिथे पोटभर पाणी पिले आणि बांद्रा हून माटुंगा पर्यंत अक्षरशः चालत चालत संध्याकाळी घरी गेला.
घरी बायकोला परिस्थिती सांगितली. तिने देखील त्याला सांभाळून घेतले. ती रात्र त्यांनी उपाशी पोटी काढली. काळ कधीच कायम सारखा राहत नाही. धर्मेंद्रचा हा चित्रपट प्रदर्शित झाला फारसा चालला नाही पण धर्मेंद्र सर्वांच्या लक्षात राहीला. हळूहळू धर्मेंद्रला (Dharamendra) चित्रपट मिळत गेले आणि पुढे काही वर्षात असतो आघाडीचा अभिनेता बनला! १९७१ साली विविध भारतीवर विशेष जयमाला या कार्यक्रमात एकदा धर्मेंद्र आला होता. फौजी लोकांसाठी असलेल्या या कार्यक्रमात तो आला होता त्याने त्याच्या आवडीची गाणी या कार्यक्रमात लावली आणि हा किस्सा देखील सांगितला. त्या दिवशी रेकॉर्डिंग कॅन्सल झाल्यामुळे त्याचे जे काही हाल झाले ते त्यांनी त्यामध्ये व्यक्त केलं. त्याने या कार्यक्रमात हे देखील सांगितले की ,”तुम्ही फौजी बांधव तर कायम अशा संकटाचा सामना करत देशाचे रक्षण करत असता.”
=====
हे देखील वाचा : ‘करवा चौथ’ मुळे अभिनेता जितेंद्रचे वाचले प्राण!
====
खरी गंमत पुढेच आहे. कार्यक्रम संपला आणि लगेच धर्मेंद्रच्या घरचा फोन खणखणला. फोनवर बोलणारी व्यक्ती म्हणाली,” मित्रा मी आता तुझा कार्यक्रम ऐकला. मला माफ कर!” धर्मेंद्रने विचारलं,” आपण कोण बोलताय?” त्यावर त्या व्यक्ती ने सांगितले,” आता या कार्यक्रमात तू जी आठवण सांगितली आणि ज्या गायकाच्या आवाज बसल्यामुळे रेकॉर्डिंग कॅन्सल झालं होतं तो गायक मी होतो! तुझ्या त्रासाला मी जबाबदार होतो. त्या वेळेला मला कळालं नाही की माझ्या एका गोष्टीमुळे तुला किती शारीरिक आणि मानसिक त्रास झाला. मित्रा मला माफ करशील का?” आता थक्क व्हायची पाळी धर्मेंद्रची होती. तो म्हणाला ,” आपण कोण बोलताय?” तिकडून आवाज आला,” अरे मित्रा मी मुकेश बोलतोय!”
नंतर दोघे बराच काळ फोनवर बोलत राहिले. नंतर धर्मेंद्रच्या (Dharamendra) लक्षात आलं ते गाणं होतं ‘मुझको इस रात की तन्हाई मे आवाज न दे”. या गाण्याचे रेकॉर्डिंग त्या दिवशी कॅन्सल झाले होते. या गाण्याच्या ध्वनिमुद्रणाला मुकेश त्या दिवशी येवू शकले नाही आणि धर्मेंद्रला त्यामुळे तब्बल चार तास पायपीट करावी लागली होती. मुकेश खूप संवेदनशील कलाकार होते त्यांच्या मनात ही चुटपूट खूप वर्ष लागून राहिली होती!