bobby : आर केच्या ‘बॉबी’ सिनेमाच्या पंजाबमधील डिस्ट्रीब्यूशनचा किस्सा!

Chhaava review : कसा आहे विकी कौशलचा ‘छावा’?
गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असणारा ‘छावा‘ (Chhaava) हा चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात ‘तुफान’ उत्सुकता आहे. चला तर पाहुया, नेमका कसा आहे ‘छावा’? (Chhaava review)
अजय देवगण (Ajay Devgn) याच्या दमदार आवाजात मराठ्यांचा इतिहास सांगत, चित्रपटाची सुरुवात होते तीच, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनाच्या बातमीने! त्यांच्या निधनामुळे आनंदी झालेल्या औरंगजेबाच्या तोंडून, “शिवाजी महाराजांसारखा शत्रू आता पुन्हा मिळणार नाही” हे काहीसं खेदजनक वाक्य निघतं आणि त्याचक्षणी, या चित्रपटात एरवी फारश्या समोर न आलेल्या गोष्टी पाहायला मिळतील अशी खात्री वाटते. महाराजांच्या निधनाने आनंदीत झालेल्या औरंगजेबाचा हा आनंद फार काळ टिकत नाही, कारण तेवढ्यात सुरू होते, ती ‘बु-हाणपूर’ची लूट! यानंतर उध्वस्त झालेलं बु-हाणपूर, त्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी मराठ्यांच्या रयतेवर मुघलांकडून करण्यात आलेला हल्ला, त्यानंतर पार पडलेला छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा, आपल्या शूरता व पराक्रमाने त्यांनी जिंकलेल्या अनेक लढाया आणि सरतेशेवटी, औरंगजेबाच्या कैदेत असेपर्यंतचा काळ हे सारं काही दाखवणारा चित्रपट म्हणजे ‘छावा‘! (Chhaava review)

कथानकाच्या दृष्टीने सांगायचं झालं तर, चित्रपटाचा फर्स्ट हाफ काहीसा फसला आहे. शंभू महाराजांच्या एंट्रीने सुरू झालेली लढाई मध्यांतर होईपर्यंत सुरूच आहे की काय असं वाटत राहतं. चित्रपटात दाखवण्यात आलेल्या घटनांचा कालखंड, सनावळ्या व स्थळ या गोष्टी नमूद न केल्याने आणि फारसे डायलॉग्सही नसल्यामुळे घटनांचे संदर्भ लावणं कठीण जातं. गाणी व काही प्रसंगातून कथानकाची सांगड घालण्याचा प्रयत्न, ती कथा व्यवस्थीत ‘मांडण्यात’ कुठेतरी कमी पडला आहे.
मध्यंतरानंतर मात्रं, चित्रपटाने चांगला वेग पकडला आहे. यात संवाद असल्यामुळे नेमकं काय कथानक सुरू आहे याचा अर्थ लागतो. चित्रपटातील शेवटची ४५ मिनीटे ही अत्यंत जमेची बाजू म्हणावी लागेल. या ४५ मिनीटांत एकामागोमाग घडलेले प्रसंग व त्यातील दमदार डायलॉग्स प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी झाले आहेत.

अभिनयाच्या बाबतीत सांगायचं तर, विकी कौशल (Vicky Kaushal) छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका अक्षरशः जगला आहे. या भूमिकेसाठी त्यानं स्वतःवर घेतलेली मेहनत क्षणोक्षणी दिसून येते. प्रत्येक वाक्यातले वेगळे हावभाव, करारी नजर, डोळ्यांची भाषा, आवाजातील पकड, उत्तम संवादफेक आणि जबरदस्त ॲक्शन सीन्स या सर्व गोष्टींतून एक उत्कृष्ट अभिनेता म्हणून त्यानं पुन्हा एकदा आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं आहे. ‘अक्षय खन्ना‘ ने (Akshaye Khanna) साकारलेला क्रुरकर्मा औरंगजेब तर केवळ लाजवाब ! तो या भूमिकेत इतका चपखल बसला आहे की, त्याला पाहताना दुस-या कोणत्याही अभिनेत्याचा त्या भूमिकेसाठी विचारही करवत नाही. ब-याचश्या प्रसंगात तो फक्त डोळ्यांतून बोलला आहे.
महाराणी येसुबाईंच्या भूमिकेत रश्मीका मंदानाला (Rashmika Mandanna) पाहणं अतिशय निराशाजनक वाटतं. ओढूनताणून केलेल्या अभिनयामुळे येसुबाईंच्या भूमिकेत ती तितकीशी प्रभावी वाटत नाही. आशुतोष राणा यांनी साकारलेले हंबीरराव, दिव्या दत्ता यांनी साकारलेल्या सोयराबाई व निलकांती पाटेकर यांनी साकारलेल्या धाराऊ या भूमिकाही उत्तम! विशेष उल्लेख करावा लागेल तो, विनीत कुमार सिंह याचा! त्याने साकारलेला ‘कवी कलश‘ सर्वाधिक भाव खाऊन जातो. शंभू महाराजांप्रती असलेली एकनिष्ठता, प्रेम व शेवटपर्यंत निभावलेली घट्ट मैत्री त्यानं पडद्यावर उत्तमरित्या दाखवली आहे. सुव्रत जोशी व सारंग साठ्ये यांना कान्होजी व गणोजी यांच्या भूमिकेत पाहताना त्या पात्रांचा अतिशय राग येणं ही खरंतर त्यांच्या अभिनयाची पोचपावतीच म्हणावी लागेल. शिवाजी वाळवेकर यांनी साकारलेले बहिर्जी नाईक व इतर गुप्तहेरांची पात्रंही उत्तम! बाकी, किरण करमरकर (अंताजी), संतोष जुवेकर (रायाजी), शुभंकर एकबोटे (धनाजी), आशिष पाथोडे (अंताजी) या कलाकारांनी आपापल्या भूमिकांना योग्य तो न्याय दिला आहे. (Chhaava review)
आता वळूया, काही तांत्रिक त्रुटींकडे!
एवढ्या मोठ्या कालखंडातील, वेगानं घडणाऱ्या अनेक घटना दाखविण्याची घाई केल्यानं दिग्दर्शकाचं स्क्रीनप्लेचं गणित काहीसं फसलं आहे. त्याचबरोबर, कोणत्याही चित्रपटाचं ‘संगीत’ हे, कथानक व प्रेक्षक यांच्यातील महत्वाचा दुवा मानलं जातं. परंतु, या चित्रपटातील काही गाण्यांत वापरण्यात आलेले शब्द व बॅकग्राऊंड स्कोअरला काहीसा आधुनिक टच असल्याचं ऐकताना जाणवत राहतं; त्यामुळे, केवळ त्या प्रसंगासाठी ते अयोग्य वाटू शकतात. बाकी, ‘तुफान’ व चित्रपटाचं थीम साँग श्रवणीय ! शंभू महाराजांनी बु-हाणपुरच्या लुटीतील लढाई दरम्यान अचानक साऊथ चित्रपटात दाखवतात तशी लांब उडी मारणं, सोयराबाईंचं पान खाणं, राज्याभिषेकाप्रसंगी शंभू महाराजांचं हत्ती किंवा पालखीतून न येता नुसतं चालत येणं, नगा-याऐवजी ढोलताशाच्या गजरात त्यांचं स्वागत होणं, असे प्रसंग प्रेक्षक, शिवप्रेमी व इतिहासप्रेमींना खटकू शकतात. (Entertainment mix masala)

दिग्दर्शन, छायांकन आणि नरेशन या तिन्ही जबाबदाऱ्या लक्ष्मण उतेकर यांनी अगदी लिलया पेलल्या आहेत. चित्रपटात वापरलेले VFX एक वेगळीच छाप पाडतात. विशेषत: शंभू राजे व सिंहाच्या लढाईचा प्रसंग! या प्रसंगात वापरण्यात आलेले VFX कमाल आहेतच पण, विकी कौशलचे हावभाव व बॉडी लॅंग्वेज त्यानं या भूमिकेसाठी किती अभ्यास केला आहे, हे देखील सांगून जाते. चित्रपटात सुरूवातीपासून शेवटपर्यंत वेशभूषेवर दिलेला भर प्रकर्षाने दिसून येतो. बाजारपेठेतील लूट, शंभू राजे यांचं आईच्या आठवणीनं भावूक होणं, शंभू राजे-अकबर यांची भेट व औरंगजेबाची दख्खनकडे कूच, शंभू राजेंची कैद हे ठराविक प्रसंग चित्रपट संपला तरीही, मनात घर करून राहतात. (Bollywood mix masala)
याशिवाय, मुघलांचा दरबार व मराठ्यांचा राजवाडा, ते सजवताना वापरलेलं कलर कॉम्बिनेशन, दागदागिने, बाजारपेठ, जंगलातील दृश्ये, लढाईत वापरण्यात आलेली शस्त्रं, व इतर अनेक प्रसंगांत दाखवण्यात आलेले बारकावे अतिशय उल्लेखनीय आहेत. शेवटच्या काही प्रसंगात अक्षय खन्ना यांचा केलेला मेकअप तर केवळ अफलातून! चित्रपटाचा क्लायमॅक्स व त्यात असलेले दमदार संवाद, ही आणखी एक जमेची बाजू म्हणावी लागेल. उगाच डायलॉग्सचा भडीमार न करता योग्य ठिकाणी योग्य ते संवाद वापरल्यामुळे ते प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवण्यात यशस्वी ठरू शकतात. तसेच, शेवटचा प्रसंग पाहताना अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. योग्य ठिकाणी सिनेमॅटिक लिबर्टीचा वापर केल्यामुळे ते प्रसंग प्रभाव पाडतात. (Chhaava review)
============
हे देखील वाचा : Chhaava : अॅडव्हान्स बुकिंगमध्येच ‘छावा’ची कोटींची दहाड
============
केवळ कलाकारांचा अभिनय व मनोरंजन म्हणून नाही तर, छत्रपती संभाजी महाराज यांचे शौर्य, त्यांचे आपल्या धर्माप्रती असणारे प्रेम आणि महाराजांचा अतोनात हाल होऊन झालेला शेवट याबद्दल फारसा माहित नसलेला इतिहास पाहण्यासाठी व तो पुढील पिढीपर्यंत पोहचावा यासाठी प्रत्येकाने ‘छावा’ एकदातरी चित्रपटगृहात जाऊन बघाच!
चित्रपट संपल्यावर प्रेक्षक पाणावलेल्या डोळ्यांनी बाहेर पडतील हे मात्रं निश्चित…!
‘कलाकृती मीडिया’ ‘छावा’ या चित्रपटाला देते आहे 3.5 स्टार!
— मधुरा शिधये