चॉपस्टिक्स : हरवलेल्या जगण्याचा शोध
चिनी खाद्यसंस्कृतीचं नाव घेताच सर्वप्रथम डोळ्यांसमोर येतात ते चॉपस्टिक्स. वीतभर आकाराच्या, समान उंचीच्या या दोन लाकडी काड्यांच्या एका निमुळत्या बाजूला गोल टोक असतं तर दुसरी बाजू जराशी चपटी, चौकोनी असते. चिनी मान्यतेनुसार, पदार्थ खाण्यासाठी वापरली जाणारी गोल बाजू ही स्वर्गाचं प्रतिक मानली जाते तर हातात असलेली चौकोनी बाजू पृथ्वीचं रूप मानली जाते. पण पृथ्वीवरून हा स्वर्ग गाठण्यासाठी सुरुवातीला बराच आटापिटा करावा लागतो. कधी हा स्वर्गीय घास पकडलाच जात नाही तर कधी हातातोंडाशी आलेला घास निसटून जातो. बरीच धडपड करून जेव्हा ‘अन्न हे पूर्णब्रम्ह’ ग्रहण केलं जातं तेव्हा ‘प्रयत्नांती परमेश्वर’ या सुविचाराचा प्रत्यय येतो.
हे नक्की वाचा: बाबू बँड बाजा: आस्था-अनास्थेची वाजंत्री
२०१९ला आलेली नेटफ्लिक्सची पहिली ओरिजनल हिंदी फिल्म ‘चॉपस्टिक्स’ (Chopsticks) असाच एक अनुभव देते. चित्रपटाचं नाव जरी चॉपस्टिक्स असलं तरी, हा कसलाही कुलिनरी ड्रामा नाहीय. ‘सी कंपनी’ आणि ‘क्या सुपर कूल है हम’ चित्रपटांचे दिग्दर्शक सचिन यार्डी यांची ही पहिलीच नेटफ्लिक्स फिल्म आहे.
निरमा सहस्त्रबुद्धे (मिथिला पालकर) एक मँडरीन ट्रान्सलेटर म्हणून एका टूरिस्ट एजन्सीसाठी काम करते. नुकतीच विकत घेतलेली तिची नवीकोरी i10 कार तिच्या चुकीमुळे चोरीला जाते. पोलीस चौकीत तक्रार द्यायला गेल्यावर तिला एका चोराकडून आर्टिस्ट (अभय देओल) बद्दल कळतं. कसलंही कुलूप उघडायची कला अवगत असलेला आर्टिस्ट एकीकडे त्याचा स्वयंपाकाचा छंदही जोपासत असतो. निरमाच्या निरागसपणामुळे आर्टिस्ट तिची गाडी शोधायला मदत करतो. तपासाअंती ती गाडी फैयाजभाई (विजय राज) ह्या कुख्यात गँगस्टरकडे असल्याचं कळतं. किशोरकुमारचा चाहता असलेला फैयाजभाईचा त्याचा फायटर बोकड ‘बाहुबली’वर प्रचंड जीव असतो. बाहुबलीचा जीव मात्र निरमाच्या i10मध्ये अडकलेला असतो. फैयाजच्या मगरमिठीतून आर्टिस्ट आणि निरमा ही गाडी सोडवतात की नाही याचं उत्तर ‘चॉपस्टिक्स’ देतो.
मिथिलाने या चित्रपटात एका वेंधळ्या,भित्र्या स्वभावाची युवती साकारली आहे जिला आत्मविश्वास वाढण्यासाठी सेल्फ-हेल्पचे लेक्चर्स ऐकावे लागतात. आपला ॲक्सेंट नीट नसल्याने करिअरमध्ये येणारे अडथळे सहन करावे लागतात. मिथिलाची ही भूमिका ‘लिटल थिंग्ज’ आणि ‘गर्ल इन द सिटी’पेक्षा पूर्णतः वेगळी आहे आणि तिने ती अगदी उत्तम वठवली आहे. अभय देओलने साकारलेला आर्टिस्ट कुठल्याही अँगलने सणकी, तुसडा वाटत नाही. आर्टिस्टची ओळख एक ठक म्हणून करून दिली गेलेली असली तरी त्याचं चातुर्य दाखवण्यासारखे फारच कमी प्रसंग असल्याने हा रोल फिका वाटतो. विजय राजच्या वाट्याला इथंही गँगस्टरचीच भूमिका आलेली असूनही बोलीभाषेच्या जोरावर त्याने थोडंफार वेगळेपण त्या भूमिकेत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. इतर भूमिकांमध्ये अरुण कुश्वथ, अचिंत कौर, राजेंद्र शिसाटकर, इत्यादी कलाकारांना फारसा वाव मिळालेला नाही.
नेटफ्लिक्सवर रिलीज होणाऱ्या चित्रपटांना बॉक्स ऑफिसशी काही घेणंदेणं नसतं. त्यांना फक्त चांगला कंटेंट हवा असतो, जो प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी होईल. ‘चॉपस्टिक्स’ याबाबतीत प्रेक्षकांचा अपेक्षाभंग करतो. चित्रपटाचं नाव आणि कथा या दोघांचाही संबंध ओढूनताणून बसवल्यासारखा वाटतो. निरमाला धैर्य आणि आत्मविश्वासरुपी चॉपस्टिक्सची मदत घेऊन योग्य वेळी योग्य संधी निवडायची आहे असं काहीसं चित्र प्रेक्षकांसमोर मांडायचा प्रयत्न दिग्दर्शकाने केलेला आहे. लहानपणापासूनच मनात न्यूनगंड असलेल्या निरमाला तिची कार शोधताना जे बरेवाईट अनुभव येतात, त्यातून ती तिचं आजवर हरवलेलं खरं जगणं शोधायचा प्रयत्न करताना दिसते.
हे देखील वाचा: त्रिभंग: ‘आई’पण तीन पिढ्यांचं
मिथिला पालकर (Mithila Palkar) सारखा वेब सिरिजेसच्या दुनियेतला प्रसिद्ध चेहरा, अनेक उत्तमोत्तम फिल्म्सचा भाग असलेला अभय देओल आणि आपल्या विविधरंगी भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे अभिनेते विजय राज असे तीन हुकमी एक्के हातात असूनही सक्षम कथा-पटकथेअभावी हा पत्त्यांचा डाव सपशेल कोसळला आहे. नेटफ्लिक्सवर कॉमेडी ड्रामा असा टॅग वागवत असला, तरीही हा चित्रपट विनोदनिर्मिती करण्यात अयशस्वी ठरला आहे. मात्र, तुम्ही जर मिथिला पालकर किंवा विजय राजचे चाहते असाल, तर हा अनुभव नक्कीच चुकवू नका.